‘नजरप्रवासी’


अंगाअंगावर ओरखडे करणारी एखादी नजर आपल्याच घराच्या भिंतींमध्ये कुठेतरी नकळतपणे वास्तव्यास आहे असे वाटणेही भयानकच! रस्त्यावरुन येताना-जाताना कितीतरी नजरांची डबकी तुडवत जावं लागतं..कितीतरी नजरा अस्ताव्यस्त एखाद्या गटाराप्रमाणे अवतीभोवती दुर्गंधी पसरवत आपल्याकडे झेपावण्याचा प्रयत्न करत असतील कोण जाणे… काही नजरा त्या माश्या अन डासांप्रमाणे कितीतरी चांगल्या वाईट ठिकाणांवरुन आता आपल्या आसपास भणभण करण्याच्या प्रयासात असतील…. काही नजरा तर रस्त्यावरच सांडलेल्या दिसतील… त्या तशाच वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी एखाद्या असहाय्य वृद्धाप्रमाणे अश्वत्थाम्याचे नशीब घेऊन रेंगाळत असतील…. खरेच जर नजरांचे हे बाण दृश्य असते तर?? कोण कुठे केव्हा नजर फिरवत असताना त्या नजरांचे ठसे उमटत असते तर? नजरांची किती जाळी-जळमटं या भकास दुनियेत क्षणाक्षणाला अस्तित्वात आली असती कोण जाणे? एखाद्या सार्वजनिक ठिकाणी मग गर्दीतून नाही तर नजरांच्या या जाळ्यांतून वाट शोधावी लागली असती….एखादी नको असलेली नजर सहज हाताने उचलून दूर भिरकावता आली असती.. किंवा तशीच जिथून सुरुवात झाली त्याच खोबण्यांमध्ये नेऊन गाडता आली असती…. घरात येऊन सांडलेल्या अन गेलेल्यांच्या मागे राहिलेल्या भकास, लंपट नजरा कचर्‍यासारख्या झाडूच्या एकाच सराट्यासहीत दूर फेकता आल्या असत्या!

नजरांचे ठीक आहे पण त्याबरोबर ओघळणार्‍या भावनांचे काय? हा अनुत्तरीत प्रश्न त्या पातेल्याला चिकटलेल्या करपट दुधासारखा उरतोच!! नजरेमध्ये जेव्हा एखादी भावना मिसळली जाते तेव्हाच त्या नजरेची किंमत ठरते… भावना झिरपते ती त्या माणसाच्या असलेल्या मूळ स्वभावाच्या अंतरंगातून… त्याच्या असलेल्या उद्देशातून अन त्याच्या अव्यक्तपणाच्या डोहातील सुप्त इच्छांच्या तरंगातून… कुणाला मोठेपणाचे इमले बांधायला आवडते तर कधी कुणाला आपल्याला आरश्यासारख्या तत्सम साधनांशिवाय न दिसणार्‍या रुपाचे गलबत या वासनांच्या समुद्रात भिरकावून द्यायची इच्छा असते… तर कधी कुणाला अतोनात मेहनतीची झाक अन त्यातुन उद्भवणारा समाधानाचा श्वास चेहर्‍यावर बाळगायला आवडते… कधी कुणाला आपल्याला कधीही न जमलेल्या साहसांना दागिन्यांप्रमाणे अंगावर मिरवायला आवडते… तर कधी कुणाला दुसर्‍याला मिळणारे सुख अजीर्ण होऊन त्याला आकंठ दुःखाचे प्याले रीचवताना बघायला आवडते.. कुणाला अपयशाच्या जंगलात राहताना यशाचा स्वर्गीय सहवास उपभोगावासा वाटतो… कुणाला असंख्य अतृप्त इच्छांचे, वासनांचे उबदार स्वेटर अंगावर मिरवायला आवडते…. कुणाला सगळ्या जगाच्या नकळत कुणाचीतरी तेवढीच जवळची गोष्ट आपल्या काबूत करावीशी वाटते… अशा एक ना अनेक ओंडक्यांच्या सहार्‍याने कितीतरी माणसे आपल्या आजुबाजुला तरंगताना दिसतील… चिंध्यांची कितीही नालस्ती केली तरीसुद्धा त्याच्यातून टिकाऊ अन उबदार गोधडी नावारुपास येतेच.. पण या नजरांच्या ठिगळ्यांची जोडाजोड केल्यानंतर जे काही तयार होईल ते या मानवतेतील अमनवीयतेचा पाक असेल अन अगदी रांधलेल्या भातावरच्या फेसाप्रमाणे त्याला अलगद ब्रह्मांडामध्ये भिरकावून देता येईल…! असो ही देखील एक कल्पनाच.. एक नजरच!

नजर म्हणजे काय? याचे एक असे उत्तर मिळणे अवघडच… जर उघड्या डोळ्यांनी दिसणार्‍या अन व्यक्त होणार्‍या अविर्भावांना नजर म्हंटले तर मग डोळे बंद असताना उठणार्‍या तरंगाना काय म्हणायचे? स्वप्न हे नजरेची उत्पत्ती आहे की विचारांच्या मुळाशी त्याचा उगम आहे? भावनांची, विचारांची अन नजरेची जुगलबंदी आजची नाही… रावणाच्या नजरेतूनही ती दिसली… अहिल्येच्या नजरेतही ती होती अन वर्षानुवर्षे एखाद्या वृक्षाच्या सावलीप्रमाणे वाट पहाणार्‍या शबरीच्या नजरेतही ती होतीच… संतांच्या नजरेतही ती होती… थेट भगवंताला गळ घालण्याचे अजब आर्जव संतांच्या नजरेतून दिसले… एकीकडे पावित्र्याचा महोत्सव आहे नजर तर दुसरीकडे वासनेचा महापूर आहे नजर… एकीकडे विश्वाला बंधुत्वाची साद आहे नजर तर दुसरीकडे कोत्या दृष्टीकोनातून बाटलेली आहे नजर… एकीकडे दोन शिळ्या तुकड्यात संतृप्तीचा ढेकर आहे नजर तर दुसरीकडे हजारो पक्वानांमध्ये उपाशी उसासा आहे नजर… एकीकडे अस्ताव्यस्त महानगरांची लगीनघाई आहे नजर तर दुसरीकडे दुष्काळातील दुर्लक्षित जमिनीच्या भेगांमध्ये धसत जाणार्‍या जिवंत सापळ्यांची शोकांतिका आहे नजर… एकीकडे हिमालयाचा मानवी मानस आहे नजर तर दुसरीकडे सदैव आटत चाललेल्या माणुसकीच्या झर्‍याची शेवटची घरघर आहे नजर… एकीकडे महत्वाकांक्षेने आभाळाला ठेंगणे ठरविणारी आहे नजर तर दुसरीकडे वासनेच्या हव्यासापोटी वय, नाती बाटवणारा बट्टा आहे नजर…एकीकडे अध्यात्माचे सर्वांगसुंदर दालन आहे नजर तर दुसरीकडे अविश्वासाचे, विषयांचे, चंगळवादाचे घोंघावते वादळ आहे नजर… एकीकडे अशक्यतेच्या सिंहासनावरील शक्यतेचा मुकुटमणी आहे नजर तर दुसरीकडे नैराश्याच्या गर्तेतील व्यसनांचा संग आहे नजर….

नजर म्हंटले की कितीतरी नितांत सुंदर घटनांची नांदी समोर आल्याखेरीज राहत नाही.. नजरेला ना कधी भाषेचे बंधन आहे अन ना शब्दांचे, ना व्याकरणाचे अन ना ओळखीचे! दोन अनोळखी व्यक्तींमध्येही आयुष्यभरांचे बंध जुळवण्याचे अजब सामर्थ्य नजरेमध्येच आहे! आयुष्यातील प्रत्येक क्षणाला सुखदुःखांच्या पल्याड जाऊन रखरखीत जीवनाच्या वाळवंटामधील मृगजळ म्हणजे नजर… कुणाचाही मालकी हक्क नसलेली पण मालकी हक्क तेवढ्याच ठसक्यात वठवणारी गोष्ट म्हणजे नजर!… शत्रुला हत्यार खाली ठेवण्यास भाग पाडणारी, डोळे छेदून काळजाचे पाणी करणारी, आत्मविश्वासाचे अन विजयाचे निशाण गाडणारी , पराक्रमाचा परीपाक अन साहसाचे अजब रसायन म्हणजे नजर! विश्वविक्रमी योध्द्याला गुडघ्यावर आणुन आजन्म बाटलीत अन कामवासनेत वश करणारी, लढाई न करता सार्‍या राज्याचे समर्पण करायला लावणारी बदनाम कहानीसुद्धा आहे नजर! एखाद्या लाहनग्या चेहर्‍यावरुन कुतुहलाचे गोंडस प्रश्नांचे प्रदर्शन म्हणजेच नजर तर सुरुकुतलेल्या चेहर्‍यांतून हजारो घटनांचा अविरत पाऊस पाडणारी अन सरतेशेवटी आकाशाकडे शून्यामधे बघत संपत गेलेली व सोडून गेलेल्या असंख्य प्रश्नांचा जाच म्हणजेच नजर! युगानुयुगे पीडीत, दुर्लक्षित घटकांच्या अतोनात हाल-अपेष्टांची साक्षीदार आहे नजर!

एक न संपणारा अन असंख्य विषयांचे कंगोरे असलेला भन्नाट प्रकार म्हणजे नजर! नजरेला वरदान म्हणावे की शाप… भौतिक म्हणावे की अभौतिक… मूर्त म्हणावे की अमूर्त.. व्यक्त म्हणावे की अव्यक्त? प्रश्नापासुन प्रश्नापर्यंतच जर वाटचाल होणार असेल तर उत्तरांचा उपयोग तो काय? उत्तरातून जर नवीन प्रश्नच जन्माला येणार असतील तर त्याला उत्तर म्हणावे काय? माणसातून माणुसकी सोडून पाशवी वृत्तीची उत्पत्ती होत असेल तर त्याला माणूस म्हणावे काय? कोणत्याही विधिलिखीत सत्याचा असत्यासाठी जर विनासायास वापर होत असेल तर त्या सत्याची किंमत कमी होते काय? वास्तवाच्या विस्तवातून तावूनसुलाखून निघण्याशिवाय पर्याय नव्हता अन खचितच तो कधी असेल.. तो ना चुकवता येईल व ना कधी थांबवता येईल.. अनियंत्रित एखाद्या बुलडोझरप्रमाणे तो मार्गस्थ होत असतोच… अन शेवटी कितीही लिहीले वा वाचले वा अनुभवले तरी काळाची नजर जिथे जाणार नाही असे ठिकाण सापडणे निव्वळ अशक्य! आपण सारेच काळाच्या नजरेतील ‘नजरप्रवासी’!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: