जोनाथन लिविंगस्टन सीगल
ऑगस्ट 21, 2009 १ प्रतिक्रिया
पुस्तक: जोनाथन लिविंगस्टन सीगल (Jonathan Livingston Seagull)
लेखक: Richard Bach
पुस्तक हातात घेताना काहीतरी चांगले वाचायला मिळेल.. तेवढाच काय तो विरंगुळा होईल अशी काहीशी अपेक्षा…… पण सरतेशेवटी आजतागायत केलेल्या विरंगुळ्यासाठी स्वतःचाच राग येऊ लागला होता… अन कदाचित इथून पुढच्या विरंगुळ्यासाठी काहीतरी दिशा मिळाली होती…. तीही एका समुद्रपक्षाकडून….
एका अशा समुद्र पक्षाची कहाणी..ज्याला आपल्या जगण्याचा खरा अर्थ उमगला होता.. आपण इथे असण्याचा खरा उद्देश गवसला होता.
ज्याप्रमाणे इतर पक्षी दिवसभर समुद्रावर घिरट्या घालुन बोटीवरील मासे एकमेकांकडून हिसकावत अन भांडत खात असतात अन त्याच्यातच आयुष्याची व्याप्ती संपवून टाकतात अन फक्त तेवढ्या एकाच कामासाठीच आपल्या पंखातील बळ वापरत असतात…. या एका पक्षाने ठरवलं होतं की खाण्यापेक्षाही खरं सुख कशात आहे तर ते आहे उडण्यात..या दैवी देणगीचं त्याने चीज करायचं ठरवलेलं असतं अन आकाशाशी नवीन नाते जुळवायचं हे नक्की केलेले असतं…सारी बंधनं झुगारुन उडायचं अन फक्त उडायचं ठरवलेलं असतं… त्याला वेड होतं वेगाचं.. आकाशात उंच उंच जाउन पुन्हा त्याच वेगाने समुद्राकडे झेपावत वार्याच्या वेगाला मागे टाकायचं होतं अन तो ते लिलया जमवतोही….
जर गरज ही शोधाची जननी आहे तर अस्तित्वाचा ध्यास, तडफड, स्वतःचा शोध, या क्षणी इथे असण्याचं प्रयोजन असे सारे प्रश्न गरज उत्पन्न करण्याची साधनं आहेत… ही गरज़ सगळ्यांना जाणवतेच असे नाही पण ज्याला जाणवते त्याला तो शोध घेताना सगळ्यांचे असणे भासत नाही.. पहायला गेलं तर वेड आहे न पाहिलेलं स्वप्न शोधण्याचं…. अन ते शोधून पूर्ण करण्याचं… बोटांच्या चिमटीतून एक डोळा झाकून आकाश पकडण्याचं….. एकरुपता अशीच हवी…तरच आकाशाला आवाहन देता येतं त्याच्याच सावलीत राहून… त्याच्याच सावलीत राहून त्यातल्याच आपल्याला शोधता येतं…. निसर्गाने दोन ठिसुळ ढगांच्यामध्ये लपवलेली विज्ञानी कोडी उलगडता येतात… नवीन विज्ञान तयार होते… अन झेप अशी घ्यावी.. पुन्हा पुन्हा घ्यावी की प्रत्येकवेळा पडल्यानंतर उभारण्याचा त्वेष द्विगुणित व्हावा… हा समुद्रपक्षी नेमकं हेच सारं शिकवून जातो…
आपल्यासमोर आपल्याला गर्दीतून ओढून नेऊन आकाशात उडण्याइतकं हलकं करुन जातो… अगदी आपल्यातील नकारात्मकतेचंही उर्जेत रुपांतर होऊन त्या आकाशयानाप्रमाणे आपण ती उडण्यासाठी वापरावी अशी बाजू दाखवून जातो… इथे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच वाक्य सांगावसं वाटतं.. ते म्हणजे.. “स्वप्न ते नाही जे तुम्हाला गाढ झोपेत दिसते.. स्वप्न ते जे तुम्हाला कधीच स्वस्थ झोपू देत नाही.”
अन जिथे ध्यास अन अशी गगनभेदी भरारी घेण्याची उर्मी असेल त्याला नक्कीच ‘तो’ साथ देतो.. म्हणजे दिशा दाखविणारा ‘सदगुरु’ लाभतो.. या समुद्रपक्षालाही असाच सदगुरु भेटतो जो त्याला त्याचीच नवी रुपं दाखवून जातो.. नवीन तपस्या नवीन स्वप्नं दाखवून जातो… अगदी ज्याप्रमाणे आपणा मानवालाही सदगुरुची गरज असते… कष्टांना योग्य दिशा देण्यासाठी किंवा योग्य दिशेकडे सुसाट सुटताना सकारत्मकतेची वा धैर्याची जाणीव करुन देण्यासाठी… आपल्या अंतरंगातील अधिष्ठानाची अनुभूती करुन देण्यासाठी…
अन अशी प्राप्ती झालेल्या समुद्रपक्षाला वेड लागते ते त्याच्यासारख्याच ध्येयवेड्या समुद्रपक्षांना योग्य मार्गदर्शन देण्याचं… असंच थव्यांनी वाळीत टाकलेल्या.. अन्नापेक्षाही स्वतःला शोधण्यात धन्य मानणार्यांना एकत्र सांधण्याचं… निर्लोभित होऊन मुक्त हस्ताने ज्ञान वाटून पूर्णत्वाकडे जाण्याचा हा मर्ग तो समुद्रपक्षी स्वीकारतो, अंगीकारतो…
कधी दुरुनही त्याची फडफड न ऐकलेल्या मला त्याच्यातील सदगुणांचा हा ओथंबलेला महासागर किंचीत लाजवून गेला… किंचीत म्हणणेही माझ्या मनुष्यस्वभावानुसारच, हे मी मात्र मान्य करतो… ज्याच्याकडे एका एका थेंबाची वाणवा त्याला हा महासागर किंचित तो कसा वाटू शकेल??
पण नक्कीच हा समुद्रपक्षी माझ्यातल्या न सापडलेल्या मला शोधण्यासाठी प्रवृत्त करुन गेला होता…
हे पुस्तक वाचल्यानंतर मला सुचलेला हा ’आकाशयात्री’.
http://www.orkut.com/AlbumZoom.aspx?uid=1907683316489248566&pid=39&aid=1
– १९ फेब्रुवारी २००८
प्रतिक्रिया