संग-असंग
जानेवारी 18, 2013 यावर आपले मत नोंदवा
संग-असंग
काळोखाचे घेऊन हात,
उजेडाचे पांग फेडावे
आभाळाला देऊन कान,
परलोकाचे ध्यान करावे…
उडता येते कोणाला,
पाताळातही रुतताना..
आभासाचे घेऊन सोंग,
उत्थानाचे नाट्य घडावे..
विचारांची स्पर्धा कसली,
भावनांचे बंड असताना…
अदृश्याचे जोडून बिंदू,
निर्गुणाचे रूप दिसावे…
गुंततात मने केव्हातरी,
एखादे कोडे उकलताना..
हातच्याचे राखून भान,
विश्वासाचे नाते जडावे…
असंग सार्या बाजुला,
निसंगाचे भेद सुटताना
आसक्तीचे गळून पान,
संवादाचे रोप फुटावे…
निलेश सकपाळ, १७ जानेवारी २०१३
प्रतिक्रिया