दैनंदिनी – २५, २६, २७ आणि २८ सप्टेंबर २००९


भांडणाची सुरुवात नाही तर भांडणाचा शेवट महत्वाचा असतो! कदाचित असंख्य जोडप्यांना याची मज्जा लगोलग कळून येईल… एखाद्या सरोवरामध्ये एकाचवेळी असंख्य कमलपुष्पांनी उमलल्यानंतरचा अत्यानंद काय असतो हे आपला प्रियकर भांडल्यानंतर शांत होताना हळूच हसताना कळून जाते… पहाटेच्या समयी नवजीवनाची सुरुवात कराणारी प्रभा डोंगरावरुन घरंगळत जेव्हा फटीफटीतून लोकांच्या आयुष्यात प्रवेश करते त्यावेळचे प्रसन्न वातावरण ओंजळीत आल्याची भावना त्यावेळेला मिळते! भांडताना उफ़ाळलेला मनसागर जेव्हा किनार्‍याच्या पायाशी येऊन शांतपणे एखाद्या कुत्र्याच्या पिल्लाप्रमाणे खेळू लागतो… कोसळणार्‍या पावसाची भीती जाऊन जेव्हा त्यामध्ये भिजण्याचा मोह होतो तेव्हा तोच पाऊस आपला सखा सोबती वाटतो.. अगदी तसेच या भांडणांचे नाही का.. आणि म्हणूनच भांडणाचा शेवट महत्वाचा ठरतो.. नदीमध्ये दगड मारून पाणी गढुळ करण्यापेक्षाही शांतपणे किनार्‍याला बसून पाण्याचे तरंग अंगावर अनुभवणे जास्त मनोहारी असते! अशीच काहीशी भांडणे आपली आपल्याशीही होतात.. मग उत्तर कुठे शोधावे कळत नाही…. मन नुसते सैरभैर असते.. अगदी एखादा दिवा जसा भकभक करत जळत असतो त्याप्रमाणे… त्याच्या वातीवर जर थोडीशी काजळी राहीली तरी तो जोरात तेजाळतो त्या काजळीस जाळून पुन्हा मंदपणे जळू लागतो.. बस्स! आपलेही असेच, जेव्हा आपल्या नित्य व्यवहारांमध्ये जगत असताना वा अध्यात्मात वावरत असताना जेव्हा प्रश्नांची काजळी येते.. किंवा आपल्याच विचारातून प्रश्न निर्माण होतात तेव्हा सैरभैर अवस्था होते व त्या दिव्याप्रमाणे तेजाळून उठतो… पण त्याचवेळेला त्या जळण्यावर विश्वास हवा.. तेवढेच काही क्षण तेजाळून घेण्याची तयारी हवी! तेव्हाच जर नांगी टाकली तर आपण त्या काजळीसवे जगू व कालांतराने विझणे हाती येईल… बाकी काही नाही!

वाट सोडून चालावेसे वाटणे नवीन नाही… प्रत्येकालाच नवीन वाट तयार करावीशी वाटते… काही जणांना तो आशिर्वादही असतो.. की ते जिथे उभे राहतात तिथे वाट सुरू होते… मग अशावेळी नव्या वाटेची वळणेही नवीच असणार.. कुणीही, कधीही न अनुभवलेली.. त्याचा कोणताही पूर्वानुभव ऐकीवात नसेल ना कुठे कुणाच्या संदर्भात… तेव्हा या नवीन वळणांत स्वतःला घट्ट बांधून ठेवण्याची जबाबदारी देखील आपणच स्वीकारली पाहीजे… नवीन वाटा जशा लोकांना रुचत नाहीत तसेच नवीन वाटांना नवीन पावले रुचत नाहीतच.. तिथे परीक्षा घेतलीच जाते… कदाचित तिथे जबाबदारी असते ती मागून आपल्या पावलांवर पाऊल ठेवत येणार्‍या असंख्य वाटसरूंच्या भवितव्याची! आणि त्यामुळेच वाट आधी आपल्या नवखेपणाला पारखून घेणारच.. उगीचच भ्रमात वावरणार्‍या स्वप्नपाखरांनी नव्या वाटेचा ध्यास घेऊ नये… जिथे वास्तवाच्या चाबकाने पूर्वाश्रमीचे रटाळवादाचे कातडे सोलले जाते तेव्हाच तिथे भविष्याची नवीन सोनेरी कांती बहाल होते!

विश्वनिर्मितीपासून ते आजतागायत अंधाराचे मनोगत त्या रात्रीस उलगडले नाही… रात्र आपली त्या गुप्तधनाला पोटात घेऊन जगाच्या फेर्‍या करीत आहे… कदाचीत मर्यादित वेळेने तिला बांधले आहे.. ती अंधाराची उकल करण्याचा कदाचित रोज प्रयत्नही करीत असेल पण एकदा का तांबडं फुटलं की रात्रीस निघणे क्रमप्राप्त होते… अन ते गुप्तधन उजेडात नाहीसे होते… आपलेही असेच नाही का त्या रात्रीप्रमाणे… आपणही तर गुप्त धनाचा हंडा घेऊन जगतो आहोत… कधी कधी त्याला शोधण्याचा मर्यादित प्रयत्नही करतो पण आपला पाठपुरावा कुठेतरी कमी राहतो… कधी अट्टहासाने बसावे म्हंटले तर ध्यान लागेपर्यंत रोजंदारीची कामे मागे लागतात व पुन्हा त्या रात्रीची जाणीव संपून या भौतिकाच्या उजेडात आपण लख्ख होतो… या गुप्त धनाची खासीयतच अशी की ते उजेडात पहायला गेले तर कधीच हाती लागणार नाही, जवळ असूनही ते खूप लांब असते… ‘गुप्त धन’ म्हणजे काय हा प्रश्न येणं सहज शक्य आहे.. पण या प्रश्नाचे उत्तर तोच सांगू शकेल जो त्याचा अधिकारी आहे.. अन त्याच्याकडे त्यासाठीच अन केवळ त्यासाठीच धाव घेतली पाहीजे… जसे तहान लागल्यानंतरच पाण्याचा शोध घेतला जातो.. तसेच या गुप्त धनाचे आहे.. जेव्हा ते हवे आहे याची तहान जागृत होईल त्याचवेळी ते पाणी पिल्यानंतरची येणारी आकंठ संतृप्त अवस्था नखशिखांत अनुभवता येईल…

गेले चार दिवस खरेतर दैनंदिनी नाही लिहीली… लिहावेसेही वाटले पण मग वेळ जुळून आली नाही किंवा काहीतरी कारणास्तव पुढे जाते राहीले… नुसते श्वास घेणे म्हणजे जगणे का? की नुसते एका दिवसामागून दुसर्‍या दिवसाकडे जाणे म्हणजे जगणे का? कळत नाही… गेल्या चार दिवसात हे प्रश्न बर्‍याचदा टपली मारुन गेले.. सण येतात नी जातात.. पण एका सणाला केलेला संकल्प दुसर्‍या सणाला किती पूर्ण झालाय याचा दुर्दैवाने कधीही अंदाज घेतला जात नाही.. श्रीरामाच्या रुपाने भगवंताने देहात असताना रावणाचा खातमा केला पण त्यानंतर आपल्यातील राम कितीवेळा जागृत झाला हा प्रश्न वादातीत आहे! गेले चार दिवस संथ होते… निवांत होते… ओल्या मातीच्या भांड्यावरून कुंभाराने सफाईने ओला हात फिरवावा व त्याला शेवटचा हावा तो आकार मिळावा त्याप्रमाणे होते… ओल्या तांदळाच्या भाकरीवर तव्यावर टाकून पाण्याचा हात फिरवून ज्याप्रमाणे आपण भाकरीच्या भेगा मिटवतो त्याचप्रमाणे हे चार दिवस होते…. प्रभु आशिर्वादाचा ओला हात या भेगाळलेल्या आयुष्यावर अशाच रीतीने फिरला व सारेकाही सुरळीत असल्याची खात्री झाली… तरूणाईचा काळ हा उमेदीचा असतो यात काही शंकाच नाही.. पण त्याचवेळी मनाला योग्य त्या संस्कारांचा अभिषेक झाला नाही तर भविष्याचा मनोरा कच्चा बनतो वा त्याचा पाया ठिसूळ होतो… परंपरा म्हणजे खुळचट थोतांड नव्हे… ज्यांना परंपराच नाही त्यांनी म्हणजेच पाश्चिमात्यांनी अंदाधुंदीने वागले तर नवीन ते काय! पण तेच जर भारतीय तरुणाई परंपरा नाकरुन, तिला लाथ मारुन या पाश्चिमात्यांचे अनुकरण केले तर त्यांच्यासारखे दुर्दैवी आणखी कोणीच नाही! सध्या हे दृश्य अगदी रोजचे झाले असले तरी एक मात्र वाटत राहते… येणारी पिढी कधीतरी आपल्या परंपरेचा ध्यास घेईल.. त्यांना प्रश्न पडतील की इथे ज्ञानेश्वर माऊली कसे काय निर्माण झाले? इथे संत रामदास स्वामी, छत्रपती शिवाजी, लोकमान्य, सावरकर कसे काय उदयास आले?.. तेव्हाच आणि तेव्हाच खरे “सीमोल्लंघन” होईल आणि विजयादशमी साजरी होईल!

About these ads

2 Responses to दैनंदिनी – २५, २६, २७ आणि २८ सप्टेंबर २००९

  1. Ajay says:

    Boss , manla tula, ekdam fundu lihlas ahes, kahi oli samjun ghenysathi punha vachyav laglya mala.

  2. medhasakpal says:

    १. जिथे वास्तवाच्या चाबकाने पूर्वाश्रमीचे रटाळवादाचे कातडे सोलले जाते तेव्हाच तिथे भविष्याची नवीन सोनेरी कांती बहाल होते!

    -> १००% सत्य.. अनुभवांनी मनात खळबळ माजवल्याशिवाय अशी वाक्यं स्फुरत नाहीत.. अगदी पटले..

    २. ” नवीन वाटा जशा लोकांना रुचत नाहीत तसेच नवीन वाटांना नवीन पावले रुचत नाहीतच.. तिथे परिक्षा घेतलीच जाते… कदाचित तिथे जबाबदारी असते ती मागून आपल्या पावलांवर पाऊल ठेवत येणार्‍या असंख्य वाटसरूंच्या भवितव्याची! आणि त्यामुळेच वाट आधी आपल्या नवखेपणाला पारखून घेणारच.. ”

    -> कधी अशा दृष्टीने विचारच केला नाही जात.. वाटाही आपली परिक्षा घेत असतील असे लक्षातच येत नाही.. केवळ एकांगी विचारात पुढे चालत असतो आपण.. अन मग हा असा वेगळा विचार खाडकन डोळे उघडून जातो.. प्रश्न आपोआप सुटत जातात..

    ३. आपणही तर गुप्त धनाचा हंडा घेऊन जगतो आहोत… कधी कधी त्याला शोधण्याचा मर्यादित प्रयत्नही करतो पण आपला पाठपुरावा कुठेतरी कमी राहतो…

    -> खरेय..
    एकामागून एक विचारांच्या मोत्यांची उधळणच आहे आजच्या दैनंदिनीत.. ह्या हातांची ओंजळ अपुरी आहे ते गोळा करण्यासाठी….

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

Follow

Get every new post delivered to your Inbox.

%d bloggers like this: