दैनंदिनी – ०२, ०३ आणि ०४ ऑक्टोबर २००९


हळवेपणा म्हणजे मंदिराच्या गाभार्‍यातील प्रत्येक ध्वनीसोबत ऊठणारा प्रतिध्वनी होय! प्रत्येक हृदयाला भगवंताने घडवले पण ज्या हृदयात भगवंताचा स्पर्श जीवंत राहिला तिथे उपजतच हळवेपणा उभारीस आला… जिथे नात्यांच्या बंधांपलिकडे सार्‍या जीवसृष्टीतील चेत, अचेत घटकांस जोडणारा एक अक्षय बंध अदृश्यरुपात अमर झाला तिथे आणि केवळ तिथे ‘हळवेपणा’ जन्मास आला… ओंजळ भरुन भावना तर आपणा सर्वांनाच मिळाल्या पण ज्याच्या वाट्याला भावनांचे आकाश आले तिथे हळवेपणा उदयास आला… झाडाच्या पानाच्या देठावरील एका हिरव्या शिरेतील कंपन जेव्हा मनाच्या दारा-खिडक्यातून खोल हृदयाच्या अंतरंगात ठसे उमटवून जाते… एका पाखराच्या पापणीचे फडफडणे नकळत जेव्हा त्या पाखराचे सारे भावतरंग मनाच्या पाटीवर लिहून जाते… पावलांचे जमिनीवर उमटणे जिथे धरतीच्या काळजाशी नाते जोडून जाते, घड्याळाच्या काट्यांचे चक्रात फिरणे जेव्हा अचानक सजीव वाटून जाते, देवाच्या पायावरील एखादे फुल जेव्हा नशीबवान वाटून जाते तेव्हा हळवेपणाच्या लहरींशी कुठेतरी आपली गाठ झाली असावी… जिथे दुसर्‍याची भूक आपल्या हातातील घास सोडण्यास प्रवृत्त करते… जिथे दुसर्‍याची वेदना आपल्या अंगावर वळ उठवते… जिथे जमिनीवरील भेगा आपली तहान संपवन टाकतात… जिथे अन्याय, अत्याचार पाहून रक्ताचा लाव्हारस होतो…. जिथे दुःख, दुष्काळ, भ्रष्टाचार पा्हून नशिबाशी दोन हात करावेसे वाटतात तेव्हा अन तेव्हाच हळवेपणा तुम्हाला खर्‍या स्वरुपात मिळाला असे समजा…. हळवेपणा जर अनेक जीवांच्या प्रेमाचे संभाषण आहे तर तो अनेक जीवांच्या वेदनांचे स्थलांतरणही आहे… जर हळवेपणा वसंतातील फुलोरा आहे तर तो ग्रीष्मातील कोरडेपणाही आहे… महालाच्या खिडकीतून जग पाहणार्‍यांना जो खिडकीबाहेर वास्तवाच्या रणरणत्या उन्हात घेऊन येतो तो हळवेपणा! फक्त दुसर्‍याचे दुःख पाहून डोळ्यातून अश्रु गाळायला लावतो तो हळवेपणा नाही तर जो दुसर्‍याचे अश्रु पुसायला प्रवृत्त करतो तो हळवेपणा! हळवेपणा जेवढा स्त्रियांचा अलंकार आहे तेवढाच तो पुरुषांचा साज आहे… हळवेपणा कधीच वीरांच्या पायातील अडथळा बनत नाही तर तो पुढे येऊन विजयी होऊन परतण्यासाठी कपाळावर विजयी शेंदुर लावतो…  हळवेपणाचा आधार घेऊन भावनिक म्हणवून घेणारे कितीतरी बांधव आजुबाजुला सापडतील… हळवेपणा भावनांचा समुद्र आहे… हळवेपणा मनगटातील भीमरुपी ताकद आहे… हळवेपणा शौर्याचे करारी नेत्रांजन आहे… हळवेपणाचा उपयोग फक्त कोमेजून जाण्यात करणार्‍यांना हळवेपणाचा खरा अर्थ किती समजला? खरा राजा हा मनाने हळवा असतो तेव्हाच तो जनतेला समजू शकतो पण त्यामुळे तो पंगू होत नाही… हळवेपणाच्या नावाखाली स्वतःला काळाच्या ढिगार्‍यात गाडून घेणार्‍या मित्रांनो या हळवेपणाला कृतीमध्ये परावर्तित करुन पहा… दोन पावले एकट्याने चालून पहा… तेव्हाच झेप घायला शिकाल.. भरारी घायला शिकाल…. उडायला शिकाल… उडण्यातला दैवी आनंद काय आहे हे अनुभवायला शिकाल…. हळवेपणाचे पंख करा, ओले कापसाचे ओझे नाही!

प्रत्येक चेहर्‍याच्या मागे वर्षानुवर्षाचा इतिहास असतो… कधी कधी कोणी इतक्या जोरात हसायचा प्रयत्न करतात की मनातले सल उघडे पडते… मनमोकळे हसणे हा दैवी आशीर्वाद आहे, एखाद्या न संपणार्‍या उदबत्तीचा अहोरात्र दरवळणारा सुगंध आहे… कुणाचे लाघवी हसणे आपल्याला क्षणात त्या व्यक्तीच्या मोहात पाडून जाते तर कधी कुणाचे बिनधास्तपणाचे खदखदून हासणे आपल्याला विचार करायला भाग पाडते…  कुणाची गालावरील खळी त्या भोवर्‍यामध्ये आपल्याला खेचुन घेते तर कधी एखाद्या लहान मुलाच्या हसण्याचा आवाजही वेड लावून जातो…. पण कधी कधी न रहावुन या माणसांच्या हासण्याचा शोध सुरु होतो.. आपण या हसण्यापलिकडे जाऊन या माणसांचे अस्तित्व शोधू लागतो… कोणी विदुषकाचे आयुष्य जगत असतो तर कोणी पिंजर्‍यातील खेळ करणार्‍या माकडाचे तर कोणी गुमान पिंजर्‍यातुन बाहेर येऊन चिठ्ठी उचलुन देणार्‍या पोपटाचे तर कोणी ओझे वाहणार्‍या गाढवाचे तर कोणी माणुसकी जपणार्‍या माणसाचे! आपणही यातील कोणत्या ना कोणत्या भुमिकेत असतो जरूर.. विचार केल्यास आपलाही थांगपत्ता लागेल हे नक्कीच! कृत्रिम हासणे अवघड नाही… पण त्या कृत्रिमतेच्या पलिकडील आयुष्य जगणे अवघड आहे…. ते सगळ्यांनाच जमेल असे नाही! जखम लपविण्यासाठी आधी जखम स्वीकारावी लागते व त्यानंतर ती लपविण्यासाठी त्यावर ठेवणार्‍या आवरणालाही झेलावे लागते हे नक्कीच! हासणे शृंगारीकही असते अन अक्राळविक्राळ आसुरीही असते… हसण्यासाठी जीवनाचा अर्क गळ्यातून उतरावा लागतो… जसे ढोलकी वाजवण्यासाठी तिचे कातडे आधी बडवावेच लागते, तेव्हाच ती कुठे खणखणीत वाजते… आपलेही तसेच, ते जीवनहास्य ओठांवर उमटण्यासाठी आधी आपल्याला जीवनाला स्वीकारावे लागतेच! … ती निरागसता जन्मतः असणे वेगळे अन तीच निरागसता मरताना असणे वेगळे!

गेले तीन दिवस बघायला गेले तर आजारपणात गेले… वातावरणातील बदलांशी स्वतःला सुरळीत करताना नेहमीच त्रास होतो… त्यामुळे वेगळे असे काही नव्हते…. वेगळे म्हणायचे तर यावेळी असणारी पत्नीची सोबत विशेष होती… आपल्या जवळचे माणुस आपल्या बरोबर आहे या भावनेतच अर्धा आजार बरा होतो… मंत्रांचे उच्चारण मनाला वेगळी उर्जा देते… याचा अनुभव प्रत्येकाने घ्यावा… नेहमीपेक्षाही आजारपणात मंत्रांच्या उच्चारणाने येणारी उर्जा विशेष असते… भगवंताच्या भक्तीला वेगळीच धार येते… प्रार्थनेला वेग येतो… एकाग्रतेला नवा शृंगार मिळतो… सगुणाची भक्ती करताना कधी त्या निर्गुणामध्ये विरघळुन जातो हेदेखील बर्‍याचदा कळत नाही… हा अनुभव शब्दातीत असतो… आपल्या मनाचे कंपन वातावरणावर उमटताना पाहणे विलक्षणीय आहे…. म्हणुनच या नव्या आठवड्याची नवी सुरुवात प्रसन्नतेने करता आली… नव्या वेळेला नव्या उत्साहाने मिठी मारता आली!

4 Responses to दैनंदिनी – ०२, ०३ आणि ०४ ऑक्टोबर २००९

 1. vikram says:

  आपल्या जवळचे माणुस आपल्या बरोबर आहे या भावनेतच अर्धा आजार बरा होतो…

  अगदी खर

  आपल्या माणसाची जवळीक नसेल तर माणूस शरीराने नसला तरी मनाने आजारी पडतोच

 2. Kranti says:

  आवडला लेख. खूप छान लिहिलाय.

 3. bhaanasa says:

  जखम लपविण्यासाठी प्रथम ती स्विकारावी लागते…….. .
  फक्त हेच नेमकं जमत नाही आणि ती वारंवार उघडी पडतच राहते. आपले माणूस आपल्याजवळ आपल्यासाठी आहे ही भावनाच अर्धा आजार बरा करते मग तो मनाचा असो वा तनाचा. हळवेपणाने लिहीलसं तितक्याच ताकदीने मनाला भावलं.

 4. aneel says:

  mala tumchya lihanat vi.s.khandekar aabhas detahet

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: