दैनंदिनी – ३० जुलै २००९

साचेबद्धता, पठडीबंद जगणे, एकाच रस्त्यावरून वर्षानुवर्षे प्रवास करणे, एकाच घरात, एकाच ठिकाणी पिढ्यानपिढ्या राहणे चुक आहे का? वेगाचे बंधन नसलेल्या आपल्या पिढीला हे विचार बुरसटलेले अन टुकार वाटतात.. वेडगळ वाटतात.. का?? मग आपले आई-वडील, आजी-आजोबा चूक होते का? आधीच्या पिढ्यांनी जे काही केले ते सगळे कालबाह्य झाले का?

नक्कीच आता महत्वकांक्षेची क्षितीजं विस्तारली आहेत.. आता दहा बाय दहाच्या वाड्यातून साता समुद्रापलिकडील पहाट सहज दिसते, अनुभवता येते किंवा ती साद घालते… अन का करु नये? मुलभूत शिक्षण घेतल्यानंतर उच्च शिक्षणासाठी परदेशात का जाऊ नये.. गेलेच पाहीजे तिथे सगळ्या सोयीसुविधा आहेत, आमच्या प्रतिभेचा योग्य सन्मान केला जातो अन ती तशीच जोपासलीही जाते, सामाजिक आयुष्य सुरक्षित आहे, बिनधोकपणे कुठे कधीही अन केव्हाही वावरता येते, जगातील सगळ्या सुखांचा उपभोग घेता येतो अन तेही सहज, विनासायास. आमची सर्वांगीण प्रगती होत राहते, जगातील सर्व उच्चशिक्षितांबरोबर स्पर्धा करता येते, आपली उपयुक्तता सिद्ध करता येते, ठरलेल्या वेळेत कामे होतात, ठरलेल्या वेळात घर गाठता येते, रोज घरच्यांशी ऑनलाईन बोलता येते, आता तर आम्ही एकमेकांना अगदी घरात बसल्यासारखे बघुन बोलू शकतो त्यामुळे घरातील हळव्या लोकांनाही आता काही अडचण नाही, बरेचशे मित्रसुद्धा कितीतरी वेळेला सहज फिरताना इथे सापडतात, इथे सगळ्यांची वेव्हलेंग्थ मॅच होते, येथील वादविवादसुद्धा एकदम शिस्तीत असतात, कुठेही मारामारी किंवा खुन्नस नाही.. सगळे आटोपशीर अन नीटनेटके, मग आम्ही का जाऊ नये इथे??
 
कुणी असेही म्हणेल की ही परंपरा काही आजची नाही अगदी स्वातंत्र्यपूर्व काळातसुद्धा IAS किंवा इतर परीक्षा देऊन परदेशात शिकायला येणार्‍यांची संख्या भरपुर होती अन तिथूनची ही सुरुवात झाली.. आम्हाला दोष देऊन काय फायदा..
 
किती समर्थनं!! पण या पलिकडे आपण सार्‍यांनी विचार केलेला नाही किंवा नसतो… ज्यांनी केला ते खरेच धन्य! पण कुणी असा विचार करत नाही की स्वातंत्र्यपूर्व काळात भारतातून परदेशात शिक्षण घेण्यास येणार्‍यांचा मूळ उद्देश काय होता? तेव्हा शिक्षणामुळे सारासार बुद्धी आपोआप यायची किंवा शिक्षण घेतलेल्या माणसाला तसाच मान होता, त्याला चांगल्या वाईटाचा विचार करण्याची क्षमता होती.. अन त्यामुळे जास्त शिकलेला देशासाठी जास्त विचार करू शकतो असे समीकरण झाले होते अन ते प्रत्यक्षातही तसेच दिसले… तेव्हा प्रत्येकाला मिळालेले उच्च शिक्षण हे भारताच्या उत्थानासाठी वापरायचे हाच उद्देश होता, परदेशात असलेल्या सुरक्षिततेपेक्षा भारतात असणारी असुरक्षितता अन पारतंत्र्यता त्यांना जास्त आवाहन द्यायची… आज ही आवाहन स्वीकारण्याची धारणाच नाहीशी झाल्याचे दिसते, तरूणपिढीतले तारुण्य वजा असल्यासारखे भासते, शिक्षणामुळे येणार्‍या तेजापेक्षाही विलासीन सुखांच्या उपभोगाप्रती असलेला पंगुपणा जास्त दिसतो.. गेल्या काही दशकांमध्येच हा देश उत्थानाचा उद्देश पुरेपुर नाहीसा झाला आहे, देशापेक्षाही स्वतःला मोठे समजण्याची घोडचुक करताना आम्ही सगळे आढळतो, माहीत असतानासुद्धा हे करताना प्रौढी मिरवताना बरेच जण दिसतील, देशासाठी खर्च केलेले आयुष्य अनमोल असते यापेक्षाही स्वतःच्या क्षुल्ल्क मोहाच्या पाठी धावताना सुखांच्या गर्दीमध्ये गाडुन घेण्यात सार्थक मानणारी पिढी उदयाला येत आहे… अप्पलपोट्या राज्यकर्त्यांच्या उपर्‍या धोरणांमुळे होत असलेले खच्चीकरण थांबवणे आता दिवसेंदिवस अशक्यतेच्या जवळ जाऊ लागले आहे, ढासळलेली न्यायव्यवस्था, दिशाहीन झालेले नेतृत्व, एक-दोन विकसित देशांचा आराखडा डीट्टो भारतासारख्या देशामध्ये राबविण्याच्या निष्फळ प्रयत्नापायी झालेले अतोनात नुकसान न भरुण येण्यासारखे आहे, हे ओळखण्याचेही भान नसलेली किंवा हे स्वीकारून वाढणारी तरुणपिधी घडत आहे याचे दुःख वाटते… उगीचच वैयक्तिक सुखाच्या मोहापायी आम्ही आमच्या देशाला मात्र विकासापासुन वंचित राहण्यास किंवा अंधारात खितपत पडण्यास भाग पाडतो आहोत हे देखील न समजलेली म्हणजेच ‘पुढारलेली’ तरुणपिढी येऊ घातली आहे…
 
शहरीकरणाला विकासाचे नाव देणे म्हणजे एखाद्या अंध व्यक्तीला एखादा मुकपट दाखविण्यासारखे आहे.. आपला विकास अधू आहे हे समजणे किंवा याचा उलगडा तरुण पिढीला झालाच पाहीजे… एखादा देश पुढे नेणे म्हणजे तिथल्या जनतेला किंवा सगळ्यात दुर्लक्षित असलेल्या व्यक्तिला प्रमुख प्रवाहात आणणे होय, आमचा विकास इंग्रजीमधुन होत आहे अन आमचा देश भाषांच्या युद्धामध्ये जखडून पडला आहे… इंग्रजी भाषेचे अनभिषिक्त साम्राज्य आम्ही स्वीकारले आहे… किंवा कोणत्याही खंबीर नेतृत्वाने ते कधीच झुगारले नाही तर ते दोन्ही हाताने स्वीकारले हे ही सत्य आहे… आज रशिया किंवा युरोपातील छोटे छोटे देश किंवा जपान किंवा चीन सगळ्यांनीच आपल्या अस्तित्वाची खुण अबाधीत राखली आहे, आपली ओळख, आपली भाषा, आपली संस्कृती अखंडीत राखली आहे… आमची तरुणपिढी निर्लज्जपणे या लोकांचे गुणगाण गाताना दिसते पण आपल्या देशात हे का नाही याचे आत्मपरीक्षण करण्याची धमक वा हिम्मत त्यांच्यात नाहि हेही तेवढेच लाजिरवाणे व बटबटीत उघड सत्य आहे.. एक म्हणुन उभे राहायचे असेल तर परस्परातील मतभेद पहील्यांदा हद्दपार झाले पाहीजेत पण आम्ही अजुनही पुराणकाळातील असणारे फरक घासुन घासुन ठळक करण्याच्या मागे लागलो आहोत… शिक्षणाचा अर्थ सध्या बदलला आहे.. शिक्षण म्हणजे शेपुट गुंडाळून देशाला पाठ लावून पळून जाणे असाच अर्थ समोर दिसत आहे… आपण स्वतःही त्यामध्ये आहोत याचीही खंत वाटत होती पण आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जाण्याचे मनाशी निश्चित आहे, ठाम आहे… कितीतरी उच्चशिक्षित परत जाऊन देशाच्या पुनर्बांधणीचे काम करीत आहेत हेही आमच्या पाहण्यातुन सुटले नाही… डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांचे उदाहरण तर नेहमीच जीवंतपणे समोर उभे राहते…

गरजा वाढविणारेही आपण अन निरर्थक चोचल्यांच्या मागे धावणारेही आपणच.. ज्या देशात अजुनही दोन वेळचे जेवण मिळत नाही तिथे घरात मोबाईल पोहचविणारेही आपणच, गावामध्ये रस्ता किंवा माध्यमिक शाळा पोहचविण्याआधी कंम्पुटर पोहचविणारेही आपणच, तंत्रज्ञानाच्या विकासाची दिशा ही विकसित देशांना समांतर धावते आपल्याला देशाच्या विकासाला नाही, त्या तंत्रज्ञानाची दिशा त्या विकसित देशांना पुरक आहे पण आपल्याला आहे का? हा विचार न करणे म्हणजे पुन्हा वीज नसलेल्या गावामध्ये एखाद्या योजनेअंतर्गत वीजेचे खांब बसविण्यासारखेच! भारत म्हणजे चार शहरांचा नाही तर तो चार हजार गावांचा आहे हे आपण विसरून गेलो आहोत.. चार-सहा शहरांच्या विकासावर भारताचा अमेरीका नाही होणार तर शिस्तबद्ध विकासाची जोपर्यंत पायाभरणी होत नाही, खेड्यातील माणुसही या विकासात सहभागी होत नाही तोपर्यंत सारे प्रयत्न निरर्थक आहेत, तंत्रज्ञान विकसित करताना फक्त शहरी लोकांचा विचार करून विकसित होते, पण ते एखाद्या खेडुताच्या दृष्टिकोनातून कधीच विकसित होत नाही हे आमचे दुर्दैव! दोन चार पिढ्यांआधी आपणही खेडवळ होतो हे आपण विसरून गेलो आहोत, समोरचा खेडवळ माणुस वर्षानुवर्षे तसाच आहे अन तो तसाच वागतो आहे, तरी आपण त्याला हसतो, पण खरेतर मित्रहो आपण बदललो आहोत हे सत्य आहे!! त्याला हसताना दात आपले दिसत असतात.. आपण आपल्यावर हसत असतो…. अन तो मुकपणे भारत खांद्यावर घेऊन समोरुन रस्त्यावरील धुळीमध्ये खर्‍या भारताचे ठसे उमटवत चालत राहतो………
 
क्रांती उद्वेगातून होते, समाजातील विषमतेचा लाव्हा उफाळला की क्रांती होते, उलथापालथ होते पण त्यासाठीही तो बदलाचा मुद्दा प्रत्येक मनात झिरपावा लागतो.. मित्रहो, कुठेतरी ही विषमता आता दिवसेंदिवस जास्त स्पष्ट होऊ लागली आहे.. प्रत्येक थराला प्रगती प्रवाहामध्ये येण्याची गरज वाटू लागली आहे… पद्धतशीर किंवा साचेबद्ध विकास न झाल्याने एखाद्या झाडावरील पाखरांचा जत्था उडावा अशी परीस्थिती देशात उभी आहे… या खदखदलेल्या असंतोषाला कदचित ‘शिकलेल्या’ तरुणपिढीची गरज आहे असे वाटून गेले म्हणून हा प्रपंच! कुणाच्या भावना नकळतसुद्धा दुखावल्या असतील तर क्षमस्व! ताशेरे ओढण्यापेक्षाही एखाद्या तरूणाला तरी सुखासीनतेपासून वास्तवतेकडे खेचण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे…

काल दिवसभरातील हे विचार असेच सहज उतरले गेले आहेत… वेगवेगळ्या भावनांपेक्षाही जेव्हा एकच भावना आपल्या जगण्यावर हावी होते तेव्हा हे विचार एकाच दिशेने अशा पद्धतीने सुरु होतात.. चाबुक फिरवताना चाबकापेक्षा चाबुक फिरवणार्‍याला जास्त विचार करावा लागतो… तसेच आपले आहे… आपण नित्य वावरताना जो आपल्याला चालायला किंवा बोलायला भाग पाडत आहे तो विश्वविधाता नक्कीच सर्व विचारांती असे विचार माझ्या पारड्यात टाकत असेल किंवा असावा.. त्याला अपेक्षित असणार्‍या व त्याच्या संकेतचिन्हांवर समर्पित भावनेने चालत राहणे जास्त योग्य, असेच वाटते व पटतेही!

दैनंदिनी – २९ जुलै २००९

कोणत्या गोष्टीची गरज कशी निर्माण होते?? कोणाला प्रेमाची, कोणाला भावुकतेची, कोणाला आधाराची, कोणाला सोबतीची, कोणाला आरामाची, कोणाला भटकण्याची, कोणाला भरकटण्याची, कोणाला उपभोगाची, कोणाला सुखनैव स्वप्नांची, कोणाला भगवंताची… जाणकार म्हणतात की जिथे माणुस अडतो तिथे तो नविन गोष्टींचा ध्यास घेतो किंवा जसे आयुष्याचे टप्पे बदलतात तसे त्याच्या सुखाच्या व्याख्या बदलतात अन मग गरजा बदलतात किंवा वयोमानाप्रमाणे होनारे बदल वेगवेगळ्या गोष्टींची जाणीव करून देतात अन गरजा बदलतात किंवा कोणी म्हणतात की वैचारीक स्वातंत्र्यामुळे जगातल्या प्रत्येक गोष्टीला काबीज करण्याच्या हव्यासापायी वेगवेगळ्या स्वप्नांची ओढ लागते किंवा अर्थार्जनामुळे मुलभुत गरजा भागल्यानंतर उरलेल्या  आर्थिक क्षमतेमुळेसुद्धा गरजा निर्माण होतात वैगेरे वैगेरे… यातील बरीचशी निरीक्षणं योग्यही आहेत अन बर्‍याचदा मला तुम्हाला लागू पडतात, आता या घडीलासुद्धा नकळत आपण कितीतरी गोष्टींना आपल्या गरजा मानुन बसलो आहोत हे कळेल.. पण परत फिरून पुर्ण अलिप्त भावनेने विचार केला की कळते की किती गोष्टींची खरोखर गरज आहे अन किती गोष्टी नाहक ओझ्याप्रमाणे आपण आपल्याबरोबर वागवतो आहोत… हा अलिप्त विचार करणे मात्र सगळ्यांना शक्य होत नाही, त्या गरजांमागे असलेली आपली समर्थनं अशी काही ठाम असतात किंवा आपण बनवलेली असतात, अन बस्स आपल्याला आपल्याकडुन हारायचे नसते हेही आधीच ठरवलेले किंवा ठरलेले असते… आत्ताचा मी जास्त सुज्ञ किंवा सुजाण आहे अन जो यातुन अलिप्तपणे विचार करून मला प्रश्न विचारतो तो जुनाट व खुळचट आहे असा समज आपण करुन घेतलेला आहे किंवा तो असतोच.. प्रत्येकाच्या मनात या दोन्ही बाजू असतात फक्त कोण कुणाचे कधी केव्हा ऐकतो यानुसार त्याची जीवनशैली ठरत जाते अन तो माणुस त्याप्रमाणे आपल्यासमोर वावरताना दिसतो एवढेच!
 
नेहमी ऑफिसला येताना किंवा परत जाताना रस्त्याच्या कडेला टाकलेले बाक दिसतात, आजुबाजुला मस्त हिरवळ व हे एखाद्या बुजुर्ग माणसाप्रमाणे त्या हिरवळीमध्ये पाय रोवुन निश्चल थांबलेले असतात.. कोणताही त्रागा न करता.. कधी कधी मग एखादे आजोबा वा आजी तिथे जाऊन बसलेले दिसतात त्यावेळेला जणु दोन वृद्ध एमकेकांशी वार्धक्याचा गप्पा मारत असल्याचा भास होतो… वाटते की या धावपळीच्या जीवनाच्या दुष्टचक्रामधुन जिथे आजी आजोबांना बाहेर फेकले आहे तिथे हा बाक मात्र त्यांना त्याच आत्मीयतेने जवळ घेताना दिसतो… तसेच एखाद्या तरुणाला सिगरेट किंवा दारुचा कॅन घेऊन आला तरी नाकारत नाही तर काहीही न बोलता गुमान थारा देतो.. भले, तेव्हा त्याच्या भावना त्या अंदाधुंद तरुणपिढीला काय झेपणार म्हणा… असा हा बाकडा मुकपणे जीवनाचे गाणे गात असतो…. काळाबरोबर आणखी म्हातारा होत असतो… रस्त्यावरील येणार्‍या जाणार्‍या प्रत्येकास एकाच भावाने अभिवादन करीत काळ कंठत असतो… एवढ्या रटाळ अन एकसुरी आयुष्यातही त्याचे ते निश्चल अन विनातक्रार जगणे पाहीले की मला माझ्या चीडचीडपणाची लाज वाटते… त्याचा एखादा गुण हलकासा जरी माझ्या ओंजळीत आला तरी स्वतःला मी भाग्यवान समजेल… त्याची ही साधना तपानुतपे चालू आहे अन पुढेहि चालू राहील, कदाचित त्याचे हे निर्विकारी स्वरुप या अविरत साधनेचेच फलित नाही ना!
 
कालचा दिवस थोडासा गोंधळलेला होता… जसे रंगपंचमीला चेहरा रंगवुन आरशात पाहीले की वाटते ना, की हा मीच का? तसेच काल या दिवसाच्या बाबतीत झाले… आधी आधी सुरळीत चाललेला दिवस नंतर असा काही रंगला की ओळखता येणे अवघड झाले… मिरवणुकीमध्ये उधळेला रंग जसा बेलगाम असतो तशाच काही घटनांचा मुक्त अन बेलगाम वावर आपल्यावर होत असतो… काही लोकांना एकाचवेळी या रंगाने पुर्णपणे माखायला होते, डोळे, कान, नाक सगळे गच्च होऊन जाते तर काही जणांना फक्त नाममात्र प्रसाद मिळतो…. एकाचवेळी घडणार्‍या घटना जेव्हा सामोर्‍या येतात तेव्हाची अवस्था विचित्र असते किंवा असावी.. एकीकडे मिरवणुकीमध्ये सामील असल्याचा, बेभान होऊन नाचण्याचा, सगळ्यांमध्ये मिसळल्याचा आनंद तिथे त्याचवेळेला डोळे, नाक, कान गच्च होऊन झालेली दुरावस्था किंवा नाचताना झालेली एखादी दुर्धर जखम, किंवा आधीची असलेली जखम दुखावली गेल्याची चुणुक जीव्हारी लागते… काही कळत नाही रडायचे की हसायचे.. अशी काहीशी अवस्था… थोडक्यात संगायचे तर एकाच दिवशी कुणीतरी जवळचे निवर्तल्याची बातमी अन कुणा जवळच्याकडे आलेली नव-अर्भकाची बातमी, अशा विषम परिस्थितीला सामोरे जाणे… अन अशावेळी दोन्ही ठिकाणी होणारा मनाचा वावर किती वेगळा असतो हे सांगायला नकोच.. अशाही प्रसंगातुन कितीतरी वेळा आपल्याला किंवा आपल्या जवळच्यांना जावे लागते हे अनुभवणेही तेवढेच विचित्र!! डोळ्यातून संततधार वाहणार्‍या अश्रुंमधुन दुःखाश्रू अन आनंदाश्रू ते कसे वेगळे करणार?

दैनंदिनी – २८ जुलै २००९

सगळ्यांनाच वाटते की आयुष्य हळुवार असावे एखाद्या तलम स्पर्शाप्रमाणे… त्यामध्ये आपण नायक असावे.. खलनायक कुठेही नसावा… सगळीकडे भरभराट असावी, समृद्धी असावी… एखादी सुंदर गोष्टच जणू सत्यात उतरावी.. पण मग पाहतो तर काय? वास्तवाला हे असले तलमी, लेचेपेचे विचार अजिबात मान्य नसते, इथे आयुष्य असते ते सुसाट सुटलेल्या करवतीप्रमाणे अन तुम्ही आम्ही असतो त्या पकडीमध्ये पकडलेल्या लाकडाच्या फळकाटाप्रमाणे, कधी करवट चालते तर कधी रंधा सालं सोलून काढत असतो… कुठे एखादा खिळा ठोकळा जातो तर कुठे अंगावर एखादे रंगीबेरंगी सनमाईकाचे अस्तर चढवले जाते, कुठे सरपण म्हणून वापरतात तर कुठे शवपेटीबरोबर जमिनीच्या पोटात घुसडतात… कुठे भरजरी महालात स्तंभ म्हणून समाधी लागते तर कुठे एखाद्या मंदिरातील पायरी होऊन झिजत राहतो…कुणी छान तिजोरीसाठी वापरले जाते तर कुणी कुंपणासाठी आयुष्यभर अणूकुचीदार तारांबरोबर गुंफले जाते… असेच काहीसे दिसले आयुष्य… तलमी वस्त्राला इथे उपभोगाचे लेबल आहे नी घामाटलेल्या गंज़ीला इथे सोन्याचा भाव आहे…
 
माणसांचे स्वभाव विचित्र असतात… कुणी एकलकोंडे असतात तर कुणी नुसतेच बोलघेवडे… कुणी कळीचे नारद तर कुणी आयतखाऊ कुंभकर्ण, कुणी उत्साही लाट तर कुणी निराशावादाचे चाहते, कुणी भक्तीरसामध्ये न्हालेले तर कुणी नास्तिक म्हणुन देवाकडे पाठमोरे बसलेले, कुणी दुसर्‍यावर हसणारे तर कुणी दुसर्‍याबरोबर हसणारे, कुणी इतके नाजुक की कल्पनेने धास्तावणारे तर कुणी इतके निबर की काळाला कोळुन प्यालेले, कुणी भावुक तर कुणी त्रासीक, कुणी नुसतेच सोशीक तर कुणी अन्यायाने पेटून उठणारे… कितीतरी पैलू दिसत असतात आपल्याला… अन हे सगळे माणसांचेच.. प्रत्येकालाच दोन पाय, दोन हात, दोन डोळे एक नाक असताना सुद्धा एवढा फरक का? प्रत्येक चेहर्‍यामागे एक किंवा अनेक वेगळे वेगळे चेहरे का? कळत नाही असे प्रश्न नेहमीच भंडावून सोडतात..
 
मला नेहमी वाटते कि माणसाचा स्वभाव त्या साखरेच्या किंवा मिठाच्या कणांप्रमाणे असावा… पाण्यात पडला की विरघळून जाणारा.. पाण्याला आपली स्वतःची चव देऊन जाणारा.. जाता जाता लक्षात राहुन जाणारा.. त्या दगडाच्या खड्याप्रमाणे नको.. खाताना कचकन दातात अडकणारा.. घासाची चव बिघडवणारा.. मग त्याला शोधून बाजुला काढावे लागते.. पाण्यात टकला ति विरघळत नाही किंवा कोणत्याच द्रवामध्ये एकजीव होत नाही.. हो जर चिखल असेल तर मात्र चिखलाच्या रंगात तो मिसळून जातो… आपला अहंकार किंवा ‘इगो’ असाच… तो त्या साखरेप्रमाणे आहे की त्या दगडाच्या खड्याप्रमाणे हे ज्याने त्याने आठवावे.. आपण चव वाढवतो की चव घालवतो हेदेखील विचार करून पहावे.. आपले अहंकारी अस्तित्व एवढेही बटबटीत नसावे की आपण आपल्या संगतीच्या माणसांमध्ये शोभणार नाही… अन त्या अहंकारी अस्तित्वाचा एवढाही अट्टहास नको की आपल्याबरोबर कुणीच मिसळणार नाही… अहंकार विरघळणे ही जगातील सर्वात दुर्मिळ अन अवघड गोष्ट आहे.. एकदा तो विरघळला की जगातील ज्ञानाची सारी कवाडे खुली होतात… पण जर अहंकार घेऊन ज्ञनोपसना केली तर शब्दांचे दागिने अंगावर सजवून मिरवण्याखेरीज प्राप्ती काहीच होत नाही.. शब्दापलिकडील भाव अहंकार निस्तरल्यानंतरच आपल्या परेमध्ये जागृत होतो हेही तेवढेच खरे!
 
हरीण किंवा सांबर ज्यापद्धतीने उड्या मारत पळत असते तसा कालचा दिवस माझ्यासमोरून निघून गेला.. हरिणाएवढ्याच शिताफीने अन तेवढ्याच निस्तब्धतेने तेवढ्याच चपळाईने… एका ठिकाणी नजर स्थिरावेपर्यंत तो सकाळपासून रात्रीपर्यंत येऊन ठेपला.. अन दुलईमध्ये मग शांतपणे माझ्याबरोबर निजलाही…. एखाद्या डबक्यात पाय पडल्यानंतर आपल्या डोक्यात पहिला विचार येतो तो म्हणजे आपले कपडे किती खराब झालेत पण हा विचार करत नाही की आपल्यामुळे जे असंख्य तुषार त्या डबक्यापासून विखुरले गेले अन नाहीसे झाले त्याचे काय? हेच बर्‍याचदा व्यक्तिगत आयुष्यात होते की एखाद्या घटनेने आपण आपल्याला किती त्रास झालाय यात अडकून बसतो पण त्याचवेळी या घतनेमुळे किंवा आपल्यामुळे आणखी कुणाचे मन दुखावले गेलेय का याची खात्री आपण कधीच करत नाही! राहून जाते.. निसटून जाते… कारण आपण आपल्यात गुंतून राहतो, गुरफटून राहतो…. एकट्याने शोक करण्यापेक्षा दुसर्‍यांचा शोक समजून त्यात सहभागी झाले तर फक्त दुसर्‍यालाच आराम नाही मिळत तर आपलाही शोक नकळतपणे कमी होतो हे सत्य!! बस्स थोडासा पुढाकार हवा असतो.. किंवा पुढाकार घेण्याचा प्रयत्न तरी समोरच्याला दिसावा लागतो!

दैनंदिनी – २७ जुलै २००९

जगण्याला नेहमी शिव्या हासडणारे धुरंधर मरणाला का घाबरतात कळत नाही? मोठ्या मोठ्या भाषणांची सरबत्ती करणारे प्राणी एखादे छोटे कामही करताना का दिसत नाहीत? कितीतरी विरोधाभास दिसून येतो आजुबाजूला… वाटते की हा विरोधाभास म्हणजेच जगणे आहे का की यातच कुठेतरी जगणे दडले आहे… कळत नाही.. पाहिले तर दरीचे उंच उंच टोक दिसते नी एकीकडे कड्याला चिकटून चिकटून घरंगळत विसावलेली खोल खोल दरी… तिला मधली अवस्था काहीच नाही.. एकतर वरचे टोक किंवा खालची दरी.. एखादा फासाचा चाप ओढणारा जल्लाद अन नव-अभ्रकाला जन्म देणारी माता.. विषमता.. विरोधाभास… एकीकडे विजयाचा परमानंद दुसरीकडे पराभवाची गर्द छाया… एकीकडे आलेला महाकाय भीषण पूर तर एकीकडे जमिनीला भेगा पडून फोफावणारा दुष्काळ… विचित्र.. विमनस्क वाटून जाते.. कधी कळत नाही आपल्याला अजून वेड नाही लागले म्हणून आपण शहाणे की आपण मरत नाही म्हणून आपण जीवंत… कुणाला वाटेल की हा आज भरकटला आहे.. पण प्रश्न असा आहे की जेव्हा हरणारे अन जिंकणारे दोन्ही तुम्हीच असता तेव्हा काय? जेव्हा आपल्याच दोन हातांमध्ये उजवं नी डावं ठरवावं लागतं तेव्हा काय? शर्यत जिंकल्यानंतर दोन पायांपैकी एकाच पायाला बक्षीस द्यायचे असेल तेव्हा काय? तीरंदाजीमध्ये जिंकल्यानंतर बक्षीसावर जेव्हा एकच डोळा हक्क सांगतो तेव्हा काय? दोन श्वासांमध्ये भांडण झाले तर काय? दोन क्षणांमध्ये वाद झाला तर काय?
 
प्रश्न पडणे कधी कधी वरदान वाटते तर कधी जेव्हा एखाद्या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही तेव्हा उधाणणारा आंतरिक संतापही त्याचाच एक भाग म्हणून स्वीकारावा लागतो. नेहमी चढ आला की आपली जीवनाची गाडी मंदावते.. स्वतःवर चीड येते.. वैताग वाटू लागतो… वाटते की या गाडीला ब्रेक हवेतच कशाला… जिथे वेगच नाही तिथे त्या वेगाला मर्यादा ठरवायला हे ब्रेक कशाला… आणखी त्रागा करतो… पण जेव्हा उतार येतो तेव्हा कळते की वेगापेक्षाही ब्रेक जास्त गरजेचे असतात.. वेग कधीही मिळू शकतो पण त्याचवेळेला ब्रेक असणे जास्त महत्वाचे…. कधी कधी ही प्रश्न पडण्याची स्थिती ब्रेक सारखे काम करून जाते या धकाधकीच्या जीवनात… सुसाट धावताना आपल्या नकळत आपल्याला नियंत्रणात ठेवणारी एखादी तरी शक्ती आपल्याकडे जरूर असावी.. जेव्हा आपलाही आपल्यावर ताबा नसतो तेव्हा त्यापलिकडे जाउन परीस्थितीचा ताबा घेणारी एक शक्यता जरुर आपल्या अंगी असावी.. कुणी त्याला परमेश्वरी भक्ती म्हणेल, कुणी आंतरीक ओढ म्हणेल, कुणी कल्पना, कुणी स्वप्नही म्हणू शकेल… पण ते त्या वेळेला असणे महत्वाचे.. ते आपल्यामध्ये कसे आणायचे हे ज्याचे त्याने ठरवावे.. कुणाच्या अंगी असेलही आणि असतेच फक्त ज्याची त्याने त्याची जाणिव घ्यावी एवढेच!…

कालचा दिवस तसे पाहीले तर काळ्या ढगांमुळे काळवंडलेला होता एखाद्या वृद्ध आजोबांसारखा…. आणि सरतेशेवटी संध्याकाळी दिवसभर झोपून उठलेल्या जांभई देणार्‍या सूर्यराजाचे दर्शन घडविणारा होता.. बदलणार्‍या वातावरणाचा आपल्यावर परिणाम होतो का? अन होत असेल तर ते कसे ओळखावे? हे न समजणारे प्रश्न… कदाचित होत असावा… कारण काल उत्साहामध्ये देखील ऊनसावलीचा खेळ सुरु होता… पहाटेची असणारी उत्साहाची धग रस्त्यावरील पावसाच्या सरीने बाष्प होऊन गेली ती पुन्हा यायला पूर्ण दिवस मागे ढकलावा लागला… संध्याकाळी संदीप खरेचे ‘दमलेल्या बापाची कहाणी’ ऐकल्यानंतर संवेदनांचा एक अनामिक पूर उरात दाटून आला… साध्या शब्दांतून लोकांचा हळवेपणा छेडणे किंवा धकाधकीच्या छापामध्ये दडलेल्या काळजाला हेलावून सोडणे हे त्याने खुपच लीलया साधलेय.. पत्नीच्या डोळ्यातून झरणार्‍या आठवांना पाहून याची प्रचितीही आलीच…
 
मोठी मोठी ओझी एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी वाहून टाकणारे हमाल, एकदा ओझे हातावेगळे केले की त्या ओझ्यातून मुक्त होतात.. थोड्याशा वेदना असतात पण त्यांनी त्या स्वीकारलेल्या असतात अन त्या वेदनांसाठी ते कधी ओझ्याला नावं ठेवत नाहीत.. अन आपण मात्र कितीतरी आठवणींचे ओझे विनाकारण वर्षानुवर्षे वाहत असतो… त्या वेदना, त्या भावना जशाच्या तशाच पाठीवर लादून चालत असतो.. ती आठवण, तो क्षण कधीच संपलेला असतो पण आपली त्यातील भागीदारी मात्र तशीच असते.. तशीच राहते… आपण खंगत राहतो.. झिजत राहतो… मग कधी कधी अशावेळेला तो अलिप्तपणे ओझे वाहणारा हमाल जास्त श्रेष्ठ वाटून जातो!!

दैनंदिनी – २४, २५ आणि २६ जुलै २००९

आरश्यातील स्वतःच्या प्रतिबिंबामध्ये गढून जायला सगळ्यांनाच आवडते.. अगदी तासनतास लोक त्याच्यामध्ये अडकून राहतात… पण आरसा जे प्रतिबिंब दाखवतो ते खरे कशावरुन? आरसा चुकू नाही का शकत? जे काही परावर्तित होते त्याला आपण आपले प्रतिरूप मानतो, आपण असेच आहोत, असेच दिसतो अशा धारणा आपण मानतो… अन या आभासामध्ये आपण आयुष्य घालवून देतो.. कधीही खर्‍या प्रतिबिंबाची ओढ आपल्याला सतावत नाही…. जे दृश्य आहे ते आपण आपल्या नजरेने खात्री करून घेतो म्हणुन खरे!! अजब आहे पण ज्याने कधी आयुष्यात आरसा पाहीलाच नाही त्याचे काय? किंवा ज्याला जन्मतः अंधत्व आहे त्याचे काय? त्यांच्या प्रतिबिंबाच्या किंवा समोरच्याला ओळखण्याच्या किंवा स्वतःला ओळखण्याच्या व्याख्या काय?
 
आपण डोळे बंद करून प्रतिबिंब बघू शकतो का? आपल्याला आपले स्वरुप ओळखता येते का? फक्त बाह्यस्वरुपात दिसणार्‍या आभासी आकृतीला आपण आपले प्रतिरुप मानुन घेतो हे चुकीचे वाटू लागते… विचार करताना विचारांचा आवाका एवढा मोठा वाटतो की आकाश मुठीएवढे वाटू लागते, समुद्र एखाद्या पेल्यातील खार्‍या पाण्यासारखा वाटू लागतो… पृथ्वीपेक्षाही सार्‍या ब्रम्हांडात माझ्या अस्तित्वाची जाणिव होऊ लागते… सूर्य, चंद्र, तारे सगळे सवंगडी वाटू लागतात…. मग हे असे स्वरूप त्या क्षुल्लक आरशात मावेलच कसे अन जे त्या आरशात दिसते त्यावर विश्वास तरी कसा ठेवायचा अन का ठेवायचा? अन हे स्वरूप डोळे बंद करुनही अनुभवता येते त्यासाठी चर्मचक्षुंची नव्हे तर ज्ञानचक्षुंची गरज असते… प्रत्येकाने या विश्वरुपी स्वरुपाची ओळख जरुर घ्यावी… ज्या विश्वाचा आपण अविभाज्य भाग आहोत त्या भागाची त्या विश्वाशी असलेली एकरुपता जरूर अनुभवावी, त्या भागाला त्यापासून विलग करुन पाहीले की आपण आभासांमध्ये कैद होतो… दिवसा दिसणारी सावली खरी वाटून आपण आपली फसवणुक करतो.. त्या विश्वरुपाची खरी सावली पडते ती रात्री.. जी सगळ्या विश्वाला व्यापून उरते.. तिची जाणिव घ्यायला हवी….
 
शारीरीक सीमेच्या पलिकडे होणारा विस्तार अद्भुत असतो.. सुक्ष्मरुपातील आपले अस्तित्व जेव्हा प्रत्येक चराचरामध्ये अनुभवायला मिळते, आपल्या अंतरातून उठणारे तरंग जेव्हा प्रत्येक सजीव अन निर्जीव वस्तूमध्ये कंप धरू लागतात.. आपल्या अंतरातील भावना सभोवतालाला गुरफटून घेते, आपल्या प्रत्येक श्वासाला तेवढाच उत्कट प्रतिसाद मिळू लागतो.. वेळेचे भान गळून पडते, नात्यांचे बंध सुटून जातात, आपला आपल्याशी असलेला संबंध नाममात्र होतो… या विलक्षण अनुभवाची ओढ प्रत्येकाला असावी असे मलातरी वाटते… अशा अनुभवामध्ये मिळणार्‍या स्वर्गसुखाची किंमत अनमोल आहे…
 
गेले तीन दिवसंची वाटचाल खरे सांगायची तर एखाद्या दलदलीमध्ये फसलेल्या वाटसरूसारखी होती… सुरुवातीला वाटत होते की आता आपण या दलदलीमध्ये आणखी धसत जाणार.. जरी आपल्याला या विदारक शाश्वताची कल्पना आहे तरीसुद्धा यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणे क्रमप्राप्त होते.. बरबटलेल्या पायांना आणखी तेजीने हलवून जमिन गाठणे गरजेचे होते…  पायाखाली असणारी कणखर जमीन अन त्याच जमिनीचे हे दलदलीचे रूप कितीतरी वेगळे अन भयानक वाटू लागते.. आजपर्यंत जीच्या अंगाखांद्यावर बागडलो तीच जमिन आपल्याला गिळत आहे की काय असे जाणवून काळजाचा थरकाप उडतो… अशा या अवस्थेत असताना उठणार्‍या नाना कळा काय असू शकतात या ज्याच्या त्यानेच अनुभवाव्यात… पोहता न येणारा कोणी पाण्यात पडल्यानंतर जसा जीवाच्या आकांताने हात पाय मारू जातो अन जर या हातपाय मारण्यातून त्याला पोहायला यायला लागले तर??… अशक्य वाटणार्‍या या प्रसंगातून सुखरुप किनार्‍याला आला तर काय वाटू लागेल??… कित्ती भावनांचा पुष्पगुच्छ त्याच्या चेहर्‍यावर दिसेल तसाच काहीसा भाव आम्ही या दोन-तीन दिवसांमध्ये अनुभवला…
 
वेगवेगळ्या लोकांना भेटल्यानंतर येणारे अनुभव शब्दांत बांधणे खरेतर कधी कधी अवघड होते पण शनिवारी दोन टोकाची भुमिका असणार्‍या माणसांना भेटण्याचा योग आला… एका बाजूला विज्ञानाला वरदान समजून जगातल्या प्रत्येक गोष्टीचा पडताळा करणारी भूमिका तर एका बाजुला विज्ञानाला जगण्यातील एक घटक मानून मानवी श्रद्धा जपणारी भुमिका…  अन असे असूनसुद्धा गुण्यागोविंदाने राहणारी ही माणसे अजब वाटली.. विचारसरणीतील या फरकाला कुठेही मैत्रीमध्ये अडसर न मानता त्याला तसेच स्वीकारणारी माणसे दुर्मिळ आहेत हे नक्कीच प्रत्येकाने अनुभवले असेल…
 
दिवस ढकलण्यापेक्षा माणसाला जगण्याचे वेड असावे… मनात उठणार्‍या असंख्य विचारांना स्थावर किनारा देता आला पाहीजे.. बरेचदा विचार येतात नी जातात अन यात नविन काहीच नाही हे तर सगळ्यांच्याच बाबतीत होते.. पण जेव्हा एखादा विचार मनाच्या कक्षा सोडून सार्‍या आयुष्याला व्यापून टाकतो तेव्हा खरी मज्जा!! … आपल्याच डोक्यात असे विचार असतात पण आपण निवडू शकत नाही… आपण वर्तमानासमोर शरणागती पत्करलेली असते पण खरेच कधीतरी वर्तमानाच्या या जोखडातून बाहेर येण्याचा प्रयत्न करावा… कुणास ठाऊक कदाचित तो एखादा विचार आपल्या येणार्‍या वर्तमानाचे ‘कारण’ ठरेल… या जन्माचा उद्देश सार्थ ठरवेल!

दैनंदिनी २३ जुलै २००९

आजचा दिवस कालसारखा नसेल.. एका रात्रीच्या अल्याड पल्याड असणारे दोन दिवस किती वेगवेगळे असतात ना… रात्रीचा हा पडदा अजब आहे, नाही!.. कितीतरी जणांना बर्‍याच गोष्टी विसरायला लावतो तर कितीतरी जणांना रात्र आली की भरून येते… कोणी एकटेपणाच्या विशाल सवलीमध्ये जाताना आणखी हळवे होते तर कोणी जगाच्या सीमारेषा सोडून स्वतःच्या एकट्या विश्वात रमता येते म्हणून खुश असते… कळत नाही ना आपणही नकळत असे किती पडदे जपलेले असतात किंवा वेगवेगळ्या पडद्याआडून आपल्या आयुष्याचे दालन सजवलेले असते. पडदा म्हणजे दोन विरुद्ध किंवा दोन सारख्या नसलेल्या बाजुंना एकाच वेळी सामोरा आणि पाठमोरा असलेला, दोन्हीकडे अस्तित्व असलेला अन तरीसुद्धा दोन्हीमधून अलिप्त असलेला अजब महाभाग. कधी येणारी सूर्यकिरणे गाळून घरात आणतो असेही वाटून जाते तर कधी वाटते की आत येणारे प्रत्येक सुख-दुःख सर्वात पहिल्यांदा स्पर्शणारा वा अनुभवणारा हाच की!
 
पडदा कधी कसल्यासा विचारांचा, कधी कसल्याशा अजब कल्पनांचा, कधी कसल्याशा नाहक समजुतींचा, कधी कसल्याशा वेडगळपणाचा… प्रत्येकजण पडद्यासवे वावरत असतो अन पुढे चालत असतो… पडदा असावा की नसावा हा प्रश्न डोक्यात आला असेल ना… मला वाटते की पडदा असावा की नसावा याचे उत्तर ’हो’ पण नाही अन ’नाही’ पण नाही… करण काही पडदे असतची असतात, तुम्ही आम्ही त्यांना बाजुला नाही करू शकत किंवा करूही नये, जसा एखाद्या वचनाचा पडदा, सदाचाराचा पडदा, विनयशीलतेचा पडदा, सन्मानाचा पडदा किंवा भावुकतेचा पडदा… असे कितीतरी आहेत अन असतात, आपल्या नकळत आपण त्यांच्या मागेपुढे होत असतो… काही जणांना आभासीपणाचा पडदा त्रास देतो तर काही जणांना स्वप्नांचा, कल्पनांचा पडदा त्रास देतो… मतितार्थ एवढाच की हे पडदे ओळखता आले पाहीजेत, योग्य तिथे अन योग्य त्या वेळेला त्यांची उपयुक्तता करुन घेता आली पाहीजे… काहींचे म्हणणे पडेल की मोकळे जगताना या सगळ्याचा विचार करीत बसलो तर आयुष्य जगणे अवघड होईल, बोजड होइल….. पण खरेतर मोकळं अन मनापासून ‘माणसासारखं’ जगलं की या पडद्यांचे पालन आपोआपच होते त्याचे भान आपसुकच राखले जाते ते वेगळे राखण्याची गरज जाणवत नाही… जेव्हा काहीतरी वेगळे वागण्याचा प्रयत्न असतो तेव्हा जबरदस्तीने एखाद्या पडद्याचा सहारा घेण्याचा निष्फळ प्रयास करताना काही प्राणी दिसतात… आणि तेव्हाच ते भान आवश्यक किंवा अत्यावश्यक! आपण समोर असताना जर कोणी सहज वागू शकत नसेल किंवा दुखावले जात असेल तेव्हा या पडद्यांची शहानिशा करणे भाग असते अन म्हणुनच यांची ओळख महत्वाची!!
 

बर्‍याचदा वाटून जाते की आजचा दिवस काहीतरी वेगळी सुरुवात करूयात किंवा रखडलेले काम मार्गी लावूयात.. कामे अन त्याची आखणीदेखील आपल्या डोक्यात तयार असते.. फक्त सुरुवात करायची बाकी असते अन ती नेहमी नेहमी पुढे सरकत असते.. कारण कळत नाही.. कधी थकवा तर कधी विस्मरण किंवा कंटाळा… नेहमी रात्रीला शरण जाताना आणखी एक दिवस ढकलला अशी भावना डोक्यात आली की चीडचीड होते.. आणखी एक दिवस कारणी लावला ही भावना सर्वार्थाने जेव्हा माझ्यात उतरेल तेव्हा आणि तेव्हाच जगणे सार्थक झाले असे म्हणता येईल… आणि तोपर्यंत तिथे पोहचण्यासाठी ती साधना करणे गरजेचे आहे.. जरी या दोन भावना साध्या अन सोप्या दिसत असल्या तरी दोन टोकाच्या भुमिका आहेत.. अन एका भूमिकेतून दुसर्‍या भूमिकेत पोहचायला विविध अवस्थांमधून पार व्हायला लागते… काळाच्या कसोट्यांमधून आपले नाणे पारखून घ्यावे लागते… प्रखर आत्मविश्वासाबरोबर कर्तृत्वाचीही तेजाळी सभोवार उमटावी लागते.. सकारात्मक इच्छाशक्तीची परिसीमा गाठावी लागते, भावभावनांच्या हिंदोळ्यातून शांत, स्थिर, तपस्वी योगी व्हावे लागते…. सामान्यपणाच्या चौकटीत राहून असामान्य व्हावे लागते… तेव्हा अन तेव्हाच येणार्‍या काळातून इतिहास घडवला जाऊ शकतो…

दिवसभराचा आलेख साधारण होता… काही भावभावना उचंबळून येत होत्या तर काही निर्विकारपणे कन्नी कापत होत्या… वर्षानुवर्षे जपलेली अन तेवढ्याच तन्मयतेने जोपासलेली ठेव इतर कोणाकडे सोपवताना होणारा भावनांचा उद्रेक शब्दातीत आहे.. काल अशीच खेचाखेच चालू होती….. काही गोष्टी कितीही माहीत असल्या तरीही त्यासाठी मनाची तयारी होत नाही… बाह्यदर्शनी कितीही खंबीर वाटलो तरी आतमध्ये उडालेली खळबळ वेळोवेळी पापण्यांच्या मागे दाटून येते… कधी एखादी थेंब होऊन ओघळतेही तर कधी शिष्टाचाराचा मान राखून पुन्हा काळजाकडे मार्गस्थ होते… अन मग पुन्हा जाणवून गेले की वैमानिकाला कोणत्याही क्षणी खचण्याचा अधिकार नसतो… मनातले भावनांचे मेघ मनातच गिळावे लागतात.. तिथे वाटेचा मागमूस नसतो आणि पाऊलखुणांचा ठसाही नसतो.. दृष्टीसमोर दाटणारे खरे मेघ हेच त्याच्यासाठी जास्त महत्वाचे असतात हे सत्य!!

दैनंदिनी २२ जुलै २००९

श्रावणामध्ये पावसाची एखादी सर येऊन गेल्यानंतर किंवा भल्या पहाटे कधी रानात फिरायला गेल्याचा अनुभव विलक्षण असतो… माझ्यासारख्या भटक्या माणसाला रानातील ती एकटी पाऊलवाट नेहमी भुरळ घालते, दोन्ही बाजूला वाटेवर डोकावणारी छोटी छोटी हिरवी गवताची पाती जणू काय आपल्या स्वागतासाठीच कमान करून उभी आहेत असे वाटत असते, किंवा एखादी प्रेयसी आतूर होऊन आपल्या प्रियकराच्या वाटेकडे ज्या पद्धतीने डोळे लावून असते किंवा टाचा उंचावून ज्या पद्धतीने लांबून वळणावरून आपल्या मनमोहनाच्या हलक्याशा एखाद्या झलकेसाठी आसुसलेली असते किंवा अगदी भरलेल्या डोळ्यांमध्ये वाहत्या प्रेमाबरोबर आपल्या प्रेमाची हर छबी कैद करण्यासाठी ती धडपडत असते, इतर कोणी आपल्याकडे बघतेय किंवा कोणी काय म्हणेल याचे यत्किंचितही भान न ठेवता जशी ती सार्‍या गर्दीमध्येही श्वासांचे खोल उसासे आतमध्ये दडपून स्वतः नेहमीसारखीच असल्याचा वेडगळ भाव चेहर्‍यावर आणत असते अन नकळत याचमुळे ती अजून जास्त वेगळी वागत असते… अशाच काहीशा पद्धतीने ही वाटेवरील गवतांची हिरवी पाती वाटून जातात.. वाटेला डोळे लावून बसलेली वा श्रावणाच्या मनोहारी प्रेमाच्या प्रतीक्षेत वाटेवर आत्मभान हरवलेली वाटतात.
 
जेव्हा आपण चालत असतो तेव्हा पायावर किंवा अंगावर होणारा तो स्पर्श आधी नकोसा वाटतो पण नंतर थोड्या अंतराने तो चुकला की बावरायला होते… या गवतावरील दवबिंदू किंवा तो ओलसरपणादेखील वेगळाच… आपला स्पर्श झाल्यानंतर त्या गवताचे लाजणे किंवा अलगद अंग चोरणे यातील मजा क्षणभर थांबून अनुभवायला खास आवडते.. त्या स्पर्शातील ओलावा किती जिवंत असतो… तो हलकासा ओलावाही मनाला आतूनबाहेरून भिजवून टकतो, त्यातील ते शुद्ध, सात्विक दवरुपी प्रेम समजायलाही तो संवाद व्हावा लागतो, त्या गवताने आपल्याकडे असणारे सगळे काही तर खुल्या दिलाने समोर मांडलेलेच असते पण सकाळी सकाळी भेटायला येणार्‍यांसाठी तो मायेचा ओलावा प्रत्येक पानापानावर दवांत साठवून ठेवलेला असतो.. जे आहे ते सगळे समोरासमोर, गरज असते ते समजून घेण्याची अन संवाद साधण्याची… या गवताचा हाच गुण तर वेड लावतो.. कोणत्याही वाटसरूमध्ये फरक न करता असे दुर्मिळ प्रेम बिनामोबदला वाटणे माझ्यासारख्या क्षुल्लक माणसाला विचार करायला लावते… त्या गवतासारखे वाटेवर सगळे काही मांडून मायेचा ओलावा येणार्‍या जाणार्‍याला आपल्यालाही कधीतरी देता यावा यासाठी त्या गवताचे अन या निसर्गाचे पाय धरावे, प्रार्थना करावी काहीही कळत नाही नकळतच जाता जाता डोळे मिटून आपल्याकडील सच्च्या मायेचे दोन अश्रु अलगद त्या गवतावर ठेवले जातात…
 
या पाऊलवाटेची मज्जाच न्यारी… कितीतरी वेळा निघताना असलेले उद्विग्न भाव कुठेतरी अलगद निसटून जातात व एक समाधानी व संतृप्त उल्हासी भाव येताना गाठीशी असतो.. जगात हजारो रुपये खर्च करूनही न मिळालेला तो भाव या रानात कितीतरी वेळा सहज अन विनासायास मिळून जातो… शेवटी प्रत्येक गोष्ट उपभोगण्यामागे त्यातून आनंद मिळवणे वा समाधान मिळवणे हेच तर उद्दीष्ट असते ना.. माझ्या या फेरफेटक्यात या निसर्गाशी जुळवून घेताना जन्मोजन्मीच्या आगतिकतेची जपलेली भावभावनांची गाठोडी पदोपदी सपडून जातात… कृत्रिम विश्वात बस्तान बसवलेले आपण जेव्हा अशा एखाद्या अकृत्रिम अनुभवाच्या आठवणीमध्ये हरवून जातो तेव्हा या कृत्रिम जगाचे बंध कसे निसटतात हेदेखील आपल्याला कळत नाही…. ज्या बंधांसाठी आपण आपले सारे आयुष्य वेचतोय तेही क्षणार्धात एखाद्या आठवणीने गळुन जातात, नाही? कारण ते कृत्रिम असतात… आपण कृत्रिमतेच्या मागे धावून त्यांना खरे मानून बसलो आहोत हे सत्य!
 
माझा कालचा दिवसही असाच काहीसा होता.. इथल्या हलक्या सरींनी अन येथील रंगीबेरंगी पानाफुलांनी भारतातलाच श्रावण जनू भेट दिला असे म्हंटले तरी चूक ठरणार नाही… पण पूर्णवेळ तो तसाच नाही राहू शकला हेही मला मान्य करावे लागेल… एखाद्या अट्टल मोटरबाईक चालवणार्‍याला रिंगणाबाहेर बसून निरर्थकपणे नवशिक्यांना चुकीच्या पद्धतीने मोटरबाईक चालवताना बघणे किती चीड देणारे असु शकते.. तसाच काहीसा भाव संध्याकाळी मावळत्या सूर्यकिरणांबरोबर खिडकीतून घरात तरळून गेला… थोडावेळ चीडचीडही झाली पण मग पत्नीबरोबर झालेल्या गप्पांमधून त्यातूनही लीलया बाहेर पडता आले.. देवपूजेनंतर तर तो भाव कुठल्या कुठे निघून गेला हेही कळले नाही…
 
सिंहाच्या बछड्याला घरात आयतं मांस देऊन वाढवले तर काय फायदा? त्याला शिकार करता आलीच पाहीजे त्याला त्याच्या मुळ स्वभावाचा वेध घेता आलाच पाहीजे अन त्यासाठी त्याला रानात एकटे सोडणे भाग असते ना की पिंजर्‍यात बांधून ठेवणे… अनुभवांची व मायेची शिदोरी द्यावी पण स्वाभिमानाच्या भुकेची पुरेपुर जाणीव देणे हे महत्वाचे!! हेच मोटरबाईक चालविणार्‍यांच्या बाबतीत लागू पडते तसेच त्या छाव्याच्या अन हो सर्वप्रथम आपल्याबबतीतसुद्धा!!

दैनंदिनी – २१ जुलै २००९

एखाद्या पक्ष्याला उंच आकाशात घिरट्या घालताना आपण नेहमीच पाहतो.. वाटून जाते की हा पक्षी सर्वार्थाने मुक्त आहे.. तो पाहिजे तिथे जाऊ शकतो, उडू शकतो आणि तेही कोणत्याही बंधनाशिवाय.. आणि मग आपण आपली अवस्था पाहतो आणि कसे तरी वाटते.. आपल्याला उडता येत नाही, पाहिजे ते करता येत नाही म्हणून खंत वाटून जाते.. पण कधीच त्या पक्षाच्या बाजूने विचार करण्याची पुसटशीसुद्धा कल्पना आपल्या मनात येत नाही.. तो कदाचित चुकला असेल, तो त्याच्या नातलगांना शोधत असेल, तो उपाशीपोटी अन्नासाठी वनवन भटकत असेल, जमिनीवर थारा न मिळाल्याने जबरदस्तीने आकाशात तरंगत असेल किंवा आपल्यासारख्या एखाद्या माणसाने त्याला त्रास दिल्याने तो घाबरला असेल! कितीतरी शक्यता आहेत पण आपण यातील एकही विचारात घेत नाही.. कदाचित उलटेही असू शकते की तो आनंदात असेल, त्याचे मस्त पोट भरल्यामुळे तो विहार करीत असेल, इतर मित्रांना दूर सोडून त्याला एकटे उंच आकाशी फिरायला आवडत असेल, एखाद्या माणसाला त्याने त्रास दिला असेल आणि आता तो त्याला खिजवत असेल! दोनही बाजू वेगवेगळ्या पण बर्‍याचदा आपल्या विचारांच्या कक्षेमध्ये न बसणार्‍या.. कारण आपण आपल्या चष्म्यातून त्या पक्षाला बघतो.. आपण आपल्या साचेबद्ध धाटणीतून त्याचा आढावा घ्यायला जातो….
 
तो पक्षी उंच आकाशात विहार करतो पण शेवटी त्याचे दुःख त्यालाच ठाऊक! आकाशाला सीमारेषा नसते हे विदारक दुःख अनुभवलेला साधक, पंख असूनही आकाश भेदू न शकण्याचे दुःख रिचवणारा झिंगलेला मद्यपी, आकाशाच्या पिंजर्‍यात कैद असणारा व हे सत्य मानून उडणारा स्वच्छंदी! कोणी म्हणेल की आकाशाला सीमारेषा नसते यात नवीन ते काय?? पुन्हा आपण आपल्या विचारकक्षेतून जगाला पाहतो.. अहो ज्याला ह्या संसाररुपी मोहमायेतून मुक्त व्हायचे आहे, परब्रह्माशी संवाद साधायचा आहे त्यालाच हे दुःख कळेल… पण असे असले तरी त्याचे उडणे कधीही थांबत नाही त्यातले सातत्य कमी होत नाही.. त्याचे हे आकाशी व्रत तेवढ्याच प्रखरतेने अन संयमतेने सुरु असते.. स्वतःच्या मर्यादा स्वीकारून केलेली साधना ही नेहमी सच्ची असते हेही खरेच की!
 
पण आपण त्या पक्षाच्या कितीतरी विरुद्ध वागयला जातो.. आपल्याला आपल्या मर्यादा मान्य करायला लाज वाटते… पण सभ्यपणे त्या स्वीकारून जर साधना केली तर त्यांची कक्षा वाढवता येते हे आपण विसरून जातो… बर्‍याचदा आपण आपल्याच प्रतिमेच्या सावलीमध्ये, आपल्याच एखाद्या विचाराच्या सावलीमध्ये कैद होतो.. अन जर मुक्त विहार करायचा असेल तर ही विचारांची किंवा प्रतिमेची कैद झुगारायला हवी हे विसरून जतो… मर्यादा कळल्या तरच आणि तरच विस्तार शक्य आहे हे वैश्विक सत्य आहे… मर्यादेमध्ये बांधून घेऊन आपण आपल्याच अभिव्यक्ती विस्तारावर अन्याय करत आहोत हे विसरून जाणे म्हणजे लख्ख उजेडात डोळे बंद करून चालण्यासारखेच नाही का?
 
अडखळत अडखळत कालचा दिवस रात्रीमध्ये विरून गेला… डोक्यात एकाच वेळी बर्‍याच गोष्टींचा शंखनाद सुरु असतो, काही नविन वाचायला मिळत असते तर कधी कधी एखाद्या विचाराने प्रेरीत व्हायला होते या दैनंदिनीच्या स्वरुपातून आता शब्दात व्यक्त होता येत असल्याने आता एक जादुई आरसा मिळाल्याचा आगतिक आनंद नेहमी जवळ असतो.. हा साधासुधा आरसा नाही ना.. हा तर काळाचा आरसा आहे, जेव्हा पाहिजे तेव्हा मला एखाद्या दिवसामध्ये स्वतःला पाहता येते, अनुभवता येते… एका अर्थाने वैचारीक मंथनास हे खतपाणीच आहे.. त्यामुळे स्वतःमध्येच सुधारणा करता येते.. स्वतःच्या मर्यादांची पुरेपूर जाणीव होते हे महत्वाचे… माझ्यासारख्या शून्याचा असा विस्तार होऊ शकते हे कधीही मला स्वतःलाही पटले नसते पण आज ते सत्यात आहे हेदेखील तेवढेच सत्य! याचे सर्व श्रेय माझ्या सहचारिणीच्या माझ्यावरील विश्वासाला किंवा तिच्या आग्रहाला जाते.. अन नक्कीच हे आम्हा दोघांकडून करवून घेणार्‍या परब्रम्हामुळेच केवळ शक्य आहे हेदेखील तेवढेच निर्विविवाद सत्य!

दैनंदिनी – २० जुलै २००९

कालचा दिवस नव्या सुरुवातीला साद घालणारा होता… वाद-प्रतिवादापेक्षाही संवादाच्या जवळ जाणारा होता.. इतरत्र विखुरलेल्या अस्तित्वाला एका सूत्रात बांधणारा होता… नेणीवेतून पुन्हा जाणीवेकडे आणणारा होता… कधी आपण आपल्याच विश्वात सीमीत होऊन राहतो नाही.. का? माहीत नाही.. कारणांची यादी सगळ्यांची वेगवेगळी.. कोणी स्व-कर्तृत्वाच्या सावलीमध्ये, कोणी यशाच्या तर कोणी अपयशाच्या चिंतनामध्ये, कोणी येणार्‍या उद्याच्या तर कोणी गेलेल्या कालच्या विवेचनामध्ये…. स्वामी विवेकानंदांची बेडकाची गोष्ट अन दृष्टांत आठवून गेला… आपण आपल्याच डबक्याला समुद्र समजून बसलो आहोत.. खर्‍या समुद्राची ओढ किंवा आस अजून तरी माझ्यामध्ये लागली नाही असेच सारखे राहून राहून वाटून गेले..

काल श्री प्रकाश आणि मंदाताई  आमटे यांची मुलाखत बघण्याचा योग आला… बहुतेक त्याक्षणीच माझा दिवस सत्कारणी लागला होता.. त्यांनी उभारलेले काम, त्यामागची त्यांची अविरत साधना, कुणाच्याही मदतीवर विसंबून न राहता केलेले कष्ट सारेच थक्क करणारे आहे. त्यांचा साधेपणा, प्रामाणिकपणा पाहीला की त्यांच्याबद्दलचा आदर दुणावतो.. गेल्या महिन्यात हे दांपत्य लंडनमध्ये असताना त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचा योग चुकल्याची खंत या मुलाखतीमुळे कुठच्या कुठे दूर निघून गेली… एका वेगळ्याच जाणीवेने अंगावर शहारा येऊन गेला.. सध्याच्या ‘विकसित'(?) व ‘पुढारलेल्या’ (?) समाजप्रवाहाला लांब ठेवत एका दुर्गम आदिवासी भागातील माणसातला देव शोधुन त्याची अहोरात्र सेवा करणार्‍या या देवदुतांच्या कार्यास आमचा सलाम! लवकरच भारतात परतून हेमलकश्याला भेट देण्याची इच्छा मनात येऊन गेली तर दुसर्‍या बाजूला आपण सुद्धा खर्‍या अर्थाने समाज-उभारणीचे काम करू शकतो याचीही हलकीशी लकेर मनामध्ये उठून गेली… जाणीव हरवलेल्या या भौतिक सुखांमध्ये आयुष्य वेचण्यापेक्षा एखाद्या दुर्गम ठिकाणी किंवा खर्‍या भारताच्या धरणीपुत्रांसाठी काहीतरी करणे जास्त योग्य अन समर्पक वाटून गेले… 

भारततील ८०% जनता अजूनही एखाद्या शापिताप्रमाणे आयुष्य कंठत आहे हे सत्य आहे! भारतातील बोटावर मोजण्याइतक्याच शहरांच्या ओबडधोबड प्रगतीवर विकसित भारताचे स्वप्न रुजविणार्‍या आपल्यासारख्या पांढरपेश्या लोकांनी डोळे उघडून आजूबाजूला पाहण्याची गरज आहे… एकांगी विकास हा कधीच आणि कधीच सर्वांगीन विकास होऊ शकत नाही हे समजून घेण्याची गरज आहे.. मुलभूत गरजाच जिथे अजून अपूर्ण आहेत तिथे विकास कसा काय होऊ शकेल? तरुणपिढी पाश्चात्तीकरणामुळे नागवली गेली आहे.. ग्लोबलायझेशनचे खरे दुष्परिणाम आज २० वर्षानंतर हातपाय पसरवू लागले आहेत…. विकसित भारत हा एक बुडबुडा होता अन तो आता फुटलेला आहे… राजकरण्यांनी परकीय गुंतवणुकीच्या मागे लागून देशाला विकायला काढले आहे… परकीय गुंतवणुक ही अंदाधुंद वाढणार्‍या अनावश्यक तनांप्रमाणे भारतीय समाजव्यवस्थेला गिळंकृत करीत आहे.. संस्कृती, इतिहास, विचारपद्धती या सगळ्या गोष्टी आपल्यामधून कालबाह्य होत चालल्या आहेत याची जाणीव क्षणाक्षणाला येते… छत्रपती शिवराय, महाराणा प्रतापांच्या देशाला सक्षम नेतृत्वाची गरज आहे… अन या करोडोंच्या देशात ते मिळू नये यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट ती कोणती असेल… असो.. हा न संपणारा विषय आहे…

कधी कधी रस्त्यावर एखादा दगड आपल्या पायाने उडविला जातो.. त्या दगडाला काहीही जाण नसते की त्याला कोणी उडवले अन तो कुठे आला याची… आपणही तिथून निघुन जातो.. परत काही वेळाने आणखी कोणी तरी येतो अन त्या दगडाला पायाने उडवतो अन तो दगड परत नव्या जागेवर जातो.. आपल्या तरुण पिढीचे दुर्दैवाने असेच काहीसे झाले आहे… कोणीही येतो, स्वप्न दाखवतो अन पाहीजे ते करवून घेतो… आपणही ते बिनबोभाट करतो.. परत थोड्या काळाने अजून कोणीतरी येतो.. नविन स्वप्न दाखवितो परत आपण त्याला हवे तिथे जातो, त्याला हवे ते करतो अगदी त्या दगडाप्रमाणे! आपल्याकडे आपले विचार नाहीत, आपल्याला काय करायचे आहे याची कणभरही जाणीव नाही… फक्त पैसे कमावणे प्रगती होऊ शकते का? ज्या समाजाने आपल्याला मोठे केले, ज्या वातावरणामुळे आपण सुधारलो, आज जे काही आहोत ते तिथे मिळालेल्या सकस गोष्टींमुळेच, मग याची परतफेड करण्याची जाणीव का जागृत होत नाही.. ती पुर्ण शून्य झाली आहे.. अगदी त्या दगडाप्रमाणे! ती सजगतेची जाणीव परकीय स्व्पनांच्या आहारी गेली आहे… लवकरात लवकर ती मुक्त व्हावी एवढी अन एवढीच प्रभुचरणी प्रार्थना…

असाही दिवस जातो कधी कधी… या जाणीवेतही वेगळीच धुंदी आहे अन जीवंतपणाची नशा आहे हेही खरे… स्वर्गीय सुखांमध्ये लोळून मुर्दाड एकटे आयुष्य व्यतीत करण्यापेक्षा आशाअपेक्षा हरविलेल्या, जगाशी संपर्क नसलेल्या बांधवांमध्ये सहज जीवन जगण्याची संज़ीवनी देण्यासाठी झगडणे कधीही उजवे होय!

दैनंदिनी – १८ व १९ जुलै २००९

दोन दिवसांचा छडा लावणं अवघड आहे.. अन त्यात काय काय झाले हे लिहीणेही तेवढेच अवघड आहे.. व्यतीतावस्थेतून बाहेर पडून पुन्हा आशावदाच्या नौकेवर स्वार होण्याचा किंवा सर्वसमावेशक विधात्यावर विश्वास ठेऊन त्याला शरण गेल्यानंतरचा अनुभव म्हणजे गेले दोन दिवस… दोन टोकाच्या भूमिकांमध्ये झालेले घमासान… दोन विचारसरणींमध्ये किंवा आपल्या आतमधील दोन विचारपुरुषांच्या लढाईचे पर्यावसान संगनमतात होणे, दोन अजातशत्रुंचा सलोखा होणे अन तो सोहळा याची देही याची डोळा अनुभवणे म्हणजे गेले दोन दिवस होते… पराभवाच्या गर्तेत किंवा निराशावादाच्या अंधारात भरकटलेल्या मनाला पुन्हा विश्वविधात्याच्या कृपाशीर्वादाच्या तेजामध्ये न्हाऊन निघणे म्हणजे गेले दोन दिवस…. कधी कधी किंवा बरेचदा आपण आपले सांत्वन करायला कमी पडतो.. तेव्हाच वेगळ्या द्वंद्वात आपण सापडून जातो.. मुळ स्वभावाच्या विरूद्ध आपण वागायला जातो अन नकळत वेगळ्याच सापळ्यामध्ये आपण गुंतून जातो…
 
समुद्राच्या दोन लाटांमधील फरक काय? पावसाच्या दोन सरींमधील फरक काय? कळत नाही ना पण कधी कधी या अशा निरर्थक विचारांमध्ये माझे तासनतास दवडलेले आहेत…. कधीतरी त्या दोन लाटा वेगळ्या करून बघता येतील का? किंवा कधी तरी त्या दोन सरींचा मागोवा वेगळा वेगळा घेता येईल का? हे नक्कीच अशक्य आहे सर्वसामान्य बुद्धीच्या माणसाला.. त्यामुळे त्याच्या मगे पडू नये हे सर्वस्वी मनाला पटलेलेही असते पण नाही, कधी कधी अट्टहास असतो आपलाच.. आपलाच आपल्यावरील राग असतो… जरी त्याचे उत्तर माहीत असते पण त्या उत्तरापर्यंत पोहचणे महत्वाचे होऊन बसते.. अन मग या द्वंद्वच्या शेवटी जेव्हा कळते अरे तो समुद्रा एकच आहे अन त्यातून उठणार्‍या लाटा फक्त पाण्यावर उठणार्‍या तरंगंसारख्या आहेत किंवा एखाद्या बुडबुडयाप्रमाणे आहेत… पावसाच्या सरी या शेवटी त्या ढगांच्या वाफेमधूनच वातावरणात येत असतात… त्याही क्षणापुरत्याच वेगळ्या असतात अन नंतर एकच होऊन जातात.. पण कधी यातून मी समुद्राच्या अंतरंगाशी जाण्याचा प्रयत्न करतो.. त्याचा स्वभाव माझ्या आवाक्यात येतोय का याचा आढावा घेतो.. त्याच्यामध्ये उसळलेल्या भावनाउद्रेकाला शोधण्यासाठी झगडतो.. कधी सरींमधून त्या आकाशाच्या गाभार्‍याला हात घालण्याचा कयास असतो…. थोडक्यात काय, आपल्या निराशेत राहण्यापेक्षा इतरांची निराशा, उद्विग्नता दूर करण्याचा प्रयत्न केला जातो, त्यांना त्यांच्या कारुण्याच्या छायेमधून बाहेर काढण्यासाठी उत्तराचा माग घेतला जातो…  थोडे विचित्र आहे पण हो असेच काहीतरी होते…
 
काही विचार मनात ठिय्या मांडून बसतात.. नको असलेल्या पाहुण्यासारखे.. नको असतात पण घलवता येत नाहीत.. आपण असमर्थ ठरतो… पण तेव्हाच त्याला म्हणजे आपल्या आतमधील चैतन्यशक्तीला शरण जाणे गरजेचे होते.. त्याचे स्मरण असणे महत्वाचे ठरते.. जेव्हा आपल्याला आपल्या मनाचा थांगपत्ता नाही सापडत तेव्हा निश्चिंत्पणे स्वतःला त्याच्याकडे सोपवणे उचित ठरते..
 
आजपर्यंत ज्याने आपल्याला इथपर्यंत आणले त्याच्यावर विश्वस टाकून निवांत होणे जास्त योग्य की आपण आपल्याच नियंत्रणात नसताना नाहक काळाशी झुंजत राहणे योग्य? हे ज्याचे त्याने ठरवायचे.. त्याची जाणीव असली की अशा प्रश्नाचे उत्तर शोधण्याचीही गरज पडत नाही हेही तितकेच खरे अन निर्विवाद सत्य!!