पाऊसप्रवासी : दैनंदिनी २७ जुलै २०१०

कधीतरी पावसात भिजवून मन रमवणारे पाऊसवेडे चातक बरेच आहेत… अगदी रोजच्या घडीला कितीतरी वेळा हे असे पाऊसप्रवासी नजरेसमोर मुसळधार पावसामध्ये विरघळताना दिसत असतात… कुणी आपल्या संसाराच्या गाठोड्याला खांद्यावरून त्याची होडी करुन पाण्यामध्ये सोडून देतो तर कुणी उद्या काय होणार या सामान्य प्रश्नाला कवटाळून पावसामध्ये आपले चिंतांचे कापसी ओझे भिजवून रस्त्यावरून सरपटताना दिसतो… कुणी पक्षी अगदी झाडाच्या कोवळ्या फांदीवर बसून आपले अधिराज्य गाजवताना दिसतो तर त्याचवेळेला या निसर्गाच्या नव्या नवलाईला दूर सारून डांबरी रस्त्यावर एखाद्या नव्या खड्ड्याच्या तक्रारीमध्ये त्रासलेला एखादा बुद्धिमान प्राणी दिसतो… कुठे एका बाजूला पांडुरंगावर सगळा भार सोपवून त्याच्या नामघोषामध्ये या पावसाचा टाळ करुन, या पावसाचा मृदंग करुन, या पावसाचा अभंग करुन त्या विठुमाऊलीकडे निघालेली यात्रिकांची आषाढवारी दिसते..

गेल्या पाच सहा वर्षामध्ये भारतातला पाऊस अनुभवला नव्हता.. जो काही होता तो फक्त बातम्यांमधून अन इथल्या फोटोंमधून.. यावेळी मात्र अगदी दूर गेलेल्या जुन्या मित्राप्रमाणे कडकडून गळ्यात पडला… त्याच जुन्या त्वेषामध्ये अन त्याच त्याच्या नेहमीच्या तालामध्ये… जणू काही सांगत होता की बघ या एकाच निसर्गामध्ये तू अन मी दोघे जगत आहोत, पण मी अजून तसाच मुक्त, मोकळा कोसळतो… अन तू दिवसेंदिवस एखाद्या जुन्या तलावाप्रमाणे आटत आटत चाललायस…. सार्‍या विश्वाला सताड बाहुंनी गवसणी कशी घालायची हे मात्र शिकावं ते या पावसाकडूनच… तो ना घड्याळाच्या काट्याला बांधलेला असतो ना तो कोण्या एखाद्या विशिष्ट व्यक्तीभोवती घुटमळत असतो… वर्षभराचे मळभ साचलेल्या आपल्या नजरा, आपले कोते झालेले दृष्टिकोन पुसून टाकण्यासाठी, धुवून टाकण्यासाठीच हा देवदूत आपल्याकडे झेपावत असेल… त्याचा ओला संदेश घेऊन माती सुगंधित होते.. त्याच्याकडून जीवन घेऊन कितीतरी नवी रोपटी आकाशाचे स्वप्न जोपासू लागतात… अन त्याचवेळेला आपल्यातला माणूस मात्र या पावसाचे आभार मानण्याचे विसरून जाताना दिसतो हीच ओली खंत मनामध्ये अंकुरत रहते…

अजूनही दैनंदिनी लिहावी की असंच जेव्हा वाटेल तेव्हा लिहावे हे काही केल्या नक्की होत नाहीये… लवकरच काहीतरी निर्णय व्हावा हीच अपेक्षा… विचारांशी प्रामाणिक राहणे जमावे.. उठणार्‍या प्रत्येक भावस्पंदनाला त्याच्या हक्काचे आभाळ देता यावे म्हणुन आणखी कसोशीने यत्न करावे… खळबळ वा उफाळणारा अग्नीचा समर्पक सार्थ बहुमान कराता यावा…. भ्रष्ट व कुनीतीपुर्वक काळवंडणार्‍या ढगांना क्षितीजापलिकडे दूर ढकलता यावे….. अन यानंतर उभ्या राहणार्‍या सुसंवादासाठी शब्दांना साकडे घालणे मात्र असेच सुरु राहील!!!

गुरुपौर्णिमा :२५ जुलै २०१०

जवळ जवळ आठ नऊ महिन्यांच्या एका मोठ्या खंडानंतर लिहिण्यास घेतले आहे.. खंड होता तो फक्त या शब्दांकित स्वरुपाला.. खरे काळाचे शब्द तर प्रत्येक पावलावर आपोआप उमटत होते अन याहीपुढे अवतरत राहतील.. असंख्य घटनांचे वादळ अविरतपणे काळाच्या क्षितीजावरुन आयुष्याच्या या रणावर अघोरी शरांचा मुक्तछंद, बेभान वर्षाव करीत होते… कधी कधी अगदी इंद्रधनुष्यावरही संशय यावा की कदाचित याच धनुष्याचाच तर हा छद्मी डाव नसेल ना? इथपर्यंत सैरभैर होणारी अवस्था वास्तवात होती.. प्रत्येक क्षणासरशी पायाखालची जमीन आतमध्ये धसत जावी.. आपण जिथे आहोत तिथेच आपले जिवंत थडगे होईल की काय असे वाटावे.. आयुष्यांच्या सुंदर, चमचमीत कल्पनांच्या मागे एक भेसूर आभास दब्या पावलाने आपले अस्तित्व जपत असतो व सत्यामध्ये येण्यासाठी आसुसत असतो हे पटण्यासाठीच काही योग लिहिलेले असतात.. जेव्हा हिशोब लागण्यापेक्षा हिशोब करणे नको वाटते.. जेव्हा एखाद्या चक्रव्यूहातून सुटून सुखरुप घरी जाण्यापेक्षा चक्रव्यूहाचा हिस्सा होऊन जाण्यात सार्थक वाटते…. असणे नसणे याहीपेक्षा हरवणे जास्त समर्पक असते… आपल्या कटाक्षामध्येच आपल्याला छेदून जाणारे एखादे अस्त्र लपलेले असावे असे प्रतिबिंबातून उमटत असते तेव्हा सावलीचाही तिरस्कार वाटू लागतो..

कल्पनेच्या परे असणार्‍या अशा भीषण परिस्थितीतून सहीसलामत सुटणे कधीच सहज नसते…. आज गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर हे लिहिण्याचे प्रयोजन इतकेच की गेल्या कित्येक महिन्यांच्या सगळ्या अग्निदिव्यातून, रौद्र महासागरातून जर ही जीवननौका आज पैलतीरावर सुखरुप आली आहे ती फक्त अन फक्त एका दीपस्तंभामुळे म्हणजेच एका सद्गुरुकृपेमुळेच! या अशक्य काळामध्येही जर शाश्वत काय असेल तर ते आहे सद्गुरुतत्व! त्याला समजणे, त्याची मीमांसा करणे हे या तुच्छ देहाचे कामच नाही… त्याचे अढळत्व वादातीत आहे, त्याचा वास सूक्ष्मतम सूक्ष्म आहे अन त्याचा विस्तार अनंत आहे…. तो प्राप्तही आहे अन तो अगम्यही आहे…. तो सिध्द आहे, तो साधकही आहे… तो सहजही आहे तर तोच अनाकलनीयही आहे…. तो सार्‍या या पंचीकरण पसार्‍याचा केंद्रबिंदूही आहे अन तोच या सार्‍यापासून अलिप्तही आहे… तो मी आहे, मी तो आहे… हीच सद्गुरुकृपा जी त्या रामाला वसिष्ठांकडून मिळाली, कृष्णाला सांदिपनींकडून मिळाली … अशी ही सद्गुरुकृपा मिळणे हेच ह्या जगण्याचे फलित आहे.. या अशा जगण्यासाठी मग ह्या संसाराचे शिवधनुष्य पेलणे मान्य आहे!