शक्ती – दैनंदिनी – १२ ऑक्टोबर २००९
आपलंही रक्त उसळतं, उफाळून येतो जोश, त्वेषामध्ये काहीतरी होणार असं वाटत असतं, रागाने लालबुंद असतो आपण, रागाला मोकळी वाट नाही करून दिली तर काहीतरी आकरीत घडणार हे नक्की असतं… मुठी आवळल्या जातात बर्याचदा, हात शिवशिवतात कित्येकदा, कितीतरी वेळा दरवाजे एकमेकांवर आदळले जातात, हातातली गोष्ट फेकून दिली जाते, समोरच्याला नाही नाही ते बोलले जाते, सगळ्या यंत्रणेवर डोकं फिरतं, काम करावंसं वाटत नाही, घुसमटल्यासारखं होतं, मनाच्या विरूद्ध जगणं नकोसं वाटतं, गाडीवर दूर निघून जावंसं वाटतं, शांतता खायला उठते अन गोंधळ, कल्लोळ नकोसा वाटतो, आतमध्ये काहीतरी बाहेर येण्यासाठी वाट शोधतंय पण काय करायचं ते कळत नाही… होते अशी अवस्था, प्रत्येकाची कधी ना कधी तरी अशी अवस्था असते… पण मग याचा अर्थ काय?? याचा अर्थ हाच की, आपल्यामध्येही ती उर्जा आहे, आपल्यामध्येही ती धग आहे, ती आग आहे, ती शिवबाने घेतलेली प्रतिज्ञा अजूनही जिवंत आहे, क्रांतिकारकांनी ज्या उर्जेवर भरोसा ठेऊन शत्रुला अंगावर घेतले ती अजूनही आपल्यात आहे, जिच्या जोरावर जगातील प्रत्येक क्रांती झाली, जिच्या जोरावर कितीतरी सत्तांची उलथापालथ झाली ती उर्जा, तीच अजूनही तुमच्या आमच्यात आहे! फरक एवढाच की आता वेगवेगळ्या वेष्टनांमध्ये या उर्जेला दडपून टाकले आहे… या उर्जेला लागतो तो मुक्त, मोकळा, बिनधास्त वावर! जे आहे, जसे आहे ते ठणकावुन सांगण्याचा विश्वास, निक्षून समोरच्याची नजर भेदून जाईल असा आत्मविश्वास! दुर्दैवाने या आत्मविश्वासाला आज भीतीने ग्रासले आहे.. लोकांना उद्याची भीती असते… पण आजची काळजी नसते… फक्त उद्या जगण्यासाठी आज ढकलणे कुठपर्यंत योग्य आहे? हे तर जगातील असंख्य प्राणी करतात मग आपल्यात अन त्यांच्यात फरक तो काय??
वेळीच शहाणे होणारे लांबचा पल्ला गाठतात व योग्य ठिकाणी पोहचतात.. पण वेळेला न जुमानता फक्त धावणारे उशिरा शहाणे होतात जेव्हा नको तो पल्ला गाठलेला असतो व नको तेवढ्या दूर पोहचलेलो असतो व तिथून परतणे शक्य नसते! आयुष्यात मला काय करायचेय? जे मी करतोय तोच माझा उद्देश आहे का? यात मी पूर्ण सुखी अन समाधानी आहे का? यापुढे २० वर्षानंतर जर मला हा प्रश्न आठवला अन तेव्हा माझे उत्तर वेगळे तर नसेल ना? आता आहे त्यातून मी काय करू शकतो? माझे माझ्या देशाप्रती माझ्या जन्मभूमीसाठी काही कर्तव्य आहे का? ज्यांनी फक्त जन्मभूमीच्या उद्धारार्थ ऐन-तारुण्यात बलिदान दिले त्यांच्याबद्दल मला किती माहिती आहे? त्या क्रांतिकारकांना, स्वातंत्र्यवीरांना येणार्या आपल्या पिढीकडून हेच सर्व अपेक्षित होते का? त्यांना जे अपेक्षित होते त्यादृष्टीने मी काहीतरी करतोय का? ज्यांच्या अनंत कष्टामुळे, साहसामुळे मी हा दिवस पाहतोय त्यांचे उपकार फेडण्यासाठी, त्यांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी मला आणखी काही करता येईल का? असे एक ना अनेक प्रश्न स्वतःला विचारून बघा, याची उत्तरे काय मिळतात ते बघा…. तारुण्य हे फुलण्याचे, बहरण्याचे अन उत्फुल्ल जोषाचे कारंजे असते, त्यामुळे आयुष्यातील कोणतेही महत्वाचे काम करायचे असेल तर त्याची सुरुवात या वयात होणे जास्त योग्य अन समर्पक!
आपल्या मनातील महाकाय शक्तीपासून आपणच अनभिज्ञ असतो अन बरेचदा असेच आयुष्य जगतो… माझा या शक्तीवर पूर्ण विश्वास आहे… ती प्रत्येकाच्या ठायी असते.. जर ती नसती तर आपल्या एकांतातील विचार एवढे उंच कधीच नसते झाले, आपली स्वप्नं कधीच आपल्या हातांच्या शक्यतेपलिकडे गेली नसती…..
आपल्याला कधी ना कधी तरी एखाद्या साहसासाठी आतुर करणारी ती ही शक्तीच असते.. अशक्यप्राय शक्यतांमधून आपल्याला शक्यतेच्या लाटेवर घेऊन किनार्याला येणारी लाट म्हणजेच ही शक्ती असते, कित्येकदा क्षणाच्या अंतराने आपला जीव वाचलेला असतो आणि ते करणारी ही शक्तीच असते! या शक्तीच्याच जोरावर जगातील सगळ्यात शक्तीशाली माणूस वेगळा ठरतो तर याच शक्तीच्या जोरावर इतिहास घडतो.. याच शक्तीच्या जोरावर स्वराज्य उभे राहते, याच शक्तीच्या जोरावर ५० वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा होऊनही सावरकर त्यांच्या उद्देशाप्रती ठाम राहतात, याच शक्तीच्या जोरावर बाबा आमटेंचे आनंदवन उभे राहते, याच शक्तीच्या जोरावर जगातील महदाश्चर्ये रुपास येतात! मित्रांनो या शक्तीवर विश्वास ठेवा.. या शक्तीची उपासना करा…. या शक्तीचे संवर्धन करा… ती प्रत्येकात आहे आणि त्याची जाणीव घ्या!!
कालच्या दिवसाला वरील विचारांच्या आंदोलनाचे वादळी स्वरुप होते.. भारतातील तरुणांकडे असलेली असीम ताकद पाहिली की मनाला वेगळाच उभार मिळतो… आजच्या तरुणांमध्ये तो जोष, तो त्वेष, ती उर्जा पुरेपूर आहे…. सध्या फक्त नोकरी, शिक्षण अन काम-धंदा यात अडकून पडल्याने मात्र या उर्जेचा यथोचित वापर होताना दिसत नाही अन तेव्हा मग थोडे कसेतरी वाटते… अहोरात्र घाण्याच्या बैलाप्रमाणे काम करणारे कितीतरी असंख्य तरुण पाहण्यात आहेत… फक्त ठराविक काम करून त्यांची विचारसरणी एकांगी होत आहे… लहानवयात भरमसाट प्रगती झाल्याने आत्मविश्वास तर आलाय.. पण बरेचदा तो फाजीलही वाटून जातो.. देव करो, अन लवकरच हा आत्मविश्वास देशाच्या उभारणीसाठी कारणीभूत ठरो एवढीच प्रार्थना!
=> (दैनंदिनी लिहित असताना जाणवले की प्रत्येक दैनंदिनी मधे काही ना काही नवे विचार सहज येत गेलेत.. काल वाटून गेले की दैनंदिनी मधे ज्या विषयाच्या अनुषंगाने विचार स्फु्रत जातात त्याचा समावेश दैनंदिनीच्या शीर्षकातही करावा.. अन आजपासून तशी सुरुवातही करतोय.. )


ase salsalte rakta je dainandini lihite te kranti ghadau shakat nahi fakta dambrya maru shakte !
Sdada
ऑक्टोबर 13, 2009 at 11:42 सकाळी
अनेकांना क्रांती म्हणजे काय? याचा विचार जरी करायला भाग पाडले तरी हे लिखाण धन्य झाले समजेन!
ज्यांच्याकडे असे रक्त आहे, ज्यांना कोणते रक्त क्रांतीसाठी योग्य आहे हे समजतेय अशांनी पुढे आले तरी भर्पुर होइल.. .. इतरांना येऊन मार्गदर्शन केले तरी खुप होईल… आपल्या उत्तराची वाट पहात आहे!
nileshsakpal
ऑक्टोबर 13, 2009 at 11:57 सकाळी
मस्तच
अगदी मनापासून आवडले
vikram
ऑक्टोबर 13, 2009 at 6:47 pm
vicharachya kititari sayankali likhananche suryoday pahile ! ata kruti dakhva ! yenar ka amchya sobat sukhala kantalun ? amchi krutishil kranti nasel nustya gappa ki nasel mage firnyachi sandhi ! kiti divas shabdanmadhe gurfatshil atmaparikshan kara apan aplya vicharanshi pramanik ahot ka ?
Sdada
ऑक्टोबर 17, 2009 at 1:02 pm
नुसते शब्दांच्याच जाळ्यात हरवायचे असते अन नुसतेच गम्माडी जीवन जगायचे असते तर लिहायला बरेच विषय होते अन आहेत.. गोडगुलाबीही शब्द असतात अन जहरीले खवळवणारेही शब्दच असतात…
शब्द दिसताहेत म्हणजे कृती नाहीये असा अर्थ का? कदाचित कृतीने शब्दाला जन्म दिला असेल? या वादळामध्ये पडणे ना कधी कुणाच्या हातात नव्हते अन नसेल… अन मागे फिरणारे या वादळाच्या जवळपासही येत नाहीत हेही माहिती आहेच!
आपल्याशी पुढे संवाद वाढवायला नक्की आवडेल… तुमच्यापर्यंत पोहचण्यासाठी ही शब्दांचीच नाव उपयोगी आली…! शब्द जोडू शकतात अन कृतीस भाग पाडुही शकतात!
nileshsakpal
ऑक्टोबर 17, 2009 at 1:19 pm