एकनाथजी आणि अध्यात्मिकता
सप्टेंबर 7, 2009 १ प्रतिक्रिया
(श्री एकनाथजी रानडे (१९१४-१९८२) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, कन्याकुमारी येथील विवेकानंदांचे स्मारक बांधण्यात पुढाकार घेऊन सर्वसंमतीने सहा वर्षांच्या विक्रमी कालावधीत स्मारक बांधुन पुर्ण केले… विवेकानंद केंद्राची स्थापना करून तरुणांपर्यंत स्वामीजींचे काम व संदेश पोहचविण्यासाठी चळवळ उभी केली… )
मूळ लेखक: बी. निवेदिता
अनुवाद: निलेश सकपाळ
स्वामी विवेकानंदांनी ‘व्यवहारिक वेदांत’ हा सिध्दांत मांडला. स्वामी रंगनाथानंदजी, प्रा. कपिला चटर्जी सारख्या मान्यवरांनाही पटले की एकनाथजींनी स्वामी विवेकानंदांना अपेक्षित असलेला भावार्थ उमगून तो कृतीत आणला. एकनाथजींनी ’विवेकानंद केंद्र’ या संस्थेची स्थापना केली व यास त्यांनी अध्यात्मिकतेतून रुजवलेली सेवा चळवळ असे संबोधले आहे. श्री गुरुजींची अध्यात्मिक बैठक एकनाथजींनी पुढे चालू ठेवली असेही काहींचे म्हणणे आहे. या सर्व पार्श्वभूमीचा विचार करता एकनाथजींच्या जीवनामध्ये असलेला अध्यात्मिक दृष्टीकोन जाणणे हे आपल्या ज्ञानकोषात भर घलणारे व प्रोत्साहनपर असेल. किंवा असेही म्हणता येईल की, खरी अध्यात्मिकता ही नेहमीच परखड, उर्जामय आणि प्रवाही असते जशी ती एकनाथजींच्या चरित्रात दिसून येते.
दुर्दैवाने, ब-याच आक्रमणांमुळे, परदेशी अन यवनांच्या चढाईंमुळे ब्रिटीश कालखंडात भारताची सर्व बाजूने हानी झाली. भारतासारख्या अध्यात्मिक देशाने अध्यात्मातील मूळ अर्थ गमावला. अध्यात्माला डागाळलेल्या व शक्य तितक्या सर्व चुकीच्या पद्धतीने देशात सर्वत्र पसरविले गेले; मग एकतर ती असामान्य बुद्धिमत्ता असो वा नित्यनैमित्तिक कर्म अन कर्तव्यापासूनची पराङ्मुखता, मानसिक अकार्यक्षमता, किंवा फक्त बाह्यजगाशी ठेवलेली झापडबंद निष्ठा. अध्यात्मिक देशात आज अध्यात्म हे भोंदू लोकांच्या पोटापाण्याचे सुरक्षित साधन बनलेय ही खेदाची गोष्ट आहे.
असामान्य बुद्धिमत्ता किंवा पळपुटेपणा हा आपल्या खांद्यावरील जबाबदारी झटकण्यासाठी असतो, सभोवतालच्या लोकांशी सौजन्याने मिसळून राहण्यासाठी नसतोच. आपल्याच कौटुंबिक कर्तव्यापासून पळणे किंवा समाजाबद्दल, राष्ट्राबद्दल काहीच तमा न बाळगणे अशा प्रकारातून ही प्रवृत्ती समोर येते आणि त्याचवेळेला ‘सर्वकाही ईश्वरेच्छेप्रमाणेच होईल’ या संस्कृतीचा उदो उदो होताना दिसतो. बरीच माणसे स्वतःच्या दुरावस्थेला व आजुबाजुच्या नैराश्यदर्शक भौतिकतेला आपली स्वयंघोषित अध्यात्मिकता मानतात. समाजामध्ये बहुतेक वेळा लोक कुजबुजतात की ‘अमका तमका खूपच अध्यात्मिक आहे. तो कधीच केसाला तेल किंवा फणी लावत नाही किंवा साधी चप्पलसुद्धा वापरत नाही, नेहमी अजागळ वस्त्र वापरतो.’ वगैरे. यामध्ये अध्यात्मिकता कुठे आहे? एकनाथजींनी नेहमीच या गोष्टीवर भर दिला की जर आपण चांगल्या विचारांचा प्रसार करणार असू तर आपण टापटीप राहिलेच पाहिजे. अगदी झगझगीत व दिखाऊ नाही, तर नीटनेटके वस्त्र परिधान केले पाहिजे. अध्यात्मिकता ही सभोवतालाप्रती आपल्याला असलेलेल्या आदर व काळजीतूनही प्रदर्शित होते.
काही विद्वान तत्वज्ञ म्हणतात ‘काय करावे, कर्म देते आणि दैव नेते’ (What to do man proposes and GOD disposes). एकनाथजींना हे वचन कधीच पटले नाही. हे वचन उलट्या पद्धतीने बरोबर आहे असे सांगून एकनाथजी कार्यकर्त्यांसाठी संपूर्ण तासाभराचा वर्ग घेत व अडचणीतून खंबीरपणे उभे न राहिल्यामुळेच “दैव देते आणि कर्म नेते” हे समजावून सांगत. त्यांनी नेहमीच ‘अडचणी या मनुष्यासाठी असलेली नामी संधी असतात’ यावर भर दिला. हेच त्यांनी दोन ओळीत केंद्राच्या प्रार्थनेमध्ये सुस्पष्ट केले. ‘इह जगती सदा नाट्यग सेवात्मबोधै भवतु विहता विघ्न ध्येय मार्गानुयात्रा.’ त्याग, सेवा आणि आत्मबोध (त्याग- ‘मी’पासून मुक्ती, सेवा- आपण ईश्वरप्रणित आहोत असे मानून मनोभावे कर्तव्यांची पूर्तता करणे आणि आत्मबोध- देहबुध्दीच्या भावनेतून बाहेर पडून मीही या परब्रह्माचा अंश आहे अन तेच परब्रह्म प्रत्येक चराचरात आहे ह्याची अनुभूती). या तत्वांना प्रत्यक्षात आणल्यामुळे आपण अडचणींना सुवर्णसंधीमध्ये परावर्तीत करू शकतो. त्यांच्यासाठी अध्यात्मिक पुरुष म्हणजे- ज्या पुरुषाला अंतरीच्या परब्रह्माचा आत्मबोध झाला आहे तो अडचणींपासून पळून न जाता त्यांना सामोरे जातो कारण त्याला स्वतःवर विश्वास असतो, त्या अडचणींवर मात करण्यासाठी आवश्यक अशी आत्मशक्ती त्याच्याकडे असते. एकनाथजींनी स्वतः कधीच संकट व समस्यांपासून पळ नाही काढला, विवेकानंद स्मारकाची बांधणी, १९५० मध्ये उत्तर-पूर्व भारतात आलेला महापूर यातून त्यांनी पूर्ण तयारीनिशी व काळजीपूर्वक यशस्वीरीत्या मार्ग काढत या अडचणींना सुवर्णसंधी म्हणून सिद्ध केले.
एक सच्चा अध्यात्मिक पुरुष हा नेहमीच उत्साही असतो आणि तो कधीच उदास व स्वप्नाळू माणसांप्रमाणे दिवसा आकाशातील चांदण्या मोजत बसत नाही. श्रीकृष्ण, श्रीराम, आदि शंकराचार्य, शिवाजी महाराज, श्रीमंत शंकरदेव आणि स्वामी विवेकानंद असे अनेक दिग्गज अखंड अविरत झिजले, त्यांनी व्यक्तिगतच नाही तर सामाजिक व राष्ट्र-उभारणीतील प्रत्येक आव्हानाला समर्थपणे तोंड दिले. एकनाथजींनीदेखील ह्याच मार्गाचा स्वीकार केला. त्यांची अध्यात्मिकता नेहमीच त्यांच्या वागण्यातून व्यक्त झाली. अध्यात्मिकता कधीच माणसाला त्याच्या सभोवतालपासून वेगळे करीत नाही तर त्याला त्याच्या अवतीभवतीचे वातावरण व परिस्थिती ईश्वरी इच्छेप्रमाणे अनुकूल करण्यास सक्षम करते, परावृत्त करते.
भगवद्गीतेमध्येही अध्यात्मिक पुरुषाची व्याख्या स्पष्ट करताना म्हटले आहे ‘नित्यतृप्तो निराश्रय:’ – नित्य समाधानी आणि कशावरही अवलंबून नसलेला. ह्याचा गर्भितार्थ हेच सांगतो की आपल्या अंतरी असलेल्या परमसुखाच्या व शक्तीच्या अविश्रांत उर्जास्त्रोताशी संलग्न होणे. स्वकृत्याची व स्व-अधोगतीची जबाबदारी टाळून तीर्थक्षेत्राच्या नावामागे किंवा कर्मकांडांमागे स्वतःला लपविणारे स्वयंघोषित अध्यात्मिक बाबा आपण बरेच पाहतो. काही लोकांना स्वकृत्याची व अंधारमयी भविष्याची जबाबदारी स्वीकारायला लाज वाटते. यामुळेच त्यांना ही ‘सुरक्षितता’ कुठेतरी शोधायची निकड जाणवते. म्हणूनच सातत्याने त्यांना कोणीतरी त्यांचे म्हणणे ऐकावे, किंवा त्यांची काळजी करावी असे वाटत असते. याचकरणाने काही लोकांना नेहमी इतरांशी मोबाईलवरुन बोलत रहावेसे वाटते. आणि जर फोन आला नाही तर त्यांच्यात दुर्लक्षिततेची भावना जागृत होते. काही लोक सारखी नव्या नव्या गोष्टींची खरेदी करत सुटतात ज्यातून त्यांना समाजात त्यांची पत राखली जावी असे वाटत असते. परंतु कुठलाच मनुष्य किंवा भौतिक गोष्टी कायमस्वरुपी तो आनंद देऊ शकत नाहीत. चिरकाल आनंद वा समाधान हे या तात्पुरत्या गोष्टींतून शक्य नाही.
खरेतर, धावपळ अन धकाधकीच्या आयुष्यात, क्षमतेपलिकडील कामात किंवा मदतहीन अवस्थेत असतानाच बाह्यजगातील व्यक्ती वा गोष्टींमध्ये सुख शोधण्यापेक्षा त्या आपल्या अंतरीच्या चैतन्यमयी उर्जास्त्रोताची कास धरायची असते. याचेच एकनाथजींनी आजीवन पालन केले आणि कार्यकर्त्यांनाही यासाठी मार्गदर्शन केले. “Sadhana of Service” यात ते म्हणतात,”All other help may fail, but there is a power within you which will never let you down. It is your own Self. Depend on it and march ahead with unceasing prayer to God to give you strength to fulfill His will” याचा अर्थ,” मदतीसाठीचे सगळे बाह्यमार्ग बंद होतील, पण तुमच्याकडे जी आंतरीक शक्ती आहे ती तुम्हाला कधीच फसवणार नाही. ती शक्ती तुम्ही स्वतःच आहात. यावर पूर्ण विश्वास ठेवून पुढील मार्ग पादाक्रांत करा, त्या परब्रह्माची अखंड प्रार्थना करा तो तुम्हाला त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी शक्ती प्रदान करेल.
अध्यात्माच्या या मार्गात बहुतांश वेळा भोंदूगिरीसुद्धा आढळते. माणसाने कितीही आपल्याकडे ‘मी’ नसल्याचे सांगितले तरीही तो तिथेच त्याच्याकडेच असतो हेही तितकेच खरे. उदाहरणार्थ, काही म्हणतात ‘मला आता नाव आणि प्रसिध्दी नको’ पण तरीही त्यांची त्या नावावर मालकीहक्क सांगण्याची सवय किंवा प्रसिध्दीची हाव काही जात नाही. जर त्यांच्या तथाकथित भक्तगणांपैकी कोणी दुस-या व्यक्तीचा आदर व मान ठेवायला सुरुवात केली तर त्यांना खटकते. परंतु एकनाथजींच्या जीवनामध्ये त्यांचे नाव कुठेच कोणत्याही स्मारकावर कोरले गेले नाही किंवा उद्घाटन कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरही छापले नाही यातून हेच कळते की त्यांची विनयता ही फसवी नव्हती तर पूर्ण प्रामाणिक होती. जेव्हा जहाजसेवा शासनाकडे सुपूर्त करण्याची वेळ आली तेव्हाही ते तेवढेच निश्चल राहून इतर कामगारांचे सांत्वन करीत होते.
काही लोक अध्यात्माच्या नावाखाली संपूर्ण संस्थेचा/समितीचा सर्वसमावेशक उद्देश धुडकावताना सांगतात, ‘हे माझे तत्व आहे, मी शब्द दिला आहे तर मी हे केलेच पाहिजे’ किंवा ‘मी कोणाला कसे काय दुखवू शकतो आणि शिवाय जर मी त्याने दिलेल्या सूचनांचे पालन केले नाही तर तो माझ्याबद्दल काय विचार करेल?’ किंवा ‘मला इतरांना दुखवायचा काय हक्क आहे किंवा इतरांना दुखवणे हे पाप आहे’ वगैरे वगैरे. संक्षिप्तपणे, अध्यात्माच्या नावाखाली तत्वांची पायमल्ली होतेच पण एखाद्याचा पळपुटेपणा किंवा अकार्यक्षमता किंवा खडतर कष्ट न करण्याची इच्छा झाकण्यासाठीही याचा दुरुपयोग केला जातो. एकनाथजींचा जीवनपट पाहताना नक्कीच थक्क व्हायला होते, त्यांनी कधीच संस्थेच्या उद्देशासाठी तत्वांची तडजोड नाही केली तरीही सर्व स्तरातील लोकांशी त्यांनी सौहार्दाचे संबंध राखले होते. त्यांचा प्रबळ विश्वास होता की जर आपला हेतू सात्विक असेल तर मग थेट हृदयाचा हृदयाशी संवाद साधून नेहमीच सर्वांबरोबर समान धरतीवर काम करता येते. ज्यासाठी ते झटत होते त्या राष्ट्र-उभारणीच्या कार्यात सहभागी होण्यासाठी ते कुणालाही तयार करू शकत होते. हीच खरी अध्यात्मिक शक्ती आहे जिच्यामुळे तुम्ही कुणाबरोबरही तत्वांशी तडजोड न करता काम करू शकता. त्यांनी संस्था आणि राष्ट्रहित कधीही न डावलता सा-या लोकांना एकत्र आणले होते. हीच खरी अध्यात्मिक शक्ती आणि अध्यात्मिक कार्य आणि यांनीच शेवटी त्यांना अजातशत्रू बनविले. ते जर कधी सत्याच्या शोधात स्वतःला अजातशत्रू बनविण्यासाठी भटकले असते तर तो स्वार्थीपणा ठरला असता अन ते करीत असलेल्या कार्याच्या मूळ उद्देशाची फसवणूक.
एकनाथजींसाठी अध्यात्मिकता म्हणजे वर्तमानात जगताना उंच महत्वाकांक्षा व नीतीमुल्ये बाळगणे. जरी कुणीही त्यांना कितीही दुखावले असले तरीसुध्दा त्यांच्या मनात कधीच कुणाबद्दल द्वेष नव्हता. जेव्हा ख्रिश्चनांनी विवेकानंद स्मारक बांधणीस विरोध केला तेव्हा त्यांनी कुणालाही ‘ख्रिश्चनांनी विरोध केला’ असे म्हणू दिले नाही. पण त्यांनी कधीही सत्याशी तडजोड केली नाही. ते स्वतः तर म्हणायचेच पण त्यांनी विवेकानंद स्मारक समितीस हे म्हणण्यास भाग पाडले की ‘ख्रिश्चन समुदायातील एका वर्गाने स्मारकास विरोध केला’. असे नव्हते की त्यांना मंदिरांबद्दल आदर नव्हता तर त्यांनी माणसातल्या देवत्वाची भक्ती केली. कधीच त्यांनी शाखा बुडविली नाही किंवा लोकांचा संपर्क कमी केला नाही तर त्यांनी त्यांचा कार्यप्रसार काश्मीर व अरुणाचल प्रदेशापर्यंत पोहचविला.
ख्रिस्ती मिशन-यांनी तयार केलेल्या ‘सेवा’ या सापळ्यात एकनाथजी अडकले नाहीत, ज्यात लोकांच्या गरिबीचा, आजारीपणाचा व भोळेपणाचा गैरफायदा घेऊन धर्मांतराची मूळ उद्देशप्राप्ती किंवा तथाकथित ‘सेवा’ केली जाते. एकनाथजींनी अशा सेवेला ‘व्यापार’ म्हणून संबोधले. सेवेमुळे मनुष्यातील ईश्वरी अंशाची अनुभूती करून देणे हीच त्या मनुष्याप्रती केलेली खरी सेवा होय. परंतु एकनाथजींच्यामते सेवेचा सर्वोच्च भाग म्हणजे भेदभावविरहीत समाजाची उभारणी करणे. म्हणूनच त्यांनी केंद्र कार्यकर्त्यांना सांगितले होते, “जरी आपण केवळ सेवा हा उद्देश असलेली संस्था असू, तरी आपल्याला देवाकडे वादळ, पूर, दुष्काळ आणि अपघात यासाठीही प्रार्थना करायला हवी जेणेकरून आपल्याला सेवेची संधी प्राप्त होईल. अध्यात्म-दृष्टीने केलेल्या सेवेमुळे ‘मनुष्य-निर्माण’ होते जे प्रत्यक्षरित्या राष्ट्र उभारणीच्या कार्याशी निगडीत आहे.” केवळ अध्यात्मिक माणूस जो सर्वत्र परब्रह्म पहातो तो एकटाच असा सखोल व व्यापक दृष्टीकोनातून विचार करू शकतो. हीच आपल्या राष्ट्राची परंपरा राहिली आहे. एकनाथजींनी हा सर्वसमावेशक उद्देश ओळखून अशा प्रकारे सर्वांसमोर ठेवला की त्यामुळेच त्यांच्या कार्याला सर्वबाजुंनी मदत मिळाली. आध्यात्मिक पुरुष कधीच इतरांच्या कमजोरी गोंजारत नाही तर त्यांच्यातील सद्गुण सर्वोत्कृष्ट रित्या समोर आणतो.
एकनाथजींना ‘आज आणि आत्ता’ यामधे असलेल्या शक्तीचे संवर्धन कसे करायचे हे माहीत होते. कुणी कधीच हे नाही म्हणू शकणार की त्यांनी त्यांच्या कामात कुचराई केली. म्हणूनच त्यांच्यासाठी काहीच अशक्य नव्हते. ते कधीच इतरांची किंवा हतबल परिस्थितीची तक्रार करताना दिसले नाहीत. अपेक्षित निकाल मिळेपर्यंत ते पूर्ण ताकदीने लढत असत आणि जर त्यावेळेला निकाल नाही मिळाला तर ते फक्त हसत आणि मार्गक्रमण करत. सहनशीलता, कटिबध्दता आणि सात्विकता अंगी असलेल्या पुरुषाचा अंतिम विजय हा निश्चितच असतो. वार्याप्रमाणे चंचल असल्याने ते कधीच भोवतालच्या घटनांमध्ये वा व्यक्तींमध्ये वा मतांमध्ये वा पराभवातही अडकून राहिले नाहीत. खरी अध्यात्मिकता ही कृतीतून आणि यशोगाथेतून कशा प्रकारे व्यक्त होते हे जाणून घेण्यासाठी एकनाथजींच्या चरित्राचा अधिकाधिक अभ्यास करणेच यथार्थ ठरते.
(प्रकाशित लेख)
प्रतिक्रिया