प्रवाहविभोर!!! : २४ जुलै २०११

बंधनांना झुगारुन, बंधनांशी झगडुन की बंधनांना स्वीकारुन! निर्णय तुमचा अन माझा असतो… तिथुन निवडलेला मार्गही तर मग आपापलाच असतो… नियतीच्या पटावरील पुढची चाल माहीत नसली, तरी कुतुहलापोटी फासे खेळण्याचे धाडस बरेच जण करतात, अगदी बिनधास्त!! भावनांच्या आधीन होऊन मग भावनांशीच प्रतारणा का करावी, आभाळाच्या सावलीखाली राहून आभाळालाच जखम का करावी, एखादी लांबसडक पाऊलवाट कधीच संपणार नाही याची शाश्वती कोण देतो? जर कुणीच देत नाही तर आपण आजनंतर उद्या अन उद्यानंतर परवा घरंगळत त्या भविष्याच्या मागे का धावतो? क्षितीजाशी मैत्री केली तर त्याचे नसणे स्वीकारावेच लागते, अन ते स्वीकारले नाही तर मग जखमा होतात अन त्याही न दिसणार्‍या, न भरणार्‍या, अगदी क्षितीजाप्रमाणेच निरंतर चिरकाल अस्तित्वाचा हक्क सांगणार्‍या!

धरती हादरली, वादळ घोंघावले, समुद्र उधाणला कीच आपल्याला यांच्या अस्तित्वाची जाणीव होते… नव्हे नव्हे त्यांच्या आपल्या जवळ असण्याचीसुद्धा अनामिक संशयी भीती वाटते… जसे आपल्या मनात काहूर माजले तर आपल्या वागण्यावरून आपला ताबा सुटून जातो…मनातल्या या खळबळीचा थांगपत्ता लागत नाही तोपर्यंत किंवा कदाचीत जोपर्यंत उठणार्‍या प्रत्येक प्रश्नाला समाधानकारक उत्तर मिळत नाही तोपर्यंत…. मग या धरतीने, वादळाने अन या समुद्राने कसे काय उत्तर शोधावे.. त्यांच्यातील खळबळीचा कुणी व कसा समाचार घ्यावा? त्यांच्या उच्छादामागील घाव अन त्या घावामागील भाव कोणत्या सजीव मनाला उमजावे? की सजीव मनाची व्याख्या यांच्या दुःखापलिकडेच संपत असावी अन्यथा कोणी वडाच्या झाडाला आधार घेत पसरणारा वेल तोडला नसता अन बाजारभावामध्ये विकला जाणारा कृत्रिम वेल शोभेसाठी घेतला नसता! माझे काय अन कुणाचे काय निसर्गाच्या ओसरीवर पाय पसरून बसायला थोडी का परवानगी लागते, पानाच्या गालावरील नकळत सुटलेला तो पहाटेचा दवबिंदू अलगद आठवणीच्या शिंपल्यामध्ये वेचायला मात्र नशीब लागते हेच खरे!!