शून्य झालेल्या आठवणीमध्ये वर्तमानातील एखादी ठेच अंगार फुंकुन जाते अन भुतकाळाचा वणवा क्षणार्धात आपल्याला गुरफटुन टाकतो! वाट कितीही ओळखीची असली तरी चुकामुक होऊ लागते, आरशातील प्रतिबिंबाशीदेखील नजरानजर होत नाही.. आपलीच नजर आपल्याला आरपार छेदुन जाण्याचा प्रयत्न करते.. आपली विचारांची तोफ आपल्याला एखाद्या उंच सुळक्यावर नेऊन ठेवते… आपले अस्तित्व काडीमोल वाटुन अंतरी असलेल्या कधीही न पुटपुटलेल्या शब्दांचे दडपण खोल दरीस आव्हान देऊ लागते.. निस्वार्थपणा वागण्यात असला तरी जेव्हा कृतार्थपणा मुळापर्यंत झिरपत नाही तेव्हा अहंकार अनाहुतपणे वर्तमानावर तरंगू लागतो.. तेव्हा होणारी खळबळ ही स्वत:च्या विनाशाचे कारण असू शकते किंवा येऊ घातलेल्या असंख्य वादळांची नांदी असू शकते. अतर्क्य आणि दुर्बोध वाटणारे शब्द जेव्हा धुक्यातुन वाट काढत मनाच्या फांदीवरुन दवबिंदुसारखे हृदयात येऊन न समजलेल्या घटनांचा अर्थ उलगडू लागतात आणि आपण आपल्या मनातील होणार्‍या घटनांचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होऊ लागतो, काहीसे नकोसे पण हवेहवेसे वाटणारे थंडीचे बोचरे वारे निर्जीव जख्मांचा माग घेऊन यातनांना आपल्या पदरात दान देऊ लागते तेव्हा कदाचित एका टिंबात संपुन जाण्याची अनुभुती आल्याशिवाय रहात नाही.

भुभागावर उठणार्‍या अनंत कंपनांचा आणि होणार्‍या आवर्तनांचा हिस्सा होणं किंवा ते अनुभवणं याचा आशिर्वाद प्रत्येक मर्त्य मानवाला असेलच असे नाही.. बेलाशक, सुमारपणे होणार्‍या, घडणार्‍या हालचालींचा अन्वयार्थ जोडण्यात कितीतरी जिवांना सार्थकता वाटत असते आणि यामधुन जागा होणारा परस्पर अर्थ त्या जीवांना कोणती ठराविक दिशा देत असेल यावर तुर्तास काहीही म्हणणे माझ्या विवेकबुध्दीच्या परे आहे. निसर्गातील बदलत्या समीकरणांशी नकळतपणे आपण जुळवुन घेतो किंवा कधीकधी शरण जाऊन बदलांचे स्वागत करतो.. पण जेव्हा बदल मान्य नसतील तेव्हा किंवा समीकरणांची होणारी उकल आपल्या तार्किकतेशी मेळ खात नसेल तर.. आपण बंड करू शकतो का आणि तेही दस्तुरखुद्द निसर्गाशी! आपल्या स्वभावाची खोली आपल्यापेक्षा निसर्गाला किंवा त्या विधात्याला अवगत असणारच.. पण त्यानंतरही या परिस्थितीमध्ये सापडणे हेसुद्धा कदाचित पुर्वनियोजित नसेल कशावरुन! पण हा संघर्ष, हे मंथन भाळावरील ओली जखम म्हणुन सदैव मिरवावी लागते हेही तितकेच खरे!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: