दैनंदिनी – १८ एप्रिल २०१३ (संक्रमण)

कधी अंधारुन आल्यावर वा आभाळातील मळभ असताना बाहेर पडल्यानंतर अचानक पाऊस पडून जातो.. सारे मळभ दूर होते अन् समोर लख्ख प्रकाश दिसू लागतो… डोळे तेच पण नजर बदलून जाते… समोर असणारा अन् खुंटत जाणारा सगळा परिसर एकदम आवाक्याबाहेर जाऊन विस्तीर्ण होऊ लागतो… आपल्या अमर्याद कक्षांमध्ये येण्यास त्याचा एक अविभाज्य भाग होण्यास आव्हान देऊ लागतो… एका मानसिक परिवर्तनानंतर सुद्धा कित्येकदा अशाच भावना मनःपटलावर दाटून येतात.. मनातील मळभ नाहीसे होणे.. किंवा एखाद्या आगंतुक क्षणाला त्या बदलाची परिणती अनुभवणे सुद्धा अजबच ना!! मोकळे होणे किंवा बिनधास्त होणे कधीही महत्वाचे… बर्‍याचदा आपणच आपल्याला खुराड्यात बंद करून घेतो… अगदी एखाद्या चिंचोळ्या अरुंद नळकांडीप्रमाणे.. दोन्हीबाजूला मोकळेपणा पण मध्ये तो असंकुचितपणा किंवा एक घुसमट… जगताना या गोष्टींची सोबत असेल तर प्रगती नाही तर अधोगती होणार यात काही वादच नाही म्हणूनच या सगळ्यांना झुगारून, पंख फडफडवून एखाद्या उंच शिखरावर वार्‍याच्या उलट दिशेने सार्‍या जगाला न्याहाळणे निराळेच… येणार्‍या बदलाला सामोरे जाणे जेवढे महत्वाचे तेवढेच किंवा कदाचित त्याहीपेक्षा किंचित महत्वाचे म्हणजे तो बदल स्वीकारणे होय…

रोजच्या रहाटगाड्यात स्वतःला इतकं अडकवून घेतल्यानंतर बदल, संक्रमण असे शब्द नको वाटतात जगाला, स्वतःच अहं स्वतःच्याच भोवती मोठं वेटोळं निर्माण करून घेतो अन मग एखाद्या भुंग्याप्रमाणे आपण त्यात अडकून जातो ते कधीही न सुटण्याकरताच! अन यासाठीच बदल महत्वाचा… नेणीवेकडून जाणीवेकडे नेणारा तो राजमार्ग महत्वाचा.. कधी कळत अन कधी नकळत स्वतःला त्या काळाच्या स्वाधीन करायला आपल्यालाही तर जमायलाच हवे… ते तेव्हाच जमेल जेव्हा आपण हातचं काही राखून नाही ठेवणार.. मोकळे असू अगदी एखाद्या लख्ख काचेप्रमाणे आरपार! परिस्थिती आपल्याला घडवत असते… आपल्यातूनही एखादे लाजवाब शिल्प साकारू शकते याचा आपल्यापेक्षा जास्त विश्वास त्या परिस्थितीला त्या काळाला असतो हेच खरे… याच काळानेच तर आपल्याला पहिल्यांदा चालायला अन नंतर धावायला शिकवले… अगदी लहानपणी असलेला मातीचा गोळा कधी दगड झाला हेदेखील आपल्याला कळाले नाही… त्यातील अहं इतका कधी मोठा झाला की येणारे आश्वासक बदल झुगारणे त्याला जमू लागले… अन म्हणूनच जर घडायचे असेल तर आता त्या काळाच्या सामोरे बिनदिक्कत जायलाच हवे… शिल्प घडणार तर टवके उडणारच.. वेदना होणारच.. फक्त एवढाच विश्वास हवा की हे टवके नको असलेल्या त्या अहंकाराचे आहेत… अविश्वासाचे आहेत!

एखाद्या नवीन मार्गावर पुढारणे किंवा समोर कोणताही मागोवा नसताना पुढे चालणे म्हणजेच धाडस किंवा स्वतःतील आत्मशक्तीवरील अतोनात विश्वास! वाट नसताना वाट काढणे अन् वाट तयार करणे हे सगळ्यांना जमतेच असे नाही….महाकाय समुद्रातून पलिकडे जाण्यासाठी सेतू बांधणे सगळ्यांनाच जमत नाही त्यासाठी श्रीरामाचा ध्यास हवा, मारुतीची गगनभेदी इच्छाशक्ती हवी, वानरसेनेचा तो निरागस पण अतोनात भक्तीभाव हवा… त्या खारुताईची धडपड अन भक्ती हवी.. शबरीचा भोळाभाव अन आपलेपणा हवा! खलाश्याला गलबत भर समुद्रात आल्यानंतर धीर गाळून चालत नाही.. तेव्हा परतीचा मार्ग नसतो… येणार्‍या वार्‍याशी झुंजायचे, समुद्राला कवटाळायचे अन त्यावरच स्वार व्हायचे असते… हे ज्याला जमेल त्यानेच नवीन मार्ग शोधण्याच्या फंदात पडावे अन्यथा आपला धोपटमार्ग बरा!!!