प्रवास

अवघड काय असते अन सोपे काय असते? आपल्यात आपण हरवुन जाणे की आपल्यातल्या आपल्याला शोधुन काढणे? कळत नाही बर्‍याचदा.. वरवर वावरणारा, सगळ्यांत रमणारा खुशालचेंडू चेहरा म्हणजे मी की आत कुठेतरी कुढणारा, व्यथांमध्ये व्यथा गुंफणारा, सहज गर्दीला भेदून, छेदुन एकांताचे अमृत मिळवणारा हरफनमौला चेहरा म्हणजे मी! दुराव्याशी दुरावा करणे कितपत बरोबर आहे अन सलगीशी सलगी करणे कितपत सत्य आहे… दुरावा एका सुखापासुन दुसर्‍या सुखापर्यंतचाही प्रवास असू शकतो ना… नेहमीच दोन विरूद्ध गोष्टींचा दुरावा असणे गरजेचे नाही… एका सुखात अडकणे म्हणजेच दुसर्‍या सुखापासुन लांब असणे नाही का? तसेच दुःखाच्या बाबतीत म्हणता येइल यात काही शंका नाही!

वाटेशी प्रामाणिकपणा असावा की आपल्या प्रवासाशी? एकाच वाटेवरून हजार स्थळांपर्यंत लाखो प्रवासी पोचले असतीलही.. पण माझ्या मते आपल्या सगळ्यांचे प्रवास हे वेगळे असतात.. अन म्हणुनच प्रवासाशी घट्ट बांधीलकी असणे महत्वाचे…. इच्छित इप्सित मिळणे न मिळणे ही नंतरची गोष्ट पण इच्छित प्रवास लाभणे भाग्याचे! कधीकधी कशाचेच धागेदोरे लागत नाहीत अन कशाचाही तीळमात्र संबध लागत नाही तेव्हा या प्रवासाचा सहारा मिळतो… प्रत्येकाचा अनुभव प्रचिती या वेगल्या गोष्टी… पण आपल्याच बरोबर चालणारा आपला सोबती म्हणजे हा प्रवास कधीच आपल्यास दूर ढकलत नाही… नैराश्याच्या गर्तेत अन अविश्वासाच्या अंधारात चाचपडताना जर आपल्या उशाशी घट्ट तळ ठोकणारा कोण असतो तर हा प्रवास.. तेवढाच स्थिर अन तेवढाच ठाम पुढच्या प्रवासासाठी अन पुढच्या आनंदासाठी!!!