सत्य
ऑक्टोबर 28, 2014 यावर आपले मत नोंदवा
सत्य
काही गोष्टी असतात किंवा नसतात… अस्तित्वाचे आ वासून राहिलेले काटेरी प्रश्न जेव्हा कातडी फाडून हृदयाला पिळवटायला लागतात, तेव्हा उमटणार्या तप्त अग्निरसातून भावभावनांचे शामियाने ध्वस्त होण्यास उसंत लागत नाही…. नग्न डोळ्यांनी दिसणार्या स्वप्नांवर विश्वास ठेवणारे अन समोर दिसणार्या असंख्य खाणाखुणांना बेदखल करून भविष्यावर चाल करून जाणार्या योद्ध्यांना धोपट मार्गाने सरपटणार्या क्षुद्र मानवाचा दाखला न देणेच बरे! जे आहे ते मान्य न करणे अन जे हवे ते प्राप्त करणे म्हणजेच स्वतःच्या अस्तित्वाला बिनदिक्कत झुगारून परीस्थितीला अंगावर घेणे.. सूर्याचा प्रकाश तर सगळ्यांनाच हासील आहे पण सूर्याचा पहिला किरण शोधुन त्याचे प्राशन करण्याचे वेड रंध्रारंध्रातून उपजावे लागते… स्वत्वाच्या आगीपासून लांब पळणे वेगळे अन आगीला भोवती लपेटून तेजोमयी शेंदूर भाळावर फासून आकाशातील स्वयंप्रकाशीत तार्यांना न्यूनगंड देण्यासाठी उभे ठाकणे वेगळे! वळणावळणांत अडखळणारी वाट अमान्य करून, पिचलेल्या रुढींचे कुंपण ओलांडून, विचारांचे ग्रहण बाजूला सारून, संकुचित मर्यादांना छेद देऊन नवे आभाळ मागणार्या पाखरांना ना समुद्राचा किनारा भावतो अन ना घोंघावत शांत होत जाणारा वादळपसारा!
सागराच्या लाटांमधील अनियमितपणा जिथे मनाला खटकतो…दिवस-रात्रीमध्ये असणारी अस्पष्टशी उजेडाची रेषा जेव्हा शोधावीशी वाटते… लढवय्याच्या तलवारीच्या पात्याला पाहून समाधान न होता त्याच्या अमर्याद पराक्रमाकडे मन खेचले जाते… रोजरोज येणार्या त्याच त्याच प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी जेव्हा अंतर्बाह्य विद्रोह होतो…. पर्वतावरुन दिसणार्या खोल भयाण दरीपेक्षा पर्वताच्या उंचीवर मन भाळू लागते… दगडातील शिल्प बघताना जेव्हा त्याच्या उडालेल्या टवक्यांमधील अन तेव्हा उठलेल्या असंख्य प्रसूतवेदनांशी आपण संलग्न होऊ लागतो… भासमान दिसणार्या क्षितीजाच्या कोवळ्या अस्तित्वाचा मोह न होता त्याच्या क्षणिक अनुभुतीशी मनाची प्रत्यंचा जोडली जाते… विस्कटणार्या ढगांमध्ये बेताल खेळ करणार्या असंख्य वायुलहरींशी जेव्हा श्वासांचे नाते उमगत जाते….. क्षुल्लक हेव्यादाव्यांमध्ये जीवन व्यर्थ नासवणार्या बांधवांची तेव्हा कीव करावीशी वाटते… जन्मांनंतर सुरु असणार्या मृत्यूच्या रस्त्यावर खरा सोबतीही मृत्यूच असतो याची खात्री न पटणे म्हणजेच डोळ्यांवर पट्टी बांधून लख्ख उजेडामध्ये कुट्ट अंधार चाचपडण्यासारखेच!
सत्य देखील असते वा नसते या साच्यात येत नाही… सत्य ही काळाच्या पाठीवरील जन्मखुण आहे.. भविष्याचा वेध घेताना अंतिम सत्याची गाठ कोठे पडेल हे कुणालाही माहित नाही… अशाच एका क्षणामध्ये सत्य गवसल्यानंतर योध्द्याचा बुध्द होऊ शकतो, वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो अन सत्याची खरी ओळख झाल्यानंतर अवसान गळुन गेलेला कुंतीपुत्र धनंजय युध्दकर्म करण्यास तत्पर होऊ शकतो! सत्याचा पाठलाग करणे कदाचित मुर्खपणा ठरेल.. सर्वार्थाने सत्य आपला पाठलाग करीत असते हे आणि हेच सत्य! नदीच्या प्रवाहाचा माग काढत जेव्हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जाण्याचा मानस विचारांमध्ये तग धरू लागतो तेव्हा प्रवाहाबरोबर ठेचकाळत वाहत जाणार्या असंख्य गोट्यांशी आपले नाते तुटलेले असते अन शाश्वत सत्याकडे आपली वाटचाल सुरु झालेली असते!
प्रतिक्रिया