दैनंदिनी ०४-११-२०२१

भांडेन मी धुक्याशी,
येणार्‍या नव्या दिवसाशी,
पावलांचे करुन विमान,
भिडेन मी आभाळाशी!

चिंब पावसाच्या नादी लागून प्रवाही होता येत नाही अन वर्षानुवर्षे एकाच जागेवर थांबलेल्या एखाद्या दगडाला पाहुन ध्यानस्थ होता येत नाही, वार्‍याला श्वासांमध्ये घुमवुन मदमस्त मनमौजी प्रवासी होता येत नाही, तर पाण्याच्या तरंगांशी स्वतःला जोडून पाण्याप्रमाणे पारदर्शी वा निर्मळ होता येत नाही, आजूबाजूला असलेल्या अनंताच्या कोड्यामध्ये अडकलेल्या प्रत्येक क्षुद्र जीवजंतूस भेडसावणार्‍या क्षुल्लक अन कुपमंडुक प्रश्नांमध्ये स्वतःला गुंफवुन निर्मोहीपणाची पताका फडकवता येत नाही.. बर्‍याचदा भौतिकाच्या रहाटगाड्यात आपल्याला आपला अंदाज येत नाही किंवा आपल्याला आपलीच ओळख होत नाही, आपण आपल्याच स्वपासुन अनभिज्ञ आहोत, आपण आपल्याच अमर्याद स्वरुपापासुन अज्ञातात समोर दिसणार्‍या क्षणभंगुर गोष्टींवर आपल्या आयुष्याचे वरदान ओवाळुन टाकतो आहोत, आपल्या अंतिम ध्येयाशी होणारी ही आपली फसवणुक नाही का? उलगडणे किंवा उमजणे किंवा अनुभुती येणे किंवा प्रचिती येणे या गोष्टी काय असतात याचा आपल्याला प्रश्नच पडत नाही एवढे आपण व्यस्त आहोत!
आभाळातून काहीतरी शोधत जाणारा एखादा ढग कदाचित आपल्यासाठी काही गुढ संकेत घेऊन जात नसेल ना! झाडाझाडांच्या गर्दीतुन आभाळ शोधत फिरणारे एखादे सुकलेले पान आपल्यासाठी या निसर्गाचा एखादा गुमनाम संदेश घेऊन येत नसेल ना! एखाद्या अनोळखी ठिकाणी रस्ता चुकल्यानंतरही चुकलेला रस्ता जेव्हा आवडू लागतो अन चुकल्याबद्दलचे वाईट वाटण्यापेक्षा जेव्हा चुकलो म्हणुन एखादी समाधानाची लकेर घामेजलेल्या चेहर्‍यावर स्मितहास्य आंदण ठेऊन जाते तेव्हा त्या योगायोगाला काय म्हणाल? विचारांचे ओझे वाटण्यापेक्षा विचारांच्या शृंखलेमध्ये आपल्याला आपल्या अस्तित्वाची एखादी बाजू सापडुन जाते, विचारांचे मंथन किंवा विचारांतुन विचारांकडे घुसळुन जाण्यासाठी लागणार्‍या अंतर्बोधाची चुणुक भोवताली दरवळू लागते तेव्हा कुठे तरी आपली प्रगती होत आहे किंवा होण्याच्या मार्गावर आहे असे समजायला हरकत नसावी.
पाखरांच्या थव्यांशी संलग्न व्हायचे असेल वा खोल दरीमधुन येणार्‍या प्रतिध्वनीमधील कंपनांशी एकरुप व्हायचे असेल वा एखाद्या चित्रामधील रंगसंगतीमध्ये एखाद्या रंगामध्ये भुत अन भविष्याचे कांगोरे सापडुन अस्तित्वाचे विस्मरण व्हायचे असेल तर नक्की कोणती अवस्था, कोणता मार्ग अवलंबावा लागेल हे व्यक्तिसापेक्ष आहे, कदाचित ज्याचे त्याला किंवा त्या विधात्याच्या मार्गदर्शनाशिवाय निव्वळ अशक्यप्राय आहे. काय शोधायचे हे जेव्हा माहित नसते तेव्हा मिळणार्‍या प्रत्येक गोष्टीला कशाशी जुळवुन बघणार किंवा जे मिळाले तेच हवे होते किंवा तेच हासील होते हे जर वेळेनंतर अन मृत्यूपुर्वी उलगडले तर काय अवस्था असेल! जेव्हा मिळाले तेव्हा उलगडले नाही अन जेव्हा उलगडले तेव्हा काळाची कैची इतकी आवळलेली असते की पुनः त्या गोष्टीची अनुभुती, अनुभव घेणे जन्मांतरीचे स्वप्न होते, त्या अनुभवासाठी कदाचित दुसर्‍या जन्माचे मागणे येणार असेल अन मृत्यूलोकातील चक्रात पुन्हा अडकणार असू तर त्याचा उपयोग शून्य!
दिवस अन रात्र यामधील श्रेष्ठता ठरविण्यामध्ये ते काय स्वारस्य असावे, एक श्वास दुसर्‍या श्वासाशी तुलना करुन कसा पाहता येईल? जगण्यासाठी घेतलेला पहिला श्वास अन मृत्यूपुर्वी घेतलेला शेवटचा श्वास याव्यतिरिक्त सर्व श्वास हे फक्त जगण्यासाठीच असतात, त्यांची तुलना नाही होऊ शकत! मोठ्या स्वप्नांचे ओझे मोठे असते तसेच त्यामागुन प्राप्त होणारे समाधानही नक्कीच तेवढेच अनमोल असते, त्यासाठी श्वासांशी झगडावे लागले किंवा श्वासही जर पटावर लावावे लागले तरी बेहत्तर!!

विहंग

विहंग

वात दिव्याची जळता जळता,
सांगत होती जळायचे आहे,
ज्योत विझण्याआधी,
तेल संपण्याआधी,
आसमंतभर उजळायचे आहे!

प्रवास छोटा अर्ध्यावर असता,
अंतरंग सारे उधळायचे आहे,
धुके निवळण्याआधी,
आभास सरण्याआधी,
सावलीस मस्त रंगवायचे आहे!

मौनात गोंगाट शोधत असता,
बेनामी स्वर्गीय सुर व्हायचे आहे
अंत उलगडण्याआधी,
धैर्य निखळण्याआधी,
मृत्यूस कोडे घालून यायचे आहे!

माझा तुमचा हिशोब जुळवता,
संचिताचा पाढा वाचायचा आहे
अश्रु ओघळण्याआधी,
बंध आवळण्याआधी,
रेतीसम मुठीतुन निसटायचे आहे!

भाळावर जखम ओली मिरवता,
युगायुगांचे ऋण आठवायचे आहे,
विश्व गोठण्याआधी,
सूर्य वितळण्याआधी,
राखेतुन विहंगासम उडायचे आहे

-निलेश सकपाळ
०४-११-२०२१