दैनंदिनी – ०८ जुलै २०२१

दैनंदिनी – ०८ जुलै २०२१

नैतिकता, नितीमत्ता बोलायला जेवढे अवघड कदाचित जगण्यासाठी त्याहुनही जास्त अवघड शब्द आहेत. इतरांनी आपल्याला तोलणे किंवा आपण इतरांचे मोजमाप करणे हे सदैव घडत असते..पण जेव्हा आपण स्वतः खुद्द आपल्यालाच तोलायला जातो किंवा तोलतो तेव्हाच आपल्या न्याय्यपणाची परीक्षा खर्‍या अर्थाने होत असते.. आपण स्वतः तेव्हा आरोपी असतो, आपण पोलिस, आपण वकिल आणि आपणच न्यायमुर्ती असतो.. बघायला गेले तर खुप सरळ हिशोब आहे पण बर्‍याचदा बर्‍याचजणांची अवस्था चोरुन दुध पिणार्‍या मांजरासारखी असते!
मोजमाप करताना वजनकाट्यामध्ये एका बाजूला जेव्हा विशिष्ट वजन ठेवुन त्याच्याबरोबर दुसर्‍या बाजूला इतर गोष्ट तोलणे कदाचित सोपे असते.. कारण कुठे थांबायचे कधी थांबायचे अन किती मोजायचे हे पुर्वनियोजित असते.. पण जेव्हा पहिल्याबाजूला ठेवायला येणार्‍या मापाचे परीमाणच माहित नसेल तेव्हा मग दुसर्‍या बाजूला ठेवण्यात येणार्‍या गोष्टीचे मोजमाप करायचे तरी कसे? ह्याला आपण नैतिकता जपणार्‍यांचा तात्विक गोंधळ म्हणू शकतो किंवा त्यावेळी उद्भवणार्‍या दोलायमान परिस्थितीचा झगडा! कारण तत्वांना किमतीचे लेबल लावणे हा त्या तत्वांचा तर अपमान होईलच पण त्याहीपेक्षा त्या तत्वांना अनुसरुन जगणार्‍या जिवासाठी तो सर्वस्वी त्याच्या अस्तित्वाला किंवा ओळखीला दिलेले आव्हान ठरेल!

आपले प्रतिबिंब जसेच्या जसे परावर्तित करणारा आरसा जेव्हा आपल्या हातातील घड्याळाची वेळ चुकीची सांगतो तेव्हा आपल्याला समजुन घेणार्‍या एखाद्या दुसर्‍या व्यक्तीच्या मनात आपल्याला हवी असलेली आपली प्रतिमा असेल याची खात्री किंवा अपेक्षा ठेवणे म्हणजे निव्वळ धुळफेक ठरेल…

जाणीव आणि अनुभव दोन पुर्णतः वेगळ्या गोष्टी, जाणीव सोप्या शब्दांत म्हणायचे तर न अनुभवता होणारी अनुभुती! हरवलेल्या एखाद्या क्षणाबरोबर त्या क्षणाला मिळालेली अनुभुती हरवते का की एखादी अनुभुती विस्मरणात गेल्यानंतर तो क्षण हरवला असं म्हणतात?? कशापासुन अलिप्त व्हायचं अन कशासाठी अट्टहास करायचा याचा अंदाज घेण्यासाठी अनुभुती आवश्यक नव्हे हवीच! व्यवहारीक जगामध्ये भौतिक सुखांच्या विळख्यात एकदा अडकले की एका भौतिक सुखापासुन दुसर्‍या भौतिक सुखाकडे एवढाच प्रवास सुरु होतो, भौतिक सुखांपेक्षाही दुसरे कुठले सुख आपल्याला आंतरीक मनःशांती देऊ शकेल याचा विचार येता येता आयुष्यातील उर्जेची फक्त थोडी थोडकी सावली आपल्याकडे शिल्लक राहिलेली असते…

प्रवाहाला दैवी कौल मानुन स्वतःची फुटकळ समजुत काढुन त्याबरोबर वाहत जाणे केव्हाच बरोबर ठरणार नाही.. तर प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन उगमाशी एकरुप होणे कधीही आणि केव्हाही संयुक्तिक ठरेल… अन हे कळण्यासाठी लागणारी अनुभुती ज्याची त्याने शोधावी अन ठरवावी!

-निलेश सकपाळ
०८-०७-२०२१

दैनंदिनी – १८ एप्रिल २०१३ (संक्रमण)

कधी अंधारुन आल्यावर वा आभाळातील मळभ असताना बाहेर पडल्यानंतर अचानक पाऊस पडून जातो.. सारे मळभ दूर होते अन् समोर लख्ख प्रकाश दिसू लागतो… डोळे तेच पण नजर बदलून जाते… समोर असणारा अन् खुंटत जाणारा सगळा परिसर एकदम आवाक्याबाहेर जाऊन विस्तीर्ण होऊ लागतो… आपल्या अमर्याद कक्षांमध्ये येण्यास त्याचा एक अविभाज्य भाग होण्यास आव्हान देऊ लागतो… एका मानसिक परिवर्तनानंतर सुद्धा कित्येकदा अशाच भावना मनःपटलावर दाटून येतात.. मनातील मळभ नाहीसे होणे.. किंवा एखाद्या आगंतुक क्षणाला त्या बदलाची परिणती अनुभवणे सुद्धा अजबच ना!! मोकळे होणे किंवा बिनधास्त होणे कधीही महत्वाचे… बर्‍याचदा आपणच आपल्याला खुराड्यात बंद करून घेतो… अगदी एखाद्या चिंचोळ्या अरुंद नळकांडीप्रमाणे.. दोन्हीबाजूला मोकळेपणा पण मध्ये तो असंकुचितपणा किंवा एक घुसमट… जगताना या गोष्टींची सोबत असेल तर प्रगती नाही तर अधोगती होणार यात काही वादच नाही म्हणूनच या सगळ्यांना झुगारून, पंख फडफडवून एखाद्या उंच शिखरावर वार्‍याच्या उलट दिशेने सार्‍या जगाला न्याहाळणे निराळेच… येणार्‍या बदलाला सामोरे जाणे जेवढे महत्वाचे तेवढेच किंवा कदाचित त्याहीपेक्षा किंचित महत्वाचे म्हणजे तो बदल स्वीकारणे होय…

रोजच्या रहाटगाड्यात स्वतःला इतकं अडकवून घेतल्यानंतर बदल, संक्रमण असे शब्द नको वाटतात जगाला, स्वतःच अहं स्वतःच्याच भोवती मोठं वेटोळं निर्माण करून घेतो अन मग एखाद्या भुंग्याप्रमाणे आपण त्यात अडकून जातो ते कधीही न सुटण्याकरताच! अन यासाठीच बदल महत्वाचा… नेणीवेकडून जाणीवेकडे नेणारा तो राजमार्ग महत्वाचा.. कधी कळत अन कधी नकळत स्वतःला त्या काळाच्या स्वाधीन करायला आपल्यालाही तर जमायलाच हवे… ते तेव्हाच जमेल जेव्हा आपण हातचं काही राखून नाही ठेवणार.. मोकळे असू अगदी एखाद्या लख्ख काचेप्रमाणे आरपार! परिस्थिती आपल्याला घडवत असते… आपल्यातूनही एखादे लाजवाब शिल्प साकारू शकते याचा आपल्यापेक्षा जास्त विश्वास त्या परिस्थितीला त्या काळाला असतो हेच खरे… याच काळानेच तर आपल्याला पहिल्यांदा चालायला अन नंतर धावायला शिकवले… अगदी लहानपणी असलेला मातीचा गोळा कधी दगड झाला हेदेखील आपल्याला कळाले नाही… त्यातील अहं इतका कधी मोठा झाला की येणारे आश्वासक बदल झुगारणे त्याला जमू लागले… अन म्हणूनच जर घडायचे असेल तर आता त्या काळाच्या सामोरे बिनदिक्कत जायलाच हवे… शिल्प घडणार तर टवके उडणारच.. वेदना होणारच.. फक्त एवढाच विश्वास हवा की हे टवके नको असलेल्या त्या अहंकाराचे आहेत… अविश्वासाचे आहेत!

एखाद्या नवीन मार्गावर पुढारणे किंवा समोर कोणताही मागोवा नसताना पुढे चालणे म्हणजेच धाडस किंवा स्वतःतील आत्मशक्तीवरील अतोनात विश्वास! वाट नसताना वाट काढणे अन् वाट तयार करणे हे सगळ्यांना जमतेच असे नाही….महाकाय समुद्रातून पलिकडे जाण्यासाठी सेतू बांधणे सगळ्यांनाच जमत नाही त्यासाठी श्रीरामाचा ध्यास हवा, मारुतीची गगनभेदी इच्छाशक्ती हवी, वानरसेनेचा तो निरागस पण अतोनात भक्तीभाव हवा… त्या खारुताईची धडपड अन भक्ती हवी.. शबरीचा भोळाभाव अन आपलेपणा हवा! खलाश्याला गलबत भर समुद्रात आल्यानंतर धीर गाळून चालत नाही.. तेव्हा परतीचा मार्ग नसतो… येणार्‍या वार्‍याशी झुंजायचे, समुद्राला कवटाळायचे अन त्यावरच स्वार व्हायचे असते… हे ज्याला जमेल त्यानेच नवीन मार्ग शोधण्याच्या फंदात पडावे अन्यथा आपला धोपटमार्ग बरा!!!

पाऊसप्रवासी : दैनंदिनी २७ जुलै २०१०

कधीतरी पावसात भिजवून मन रमवणारे पाऊसवेडे चातक बरेच आहेत… अगदी रोजच्या घडीला कितीतरी वेळा हे असे पाऊसप्रवासी नजरेसमोर मुसळधार पावसामध्ये विरघळताना दिसत असतात… कुणी आपल्या संसाराच्या गाठोड्याला खांद्यावरून त्याची होडी करुन पाण्यामध्ये सोडून देतो तर कुणी उद्या काय होणार या सामान्य प्रश्नाला कवटाळून पावसामध्ये आपले चिंतांचे कापसी ओझे भिजवून रस्त्यावरून सरपटताना दिसतो… कुणी पक्षी अगदी झाडाच्या कोवळ्या फांदीवर बसून आपले अधिराज्य गाजवताना दिसतो तर त्याचवेळेला या निसर्गाच्या नव्या नवलाईला दूर सारून डांबरी रस्त्यावर एखाद्या नव्या खड्ड्याच्या तक्रारीमध्ये त्रासलेला एखादा बुद्धिमान प्राणी दिसतो… कुठे एका बाजूला पांडुरंगावर सगळा भार सोपवून त्याच्या नामघोषामध्ये या पावसाचा टाळ करुन, या पावसाचा मृदंग करुन, या पावसाचा अभंग करुन त्या विठुमाऊलीकडे निघालेली यात्रिकांची आषाढवारी दिसते..

गेल्या पाच सहा वर्षामध्ये भारतातला पाऊस अनुभवला नव्हता.. जो काही होता तो फक्त बातम्यांमधून अन इथल्या फोटोंमधून.. यावेळी मात्र अगदी दूर गेलेल्या जुन्या मित्राप्रमाणे कडकडून गळ्यात पडला… त्याच जुन्या त्वेषामध्ये अन त्याच त्याच्या नेहमीच्या तालामध्ये… जणू काही सांगत होता की बघ या एकाच निसर्गामध्ये तू अन मी दोघे जगत आहोत, पण मी अजून तसाच मुक्त, मोकळा कोसळतो… अन तू दिवसेंदिवस एखाद्या जुन्या तलावाप्रमाणे आटत आटत चाललायस…. सार्‍या विश्वाला सताड बाहुंनी गवसणी कशी घालायची हे मात्र शिकावं ते या पावसाकडूनच… तो ना घड्याळाच्या काट्याला बांधलेला असतो ना तो कोण्या एखाद्या विशिष्ट व्यक्तीभोवती घुटमळत असतो… वर्षभराचे मळभ साचलेल्या आपल्या नजरा, आपले कोते झालेले दृष्टिकोन पुसून टाकण्यासाठी, धुवून टाकण्यासाठीच हा देवदूत आपल्याकडे झेपावत असेल… त्याचा ओला संदेश घेऊन माती सुगंधित होते.. त्याच्याकडून जीवन घेऊन कितीतरी नवी रोपटी आकाशाचे स्वप्न जोपासू लागतात… अन त्याचवेळेला आपल्यातला माणूस मात्र या पावसाचे आभार मानण्याचे विसरून जाताना दिसतो हीच ओली खंत मनामध्ये अंकुरत रहते…

अजूनही दैनंदिनी लिहावी की असंच जेव्हा वाटेल तेव्हा लिहावे हे काही केल्या नक्की होत नाहीये… लवकरच काहीतरी निर्णय व्हावा हीच अपेक्षा… विचारांशी प्रामाणिक राहणे जमावे.. उठणार्‍या प्रत्येक भावस्पंदनाला त्याच्या हक्काचे आभाळ देता यावे म्हणुन आणखी कसोशीने यत्न करावे… खळबळ वा उफाळणारा अग्नीचा समर्पक सार्थ बहुमान कराता यावा…. भ्रष्ट व कुनीतीपुर्वक काळवंडणार्‍या ढगांना क्षितीजापलिकडे दूर ढकलता यावे….. अन यानंतर उभ्या राहणार्‍या सुसंवादासाठी शब्दांना साकडे घालणे मात्र असेच सुरु राहील!!!

प्रगती : दैनंदिनी – १६, १७, १८, १९ आणि २० ऑक्टोबर २००९

नेहमी प्रश्न पडतो की भारताची प्रगती ही सामान्य माणसांपर्यंत का पोहचत नाही? या प्रश्नाचे कंगोरे खूपच विस्तृत आहेत.. अन आपल्यापैकी बर्‍याचजणांना त्याची कल्पनाही असेलच… माझ्यामते सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा की भारताची प्रगती होतेय असे म्हणण्यापेक्षा Indiaची प्रगती होत आहे असे जास्त उचित अन योग्य ठरेल.. हे सगळ्यांना मान्य आहे.. अन कदाचित यातच आपल्या प्रश्नाचे उत्तरही लपले आहे… Indiaची प्रगती सर्वसामान्यांपर्यंत पोहचायची असेल तर त्यासाठी सर्वसामान्यांना समजेल हे माध्यम हवे.. म्हणजेच काय तर ह्या प्रगतीला सर्वसामान्याला समजेल त्या भाषेतून त्याच्यापर्यंत पोहचवले पाहीजे… भारतामध्ये ग्लोबलायझेशन स्वीकारले गेले पण ते स्वीकारले गेले ते englishमधूनच.. कोणत्याही भारतीय भाषेतून नाही! भारतातील प्रांतवाद बाजूला ठेवून जर विचार करूयात.. जर तेव्हा प्रत्येक गोष्ट ही भारतीय भाषेचा अट्टहास करून स्वीकारली गेली असती तर काय झाले असते? आज डोक्यावरून जाणारे तंत्रज्ञान शेतकर्‍यांना वा खेडुतांना त्यांच्या भाषेतून कळु शकले असते.. कितीतरी प्रमाणात नोकर्‍यांचे दालन उघडले गेले असते.. इंग्रजी म्हणजेच सर्वकाही असा ‘गैरसमज’ न पसरता भारतातील भाषांना प्राधान्य मिळाले असते… भले पहिल्यांदा काही प्रोजेक्टस नसते मिळाले पण या अटीवरुन जर प्रोजेक्टस स्वीकारले असते तर नक्कीच कितीतरी हितकारी झाले असते… आज अवघड वाटणारे माहिती तंत्रज्ञान जर मराठीतून वा हिंदीतून सर्वदूर पसरले असते तर… आज कितीतरी जणांना त्याचा सहज सुलभ फायदा घेता आला असता! आधीच्या पिढ्यांना संगणकाची भीती नसती वाटली.. कमी शिकलेल्या लोकांच्या मनात न्यूनगंड निर्माण नसता झाला.. आज प्रांतीय भाषेच्या शिक्षणाबाबत आलेली उदासीनता कदाचित यामुळेच आहे.. आज मुलांना प्रांतीय भाषा शिकवा असा अट्टहास करणे योग्य आहे पण जर नोकर्‍या त्यांना इंग्लिशमधून मिळणार असतील तर त्यांचे मन त्यात कसे लागेल? आधी कॉर्पोरेट जगताची भाषा फक्त इंग्लिश न राखता ती भारतीय भाषा केली पाहीजे… इंग्लिश पर्याय म्हणून असेल…  भाषांतर करून देखील कितीतरी नोकर्‍या उपलब्ध झाल्या असत्या…. खेड्यातील लोकांनादेखील त्यांच्या भेषेत नोकर्‍या मिळू शकल्या असत्या.. शहराची प्रगती खेड्यापर्यंत खर्‍या अर्थाने पोहचू शकली असती! कोणतेही राष्ट्र प्रगत होते तेव्हा प्रगती ही सर्वसमावेशक असते.. दुर्दैवाने भारतातील प्रगती सर्वसमावेशक न होता समाजातील काही घटकांपर्यंत मर्यादित राहण्यासाठी हे देखील एक मुख्य कारण असू शकते.. नव्हे आहेच! आज भारत लोकशाहीकडून भांडवलशाहीकडे झुकतो आहे.. त्यामुळे हा भाषेचा मुद्दा मांडायचा असेल तर सरकारी प्रयत्न गरजेचे आहेत… कालांतराने या भांडवलदारांनी सरकारी हस्तक्षेप व कायद्याचा बडगादेखील उधळून लावला तर नवल वाटायला नको! या विचित्र धोरणामुळेच भारतातील भाषा जागतिक पातळीवर पिछाडीवर राहील्या व एका अर्थाने भारतीय भाषांची प्रगती खुंटली असेही म्हणता येईल! आज चीन, रशिया, जपान, आखाती देश, युरोपातील छोटी राष्ट्रे भारतापेक्षा प्रगत आहेत कारण तेथील समाजातील प्रत्येक घटक त्यांच्या प्रगतीचा हिस्सेदार आहे.. कोणत्याही तंत्रज्ञानाचे पहिले भाषांतर करून तेथील सामान्य माणसाला कसे समजेल हा कयास तिथे पहिल्यांदा असतो… भारतालाही जर कधी महासत्ता बनायचे असेल तर मात्र सर्वसमावेशक प्रगतीसाठी सर्वसामान्यांना समाविष्ट करुन घेण्यासाठी प्रयत्न करावेच लागतील…. अन भाषेचा हा मुद्दा तेव्हा कळीचा ठरेल यात काही वादच नाही!

शब्दांमध्ये निखारे असतात.. शब्दांमध्ये बंद अण्वस्त्रेही असतात.. फक्त वंदे मातरम हे दोन शब्द कोटी कोटी भारतीयांच्या छातीला ढवळून काढून स्वातंत्र्य लढ्यासाठी प्रेरित करू शकतात, हर हर महादेवची गर्जना जर सैनिकांना बेधडक शत्रुवर चालून जाण्यासाठी प्रेरक ठरू शकते… देवाच्या प्रार्थनेचे स्मरणही एकांतात जर अंगावर रोमांच उभारून लढण्यासाठी तयार करू शकते…. सावरकरांचे लेख वाचून कितीतरी तरुण घरदार सोडून जन्मभूमीसाठी प्राण देण्यास तयार होऊ शकतात.. म्हणजेच शब्द काही साधी गोष्ट नाही… शब्दच असतात जे नजरेला भेदून काळजाला छेदू शकतात.. ते शब्दच असतात जे ध्वनीलहरीच्या कंपनामधून अंग-अंग हादरवू शकतात.. शब्दांचे वादळ जर मनाच्या सीमारेषा ओलांडून आत शिरल्यानंतर काय होऊ शकते याची प्रचिती सगळ्यांना आहेच… पण शेवटी त्या शब्दातील भाव समजून घेणेही सगळ्यांना जमत नाही.. रामायण अन महाभारत ऐकून शिवाजी तयार झाले अन तेच रामायण अन महाभारत आज काही तरूणांच्या थट्टेचा विषय बनले आहे… ज्याला भगवदभक्तीच माहीत नाही त्याला शिवशक्ती मिलन कसे समजेल? प्रकृती-पुरुष म्हणजे काय हे कसे कळेल? मूळमाया-परब्रह्म हे नाते कसे उलगडेल? भगवंताशी होणारी अनन्यता, त्यातून पुढे येणारी समाधी कशी समजेल? विवेक, वैराग्य, योग, सिद्धता कसे समजेल? आपल्या पिढीला या गोष्टिंचा पुरवठा कदाचित लहानपणापासून झाला नसेल, याचेही कारण कदाचित इंग्रजाळलेल्या शिक्षणाचे झालेले अंधानुकरणच आहे… त्यामुळे या शब्दांचे खरे अर्थ उलगडण्यासाठी तो ध्यास हवा.. ती आस हवी अन ती भगवंताच्या अढळतेप्रती नितांत श्रद्धा हवी म्हणजे हवीच!

गेल्या चार पाच दिवसांचे वर्णन करण्यास मी असमर्थ आहे, अन कदाचित याचमुळे दैनंदिनी लिहीता आली नसावी.. जेव्हा मनावर मळभ साठते, जेव्हा स्वतःच स्वतःचे शत्रू असतो, विचारांमध्ये भरकटून जेव्हा अज्ञातात हरवणे होते तेव्हा काहीच करता येत नाही.. अशा अवस्थेतून बाहेर येण्यासाठी स्वतःच स्वतःच्या बेड्या तोडाव्या लागतात, स्वतःच निष्ठूर व्हावे लागते.. स्वतःच स्वतःच्या प्रतिमेचा बुरखा फाडावा लागतो…. एका बाजूला दिवाळीचे मंगलमय वातावरण होते.. तर एका बाजूला मौनामधून उठणारे वादळ होते… एका बाजूला नात्यांचा पसारा होता तर एका बाजूला एकांतातील प्रतिध्वनींचा सुळसुळाट…. आम्हा नवरा-बायकोच्या नात्यामधील भरभराट एका बाजूला उज्वल भविष्याकडे झेपावत होती तर एका बाजूला वास्तवाशी जुळवताना रिचवलेले विषाचे प्याले आठवत होते… एखाद्या गोष्टीतून सुटायचे असेल तर फक्त शारीरिक संदर्भ तुटून साध्य काहीच नसते… मानसिक संदर्भ पुसण्यासाठीच खरी इच्छाशक्ती हवी असते.. काही अक्षरे आपल्या जीवनाच्या फळ्यावर न पुसता येणार्‍या शाईने लिहीलेली असतात.. ती पुसण्याचा निष्फळ प्रयत्न करण्यापेक्षा त्यांची जागा तिथेच सोडून नवी अक्षरे काढणे जास्त हितावह ठरते…. कुणास ठाऊक येणारी नवी अक्षरे कदाचित त्या जुन्या अक्षरांचा प्रभाव पुसून टाकतील? पण जुन्या अक्षरात अडकून आपण येणार्‍या नव्या अक्षरांवर तर अन्याय करत नाही ना हा विचार करणे जास्त योग्य, नाही का?

अनिश्चितता – दैनंदिनी – १५ ऑक्टोबर २००९

अनिश्चितता कुणाला हवी असते? कदाचित ती कुणाच्याच अखत्यारित नसते अन म्हणूनच सगळ्यांच्या वाट्याला कोणत्या ना कोणत्या स्वरुपात तिचा भाग येत असतो… बर्‍याचदा शक्यतांच्या वेगवेगळ्या हिंदोळ्यावर येणारी चाहुल गटांगळ्या खात असते… जर सुखाची चमचम चांदणी असेल तर मनाला बागडायला नभाचे रान अपुरे पडते तेच जर एखाद्या अशुभ घटनेची किणकिण असेल तर मात्र एका टिंबात सारे विश्व डोळ्यातल्या पाण्याबरोबर विरघळताना दिसते.. एखादी अत्तराची शिशी पडून फुटल्यानंतर जसे कुठे थेंब उडतील व कुठे काचा फेकल्या जातील हे कुणाच्याच शक्यतेत नसते तशीच ती विचित्र चाहुल वाटू लागते.. पाय रोवून घट्ट उभ्या असलेल्या खांबाला जमिनीचा एक हादराही डळमळीत करू शकतो तर तिथे मानवाची ती गत काय? मग प्रश्न पडतो की ही अनिश्चितता जगण्याचाच एक भाग आहे का? या अनिश्चिततेला काहीच उत्तर नाही का? अन जर इथे नैराश्य भावनेतून विचार केला की उत्तर येते नाही म्हणून.. अनिश्चितता ही काही केल्या जाणार नाही म्हणजे आगदी सगळे काही नसले तरी मरण्यासाठीची अनिश्चितता ही कायमच असणार आहे अगदी मरेपर्यंत! मग थोडे हलके वाटते की ही अनिश्चितता स्वीकारून का जगू नये… तिच्यामधील ती अनियमितताच जर स्वीकारली तर जगणे किती सहज अन सोपे होऊन जाते… म्हणजे कितीही ठरवले तरी जसे आपण ठरवू तसे काही पुढचे सगळे होणार नाही म्हणजेच आपण जर ठरवत नसू तर मग आपण उगीचच हे असेच का अन हे असेच का नाही याचा अट्टहास करून उगीचच वेळ का दवडायचा? मग शांत व्हायला होते… अन मग कळते की हे प्रश्न तेव्हाच येतात जेव्हा आपण आपल्या नित्य कर्मातून आपले मन नाहक चिंतेमध्ये गुंतवून ठेवतो तेव्हाच.. ना त्या चिंतेने कधी फयदा होतो अन ना आपली सद्य कर्म पूर्ण मनाने होतात.. म्हणजे दुप्पट नुकसान! अन नक्कीच आपल्यासारख्या व्यवसायिक लोकांना हा सौदा तोट्याचा आहे हे सांगायला कोणा गणितज्ञाची गरज नाही पडणार… इथे जो शहणा होतो तो पुढे जाण्यास पात्र ठरतो व जो इथेच कुंथण्यात वेळ दवडतो तो याच क्षणांमध्ये सरपटत राहतो!

कालचा दिवस दिवाळीचा पहिला दिवस होता… उत्साहाचे वातावरण मनात पिंगा घालत होते पण मग मध्येच घरापासून आणखी एक दिवाळी म्हणून थोडी हुरहुर लागली होती… हरणे, जिंकणे याहीपलिकडे जर कोणती भावना असेल तर ती असते लढणे! जोपर्यंत आपण लढत आहोत तोपर्यंत आपण जरी जिंकलेलो नसलो तरी आपण हरलेलोही नसतो हे तेवढेच खरे! हरणे, जिंकणे या निकालाच्या दोन बाजू आहेत अगदी जसे नाण्याचा दोन बाजू असतत तशाच.. अगदी क्षणिक असतात.. जिंकल्यानंतरही लढावे लागतेच.. लढणे तेव्हाही थांबवता येत नाही.. आणि तसेच ते हरल्यानंतरही थांबवता येत नाही… जिंकणे अन हरणे हे कधीच आपल्या हातात नसते पण हातात असते ते म्हणजे लढणे.. कुणास ठाऊक कदाचित या लढण्यातच जिंकण्याचा आनंद लपलेला असावा!

आई – दैनंदिनी – १४ ऑक्टोबर २००९‏

आईची आठवण आल्यानंतर कोणी हळवे होणार नाही असे क्वचितच घडेल.. कोणत्याही पत्थरदिल माणासाच्या काळजाला खिंडार पाडू शकेल अशी ती माय-ममता असते…. तिच्या स्पर्शाच्या उबेला काळाचे बंधन नसते.. आजही पापण्यांचे दरवाजे मिटले की तो स्पर्श, ती प्रेमाची उब, तो अनंतकाळासाठी बांधुन ठेवणारा दैवी सुगंध अलगद अंगावर शहारे उठवुन जातो… मनाला बेकल करतो, काळाचे फासे उलटे फिरतात, आठवणींच्या गावामध्ये, बालपणीच्या रानामध्ये असंख्य मिश्कील हरकतींच्या किलबिलाटामध्ये आपण ठाण मांडण्यास जातो…

खस्ता खातानाही हसता येते नी कुणाला न दाखवता मनातून मूक रडता येते हे पहिल्यांदा आईकडूनच तर शिकलो, सगळ्यांची भूक शमल्यानंतर, सगळ्यांचे संतृप्तीचे ढेकर ऐकल्यानंतर मोकळ्या पातेल्याला पाहूनही पोट भरता येते हे आईशिवाय कोण सांगू शकेल… शाळेतल्या पहिल्या दिवशी आपल्या आधी तयार होणारी आई, शाळा सुटण्याआधी आपल्याआधी शाळेबाहेर ताटकळत उभी राहणारी आई, परीक्षेत आपण पहिले आल्यानंतर सगळ्यांच्या हसण्यामध्ये गुपचुप देवासमोर जाऊन समाधानाचे अश्रु गाळणारी आई, राशनच्या रॉकेलच्या रांगेमध्ये रॉकेल संपू नये म्हणून तासनतास उभी राहणारी आई, आपल्याला शिकता यावे म्हणून प्रत्येक वैयक्तिक सुखाला कात्री लावणारी आई, आज तारुण्यात फक्त काहीवेळ मनासारखे नाही झाले म्हणून चीडचीड करणारे आपण अन तेव्हा तिच्या ऐन तारुण्यात गुमान शंकराच्या पिंडीवर बेलाच्या पानांप्रमाणे स्वतःच्या आनंदाला वाहणारी आई, शाळेमध्ये फी भरण्यासाठी सकळी आपण उठण्याआधी वडिलांशी बोलून ऐन सणाच्या दिवशी आपली हौस बाजूला सारून आवडता दागिना काढून देणारी आई, आपल्याला ठेचकाळले की जोरात रागावणारी आई त्याचवेळेला तेवढ्याच मायेने मिळेल ते करून रक्त थांबवण्याचा प्रयत्न करणारी आई, आम्ही झोपल्यानंतरही काम करणारी अन आम्ही उठण्याआधीपासुन काम करणारी आणि कदाचित झोपेतही संसाराच्या जबाबदा-यांची बेरीज वजाबाकी करणारी आई, आपल्या शब्दांच्या फेकीवरून आपली संगत ओळखणारी व दामटून बरोबर काय अन चूक काय हे ठसवणारी आई, एक नाही दोन नाही कित्येक वर्षे आपल्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारी आई, चार पैसे वाचावे म्हणून पायी चालत प्रवास करणारी आई….. त्यागाचे मूर्तीमंत उदाहरण कोणी असेल तर ती आईच असते, सगळ्या परिस्थितींशी भांडून प्रसंगी समोर येईल त्या अवघड वळणाला स्वीकारून आपल्याला आपल्या योग्य ठिकाणी पोहचविण्यासाठी धडपडणारी आई, वादळात, वीजांच्या गडगडाटात, मुसळधार पावसात, गरीबीमध्ये, हालाखीमध्ये उद्याचा आशेच्या किरण आपल्या डोळ्यांत शोधून त्यावर वर्षानुवर्षे मागे ढकलणारी आई.. आपल्या स्वप्नांवर आपल्यापेक्षा जास्त विश्वास ठेवणारी व तिथपर्यंत पोहचण्यासाठी सततचा पाठपुरावा करणारी दैवी शक्ती म्हणजे आई!

आईच्या उपकाराचे गणित मांडणारेही नतद्रष्ट असतात, पण हे उपकार अनंत काळाचे आहेत अन ते न फिटण्यासाठीच असतात अन असावेत त्या उपकारांमध्येच त्या कल्पवृक्षाच्या सावलीचा परमानंद आहे… जो परब्रह्म ह्या जीव सृष्टीला चालवतो त्याच परब्रह्माने आपल्याला त्या मातेच्या उदरी स्थान दिलेय… आपल्या पूर्वसंचिताचे ते फलित आहे! जिथे अलंकारितता उपमामुक्त होते, जिथे भाषा शब्दमुक्त होते, जिथे भावना देहमुक्त होते,  जिथे प्रेम स्पर्शमुक्त होते, जिथे अश्रु भावमुक्त होतात तिथे आईचा महिमा सुरू होतो! आई झालेले पहिले देवदर्शन असते,  आइ नकळत झालेले पहिले मैत्र असते, आई हृदयात कोरलेले पत्र असते, आई वात्सल्याचे प्रतिबिंब असते, आई काळाच्या वहीमध्ये जपलेले अव्यक्त पिंपळपान असते, आई प्रत्येकाला न मागता मिळालेले वरदान असते!

काळाच्या ओंजळीतून आपलेही आयुष्य त्या रेतीप्रमाणे निसटून जात आहे.. अनेकांचे गेले अन आता आपलेही जाईल… अनामिकतेचा शाप घेऊन अनामिकतेमध्ये हरवून गेलेले कितीतरी जण आपल्या पाहण्यात आहेत अन येत राहतील… आयुष्यभर झटले अन शेवटी एका तस्वीरीच्या चौकटीमध्ये आठवणींच्या रंगामध्ये कायमचे चिकटून बसलेले चेहरे नवीन नाहीत… निष्क्रियता जर अशीच चालू राहीली तर तुमचे आमचेही असेच होणार यात काही शंकाच नाही…. जो मृत्यूनंतरही त्याच्या योगदानातून जिवंत राहतो तो आणि फक्त तोच या जीवन-मृत्यूच्या साखळीला भेदू शकला…. जीवनाच्या प्रत्येक वळणावर संधीला चुकवणारा व आयुष्याच्या प्रत्येक वळणावर संधी शोधून तिला यशस्वी करणारा या दोन विभागात नकळत जग विभागले जाते.. नवीन जबाबदारींचा मार्ग कुणालाच चुकला नाही ना तो रस्त्यावरील भिकार्‍याला अन ना महातील राजाला, पण यातही जो कर्तव्याप्रती एकनिष्ठ राहून तेजाळून निघतो तोच यशस्वी गणला जातो! फुटकळ समस्यांवर आयुष्य घालवायला थोडी ना हा जन्म आहे… या दगडातून उत्कृष्ठ शिल्प घडवायचे तर मग छन्नी अन हातोड्याची भीती बाळगून कशी चालेल.. यातून तावून सुलाखून निघू तेव्हाच तर खरे शिल्प तयार होईल! या आणि अशा अनेक विचारांच्या सोबतीत कालच्या दिवसाची सांगता झाली!

जात(?) – दैनंदिनी – १३ ऑक्टोबर २००९

जातीचे मुख्यत्वे दोनच प्रकार पडतात.. एक म्हणजे ‘जात मानणारे’ व दुसरे ‘जात न मानणारे’! माणसाच्या अहंकारातून जातीचा जन्म होतो… मी माझा अन माझे जेव्हा टोकाला जाते तेव्हा मग हे माझ्यातले अन हे तुमच्यातले अशी सुरुवात होते… या तत्सम गोष्टी करणारे आमचे व या गोष्टी न करणारे वेगळे… सद्य काळात जातींना किती महत्व द्यायचे हे ज्याने त्याने ठरवले पाहिजे… जेव्हा विहीत कर्मानुसार वा व्यवसायानुसार (धर्म) एका विशिष्ट मनुष्य समुहाला एक नाव दिले होते तेव्हा जात ओळखणे उचित असावे… पण आज जिथे कोणाचेही विहीत कर्म पिढीजात नाही… अभियंत्याचा मुलगा अभियंता नाही, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर नाही, शेतकर्‍याचा मुलगा शेतकरी नाही, चांभाराचा मुलगा चांभार नाही आणि लोहाराचा मुलगा लोहार नाही तिथे जात कशी ठरवणार? फक्त पिढीजात आलेली गोष्ट पुढे चालू ठेवायचा अट्टहास म्हणुन आजच्या यशस्वी तरुणांनाही त्यांच्या पिढीजात जातीनुसार संबोधायचे??

सद्य कर्मानुसार त्याची जात का ठरू नये? जर तेव्हा ती तशीच ठरवण्यात आली तर मग आत्ता का नाही?  आता आपली शिक्षण व्यवस्था एक चांगला अभियंता वा डॉक्टर घडवते पण त्याची जात पुसू शकत नाही… अन हेच आपल्या शिक्षण व्यवस्थेचे दुर्दैव आहे! आपण युके अन युएस स्टॅंडर्डला अनुसरून त्यांना हवे तसे अभियंते बनवू शकतो.. पण भारताला हवे तसे ‘नागरिक’ नाही बनवू शकत! खरी शिक्षण व्यवस्था तीच जी एक स्वयंपूर्ण नागरिक घडवू शकेल! जो समाजाच्या नितीनियमांना पाळू शकेल असा खंदा सैनिक तयार करू शकेल!… आजच्या शिक्षणसंस्था म्हणजे फक्त परकीय धोरणांप्रमाणे वागणार्‍या बाहुल्या आहेत… आज, भारताला मान वर करून… भारताचा विचार करून का ठरवता येत नाही? आपल्याला काय हवे हे परकीय कसे काय ठरवू शकतात? भारताला भारत सुधारायचाय तर भारतातल्या समस्यांवर काम करणारे अभियंते तयार करायचे की बाहेरच्या देशातील मार्केटला आपल्या देशात विस्तार करण्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ तयार करायचे? कधी तरी असाही दिवस यावा जेव्हा आपण आपले माप घेऊन आपले कपडे आपण स्वतःच शिवू…. सध्यातरी दुसर्‍याच्या मापाचे दुसर्‍यासाठी तयार केलेले कपडे घालून बघण्यात आपली हयात चालली आहे!

फक्त नावं ठेऊन साध्य काहीच होणार नाही.. आपल्या व्यवस्थेवर नावं ठेवायला कोणाला पैसे देऊन आणायला नको तर समोरच्याला गप्प बसवायला आपल्या इथे पैसे चारावे लागतात, ही आपली सरकारी शोकांतिका! आपली व्यवस्था स्वयंपूर्ण आहे हा विश्वास सर्वसामान्यांमध्ये येण्यासाठीचे सरकारी प्रयत्न निष्फळ ठरले आहेत… समाजातील काही घटकांकडे लांगुलचालन करून सरकारने विश्वास गमावला आहे अन सरसकट प्रत्येक निवडणुकीत या सूत्राचा वापर प्रत्येक राजकीय पक्षाने केला आहे… म्हणजेच काय की एका बाजूला शिक्षणव्यवस्था भरकटवत आहे त्यामुळे तरुणपिढी म्हणजे ‘विदेशी वेष्टनात देशी माल’ होऊन राहिली आहे व राजकीय नेतृत्व अजून ताकदीने इतर घटकांना मूळ सत्यापासून दूर नेत आहे… अन त्यामुळे ना सामाजिक जबाबदारी आहे अन ना सामाजिक जागृती! सामाजिक उदासीनता ही याचमुळे उदयास येते.. जेव्हा नेतृत्व सक्षम नाही, कायद्याचा वचक नाही तेव्हा समाजातील सर्व घटक भरकटतातच… अन सध्या हेच चित्र ढोबळमानाने समोर येत आहे.. अन येणार्‍या काळात याचा विस्तार होण्याचीच शक्यता जास्त वाटत आहे… सर्वांगीण विचार करून जोपर्यंत एखादे नेतृत्व सामान्यांपर्यंत पोहचत नाही तोपर्यंत सामान्यांनाचा विश्वास डळमळीत राहील…  राजरोसपणे उदयाला येणारे नवीन नवीन राजकीय पक्ष हे देखील आपली एक ‘विशिष्ट जात’ तयार करण्याचेच काम करत आहेत…. पहायला गेले तर पक्ष दोनच असतात एक सत्ताधारी व दुसरा विरोधक पक्ष… पण आता यामध्येही फाटे फुटत आहेत…. मूळ प्रश्न, समस्या मांडणारे वा त्याचा पाठपुरावा करणारे पक्ष शोधावे लागत आहेत हे दुर्दैव!

अन अशा अवस्थेत नैराश्य येणार नाही असे होणार नाही.. पण हे सत्य आहे.. हे नाकारून कसे चालेल.. याची जाणीव असलीच पाहीजे अन कदाचित यामुळे मनाला चालना दिली पाहीजे… जेवढा शत्रू मोठा असतो तेवढाच त्याला हरवणार्‍याचे कर्तृत्व महान होते…. आपल्या पिढीला या चक्रव्युहातूनच मार्ग काढायचा आहे.. त्यासाठी सुरुवात ही झाली पाहिजे.. राजकीय व्यवस्थेची गरज असते पण त्या व्यवस्थेचे सहकार्य नाही म्हणून एखादे काम मोडीत काढणे हास्यास्पद ठरेल कारण ती मदत नाही हे गृहीत धरूनच आता पुढे गेले पाहिजे… आजच्या तरुणांनी काहीतरि सामाजिक काम केलेच पाहीजे.. कोणत्याही स्वरुपाचे असेल पण कोणत्यातरी कार्याशी स्वतःला जोडून घेतले पाहिजे.. आज त्याची नितांत गरज आहे.. आपली शिक्षण व्यवस्था आपल्यामध्ये ती सामाजिक जाणिव निर्माण करायला अयशस्वी ठरली हे स्वीकारायलाच हवे.. फक्त ठरविक पुस्तकी शिक्षण घेऊन एका नोकरीच्या साच्यात आयुष्य घालवायचे असेल तर बिन्धास्त घालवा पण हासील काहीच नाही.. हासील तेच जे आपल्या आधीच्या पिढीला मिळाले.. आपल्या बाबांना मिळाले… आयुष्यभर नोकरी केली.. सगळे कमावले पण आज देशात राहताना इथल्या व्यवस्थेला नावं ठेवण्याखेरीज काहीच करता येत नाही.. निमूट जे आहे, जसे आहे ते स्वीकारावे लागत आहे… आपलेही तसेच होईल कदाचित याहीपेक्षा खडतर चित्र आपल्यावेळी असेल हे लक्षात घ्या… आज जर कोणत्यातरी कामात आपला काही वेळ दिला तर शेवटी एवढे समाधान नक्की असेल की मी या व्य्वस्थेला बदलण्यासाठी वा समाजासाठी काहीतरि हातभार लावला… आज हा विचार जरी मनात घोळू लागला तरी पुष्कळ आहे!

आज सर्वत्र वावरणारे ‘एन्जीओ’ कार्यरत आहेत.. पण बरेचदा फक्त एखादा ठरलेला कार्यक्रम वर्षानुवर्षे त्याच स्वरुपात अमलात आणताना बरेच दिसतात.. त्यामुळे जर कोणत्याही संस्थेशी निगडीत व्हायचा विचार असेल तर,

आधी आपल्याला काय करायचेय हे ठाम ठरवा, फक्त कोणीतरी म्हणतय म्हणून स्वतःला झोकून देऊ नका… कारण अशा झोकून देण्याने होणारी जखम मोठी असते.. अन याचा परिणाम म्हणजे संपूर्णपणे सामाजिक कामाप्रती येणारी चीड… त्यामुळे डोळे उघडे ठेऊन काम करा.. थोडेच करा पण समाधानाने करा… एखादे सामाजिक उत्तर सगळीकडे जसेच्या तसे लागू होऊ नाही शकत त्यामुळे प्रत्येक सामाजिक उत्तर हे प्रत्येक सामाजिक समस्येप्रमाणे, प्रश्नाप्रमाणे बदलते हे लक्षात घ्या…  काम करण्यासाठी पुढे या.. वेळ असाच चालला आहे… थोडे कार्यरत व्हा… इतरांनाही सहभागी करण्यासाठी प्रेरीत करा… फक्त ‘उद्या बघू’ ही प्रवृत्ती असेल तर ती झटकण्यासाठी तयार रहा… आपले सांसारिक प्रॉब्लेम्स कधीच संपणार नाहीत अगदी मरेपर्यंत नाही अन मेल्यानंतरही नाही.. त्यामुळे आता थोडा वेळ सत्कारणी लावा!

कालचा दिवस असा काही वेगळा नव्हता.. विचारांची आवर्तने चालू होती… अन त्याचवेळेला जातीपातीवरून भांडणारे काही तरुण पाहीले… म्हणजे भरारी घ्यायची आहे पण साखळदंड तोडायचे नाहीत… मित्रांनो हे साखळदंड तोडल्याशिवाय उडणे शक्य नाही… माणसाच्या स्वभावाप्रमाणे त्याला दूर-जवळ करा पण फक्त जातीमुळे नाही… हे विष जेवढे उगाळा तेवढे पसरणार आहे त्यामुळे एकतर निर्विषारी होऊन बाजूला थांबा किंवा विषारी होऊन समाजाला मागे ढकलत घेऊन चला…. निर्णय आपल्याकडे आहे अन आपल्याकडेच राहणार… त्यामुळे हे आताच ठरवायचे आहे मी कोण? ‘जात मानणारा’ की ‘जात न मानणारा’? सध्याच्या काळात याच दोन जाती आहेत तिसरी जात कोणतीच नाही!

शक्ती – दैनंदिनी – १२ ऑक्टोबर २००९

आपलंही रक्त उसळतं, उफाळून येतो जोश, त्वेषामध्ये काहीतरी होणार असं वाटत असतं, रागाने लालबुंद असतो आपण, रागाला मोकळी वाट नाही करून दिली तर काहीतरी आकरीत घडणार हे नक्की असतं… मुठी आवळल्या जातात बर्‍याचदा, हात शिवशिवतात कित्येकदा, कितीतरी वेळा दरवाजे एकमेकांवर आदळले जातात, हातातली गोष्ट फेकून दिली जाते, समोरच्याला नाही नाही ते बोलले जाते, सगळ्या यंत्रणेवर डोकं फिरतं, काम करावंसं वाटत नाही, घुसमटल्यासारखं होतं, मनाच्या विरूद्ध जगणं नकोसं वाटतं, गाडीवर दूर निघून जावंसं वाटतं, शांतता खायला उठते अन गोंधळ, कल्लोळ नकोसा वाटतो, आतमध्ये काहीतरी बाहेर येण्यासाठी वाट शोधतंय पण काय करायचं ते कळत नाही… होते अशी अवस्था, प्रत्येकाची कधी ना कधी तरी अशी अवस्था असते… पण मग याचा अर्थ काय?? याचा अर्थ हाच की, आपल्यामध्येही ती उर्जा आहे, आपल्यामध्येही ती धग आहे, ती आग आहे, ती शिवबाने घेतलेली प्रतिज्ञा अजूनही जिवंत आहे, क्रांतिकारकांनी ज्या उर्जेवर भरोसा ठेऊन शत्रुला अंगावर घेतले ती अजूनही आपल्यात आहे, जिच्या जोरावर जगातील प्रत्येक क्रांती झाली, जिच्या जोरावर कितीतरी सत्तांची उलथापालथ झाली ती उर्जा, तीच अजूनही तुमच्या आमच्यात आहे! फरक एवढाच की आता वेगवेगळ्या वेष्टनांमध्ये या उर्जेला दडपून टाकले आहे… या उर्जेला लागतो तो मुक्त, मोकळा, बिनधास्त वावर! जे आहे, जसे आहे ते ठणकावुन सांगण्याचा विश्वास, निक्षून समोरच्याची नजर भेदून जाईल असा आत्मविश्वास!  दुर्दैवाने या आत्मविश्वासाला आज भीतीने ग्रासले आहे.. लोकांना उद्याची भीती असते… पण आजची काळजी नसते… फक्त उद्या जगण्यासाठी आज ढकलणे कुठपर्यंत योग्य आहे? हे तर जगातील असंख्य प्राणी करतात मग आपल्यात अन त्यांच्यात फरक तो काय??

वेळीच शहाणे होणारे लांबचा पल्ला गाठतात व योग्य ठिकाणी पोहचतात.. पण वेळेला न जुमानता फक्त धावणारे उशिरा शहाणे होतात जेव्हा नको तो पल्ला गाठलेला असतो व नको तेवढ्या दूर पोहचलेलो असतो व तिथून परतणे शक्य नसते! आयुष्यात मला काय करायचेय? जे मी करतोय तोच माझा उद्देश आहे का? यात मी पूर्ण सुखी अन समाधानी आहे का? यापुढे २० वर्षानंतर जर मला हा प्रश्न आठवला अन तेव्हा माझे उत्तर वेगळे तर नसेल ना? आता आहे त्यातून मी काय करू शकतो? माझे माझ्या देशाप्रती माझ्या जन्मभूमीसाठी काही कर्तव्य आहे का? ज्यांनी फक्त जन्मभूमीच्या उद्धारार्थ ऐन-तारुण्यात बलिदान दिले त्यांच्याबद्दल मला किती माहिती आहे? त्या क्रांतिकारकांना, स्वातंत्र्यवीरांना येणार्‍या आपल्या पिढीकडून हेच सर्व अपेक्षित होते का? त्यांना जे अपेक्षित होते त्यादृष्टीने मी काहीतरी करतोय का? ज्यांच्या अनंत कष्टामुळे, साहसामुळे मी हा दिवस पाहतोय त्यांचे उपकार फेडण्यासाठी, त्यांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी मला आणखी काही करता येईल का?  असे एक ना अनेक प्रश्न स्वतःला विचारून बघा, याची उत्तरे काय मिळतात ते बघा…. तारुण्य हे फुलण्याचे, बहरण्याचे अन उत्फुल्ल जोषाचे कारंजे असते, त्यामुळे आयुष्यातील कोणतेही महत्वाचे काम करायचे असेल तर त्याची सुरुवात या वयात होणे जास्त योग्य अन समर्पक!

आपल्या मनातील महाकाय शक्तीपासून आपणच अनभिज्ञ असतो अन बरेचदा असेच आयुष्य जगतो… माझा या शक्तीवर पूर्ण विश्वास आहे… ती प्रत्येकाच्या ठायी असते..  जर ती नसती तर आपल्या एकांतातील विचार एवढे उंच कधीच नसते झाले, आपली स्वप्नं कधीच आपल्या हातांच्या शक्यतेपलिकडे गेली नसती…..

आपल्याला कधी ना कधी तरी एखाद्या साहसासाठी आतुर करणारी ती ही शक्तीच असते.. अशक्यप्राय शक्यतांमधून आपल्याला शक्यतेच्या लाटेवर घेऊन किनार्‍याला येणारी लाट म्हणजेच ही शक्ती असते, कित्येकदा क्षणाच्या अंतराने आपला जीव वाचलेला असतो आणि ते करणारी ही शक्तीच असते! या शक्तीच्याच जोरावर जगातील सगळ्यात शक्तीशाली माणूस वेगळा ठरतो तर याच शक्तीच्या जोरावर इतिहास घडतो.. याच शक्तीच्या जोरावर स्वराज्य उभे राहते, याच शक्तीच्या जोरावर ५० वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा होऊनही सावरकर त्यांच्या उद्देशाप्रती ठाम राहतात, याच शक्तीच्या जोरावर बाबा आमटेंचे आनंदवन उभे राहते, याच शक्तीच्या जोरावर जगातील महदाश्चर्ये रुपास येतात! मित्रांनो या शक्तीवर विश्वास ठेवा.. या शक्तीची उपासना करा…. या शक्तीचे संवर्धन करा… ती प्रत्येकात आहे आणि त्याची जाणीव घ्या!!

कालच्या दिवसाला वरील विचारांच्या आंदोलनाचे वादळी स्वरुप होते.. भारतातील तरुणांकडे असलेली असीम ताकद पाहिली की मनाला वेगळाच उभार मिळतो… आजच्या तरुणांमध्ये तो जोष, तो त्वेष, ती उर्जा पुरेपूर आहे…. सध्या फक्त नोकरी, शिक्षण अन काम-धंदा यात अडकून पडल्याने मात्र या उर्जेचा यथोचित वापर होताना दिसत नाही अन तेव्हा मग थोडे कसेतरी वाटते… अहोरात्र घाण्याच्या बैलाप्रमाणे काम करणारे कितीतरी असंख्य तरुण पाहण्यात आहेत… फक्त ठराविक काम करून त्यांची विचारसरणी एकांगी होत आहे… लहानवयात भरमसाट प्रगती झाल्याने आत्मविश्वास तर आलाय.. पण बरेचदा तो फाजीलही वाटून जातो.. देव करो, अन लवकरच हा आत्मविश्वास देशाच्या उभारणीसाठी कारणीभूत ठरो एवढीच प्रार्थना!

=> (दैनंदिनी लिहित असताना जाणवले की प्रत्येक दैनंदिनी मधे काही ना काही नवे विचार सहज येत गेलेत.. काल वाटून गेले की दैनंदिनी मधे ज्या विषयाच्या अनुषंगाने विचार स्फु्रत जातात त्याचा समावेश दैनंदिनीच्या शीर्षकातही करावा.. अन आजपासून तशी सुरुवातही करतोय.. )

दैनंदिनी – ०८, ०९, १० आणि ११ ऑक्टोबर २००९‏

चुकीचा इतिहास नक्की काय करू शकतो? याचे जिवंत उदाहरण म्हणजे आपली सगळ्यांची बदललेली मानसिकता… परस्त्रीबरोबर उघड उघड संबंध ठेवणार्‍या माणसाला आपण ‘चाचा’ म्हणतो, आयुष्यभर ज्या माणसाने दारूचे अन सिगारेटचे व्यसन जोपासले त्याचा जन्मदिवस आपण ‘बालदिन’ म्हणून साजरा करतो! ज्या माणसाने उघड उघड छत्रपती शिवरायांना ‘दहशतवादी’ म्हंटले त्याच्या नावाने आपण कितीतरी पवित्र स्थानांना नाव देऊन गौरव करतो! ज्या माणसाने आपल्यातील कामभावना जागृत आहे की नाही किंवा आपल्या मनाचा ताबा आहे की नाही हे पाहण्यासाठी आपल्या बाजुला स्त्रियांना नग्नावस्थेत झोपवले त्या माणसाला आपण ‘महात्मा’ म्हणतो! अशा एक ना अनेक गोष्टी आपल्यापासून का लपविल्या गेल्या? याचा जाब आपण कधी आपल्या आधीच्या पिढ्यांना विचारला आहे का? आपल्या येणार्‍या पिढ्यांनी जर हे प्रश्न उपस्थित केले तर आपण काय उत्तर देणार आहोत?

मित्रांनो, खर्‍या इतिहासाचा शोध घ्या…. आपल्या इथे इतिहासाचेही राजकारण करणारे भडवे आहेत… आता तुमच्यासाठी नाही पण येणार्‍या पिढ्यांसाठी तरी बरोबर माहिती जाणून घ्या…. इतिहास कसाही असला तरी तो खर्‍या स्वरुपात माहीत असला पाहीजे.. उगीच कोणाला पाहीजे त्या स्वार्थी उद्देशाने मांडलेला इतिहास म्हणजे शाप आहे… प्रश्न विचारा… उत्तरांसाठी कासावीस व्हा… आता जर हातावर हात ठेवून बसलात तर मात्र खैर नाही… कितीही गुलाबांच्या सज्जामध्ये असलात तरी हा सज्जा भ्रामक आहे याची जाणीव ठेवा… आपल्या आतमध्येही निखारा आहे.. त्यावर विश्वास ठेवा… त्याला संघर्षाची हवा द्या… पेटून उठू देत त्याला अन त्याच्याबरोबर स्वतः पेटून उठा… परकीयांची गुलामी उघड उघड होती ही स्वकीयांकडून होणारी पिळवणुक अदृश्य आहे पण नकळत आपल्या स्वाभिमानाचा गळा घोटत आहे हे लक्षात घ्या! स्वाभिमान असेल तर पुढे या… नसेल तर काळाबरोबर नष्ट होण्यास तयार रहा… भित्र्यांच्या माथी येणार्‍या पिढ्या गद्दारीचा छाप मारतील… तर लढून मरणार्‍यांसाठी क्रांतीचा टिळक माथी लागेल.. इतिहास घडवण्यास सज्ज व्हा… येणारा काळ बदलण्यास सज्ज व्हा!

स्पंदनांची भाषा जेव्हा मनाची भाषा होते तेव्हा एक व्यक्ती बदलतो.. जेव्हा वेगवेगळ्या मनांची भाषा एक होते तेव्हा समाज बदलतो.. प्रत्येक शेवट हा एक नवी सुरुवात घेऊन येतो.. नेहमी शेवटावर रडत बसणार्‍यांस काळ त्याच्या सापळ्यात कैद करतो.. तर शेवटामध्येही संधी शोधून नवी सुरुवात करणार्‍यांच्या उद्देशपूर्तीसाठी काळ कटीबद्ध होतो… आत्मविश्वास प्रत्येकालाच हवा असतो.. आत्मविश्वास जगण्याचा, झगडण्याचा, लढण्याचा, जिंकण्याचा प्रत्येकालाच हवा असतो… पण त्या आत्मविश्वासापर्यंत पोहचविणारा संघर्ष किती जणांना मान्य असतो?

हा संघर्षच सामान्यांना महान ठरवतो वा त्यांना दूर भूतकाळाच्या इतिहासात फेकून देतो… संघर्षाला पर्याय नाही… संघर्षास उभे रहा… स्वतःला या भट्टीत झोकुन द्या.. यज्ञ यशस्वी होण्यासाठी समिधांची आहुती द्यावीच लागते… या समिधा म्हणजे दुसरे तिसरे काही नसून हा आपला जपलेला पुळचट नेभळटपणा, पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण करुन आलेला पंगुपणा होय! आपल्या सदसदविवेकबुद्धीवर साठलेले मळभ आपल्यालाच दूर केले पाहीजे… आता वेड्याप्रमाणे धावणे सोडून थांबून थोडा विचार केलाच पाहीजे… आधी स्वतः बदलून इतर बांधवांपर्यंत ही भावना पोहचवलीच पाहीजे… सुरुवातीला सागर हा एक थेंबच असतो.. तसेच आपणही सुरुवातीला एकटेच असू… आपल्याला आपल्यासारख्यांचा समुद्र गोळा करायचा आहे… दिशाभूल झालेल्यांना योग्य दिशेकडे घेऊन जाण्यासाठी आधी आपले वारू योग्य दिशेला मार्गस्थ केले पाहीजेत… बदलायचे आहे हे मनात ठाम करा! जर सद्य परिस्थितीतून सुवर्णयुग परत आणायचे असेल तर ‘संघर्ष’ करायचाच आहे.. आपली पिढी यासाठी आहुती बनण्यास सज्ज झालीच पाहीजे… उध्वस्त माळरानात एकच महाल बांधून काय फायदा.. सार्‍या माळरानाचे नंदनवन करायला हवे तेव्हाच आणि तेव्हाच त्या महालास खरी शोभा येईल!!

समविचारी लोकांपर्यंत पोहचणे अवघड नाही… पण त्या समविचारी लोकांकडून त्या विचारांची अंमलबजावणी होणे महत्वाची असते.. जेव्हा राजकीय नेतृत्वालाच देशाच्या संस्कृतीचा विसर पडला आहे… जिथे सर्वांगीण विकासापेक्षाही एकांगी विकासाला महत्व देण्यात धन्यता मानली जात आहे… तिथे आपल्या पुढच्या पिढ्या कशा काय समृद्धपणे उभ्या राहतील… हे बदलाचे शिवधनुष्य आपल्या पिढीला पेलावे लागणारच आहे… सुरुवात ही आपल्यापासून आहे अन ती आपल्याला करावीच लागणार आहे.. बदलाची जबाबदारी टाळणे अवघड नाही पण येणार्‍या पिढ्यांचे शाप माथी घेऊन मरणे किती अवघड असेल याचा विचार करा…

शिक्षणाचा खरा अर्थ काय? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची गरज आहे… शिक्षण म्हणजे फक्त वैयक्तिक स्वार्थच असतो का? शिक्षण म्हणजे जिथे उपजलो, जिथे वाढलो तिथल्या लोकांशी प्रतारणा करणे होय का? दोन चारशे रुपये दान करून परिस्थिती सुधारणार आहे का?  विकसित जगाची भुरळ आपल्यावर पडली आहे अन त्यात काहीही गैर नाही… पण ही धुंदी एवढी आहे की आपल्याला आपल्या देशातील वास्तविकतेचा विसर पडला आहे… आपल्या देशाची जगाला भुरळ पडेल असा समृद्ध देश बनवायची मनिषा आपल्या मनात का रुंजी घालत नाही? … सोप्पं नक्कीच नाही पण इथेच ‘खरा संघर्ष’ आहे.. इथे अन इथेच खर्‍या व्यक्तिमत्वाची कसोटी लागणार आहे.. आधीच तयार झालेल्या सकस वातावरणात स्वतःला बदलवून घेणे अवघड नाही… पण असेच सकस वातावरण तयार करणे खरे जिकरीचे आव्हान आहे!

इतर देशात जाउन मी स्वतःला कसे काय तिथल्या संकृतीमध्ये मिळते-जुळते करुन घेतले याची प्रौढी मिरवणारे कितीतरी सहज सापडतील… लोकं यातच खुश होतात.. नवीन देश बघणे यात गैर काहीच नाही.. पण लोकहो, आधी  आपला देश बघा! भारत भ्रमण करा! युवकांमध्ये भारतभ्रमणाविषयी असलेली अनास्थाच आपल्या देशाच्या प्रगतीचे खरे स्वरुप सांगत नाही का? भारत भ्रमण करा .. भारतातील खर्‍या भारताला शोधा… आज भारतातील बहुतांश भाग फिरल्यानंतर मी नक्कीच सांगू शकतो की ते इतके सहज नाही… आयुष्यभरासाठी एक जखम मिळेल.. भळभळती.. कधीही खपली न धरणारी… मित्रांनो ती जखम जगा… ती जखमच तुम्हाला बदलासाठी, संघर्षासाठी परावृत्त करेल!

गेल्या चार दिवसातील मनःस्थिती यावेगळी नव्हती… इथे लंडनमध्ये आपल्या क्रांतीकारकांच्या स्वातंत्र्यपूर्व वास्तव्याच्या जुन्या खुणा शोधण्याचा योग आला… न ऐकलेला व न वाचलेला इतिहास जवळून अनुभवण्याचा योग आला…  सावरकर, मदनलाल धिंग्रा, उधम सिंग, श्यामजी कृष्णवर्मा, लोकमान्य टिळक यांची पदचिन्हे शोधताना अंगावरील रोमांच उभे राहीले.. मन शंभर वर्षापूर्वीच्या काळात हरवून गेले… ब्रिटीशांच्या अघोरीपणाची किळस आली, घृणा वाटली.. आज जगाला ‘शांतता’ शिकवण्यासाठी निघालेल्या या इंग्रजांनी केलेल्या अत्याचाराचे थोडुसे वर्णनही यांचे कपटी रुप उघड करते… याचा सविस्तर गोषवारा इथे ब्लॉगवर लवकरच प्रस्तुत करेल… एका बाजुला लंडनमध्ये असताना अशा स्थानांना भेट देता आली यासाठी धन्य वाटत होते तर दुसर्‍या बाजूला आपल्या सरकारचे बेरकी स्वरुप समोर आल्याने चीड आली होती… एक वेगळीच उर्जा नकळतपणे अंगात संचारली… या क्रांतिकारकांच्या साहसाचा एक अंश, एक थेंब आपल्याही वाट्याला यावा, त्यांचे सार्वभौम देशाचे अपूर्ण राहीलेले स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने काहीतरी प्रयत्न करण्याचे बळ आपल्या अंगी यावे यासाठी मनोमन प्रार्थना करुन या नव्या आठवड्याची सुरुवात केली!

दैनंदिनी – ०६ आणि ०७ ऑक्टोबर २००९

एखाद्या प्रश्नाच्या उत्तरासाठी जर आयुष्य खर्ची करावे लागणार असेल तर? अन तरीही त्या उत्तराची शाश्वती मिळणार नसेल तर? कुणास ठाऊक एखाद्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे ‘आणखी एक प्रश्न’ असायचा? प्रश्नांमध्ये भरकटणे मला कधीच जमले नाही.. प्रश्नांची सोबत असते, ती नाकारता येत नाही वा तिचे असणे गरजेचेच असते.. या शोधार्थ आयुष्य जगणेही उचित असते… पण कोणता प्रश्न स्वीकारायचा अन कोणता प्रश्न किती महत्वाचा ठरवायचा याचे सर्व अधिकार मात्र हे आपल्यावर असतात.. कुणाला कशाला बर्‍याच जणांना वैयक्तिक प्रश्नांचे शाप असतात.. वैयक्तिक आयुष्यातून बाहेर डोके काढायला मिळत नाही..  माझे आयुष्य, माझा संसार अन माझे कर्तृत्व इथे अन इथेच आयुष्याच्या शेवटच्या क्षणांवर येऊन थांबणे होते…. यात गैर काहीच नाही… पण नेहमीच वाटते की हे तर सगळ्यांच्याच नशिबी आहे.. जरी कितीही नाकारले किंवा कितीही धुडकावले तरी माझे प्रश्न माझेच राहणार, माझा संसार, माझे कर्तृत्व याचा बोझा मलाच वहावा लागणार.. त्यापासून काही सुटका नाही… मग वाटते की हे अशा धोपटमार्गावर जगायचे म्हणजे खरेच योग्य आहे का? की आपल्या वर्तुळाच्या परिघाबाहेरील एखादे उद्दिष्ट जगण्याचा उद्देश करुन घ्यावे अन जगणे सफल करावे… माहीत नाही, नेहमीच हा पर्याय जास्त योग्य वाटतो अन नेहमीच नव्याने स्वीकारला जातो वा डोक्यात भिनला जातो… अगदी लहानपणापासून या मतामध्ये कुठेही फरक नाही पडला… ना शिक्षणाची पूर्तता करताना फरक पडला ना जगातील वेगवेगळ्या ठिकाणी गेल्या काही वर्षामध्ये काम करताना फरक पडला… ना जगातील वेगवेगळ्या भाषिक लोकांशी बोलताना वा त्यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध जपताना जोपासताना फरक पडला…  उलट यामुळे एक वेगळाच विश्वास मनात भरीस होता.. कितीतरी लोकांमध्ये हा विश्वास मी पाहीला व त्यांना तो जगताना पाहीला… आपल्या देशामध्ये या जगण्याला जिथे दुर्मिळतेचे लेबल आहे तिथे कितीतरी देशांमध्ये याला वेगळं असं काही स्थान नाही कारण तो त्यांच्या जगण्याचाच भाग आहे… अगदी नायजेरीया, लिबया, आयर्लंड, दक्षिण आफ्रिका, रशिया, कझाकिस्तान, चीन, इंडोनेशिया, मलेशिया, अमेरिका, इंग्लंड (इथे मुद्दाम आखाती देशांचा उल्लेख केला नाही) अशा कितीतरी देशातील नागरिकांशी बोलणे झाले पण बहुसंख्य वेळाला या सुजाण लोकांकडे एक उद्देश असतो म्हणजे असतोच! आपल्या भारतीयांबद्दल कुठेही टीका करण्याचा हेतू नाही पण बर्‍याचदा आपल्या तरूणांना हा प्रश्न विचारल्यानंतर त्यांच्याकडे उत्तर नसते… का ते माहीत नाही… खासकरुन मुलींमध्ये तर ही ‘मूकता’ जास्त बोलकी असते.. एवढ्या शिक्षणानंतरसुद्धा जगण्याचा काहीच क्रम न ठरवता येणे याला काय म्हणायचे.. आपल्या शैक्षणिक पद्धतीचे अपयश की आपल्या संगोपनात असलेली एक मोठी तूट??.. कळत नाही….

जगण्याचा एक उद्देश असेल तर मात्र नकळत एका वैश्विक तत्वाशी तुम्ही जोडला जाता.. एका वैश्विक भाषेमध्ये तुम्ही सार्‍या जगाशी बोलू शकता…  नुसतेच मी शिकलो, पहील्या नंबराने पास झालो, परदेशात शिकायला आलो, आता यानंतर इथे नोकरी करेन, लग्न करेन, पैसा मिळवेन, दुसर्‍या देशात जाईल, तिथे नोकरी करेन.. मग भारतात घर घेईन, मोठा बंगला बांधेन, आई-बापाला मजेत ठेवेन, त्यांचे पांग फेडेन, मुलांना मोठे करेल… ही असली जर उत्तरं डोक्यात असतील तर नवल नाही… पण दुर्दैव! यात कुठेही ‘उद्देश’ नसतो.. आयुष्याच्या पन्नाशीमध्येही जरी हा प्रश्न विचारला तरी उत्तरं ठरलेली असतात… घरी बसेन, पेंशन खाईन, नातवंडांना खेळवेन, हे करेन अन ते करेन… तेव्हासुद्धा काही वेगळे करेन हे उत्तर अशक्य! म्हणजे जेव्हा करण्याचे, तारुण्याचे दिवस होते तेव्हा केले नाही तर मग म्हातारपणात काय अपेक्षा ठेवावी! या जगातील एक घटक व्हायचे असेल तर मित्रांनो आयुष्याला आकार द्या…. विचार करून मार्ग निवडा… प्रत्येक मार्गावर उन्नती आहे.. डोळे झाकुन ग्लोबलायझेशनच्या लाटेवर झोकून देण्यापेक्षा नवी लाट आणण्याचा प्रयत्न करा… वेगळा उद्देश म्हणजे नक्की काय? हा प्रश्न सहाजिक आहे… तो काहीही असू शकतो… कुणाला देशासाठी काहीतरी करावेसे वाटेल, कुणाला मानवजातीसाठी काही करावेसे वाटेल, कुणाला एखाद्या खेड्यासाठी काही करावेसे वाटेल, कुणाला निसर्गासाठी काही करावेसे वाटेल, कुणाला राजकारणासाठी काही करावेसे वाटेल, कुणाला वातावरणातील बदलांसाठी काही करावेसे वाटेल, कुणाला समाजातील दुर्लक्षितांसाठी काही करावेसे वाटेल, कुणाला प्राण्यांसाठी काही करावेसे वाटेल…. यातले किंवा यापलिकडे बरेचसे पर्याय आहेत… अन नवीन पर्याय स्थापित करणारे जर आपल्यातील कुणी असतील तर त्यासारखे सुदैव नाही! नेहमीच्या आयुष्याला नाकारता येत नाही पण फक्त तेवढेच स्वीकारुन जगण्याच्या वैश्विक वरदानाला नाकरणे चुकीचे नाही का? मला जमत नाही, जमणार नाही, माझ्या शक्यतेपलिकडे आहे, उगीच यामध्ये का पडा? या असल्या गोष्टिंचे विटाळ आता काळाच्या अंधार्‍या खाईत कायमचे झुगारुन द्या… जगण्याला अर्थ द्या.. जगता जगता स्वतः अर्थ होऊन जा.. येणार्‍या पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल असा जीवनपट मांडून जा…

कितीदा तरी स्वतःला अशा परीस्थितीमध्ये पहात असतो जेव्हा जगण्यापेक्षाही फक्त श्वास घेणं चालू असतं…. जिवंत असूनही मृत भावनांचे ओघळ देहावरुन निथळताना मन भानावर नसतं…. जसं निष्पर्ण झाड एक खोड होऊन उभं असतं, जसं कुंकु पुसलेलं विधवेचं कपाळ कुंकवाचा सुगंध शोधत असतं, जत्रेनंतर उत्सवाच्या खुणा जसं एखादं मैदान जपत असतं  तसंच काहीसं कधी कधी तुमचं आमचं झालेलं असतं…. जेव्हा परिस्थितीवर सारं सोडलेलं असतं, वार्‍यावरचं जगणं स्वीकारलेलं असतं….. गेलेल्या क्षणापाशी कुठेतरी मन अडखळलेलं असतं…. भूतकाळाच्या दोरखंडात वर्तमानाला बांधून भविष्यासाठी उत्तर नसतं तेव्हा हतबलतेच्या जगात आपले आगमन झालेलं असतं… अंधार सगळीकडेच असतो.. अगदी निमिषाच्या अंतरावर तर तो असतो.. फक्त पापण्या मिटल्या की अंधारच अंधार…. गेल्या दोन दिवसात या अशा घटनांचा बेबंद वावर माझ्या आसपास होता.. पण त्याचवेळेला प्रत्येक क्षणी आयुष्यभर जपलेला जगण्याचा उद्देश आठवून देण्याचे काम माझ्या पत्नीने व त्या भगवंताच्या नित्य स्मरणाने केले… पूर येतात, दुष्काळ येतात, भूकंप येतात जगण्यापासून भरकटवणारे कितीतरी महाभयंकर अघोरी विचारही मनपटलावर येतात… या सगळ्यातून उभे करते ती त्या वैश्विक मूलतत्वाशी असलेली आपली एकरुपता… सृष्टीतील सृजन शक्तीबरोबर जर आपले संधान असेल तर मग कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्यापेक्षा जास्त आपली काळजी घेतली जाते.. हे अनुभवणे वा ही प्रचिती घेणे यासारखे दुसरे सुख या भूतलावर नाही! फक्त त्यासाठी लागते ती त्या वैश्विक सृजनशक्तीशी गट्टी, बाकी काही नाही!