समिधा – माझ्या नजरेतून


sadhana ‘समिधा’ वाचायला घेतलं…. वाचताना स्वतःला कुठेतरी सांडलं…. अन असं सांडलं की पुन्हा वेचण्याचाही मोह नाही झाला…

स्वर्गीय मुरली उर्फ बाबा आमटे यांच्या लोकविलक्षण कार्याची ओळख करुन देणे म्हणजे त्या सूर्यालाही तुझा प्रकाश पडतो असं काहीसं सांगण्यासारखं आहे… किंवा त्यांची ओळख करुन देण्याइतपत ओळख अजून मी कमावली नाही आहे…

बाबा म्हणजे समाजसेवेचा कल्पतरु अन त्या कल्पवृक्षाबरोबर असणारी वेल म्हणजेच श्रीमती साधना आमटे… पुस्तक वाचताना प्रसंगी ही वेल या कल्पतरुला कशी सावरु शकते याचीही प्रचिती येते… अगदी बाबांच्या बरोबरीने उभे राहून, एक उच्चभ्रू कुटुंबाचा वारसा असूनही दारिद्र्याला सौभाग्य मानून त्यातून इतर लाखो संसार फुलविण्याची किमया साधनाताईंची आहे…. अन ही किमया घडविण्यासाठी गेल्या ७६ वर्षापेक्षाही कालावधीतील घटनांचा यथोचित आलेख आपल्याला समिधा वाचताना पहायला मिळतो…
बाबांच्या कार्यात साधनाताईंचे योगदान म्हणजेच बाबांनी सुरु केलेल्या या अहोरात्र यज्ञातील अविरत तेजाळत राहणार्‍या समिधेसारखंच आहे याची खात्री पटते… पुस्तक वाचताना या यज्ञाच्या तेजाची उब आपल्यापर्यंत पोचली नाही तर नवलच..

अगदी पुस्तकाच्या सुरुवातीला बाबांच्या अन साधनाताईंच्या जगावेगळ्या प्रेमकहाणीचे वर्णन वाचताना त्याचे वेगळेपण मनाचा ठाव घेते. नंतर दिसते ती एका स्त्रीची सक्षम भूमिका… मग समाजसेवेत असूदेत की मग संसारात असूदेत की मुलांचे संगोपन करणार्‍या आईच्या भूमिकेत असूदेत…..की एका अर्धांगीनीच्या रुपात असूदेत की मग एका संघटकाच्या भूमिकेत असूदेत… अशा एकापेक्षा एक कितीतरी भूमिका कधी प्रत्यक्षपणे तर कधी पडद्यामागून खंबीरपणे त्यांनी पार पाडल्या.. याचा तपशीलवार वाचून स्फुरण न चढेल तर आश्चर्य!!!

पुस्तकामध्ये असलेल्या पत्रांचा शब्दवर्षाव ही मनाला भारावून टाकतो.. मग ती बाबांनी साधनाताईंना प्रेमाच्या सुरुवातीला लिहिलेली असूदेत की नंतरच्या काळात उभयंतांनी एकमेकांना केलेला पत्रव्यवहार असूदेत….

झगमगाट दुनियेचे स्वप्न पाहणारी तरुणपिढी नवीन नाही.. पण त्या झगमगाटाकडे हजारो लाखो पीडीत लोकांना वाहून नेणारी तरूणपिढी घडविण्याचे श्रेय बाबांना आणि साधनाताईंना जाते… आज तिसरी पिढीही तेवढ्याच उमेदीने अन चिकाटीने बाबांचे काम पुढे नेण्यास सिध्द झाली…. एका ठिकाणी साधनाताईंने लिहिले आहे की…. आधी आम्ही दोघे होतो सुख वाटून घेत होतो.. नंतर दोघांचे तीन अन मग हजार अन मग लाख झाले… आम्ही सुख वाटतच राहीलो.. पण आमच्याकडचे सुख अजूनकाही संपले नाही.. भरपूर शिल्लक आहे…

अगदी शुन्यातून उभे राहीलेले समाजसेवेचे साम्राज्य उभारताना बाबांना झालेले अतोनात कष्ट, स्वतःच्या तब्येतीची झालेली परवड जेवढी स्पष्ट होते तेवढीच त्याचवेळेला साधनाताईंच्या मनातील आंदोलनाचे हेलकावे काळजाच्या तारा छेडल्यावाचून राहत नाही… एक स्त्री म्हणून उपसावे लागणारे कष्ट आणि असंख्य अग्निदिव्यांना पार करण्याचे अचंभित करणारे कसब साधनाताई अगदी सहज शब्दांत मांडून जातात.. अन वाचकाबरोबर राहते ती त्या यज्ञाची धग नेहमीच उब घेण्यासाठी… कदाचित नकळतपणे आपणही स्वतः या यज्ञातील समिधा होऊन आपले जीवन पुनीत करण्याचा विचार मनात ठाण मांडुन जातो… कुणाला समाजतील उपेक्षितांच्या उध्दाराच्या आजीवन स्वप्नांचेहि अदभुत शाप मिळतील… कुणाला समाजाच्या विसंगत प्रगतीची झळ मिळेल… तर चंद्रावर वावरणार्‍या जगाला आपण अजूनही जमिनीवर असल्याची अनुभूती येईल….

पुस्तक संपूनही विचारांचे चक्र संपत नाही… संपवता येत नाही.. कदाचित हेच या पुस्तकाचे साध्य आहे!!

समिधा वाचल्यानंतर शब्दांनी आपोआप आपली वाट मोकळी करुन घेतली… यावर साधनाताईंसाठी सुचलेल्या या काही ओळी..

http://www.orkut.com/AlbumZoom.aspx?uid=1907683316489248566&pid=37

बाबांचं काळाच्या पडद्याड जाणं रुखरुख लावून गेलं.. मनाच्या गाभार्‍यात एक फेसाळता समुद्र उठवून गेलं… त्या महात्म्याला ही माझी ‘श्रध्दांजली’

http://www.orkut.com/AlbumZoom.aspx?uid=1907683316489248566&pid=1202667824988&aid=1200978330

– १७ फेब्रुवारी २००८

One Response to समिधा – माझ्या नजरेतून

Leave a reply to Vijay More उत्तर रद्द करा.