तेजोमय

समर्थे समर्थ करावे। तरीच समर्थ म्हणवावे। त्रैलोक्यास पडे ठावे। सामर्थ्य जयाचे॥ – समर्थ रामदासस्वामी

Archive for the ‘पुस्तक विवेचन’ Category

जोनाथन लिविंगस्टन सीगल

with one comment

पुस्तक: जोनाथन लिविंगस्टन सीगल (Jonathan Livingston Seagull)
लेखक: Richard Bach

jonathan_livingston_seagull-book-coverपुस्तक हातात घेताना काहीतरी चांगले वाचायला मिळेल.. तेवढाच काय तो विरंगुळा होईल अशी काहीशी अपेक्षा…… पण सरतेशेवटी आजतागायत केलेल्या विरंगुळ्यासाठी स्वतःचाच राग येऊ लागला होता… अन कदाचित इथून पुढच्या विरंगुळ्यासाठी काहीतरी दिशा मिळाली होती…. तीही एका समुद्रपक्षाकडून….

एका अशा समुद्र पक्षाची कहाणी..ज्याला आपल्या जगण्याचा खरा अर्थ उमगला होता.. आपण इथे असण्याचा खरा उद्देश गवसला होता.

ज्याप्रमाणे इतर पक्षी दिवसभर समुद्रावर घिरट्या घालुन बोटीवरील मासे एकमेकांकडून हिसकावत अन भांडत खात असतात अन त्याच्यातच आयुष्याची व्याप्ती संपवून टाकतात अन फक्त तेवढ्या एकाच कामासाठीच आपल्या पंखातील बळ वापरत असतात…. या एका पक्षाने ठरवलं होतं की खाण्यापेक्षाही खरं सुख कशात आहे तर ते आहे उडण्यात..या दैवी देणगीचं त्याने चीज करायचं ठरवलेलं असतं अन आकाशाशी नवीन नाते जुळवायचं हे नक्की केलेले असतं…सारी बंधनं झुगारुन उडायचं अन फक्त उडायचं ठरवलेलं असतं… त्याला वेड होतं वेगाचं.. आकाशात उंच उंच जाउन पुन्हा त्याच वेगाने समुद्राकडे झेपावत वार्‍याच्या वेगाला मागे टाकायचं होतं अन तो ते लिलया जमवतोही….

जर गरज ही शोधाची जननी आहे तर अस्तित्वाचा ध्यास, तडफड, स्वतःचा शोध, या क्षणी इथे असण्याचं प्रयोजन असे सारे प्रश्न गरज उत्पन्न करण्याची साधनं आहेत… ही गरज़ सगळ्यांना जाणवतेच असे नाही पण ज्याला जाणवते त्याला तो शोध घेताना सगळ्यांचे असणे भासत नाही.. पहायला गेलं तर वेड आहे न पाहिलेलं स्वप्न शोधण्याचं…. अन ते शोधून पूर्ण करण्याचं… बोटांच्या चिमटीतून एक डोळा झाकून आकाश पकडण्याचं….. एकरुपता अशीच हवी…तरच आकाशाला आवाहन देता येतं त्याच्याच सावलीत राहून… त्याच्याच सावलीत राहून त्यातल्याच आपल्याला शोधता येतं…. निसर्गाने दोन ठिसुळ ढगांच्यामध्ये लपवलेली विज्ञानी कोडी उलगडता येतात… नवीन विज्ञान तयार होते… अन झेप अशी घ्यावी.. पुन्हा पुन्हा घ्यावी की प्रत्येकवेळा पडल्यानंतर उभारण्याचा त्वेष द्विगुणित व्हावा… हा समुद्रपक्षी नेमकं हेच सारं शिकवून जातो…

आपल्यासमोर आपल्याला गर्दीतून ओढून नेऊन आकाशात उडण्याइतकं हलकं करुन जातो… अगदी आपल्यातील नकारात्मकतेचंही उर्जेत रुपांतर होऊन त्या आकाशयानाप्रमाणे आपण ती उडण्यासाठी वापरावी अशी बाजू दाखवून जातो… इथे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच वाक्य सांगावसं वाटतं.. ते म्हणजे.. “स्वप्न ते नाही जे तुम्हाला गाढ झोपेत दिसते.. स्वप्न ते जे तुम्हाला कधीच स्वस्थ झोपू देत नाही.”

अन जिथे ध्यास अन अशी गगनभेदी भरारी घेण्याची उर्मी असेल त्याला नक्कीच ‘तो’ साथ देतो.. म्हणजे दिशा दाखविणारा ‘सदगुरु’ लाभतो.. या समुद्रपक्षालाही असाच सदगुरु भेटतो जो त्याला त्याचीच नवी रुपं दाखवून जातो.. नवीन तपस्या नवीन स्वप्नं दाखवून जातो… अगदी ज्याप्रमाणे आपणा मानवालाही सदगुरुची गरज असते… कष्टांना योग्य दिशा देण्यासाठी किंवा योग्य दिशेकडे सुसाट सुटताना सकारत्मकतेची वा धैर्याची जाणीव करुन देण्यासाठी… आपल्या अंतरंगातील अधिष्ठानाची अनुभूती करुन देण्यासाठी…

अन अशी प्राप्ती झालेल्या समुद्रपक्षाला वेड लागते ते त्याच्यासारख्याच ध्येयवेड्या समुद्रपक्षांना योग्य मार्गदर्शन देण्याचं… असंच थव्यांनी वाळीत टाकलेल्या.. अन्नापेक्षाही स्वतःला शोधण्यात धन्य मानणार्‍यांना एकत्र सांधण्याचं… निर्लोभित होऊन मुक्त हस्ताने ज्ञान वाटून पूर्णत्वाकडे जाण्याचा हा मर्ग तो समुद्रपक्षी स्वीकारतो, अंगीकारतो…
कधी दुरुनही त्याची फडफड न ऐकलेल्या मला त्याच्यातील सदगुणांचा हा ओथंबलेला महासागर किंचीत लाजवून गेला… किंचीत म्हणणेही माझ्या मनुष्यस्वभावानुसारच, हे मी मात्र मान्य करतो… ज्याच्याकडे एका एका थेंबाची वाणवा त्याला हा महासागर किंचित तो कसा वाटू शकेल??

पण नक्कीच हा समुद्रपक्षी माझ्यातल्या न सापडलेल्या मला शोधण्यासाठी प्रवृत्त करुन गेला होता…

हे पुस्तक वाचल्यानंतर मला सुचलेला हा ’आकाशयात्री’.

akashayatri

http://www.orkut.com/AlbumZoom.aspx?uid=1907683316489248566&pid=39&aid=1

- १९ फेब्रुवारी २००८

Written by nileshsakpal

ऑगस्ट 21, 2009 at 8:33 pm

समिधा – माझ्या नजरेतून

with one comment

sadhana ‘समिधा’ वाचायला घेतलं…. वाचताना स्वतःला कुठेतरी सांडलं…. अन असं सांडलं की पुन्हा वेचण्याचाही मोह नाही झाला…

स्वर्गीय मुरली उर्फ बाबा आमटे यांच्या लोकविलक्षण कार्याची ओळख करुन देणे म्हणजे त्या सूर्यालाही तुझा प्रकाश पडतो असं काहीसं सांगण्यासारखं आहे… किंवा त्यांची ओळख करुन देण्याइतपत ओळख अजून मी कमावली नाही आहे…

बाबा म्हणजे समाजसेवेचा कल्पतरु अन त्या कल्पवृक्षाबरोबर असणारी वेल म्हणजेच श्रीमती साधना आमटे… पुस्तक वाचताना प्रसंगी ही वेल या कल्पतरुला कशी सावरु शकते याचीही प्रचिती येते… अगदी बाबांच्या बरोबरीने उभे राहून, एक उच्चभ्रू कुटुंबाचा वारसा असूनही दारिद्र्याला सौभाग्य मानून त्यातून इतर लाखो संसार फुलविण्याची किमया साधनाताईंची आहे…. अन ही किमया घडविण्यासाठी गेल्या ७६ वर्षापेक्षाही कालावधीतील घटनांचा यथोचित आलेख आपल्याला समिधा वाचताना पहायला मिळतो…
बाबांच्या कार्यात साधनाताईंचे योगदान म्हणजेच बाबांनी सुरु केलेल्या या अहोरात्र यज्ञातील अविरत तेजाळत राहणार्‍या समिधेसारखंच आहे याची खात्री पटते… पुस्तक वाचताना या यज्ञाच्या तेजाची उब आपल्यापर्यंत पोचली नाही तर नवलच..

अगदी पुस्तकाच्या सुरुवातीला बाबांच्या अन साधनाताईंच्या जगावेगळ्या प्रेमकहाणीचे वर्णन वाचताना त्याचे वेगळेपण मनाचा ठाव घेते. नंतर दिसते ती एका स्त्रीची सक्षम भूमिका… मग समाजसेवेत असूदेत की मग संसारात असूदेत की मुलांचे संगोपन करणार्‍या आईच्या भूमिकेत असूदेत…..की एका अर्धांगीनीच्या रुपात असूदेत की मग एका संघटकाच्या भूमिकेत असूदेत… अशा एकापेक्षा एक कितीतरी भूमिका कधी प्रत्यक्षपणे तर कधी पडद्यामागून खंबीरपणे त्यांनी पार पाडल्या.. याचा तपशीलवार वाचून स्फुरण न चढेल तर आश्चर्य!!!

पुस्तकामध्ये असलेल्या पत्रांचा शब्दवर्षाव ही मनाला भारावून टाकतो.. मग ती बाबांनी साधनाताईंना प्रेमाच्या सुरुवातीला लिहिलेली असूदेत की नंतरच्या काळात उभयंतांनी एकमेकांना केलेला पत्रव्यवहार असूदेत….

झगमगाट दुनियेचे स्वप्न पाहणारी तरुणपिढी नवीन नाही.. पण त्या झगमगाटाकडे हजारो लाखो पीडीत लोकांना वाहून नेणारी तरूणपिढी घडविण्याचे श्रेय बाबांना आणि साधनाताईंना जाते… आज तिसरी पिढीही तेवढ्याच उमेदीने अन चिकाटीने बाबांचे काम पुढे नेण्यास सिध्द झाली…. एका ठिकाणी साधनाताईंने लिहिले आहे की…. आधी आम्ही दोघे होतो सुख वाटून घेत होतो.. नंतर दोघांचे तीन अन मग हजार अन मग लाख झाले… आम्ही सुख वाटतच राहीलो.. पण आमच्याकडचे सुख अजूनकाही संपले नाही.. भरपूर शिल्लक आहे…

अगदी शुन्यातून उभे राहीलेले समाजसेवेचे साम्राज्य उभारताना बाबांना झालेले अतोनात कष्ट, स्वतःच्या तब्येतीची झालेली परवड जेवढी स्पष्ट होते तेवढीच त्याचवेळेला साधनाताईंच्या मनातील आंदोलनाचे हेलकावे काळजाच्या तारा छेडल्यावाचून राहत नाही… एक स्त्री म्हणून उपसावे लागणारे कष्ट आणि असंख्य अग्निदिव्यांना पार करण्याचे अचंभित करणारे कसब साधनाताई अगदी सहज शब्दांत मांडून जातात.. अन वाचकाबरोबर राहते ती त्या यज्ञाची धग नेहमीच उब घेण्यासाठी… कदाचित नकळतपणे आपणही स्वतः या यज्ञातील समिधा होऊन आपले जीवन पुनीत करण्याचा विचार मनात ठाण मांडुन जातो… कुणाला समाजतील उपेक्षितांच्या उध्दाराच्या आजीवन स्वप्नांचेहि अदभुत शाप मिळतील… कुणाला समाजाच्या विसंगत प्रगतीची झळ मिळेल… तर चंद्रावर वावरणार्‍या जगाला आपण अजूनही जमिनीवर असल्याची अनुभूती येईल….

पुस्तक संपूनही विचारांचे चक्र संपत नाही… संपवता येत नाही.. कदाचित हेच या पुस्तकाचे साध्य आहे!!

समिधा वाचल्यानंतर शब्दांनी आपोआप आपली वाट मोकळी करुन घेतली… यावर साधनाताईंसाठी सुचलेल्या या काही ओळी..

http://www.orkut.com/AlbumZoom.aspx?uid=1907683316489248566&pid=37

बाबांचं काळाच्या पडद्याड जाणं रुखरुख लावून गेलं.. मनाच्या गाभार्‍यात एक फेसाळता समुद्र उठवून गेलं… त्या महात्म्याला ही माझी ‘श्रध्दांजली’

http://www.orkut.com/AlbumZoom.aspx?uid=1907683316489248566&pid=1202667824988&aid=1200978330

- १७ फेब्रुवारी २००८

Written by nileshsakpal

ऑगस्ट 6, 2009 at 6:37 pm

Follow

Get every new post delivered to your Inbox.