दैनंदिनी – २९ सप्टेंबर २००९
सप्टेंबर 30, 2009 यावर आपले मत नोंदवा
अट्टहास करूनही जगणे मनासारखे होत नाही… जिथे पाऊल ठेवायचे तिथे जमीन सापडत नाही… स्वप्नांचे पंख छाटल्यासारखे वाटतात… भूलभुलैय्यामध्ये आत्मभान गमावून विचारांच्या साखळीमध्ये जेरबंद झाल्यासारखे वाटते… सापशीडीच्या खेळासारखे अगदी शेवटच्या घरातील सापाने गिळून पुन्हा सुरुवातीला फेकल्यासारखे वाटते… धोब्याच्या धोपटण्याने धोपटल्याप्रमाणे व त्या कपड्यातील बिचार्या पाण्याच्या थेंबांप्रमाणे उधळल्यासारखे वाटते… तोंड रंगवून झाल्यावर तेवढ्याच आवडीने तोंडात घेतलेल्या पानाला पिचकारीत थुंकून दिल्यासारखे वाटते… फळ्यावर खडुने लिहीताना सरसर पडणार्या धूलिकणांप्रमाणे आयुष्याच्या फळ्यावर उमटण्याआधीच फळ्याबाहेर फेकल्यासारखे वाटते… एखादा आवाज ऐकून सगळे काही विसरून जीवाच्या भीतीने उडणार्या असंख्य पाखरांच्या थव्याप्रमाणे जगणे वाटून जाते.. नैराश्य, हतबलता, उदासीनता अगदी रोजचे सवंगडी होऊन गेल्यासारखे फेर घालून नवे खेळ मांडत असतात… जगण्याचे उद्देश, धेय, ध्यास, प्रयत्न, कणखरता, शौर्य या सगळ्या गोष्टी कालबाह्य होऊन जगण्याच्या शब्दकोषामधुन बेमालुमपणे निघून गेलेल्या असतात… किती भंपक आयुष्य आहे हे! ना जगण्याला अर्थ ना मरण्याला अर्थ, जगण्याचे ओझे जन्मापासून मरणापर्यंत वाहून नेणारी अशी असंख्य गाढवे आपल्या आजुबाजुला सहज सापडतील.. कधी कधी आरशात आपल्या प्रतिबिंबातही सापडेल!
अशावेळी लोकांना हवी असते ती सहानुभुती, दया! … कुणाच्या तरी सावलीमध्ये राहण्याची गरज निर्माण होते आणि खरेतर इथेच याच क्षणाला एका बांडगुळाचा जन्म होतो… अशी बांडगुळे ना कधी स्वतः वृक्ष होऊ शकतात आणि ना कधी वृक्षावाचुन स्वतःचे अस्तित्व दाखवू शकतात.. प्रेरणा जरूर घ्यावी, आदर्शवाद जरूर स्वीकारावा, पण समोरच्याचा प्रगतीचा फॉर्म्युला जसाच्या तसा स्वतःच्या जगण्याला लावताना जरा देवाने दिलेल्या अकलेचा वापर जरूर करावा… समविचारी असणे वेगळे व एखाद्याच्या मागे शेपुट धरून फरफटत धावणे वेगळे!
आजकाल स्वतःला अमुक तमुक नेत्याच्या नावाशी जोडण्याचा तरुणांचा प्रयत्न दिसतो… मित्रांनो, समर्थकांच्या झुंडीमधील मेंढरू होण्यापेक्षा समर्थ व्यक्तिमत्व व्हा… तत्वांचे आदान-प्रदान करणे गरजेचे असते पण एखाद्या ठराविक तत्वांच्या साच्यामध्ये अडकून एक साचेबद्ध कार्यकर्ता तयार होणे हे हास्यास्पद आहे… साच्याच्या आतमध्येही पोकळी राहिली की होणारी कलाकृती ही विक्षिप्त होते… तिला उचलुन फेकून द्यावे लागते… याहीपेक्षा स्वीकारा ते मार्गदर्शन.. प्रत्येकाने प्रत्येकाच्या आभाळाची जाणीव करुन घ्या… आदर्श विचारांचे कोठार मुक्त हस्ताने उपलब्ध करुन घ्या, त्याचा ध्यास घ्या… एकाच उद्देशाला वेगवेगळ्या मार्गाने प्राप्त करता येते हे मान्य करणे गरजेचे आहे… पठडीबंद घोड्याप्रमाणे वागल्यानंतर माणूसही पुढे आयुष्यभर घोड्यासारखाच वागतो… त्याला निर्णायक अमृतापेक्षाही हरभराच गोड वाटतो… काळानुसार होणारे बदल स्वीकारण्याची वृत्ती अंगीकारलीच पाहीजे… सारासार विचारांची ओळख घेता आली पाहीजे… या घडीला समर्थ नेत्यांची गरज आहे… समर्थ व्यक्तिमत्वातूनच सकस नेत्याची निर्मिती होते… प्रत्येक समर्थ नेता हा उत्तम समर्थक असतो पण एक निष्ठावान समर्थक दुर्दैवाने आदर्श नेता होऊ शकत नाही… पुढाकार घ्या.. काळाला अंगावर घ्या… कळपामध्ये राहून कळपामागे फिरण्यापेक्षा आता कळपाचे अधिभारी व्हा!
देशाचे झालेले अधःपतन आपल्या पिढीला पहावेही लागत आहे व झेलावेही लागत आहे.. याला बदलायचे असेल तर आपल्याला प्रथमतः कात टाकली पाहीजे.. आपल्यातून प्रत्येकाने पुढे येऊन काम केले पाहिजे…. कोणते काम करायचे हे सर्वाधिकार आपल्याकडे आहेत.. असंख्य खेड्यांमधील असंख्य प्रश्न आ वासून उभे आहेत.. खेड्यांना खेड्यांप्रमाणे विकसित केले पाहीजे… वर्षानुवर्षे चालत आलेली आदर्श पंचायत व्यवस्था पुन्हा जोमाने उभारली पाहीजे.. गावाचे शहर करण्यापेक्षा गावला एक ‘स्वयंपूर्ण खेडे’ होणे जास्त गरजेचे आहे… संगणक, इंटरनेट, मोबाईल, या खुप लांबच्या गोष्टी आहेत अजूनही कितीतरी खेड्यांमध्ये पाण्याचे व खाण्याचे राक्षस बळावत आहे… आपण घेतलेल्या ज्ञानाचा वापर देशासाठी नाही झाला तर त्याचे फलित काय? परदेशातील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या विषयांवर काम करणारे आपण काहीना काही बदल नक्कीच घडवू शकतो.. इथे मोबदला पैसा नसेल पण समाधान असेल.. एका गावाला जर त्यांचा स्वाभिमान परत मिळाला तर त्या गावात तयार होणार्या पुढच्या कितीतरी पिढ्यांचे भवितव्य सुडौल बनवण्याचे समाधान नक्कीच मिळेल… अगदी प्रत्यक्ष जाऊन नाही जमले तरी अप्रत्यक्ष काम करण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात निर्माण व्हावी हीच त्या भारतमातेचरणी प्रार्थना!
हे मी का लिहीले, हे मला माहीत नाही.. मनातून उठणार्या वादळाला शब्दांचे गाव दिले आहे… प्रत्येकाच्या आतमध्ये एक समर्थ नेता व कार्यकर्ता असतो याची खात्री मला आहे अन त्यालाच आवज देण्याचा हा प्रयत्न आहे… मोबदल्यासाठी काम करण्यापेक्षाही समाधानासाठी काम करणार्या पिढ्या तयार व्हाव्यात… बदलांना नुसते मान डोलवुन होकार देणार्यांपेक्षाही तो बदल अंगी उतरवून समाजातील दुर्लक्षितांपर्यंत पोहचविणार्या समर्थ पिढ्या तयार व्हाव्यात असे वाटते म्हणूनच हा खटाटोप!
एखाद्या पोस्ट ऑफिसमध्ये ज्या निराकारपणे व अगदी कशासही घेणे-देणे नसल्याप्रमाणे तो पोस्टमन एकामागून एका पाकीटावर ठसे उमटवत गठ्ठ्यामध्ये भर पाडत असतो… त्याचप्रमाणे कालचा दिवस होता.. अशाच निराकारपणे मी जगण्याचा ठसा दिवसावर उमटवला अन आयुष्याच्या गठ्ठ्यामध्ये ‘आणखी एक’ म्हणून मागे ढकलला… काही विशेष घडलेच नाही… माझ्याकडून तसा प्रयत्नही झाला नाही… शेवटी वार्याबरोबर उडणार्या कागदाला कुठे जायचं हे ठरवण्याचा अधिकार नसतोच अगदी तसेच काल कसे जगायचे हे त्या जीवनाला सांगण्याचा अधिकार मला नव्हता! रात्रीशी सलगी करताना पत्नीशी मारलेल्या गप्पांनी कितीतरी प्रमाणात गेल्या दिवसाला त्याचे वैभव परत मिळाले व समाधानाने मला उद्याकडे जाण्याचे आमंत्रण मिळाले!
प्रतिक्रिया