सहज…वळणावरुन..
ऑक्टोबर 17, 2014 यावर आपले मत नोंदवा
उरल्या सुरल्या अवसानाच्या मुसक्या बांधुन पुन्हा अशक्यतेच्या शक्यतांना झुगारुन पंख छाटलेले पाखरु उंचावरुन आकाशाकडे झेपावताना… स्वतःला झोकुन देताना काय विचार करत असेल?… कुणी मागेपुढे आहे वा नाही?… पुढच्या क्षणाची खातरजमा आहे वा नाही?… जख्मांच्या थारोळ्यात पंचप्राण गमावून आगतिकतेमध्ये विरुन जाऊ वा नाही?… किंवा याहीपलिकडे असणारी अंधुकशी, मिणमिणती आशा म्हणजे.. हे अमर्याद आकाश आपल्याला त्याच्या बाहूंमध्ये अलगद स्वीकारेल… वार्याच्या या झोक्यामध्ये पंखाना नवसंजीवनीचे अमृत प्राप्त होईल!!
झगडा कधीच कुणाला चुकला नाही… जन्म देणार्या मातेला नाही किंवा जन्म घेणार्या अभ्रकालाही नाही.. नवनिर्मितीचे स्वप्न रंगविणार्या पुढार्याला नाही किंवा खोट्या आश्वासनांच्या कागदी बंगल्यात राहुन वास्तवाची धग सोसणार्या सामान्य कार्यकर्त्यालाही नाही…. संघर्ष हवाच्च.. कधी आपला आपल्याशी तर कधी आपला वास्तवाशी… कदाचित कुणी असेही म्हणेल की आपण आणि वास्तव या दोन बाजू नाहीच आहेत मुळी… पण सुखवस्तू मायेच्या हिंदोळ्यांवर झुलताना पाय जमिनीवर न टेकवणारे कमी नाहीत!
असफलतेचा खंजीर काळजात घुसलेला असताना मिळालेल्या सफलतेची फुंकर निराळीच!! स्वतःच स्वतःच्या मर्यादांना आव्हान देणे म्हणजेच कदाचित संघर्ष, झगडा किंवा आपल्या भाषेत जगणे!!
प्रतिक्रिया