“तुतारी”

वळणांची वाट गरगरणारी,
फिरुनी येते पुन्हा माघारी
नजर वेंधळी घुटमळणारी,
… सुरुवातीचे ते कौतुक भारी!

आत डोकवा, येते शिसारी,
घाटाघाटांची गम्मत न्यारी!
कधी झटका, मध्येच उभारी,
चांदण्यानीच थाटली पथारी!

हुंदक्यांची ती भाषा बिलोरी,
काळजांच्या आरपार कट्यारी!
सोबतीचे जाम, आठवांची यारी,
जणू,जिभेवर चिंच विरघळणारी!

मदमस्त कलंदर तो पुकारी,
कोण नाचती नी, कोण मदारी?
कुठले आप हे? कुठले शेजारी,
भाव द्या चेहर्‍याला, व्हा रंगारी!

झटावे नशिबाने रोजच बाजारी,
म्हणे नशिब तुझे देशील उधारी?
बुरुजावरुनी वाजू द्या तुतारी,
येता आम्ही, कफल्लक भिकारी!

-निलेश सकपाळ, २० फ़ेब्रुवारी, २०१३

दैनंदिनी ०१ जुलै २०२१

एखादा झोका अनाहुतपणे लक्षात राहतो, ज्या झोक्याबरोबर काळजाचा थरकाप उडाला होता, अस्तित्वाच्या ठिकर्‍या उधळल्या जाऊन सार्‍या भुतकाळाची उजळणी झाली होती, भविष्याबद्दल साशंकता निर्माण झाली होती… कधीतरी निसरड्या वाटेवरुन भक्कम वाटणारा आधाराचा दगड मामुली पापुद्र्याप्रमाणे हातात आला असेल अन ब्रम्हांड आठवले असेल… रस्ता ओलांडताना नखभर अंतरावरुन भरधाव एखादे वाहन आपल्या नकळत आपली वाट कापुन गेल्यानंतर समोर येणारा नजरपट.. एखादी उचकी लागल्यानंतर अडकलेला श्वास जर सुटता सुटत नसेल, हातांची होणारी फडफड कोणापर्यंत पोहचविण्यास असलेली असमर्थता त्या श्वासाचे मोल सांगुन जाते.. तो एक श्वास वजा करुन पुढचे श्वासांचे मोल फक्त आणि फक्त शून्यच!

धापा टाकत जगणारे अन धावुन झाल्यावर धापा टाकत कापलेल्या अंतराचा आस्वाद घेणारे यामध्ये न सांगता येणारा फरक आहे.. स्वप्नांची राखरांगोळी करुन उबेला निवांत झोपणे अन झोपेची कुर्बानी देऊन स्वप्नांची गुढी उभारणारे यामध्ये असलेली विसंगतता जेव्हा अनुभवता येईल, खळबळ होऊन जेव्हा अंतरातील ढवळाढवळ मुर्त स्वरुपात पावलांना ढकलायला सुरुवात करेल तेव्हा आणि तेव्हाच त्या अनुभवलेल्या विसंगततेची खरी रुजवात होईल. किनार्‍यावरुन समुद्र अनुभवता येत नाही तर बिनधास्त खलाशाप्रमाणे जेव्हा आपली नौका त्या लाटांवर स्वार होते, ध्रुवाच्या आधाराने दिशाप्रवास सुरू होतो, ओळख झुगारुन जेव्हा नवं क्षितीज कपाळावरील आणि हातावरील नशिबाला आव्हान देऊ लागते कदाचित तेव्हा आणि तेव्हाच कदाचित समुद्रासारखा मैत्र उलगडू लागेल, बेभरोशाचे वाटणारे वादळ पंखांसारखे वाटू लागेल अन सारे मर्त्य, कुपमंडुक मानव लाटांप्रमाणे क्षणभंगुर वाटू लागतील… आपल्या अस्तित्वाची कदर जेव्हा खुद्द निसर्गालाच घ्यावी लागेल, आपल्यासाठी विशेष घटनांना जन्म द्यावा लागेल.. तेव्हा होणारा आनंद किंवा उन्माद काही औरच असेल!!

आनंदासाठी प्रयत्न करणे.. अन विहीत कर्म करताना आपल्या गळयात माळेप्रमाणे येऊन आनंद बागडणे हा स्वानुभव, स्वानंद कोणत्याही मिठाईपेक्षा सुमधुर, स्वर्गीय असेल यात काहीच शंका नाही… छोटे कुंपण, छोटे विचार अन छोटे स्वप्नं यामध्ये गुरफटुन आयुष्याची कितीतरी वाताहत झाली हे जर उमेद संपल्यावर कळले तर त्याचा काय उपयोग! नात्यांचे जंजाळ, अपेक्षांचे मायाजाळ जर आपलेच पंख छाटत असतील, आपल्याला पावलोपावली ठेचकाळत असतील तर काय करावे? प्रत्येक नाते सुगंधी असेल असे नाही.. अन प्रत्येक सुगंधी गोष्ट आपली होईलच असे नाही.. जे आहे त्याला नव्या आयामांची कल्हई देता आली तर ठीक नाही तर आपल्या स्वप्नांची, प्रयत्नांची झेप एवढी व्यापक हवी सगळे अनियमित ढोबळ जगणे प्रवाही होईल, प्रत्येकाला जगण्याचा उद्देश देईल.. आपण नाही तर आपल्या जगण्याचा पट दिपस्तंभ होईल!

आपल्या प्रामाणिक खस्ता वारीत चाललेल्या वारकर्‍यांप्रमाणे टाळ-चिपळीतील आर्त साद होऊन पांडुरंगाच्या त्या विधात्याचा चरणांशी आपल्याला मार्गस्थ करतील एवढे मात्र नक्की!!

-निलेश सकपाळ

आक्रोश चांदण्यांचा…

शांत होता भद्र किनारा,
त्यासोबत जळता तारा,
एक शेकोटी मरणानंतरची,
अन् लाट अनामिक आहोटीची…..

स्थित्यंतरे नवी क्षितिजावर,
बांधले घरटे पावसावर,
टोळकी भ्रामक त्या सत्याची,
त्यावर ही कल्हई गुपितांची……

आसक्तीची आलिशान मंदिरे,
उत्तुंग आभासी ती गोपुरे,
मग्न साधना युगांतरीची,
भूते ओशाळली वेशीवरची…..

आक्रोश वेगळा चांदण्यांचा,
मनावरुन ओघळणार्‍या भावनांचा,
गाठ अंतरी निद्रिस्त वादळांची,
अव्यक्त वाट ही अदृश्य पावलांची….
अव्यक्त वाट ही अदृश्य पावलांची….

–निलेश सकपाळ
२९ मार्च २०१५

अपेक्षांच्या किनार्‍यावरुन…

अपेक्षांच्या किनार्‍यावरुन…

उमेद जागवायची असेल तर आंतरिक उन्मादाशी नाते तोडून नाही चालत… भग्न मंदिराच्या भग्न अवशेषांमध्ये साठलेला दैवी अंश तेवढाच तेजस्वी अन चिरंतन असतो हेच जर नाही समजले तर भूतकाळाच्या जखमांमधून अन जल्लोषांमधून काळाच्या कपार्‍यांमधून पाझरणारी प्रेरणा काय गवसेल? रात्रीला सुरुवात मानायचे की रात्रीला शाश्वत सत्य मानून मिळालेल्या तोकड्या उजेडाला वरदान मानून कपाळावर फासायचे हेही कळले पाहिजे… एखादा रातकिडा जर रात्रीची चादर चोचीत ओढत नेऊन डोक्यात किर्रर्रर्रर्र करायला लागला तर काय करायचे याचेही उत्तर जाणिवेच्या तळाशी साठलेले पाहिजे… सारा उजेड जर अंधार गिळंकृत करुन चंद्राच्या एका ठिपक्यामध्ये साठला असेल वा कुणीतरी आकाशाचे झाकण बंद करुन फक्त उजेडाकडे जाण्यासाठी असलेले झाकण थोडेसे ऊघडे ठेवुन त्याला चंद्र नाव दिले नसेल कशावरुन?

नात्यांच्या जंजाळात चक्रव्यूहाप्रमाणे बाहेर न पडण्यासाठी अडकत जायचे का? नात्यांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली दुःखाच्या दलदलीमध्ये धसत जायचे का? प्रत्येक श्वासाबरोबर अपेक्षांची असंख्य रोपटी आपल्या अवतीभवती उपटसुंभासारखी किंवा नको असलेल्या अन आपल्याला माहीतही नसलेल्या असंख्य क्षुल्लक किड्यांप्रमाणे जन्माला येत असतात… कधी एखाद्या स्वप्नातून, कधी एखाद्या क्षणिक आनंदातून तर कधी एखाद्या छोट्याश्या कर्तव्यपूर्तीतून ही पिल्लावळ जन्माला येते अन एखाद्या बांडगुळाप्रमाणे आपल्याच रक्ताच्या थेंबाथेंबावर आपलेच गळे आवळण्यासाठी दिलखुलास एखाद्या वेलीप्रमाणे आपल्या अंगाखांद्यावर अदृश्य पकड घेऊ लागते… कधीही माहीत नसलेल्या वाटेचा माग हवाहवासा वाटतो तर एखाद्या क्रूर घटनेमधून पाशवी आनंदाचा एखादा पेला रिचवताना आपल्यातल्या दडून बसलेल्या राक्षसाशी आपली ओळख होऊ लागते…. असमंजसपणा वा समंजसपणा, संकुचितपणा वा व्यापकता, वैश्विकता वा कूपमंडुकता यातील फरक समजून घेणे निव्वळ फालतू अन निरर्थक वाटू लागते… द्विधा मनःस्थिती असलेली, वर्तमानाची भान नसलेली असंख्य जिवंत भूतं आपल्याला हातभराच्या अंतरावर घुटमळताना दिसतील… ती भूतं अन त्यांच्या हिशोबातील गोंधळापेक्षा जगाच्या तिरस्कृत वर्गामध्ये मोडणारे पण बेमतलब विचारांच्या झुल्यामध्ये अडकून न राहता त्याच विचारांनीच त्या झुल्याचा दोर कापलेले व निराशेत रुजलेले, वाढलेले आपले स्वरुप आपल्याला कांकणभर का होईना सरस वाटायला लागते… अपेक्षांची कुंपणं माणसाला हृदय पिळवटून त्यातील मदमस्त मोकळा श्वास या स्वतःतील अघोरी राक्षसांवर ओवाळून टाकायला भाग पाडतात… अपेक्षांच्या झाडांची सावली कधी जीवनातील उजेड पिऊन टाकायला सुरुवात करते हेही कळत नाही… ती वाढत जाते एका सावलीतून दुसर्‍या सावलीपर्यंत अन् दुसर्‍या सावली पासून तिसर्‍या, चवथ्या अन् तद्पश्चात आपल्या भ्रामक अस्तित्वाला आश्वासकपणे आणखी अपेक्षांमध्ये पिचलेल्यांना आकर्षित करण्यास सज्ज होते…. प्रवास नेहमीच सुरुवातीपासून शेवटाकडे असतो असं म्हणतात पण या अपेक्षांच्या जंगलातील प्रवास जिथून सुरु होतो तिथेच तो जिलेबीप्रमाणे स्वतःच्याच पोटात एखाद्या भोवर्‍याप्रमाणे शून्यात संपून जातो… जिथे संपतो त्याला शेवट म्हणता येणार नाही कारण कदाचित तिथेच कुठेतरी, आपल्याच अंतरी त्या अनुभूतीचं नवीन पर्व सुरु होत असावं!!

अपेक्षांना सौदा मान्य नसतो… त्या म्हंटलं तर निर्दयी अन म्हंटलं तर एखाद्या प्रेयसीप्रमाणे मोरपिशी असतात… नाती निर्व्याज असावीत असं कितीही वाटलं तरीही जशा दोन समांतर रेषा एकमेकींना अनंतात छेदतात त्याचप्रमाणे दोन माणसे कितीही स्वतंत्र असली तरीही एकमेकांना कुठेतरी, कधीतरी, कोणत्यातरी अपेक्षांमध्ये एकमेकांना छेदतात हे मात्र नक्की!! एकांताचा दरवळ कितीही आपलासा वाटला तरी कधीतरी तिथेच जीव घुसमटायला लागेल हेही सांगता येणार नाही! माणसाला स्वतःचे सारे रंग जेव्हा समोर सुस्पष्टपणे उमटलेले दिसायला लागतात व डोळ्यांमध्ये विषारी बाणांप्रमाणे खुपू लागतात तेव्हा म्हंटले तर स्वतःच्याच संगतीचा कंटाळा येतोच की! स्वतःच्याच स्वतःकडून अपेक्षा असणे चूक की बरोबर हे ठरवणे व्यक्तिसापेक्ष अन त्यावरील वादही निरर्थकच!

अपेक्षांचे असणे मान्य पण असूनही न जाणवणे अधिक महत्वाचे! अपेक्षांनी मनामध्ये उभारीसाठी रुंजी घातली पाहिजे… नकळत एकामागून एक ओघळणार्‍या अश्रुथेंबांची एकमेकांकडून अशी काय अपेक्षा असते… असते ते निर्धोकपणे उमटणार्‍या तरंगांच्या लहरींशी एकरुप होणे… अंतरातील संवेदनांना नव्या जाणिवेसाठी उद्धृत करणे.. नवे आयाम, नवी क्षितीजे, नव्या भावना अन नवे विश्व आपल्यामधूनच आकारताना बघताना अपेक्षांची फुलपाखरं अलगद या आनंदातील मधाने संतृप्त होऊन बागडताना बघणे म्हणजेच जगण्याचे सार्थक होय! नात्यांतील अंतरांचे साखळदंड असण्यापेक्षा आपापसात कसलाही संबंध नसतानाही एका लयीत विहार करणार्‍या त्या पाखरांप्रमाणे नात्यांमधील धागा असावा… कुणालाही न दिसणारा पण घट्ट एकमेकांना ओढीने बांधून ठेवणारा!!

– निलेश सकपाळ
२७ नोव्हेंबर २०१४

‘नजरप्रवासी’

अंगाअंगावर ओरखडे करणारी एखादी नजर आपल्याच घराच्या भिंतींमध्ये कुठेतरी नकळतपणे वास्तव्यास आहे असे वाटणेही भयानकच! रस्त्यावरुन येताना-जाताना कितीतरी नजरांची डबकी तुडवत जावं लागतं..कितीतरी नजरा अस्ताव्यस्त एखाद्या गटाराप्रमाणे अवतीभोवती दुर्गंधी पसरवत आपल्याकडे झेपावण्याचा प्रयत्न करत असतील कोण जाणे… काही नजरा त्या माश्या अन डासांप्रमाणे कितीतरी चांगल्या वाईट ठिकाणांवरुन आता आपल्या आसपास भणभण करण्याच्या प्रयासात असतील…. काही नजरा तर रस्त्यावरच सांडलेल्या दिसतील… त्या तशाच वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी एखाद्या असहाय्य वृद्धाप्रमाणे अश्वत्थाम्याचे नशीब घेऊन रेंगाळत असतील…. खरेच जर नजरांचे हे बाण दृश्य असते तर?? कोण कुठे केव्हा नजर फिरवत असताना त्या नजरांचे ठसे उमटत असते तर? नजरांची किती जाळी-जळमटं या भकास दुनियेत क्षणाक्षणाला अस्तित्वात आली असती कोण जाणे? एखाद्या सार्वजनिक ठिकाणी मग गर्दीतून नाही तर नजरांच्या या जाळ्यांतून वाट शोधावी लागली असती….एखादी नको असलेली नजर सहज हाताने उचलून दूर भिरकावता आली असती.. किंवा तशीच जिथून सुरुवात झाली त्याच खोबण्यांमध्ये नेऊन गाडता आली असती…. घरात येऊन सांडलेल्या अन गेलेल्यांच्या मागे राहिलेल्या भकास, लंपट नजरा कचर्‍यासारख्या झाडूच्या एकाच सराट्यासहीत दूर फेकता आल्या असत्या!

नजरांचे ठीक आहे पण त्याबरोबर ओघळणार्‍या भावनांचे काय? हा अनुत्तरीत प्रश्न त्या पातेल्याला चिकटलेल्या करपट दुधासारखा उरतोच!! नजरेमध्ये जेव्हा एखादी भावना मिसळली जाते तेव्हाच त्या नजरेची किंमत ठरते… भावना झिरपते ती त्या माणसाच्या असलेल्या मूळ स्वभावाच्या अंतरंगातून… त्याच्या असलेल्या उद्देशातून अन त्याच्या अव्यक्तपणाच्या डोहातील सुप्त इच्छांच्या तरंगातून… कुणाला मोठेपणाचे इमले बांधायला आवडते तर कधी कुणाला आपल्याला आरश्यासारख्या तत्सम साधनांशिवाय न दिसणार्‍या रुपाचे गलबत या वासनांच्या समुद्रात भिरकावून द्यायची इच्छा असते… तर कधी कुणाला अतोनात मेहनतीची झाक अन त्यातुन उद्भवणारा समाधानाचा श्वास चेहर्‍यावर बाळगायला आवडते… कधी कुणाला आपल्याला कधीही न जमलेल्या साहसांना दागिन्यांप्रमाणे अंगावर मिरवायला आवडते… तर कधी कुणाला दुसर्‍याला मिळणारे सुख अजीर्ण होऊन त्याला आकंठ दुःखाचे प्याले रीचवताना बघायला आवडते.. कुणाला अपयशाच्या जंगलात राहताना यशाचा स्वर्गीय सहवास उपभोगावासा वाटतो… कुणाला असंख्य अतृप्त इच्छांचे, वासनांचे उबदार स्वेटर अंगावर मिरवायला आवडते…. कुणाला सगळ्या जगाच्या नकळत कुणाचीतरी तेवढीच जवळची गोष्ट आपल्या काबूत करावीशी वाटते… अशा एक ना अनेक ओंडक्यांच्या सहार्‍याने कितीतरी माणसे आपल्या आजुबाजुला तरंगताना दिसतील… चिंध्यांची कितीही नालस्ती केली तरीसुद्धा त्याच्यातून टिकाऊ अन उबदार गोधडी नावारुपास येतेच.. पण या नजरांच्या ठिगळ्यांची जोडाजोड केल्यानंतर जे काही तयार होईल ते या मानवतेतील अमनवीयतेचा पाक असेल अन अगदी रांधलेल्या भातावरच्या फेसाप्रमाणे त्याला अलगद ब्रह्मांडामध्ये भिरकावून देता येईल…! असो ही देखील एक कल्पनाच.. एक नजरच!

नजर म्हणजे काय? याचे एक असे उत्तर मिळणे अवघडच… जर उघड्या डोळ्यांनी दिसणार्‍या अन व्यक्त होणार्‍या अविर्भावांना नजर म्हंटले तर मग डोळे बंद असताना उठणार्‍या तरंगाना काय म्हणायचे? स्वप्न हे नजरेची उत्पत्ती आहे की विचारांच्या मुळाशी त्याचा उगम आहे? भावनांची, विचारांची अन नजरेची जुगलबंदी आजची नाही… रावणाच्या नजरेतूनही ती दिसली… अहिल्येच्या नजरेतही ती होती अन वर्षानुवर्षे एखाद्या वृक्षाच्या सावलीप्रमाणे वाट पहाणार्‍या शबरीच्या नजरेतही ती होतीच… संतांच्या नजरेतही ती होती… थेट भगवंताला गळ घालण्याचे अजब आर्जव संतांच्या नजरेतून दिसले… एकीकडे पावित्र्याचा महोत्सव आहे नजर तर दुसरीकडे वासनेचा महापूर आहे नजर… एकीकडे विश्वाला बंधुत्वाची साद आहे नजर तर दुसरीकडे कोत्या दृष्टीकोनातून बाटलेली आहे नजर… एकीकडे दोन शिळ्या तुकड्यात संतृप्तीचा ढेकर आहे नजर तर दुसरीकडे हजारो पक्वानांमध्ये उपाशी उसासा आहे नजर… एकीकडे अस्ताव्यस्त महानगरांची लगीनघाई आहे नजर तर दुसरीकडे दुष्काळातील दुर्लक्षित जमिनीच्या भेगांमध्ये धसत जाणार्‍या जिवंत सापळ्यांची शोकांतिका आहे नजर… एकीकडे हिमालयाचा मानवी मानस आहे नजर तर दुसरीकडे सदैव आटत चाललेल्या माणुसकीच्या झर्‍याची शेवटची घरघर आहे नजर… एकीकडे महत्वाकांक्षेने आभाळाला ठेंगणे ठरविणारी आहे नजर तर दुसरीकडे वासनेच्या हव्यासापोटी वय, नाती बाटवणारा बट्टा आहे नजर…एकीकडे अध्यात्माचे सर्वांगसुंदर दालन आहे नजर तर दुसरीकडे अविश्वासाचे, विषयांचे, चंगळवादाचे घोंघावते वादळ आहे नजर… एकीकडे अशक्यतेच्या सिंहासनावरील शक्यतेचा मुकुटमणी आहे नजर तर दुसरीकडे नैराश्याच्या गर्तेतील व्यसनांचा संग आहे नजर….

नजर म्हंटले की कितीतरी नितांत सुंदर घटनांची नांदी समोर आल्याखेरीज राहत नाही.. नजरेला ना कधी भाषेचे बंधन आहे अन ना शब्दांचे, ना व्याकरणाचे अन ना ओळखीचे! दोन अनोळखी व्यक्तींमध्येही आयुष्यभरांचे बंध जुळवण्याचे अजब सामर्थ्य नजरेमध्येच आहे! आयुष्यातील प्रत्येक क्षणाला सुखदुःखांच्या पल्याड जाऊन रखरखीत जीवनाच्या वाळवंटामधील मृगजळ म्हणजे नजर… कुणाचाही मालकी हक्क नसलेली पण मालकी हक्क तेवढ्याच ठसक्यात वठवणारी गोष्ट म्हणजे नजर!… शत्रुला हत्यार खाली ठेवण्यास भाग पाडणारी, डोळे छेदून काळजाचे पाणी करणारी, आत्मविश्वासाचे अन विजयाचे निशाण गाडणारी , पराक्रमाचा परीपाक अन साहसाचे अजब रसायन म्हणजे नजर! विश्वविक्रमी योध्द्याला गुडघ्यावर आणुन आजन्म बाटलीत अन कामवासनेत वश करणारी, लढाई न करता सार्‍या राज्याचे समर्पण करायला लावणारी बदनाम कहानीसुद्धा आहे नजर! एखाद्या लाहनग्या चेहर्‍यावरुन कुतुहलाचे गोंडस प्रश्नांचे प्रदर्शन म्हणजेच नजर तर सुरुकुतलेल्या चेहर्‍यांतून हजारो घटनांचा अविरत पाऊस पाडणारी अन सरतेशेवटी आकाशाकडे शून्यामधे बघत संपत गेलेली व सोडून गेलेल्या असंख्य प्रश्नांचा जाच म्हणजेच नजर! युगानुयुगे पीडीत, दुर्लक्षित घटकांच्या अतोनात हाल-अपेष्टांची साक्षीदार आहे नजर!

एक न संपणारा अन असंख्य विषयांचे कंगोरे असलेला भन्नाट प्रकार म्हणजे नजर! नजरेला वरदान म्हणावे की शाप… भौतिक म्हणावे की अभौतिक… मूर्त म्हणावे की अमूर्त.. व्यक्त म्हणावे की अव्यक्त? प्रश्नापासुन प्रश्नापर्यंतच जर वाटचाल होणार असेल तर उत्तरांचा उपयोग तो काय? उत्तरातून जर नवीन प्रश्नच जन्माला येणार असतील तर त्याला उत्तर म्हणावे काय? माणसातून माणुसकी सोडून पाशवी वृत्तीची उत्पत्ती होत असेल तर त्याला माणूस म्हणावे काय? कोणत्याही विधिलिखीत सत्याचा असत्यासाठी जर विनासायास वापर होत असेल तर त्या सत्याची किंमत कमी होते काय? वास्तवाच्या विस्तवातून तावूनसुलाखून निघण्याशिवाय पर्याय नव्हता अन खचितच तो कधी असेल.. तो ना चुकवता येईल व ना कधी थांबवता येईल.. अनियंत्रित एखाद्या बुलडोझरप्रमाणे तो मार्गस्थ होत असतोच… अन शेवटी कितीही लिहीले वा वाचले वा अनुभवले तरी काळाची नजर जिथे जाणार नाही असे ठिकाण सापडणे निव्वळ अशक्य! आपण सारेच काळाच्या नजरेतील ‘नजरप्रवासी’!

‘प्रतिमा आणि प्रतिभा’

प्रतिमांचा चुरगळा एकीकडे होत असताना त्याच प्रतिमांपैकी कोणत्यातरी एका प्रतिमेचा आधार घेत जीवन कंठणं म्हणजेच नरकयातना! प्रतिमा अन प्रतिभा दोन परस्परविरोधी संकल्पना… प्रतिभा हे दैवी वरदान तर प्रतिमा हा मानवी शृंगार… प्रतिभा ही स्वच्छंद बागडणारी कविता तर प्रतिमा ही काटेरी कुंपणातील मर्यादित भावना….. प्रतिभा जन्मजात वा पूर्वजन्मांची पुण्याई तर प्रतिमा ही प्रतिभेला मिळालेली कल्हई…. प्रतिभा मुक्त तरी उत्तुंग समाधानाच्या शिखरावर हात धरुन नेणारी सावली तर प्रतिमा प्रतिभेला कैद करण्यासाठी असलेली तटबंदी…. राजकारणातील पक्षापक्षातील भडवेगिरी एकवेळ मान्य पण प्रतिमेसाठी प्रतिभेचा लिलाव करणारी निब्बर चामड्यांची नीचगिरी केवळ अमान्य!! उमललेल्या फुलाला, सुटलेल्या बाणाला आणि उच्चारलेल्या शब्दाला जसे मार्गस्थ व्हावेच लागते नव्हे ते क्रमप्राप्तच असते तसे अन तसेच प्रतिभेला काळाच्या गर्भातून मानवी शरीराच्या संवेदनांतून सूर्याच्या दिशेने व्यक्त व्हावेच लागते… सूर्य कुठल्याही प्रतिमेपेक्षा मोठा ठरतो तसाच कोणताही खरा प्रतिभावंत दिलेल्या प्रतिमेच्या मर्यादा स्पष्ट करणारा ठरतो….

मुक्त हस्त पेरलेल्या चांदण्यांना कधी नियमांचे बंधन आहे का वा कुणी ते कधी तरी देऊ शकेल काय? त्या चांदण्या जशा आहेत तशाच त्यांच्या असण्याचा अर्थ कधी निसर्गाच्या हालचालींशी वा माणसाच्या जगण्यातील घडामोडींशी लावला गेला…. त्यांच्या या अनिर्बंध पसार्‍यातूनही जर का नियमितपणाचा उदय होऊ शकतो तसेच कदाचित नव्हे खात्रीनेच या प्रतिभावंताच्या कल्पनांतून उधळलेल्या गेलेल्या अविष्काराचा नियोजित असा अर्थ लावता येऊ शकतो… अर्थाचा माग घेणे गरजेचे!! प्रतिमांचा शेंदूर लावून प्रतिभावंताला देव करण्यापेक्षा त्याच्या प्रतिभेच्या मर्यादांना आव्हान देऊन जगाच्या पाठीवर या प्रतिभेला मानणारा नवा पंथ उदयाला यावा!! प्रतिभेपासून प्रतिभेला स्फुरण मिळावे.. प्रतिभेपासून प्रतिभेवरील अव्यक्तपणाची धूळ उडावी.. प्रतिभेपासून प्रतिभेचा न भुतो न भविष्यती असा आकाशाच्या कॅनव्हासवर ठसा उमटावा… प्रतिभेपासून खोट्या, बनावट प्रतिभांचे नागवेपण सिद्ध व्हावे… प्रतिभा हाच निकष व्हावा.. प्रतिभा हाच धर्म व्हावा… प्रतिभेचा प्रतिभा हाच पुरावा व्हावा.. जगण्याचा आधार प्रतिभा व्हावा… वर्षानुवर्षे खितपत पडलेल्या भग्न विचारांना प्रतिभेचा परीसस्पर्श व्हावा… परीसापासून आणखी परीस मिळावा… प्रतिभेचा असा सत्कार व्हावा… प्रतिमांचे कोंदण घेण्यापेक्षा प्रतिभा ही उत्कट असावी.. थेट असावी… रक्तातील प्रत्येक तंतुच्या मनामनातील हेलकाव्यांचे प्रतिक असावी… सुंदर नाही तर प्रामाणिक असावी.. भडक असली तरी निर्धोक असावी… भयानक असली तरी सच्ची असावी… विक्षिप्त असली तरी स्वतंत्र असावी….जगाच्या स्वीकृतीसाठी हपापणारी नाही तर बिनदिक्कत जगाच्या नाकावर नाचणारी असावी….

प्रतिमांचे लेप घेऊन जगणारे काफिर कारंज्यातील उधळणार्‍या तुषारांप्रमाणे यत्र तत्र सर्वत्र सापडतील… प्रतिमांच्या आधारे मोठेपणाची व महानतेची भिंत उभारुन स्वतःचे नागवेपण लपवणार्‍यांना काळाच्या धबधब्याखाली नेऊन सत्याचे अन जाणिवांचे असंख्य बोचरे चटके बक्षिसी द्यावे… प्रतिमा ही प्रांजळ असावी.. उदो उदो करण्यासाठी मांडलेल्या बैठकीतील घुंगरु बांधून छुमछुम करुन फुलांप्रमाणे प्रतिमा उधळणारी बाजारबसवी नसावी… ती बाजारबसवी दिलेल्या मोबदल्याशी तरी निष्ठा राखते पण प्रतिमांचा गोफ गळ्यात बांधणारे आजन्म या प्रतिमांचा डबक्यात आकंठ बुडून आयुष्य संपवतात… प्रतिमा असावी पण तिला जीवनाचा सुगंध असावा.. तिला मुक्तछंद असण्याचा आशिर्वाद असावा… बंधनांचा कुजट वास नसावा तर निखळलेल्या तार्‍यासाठी सांत्वनाचा दैवी सूर असावा.. गाभार्‍यातील पिंडीवर होणार्‍या अभिषेकातील लयीचा सात्विक भाव असावा…. घरट्याकडे निघालेल्या पाखराची आर्त साद असावी… पानांवरुन ओघळणार्‍या दवबिंदूचे पावित्र्य असावे… जगण्याच्या वाटेवरल्या वळणातील हक्काचे स्पंदन असावे… प्रतिभेला परमोच्च आनंदासाठी परावृत्त करणारी ओळखीची हाक असावी प्रतिमा!

विसंगत गोष्टींमधून जगणे कुणी टाळू शकत नाही… अंगठ्याने एखाद्या मुंगीला चिरडावे अशा अविर्भावात काळाची बोटं ढगांच्या वर आपल्यासाठी हलत असतीलच! यातूनही त्या काळाला आश्वस्त करायचे असेल वा त्याच्या पटावरुन त्याला भिडायचे असेल तर अंतरंगातील सुप्त प्रतिभेचा ध्यास घेणे हेच एक उत्तर आहे… प्रतिभा खुलणे म्हणजे एका क्षणात आयुष्य जगणे.. एका क्षणात अनेक आयुष्यांशी बांधले जाणे.. अनेकांच्या मनातील संगीतात आपल्या सुरांची बेरीज करणे… दुखर्‍या जखमेवर फुंकर होऊन झुलणे…. एकांतात आयुष्य हरवून गेलेल्या चेहर्‍यांवरील स्मितहास्याची चांदणी… दिलखुलास हसणार्‍या अनेकांशी त्या हास्यात विरघळून जाणे… बाकी काहीच नाही तर आपल्या आयुष्यातील आपलेपणाशी झालेला लगाव होणे म्हणजेच प्रतिभा! या विश्वातील गुमनाम पण शाश्वत संगीतात या प्रतिभेतून समरस होणे म्हणजेच या जन्माचे ऋण फेडणे नाही का??

-निलेश सकपाळ
११-११-२०१४

सत्य

सत्य

काही गोष्टी असतात किंवा नसतात… अस्तित्वाचे आ वासून राहिलेले काटेरी प्रश्न जेव्हा कातडी फाडून हृदयाला पिळवटायला लागतात, तेव्हा उमटणार्‍या तप्त अग्निरसातून भावभावनांचे शामियाने ध्वस्त होण्यास उसंत लागत नाही…. नग्न डोळ्यांनी दिसणार्‍या स्वप्नांवर विश्वास ठेवणारे अन समोर दिसणार्‍या असंख्य खाणाखुणांना बेदखल करून भविष्यावर चाल करून जाणार्‍या योद्ध्यांना धोपट मार्गाने सरपटणार्‍या क्षुद्र मानवाचा दाखला न देणेच बरे! जे आहे ते मान्य न करणे अन जे हवे ते प्राप्त करणे म्हणजेच स्वतःच्या अस्तित्वाला बिनदिक्कत झुगारून परीस्थितीला अंगावर घेणे.. सूर्याचा प्रकाश तर सगळ्यांनाच हासील आहे पण सूर्याचा पहिला किरण शोधुन त्याचे प्राशन करण्याचे वेड रंध्रारंध्रातून उपजावे लागते… स्वत्वाच्या आगीपासून लांब पळणे वेगळे अन आगीला भोवती लपेटून तेजोमयी शेंदूर भाळावर फासून आकाशातील स्वयंप्रकाशीत तार्‍यांना न्यूनगंड देण्यासाठी उभे ठाकणे वेगळे! वळणावळणांत अडखळणारी वाट अमान्य करून, पिचलेल्या रुढींचे कुंपण ओलांडून, विचारांचे ग्रहण बाजूला सारून, संकुचित मर्यादांना छेद देऊन नवे आभाळ मागणार्‍या पाखरांना ना समुद्राचा किनारा भावतो अन ना घोंघावत शांत होत जाणारा वादळपसारा!

सागराच्या लाटांमधील अनियमितपणा जिथे मनाला खटकतो…दिवस-रात्रीमध्ये असणारी अस्पष्टशी उजेडाची रेषा जेव्हा शोधावीशी वाटते… लढवय्याच्या तलवारीच्या पात्याला पाहून समाधान न होता त्याच्या अमर्याद पराक्रमाकडे मन खेचले जाते… रोजरोज येणार्‍या त्याच त्याच प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी जेव्हा अंतर्बाह्य विद्रोह होतो…. पर्वतावरुन दिसणार्‍या खोल भयाण दरीपेक्षा पर्वताच्या उंचीवर मन भाळू लागते… दगडातील शिल्प बघताना जेव्हा त्याच्या उडालेल्या टवक्यांमधील अन तेव्हा उठलेल्या असंख्य प्रसूतवेदनांशी आपण संलग्न होऊ लागतो… भासमान दिसणार्‍या क्षितीजाच्या कोवळ्या अस्तित्वाचा मोह न होता त्याच्या क्षणिक अनुभुतीशी मनाची प्रत्यंचा जोडली जाते… विस्कटणार्‍या ढगांमध्ये बेताल खेळ करणार्‍या असंख्य वायुलहरींशी जेव्हा श्वासांचे नाते उमगत जाते….. क्षुल्लक हेव्यादाव्यांमध्ये जीवन व्यर्थ नासवणार्‍या बांधवांची तेव्हा कीव करावीशी वाटते… जन्मांनंतर सुरु असणार्‍या मृत्यूच्या रस्त्यावर खरा सोबतीही मृत्यूच असतो याची खात्री न पटणे म्हणजेच डोळ्यांवर पट्टी बांधून लख्ख उजेडामध्ये कुट्ट अंधार चाचपडण्यासारखेच!

सत्य देखील असते वा नसते या साच्यात येत नाही… सत्य ही काळाच्या पाठीवरील जन्मखुण आहे.. भविष्याचा वेध घेताना अंतिम सत्याची गाठ कोठे पडेल हे कुणालाही माहित नाही… अशाच एका क्षणामध्ये सत्य गवसल्यानंतर योध्द्याचा बुध्द होऊ शकतो, वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो अन सत्याची खरी ओळख झाल्यानंतर अवसान गळुन गेलेला कुंतीपुत्र धनंजय युध्दकर्म करण्यास तत्पर होऊ शकतो! सत्याचा पाठलाग करणे कदाचित मुर्खपणा ठरेल.. सर्वार्थाने सत्य आपला पाठलाग करीत असते हे आणि हेच सत्य! नदीच्या प्रवाहाचा माग काढत जेव्हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जाण्याचा मानस विचारांमध्ये तग धरू लागतो तेव्हा प्रवाहाबरोबर ठेचकाळत वाहत जाणार्‍या असंख्य गोट्यांशी आपले नाते तुटलेले असते अन शाश्वत सत्याकडे आपली वाटचाल सुरु झालेली असते!

प्रवासी

प्रवासी
विषण्णपणाचा शाप घेऊन रानोमाळी भटकणार्‍या प्रवाशाची गणती या दिवसरात्रीचे गणित मांडलेल्या समाजाने करायची यत्किंश्चितही आवश्यकता नाही..  जिथे प्रवास अनिश्चित आहे अन अंतिम स्थळ अनामिक आहे अशा प्रवाशाला या जगमान्यतेची सुतरामही पर्वा नसावी…
जीवन-मृत्यूच्या सापळ्यात अडकलेल्या कफल्लक मनोवृत्तीला मुक्ततेची अमृतफळे कशी काय कळणार?… जिथे सगळे एकमेकांवर अवलंबुन राहतात पण विचार एकमेकांशिवाय करण्यात स्वारस्य आहे… जिथे स्वार्थीपणा सर्वश्रुत मान्य आहे अन समावेशकपणा भाषणांच्या गुलाबी पेटीत कैद आहे… जे बोलायचं ते वागायचं नाही अन जे वागलो ते लपवत रहायचं… गेल्या क्षणांचे सहानुभुतीपुर्वक भांडवल करायचे अन आजपेक्षा उद्यावर खर्च करत रहायचं….
अनंतकाळचा हा प्रवासी हिशोबापासुन अनभिज्ञ आहे… त्याचा ध्यास हा प्रवासपुत्र अन त्याची साधना ही प्रवासकन्या… या व्यतिरीक्त ना शिदोरी आहे अन ना कोणती तिजोरी आहे… अंधाराच्या पोटात चालत रहायचे.. उजेडाच्या वाटा धुंडाळत रहायचे….. दूर टिमटिमणार्‍या कोणत्याही काजव्याला पाहून हर्षोल्लासित व्हायचे नाही वा शेकडो योजने चालल्यानंतरही काट्यांच्या सहवासाचा तिरस्कार चेहर्‍यावरील सुरुकुत्यांमध्ये उमटुन द्यायचा नाही…. ना निसर्गसौंदर्याची भुरळ पडू द्यायची वा ना रसरसलेल्या फळांचा मोह पडू द्यायचा… सुकलेल्या पानापानांतुन खरे-खोटे मुखवटे तुडवत रहायचं… या मुखवट्यांच्या पलिकडील चेहर्‍याशी सलगी करायची… हे अगणित माणसांचे मुखवटे बाजूला सारले तर एक तोच चेहरा सगळीकडे दिसेल…. निर्मात्याने म्हणे माणुस घडवला अन माणसाने त्याचा विपर्यास केला… या निर्मितीला प्रमाण मानून प्रवाशाला चालणे क्रमप्राप्त आहे… स्वतःच्या अंतरंगात ढवळल्यानंतर उठणार्‍या तरंगांशी नाते जोडल्यानंतर इतर नात्यांचा क्षुद्रपणा जळजळीतपणे वेशीवरल्या भुतांप्रमाणे उल्ट्या पावलाने दांभिकतेचे नगारे तुडवताना दिसतो… आयुष्यातील जर सगळ्यात जास्त वेळ या नात्यांतील सापशिडीच्या खेळात व्यतित होणार असेल अन शेवटी कृतघ्नपणाचा साप शेवटच्या घरातून गिळंकृत करुन बक्षिसी मिळणार असेल तर कर्मशून्य रहाणे बरे नाही का… कर्मशून्यता ही तर या प्रवाशाची ताकद आहे .. जर आरशात, पाण्यात उमटणारे प्रतिबिंब खोटे आहे… त्याचे अस्तित्व शून्य आहे.. तर त्याच्यावर विश्वास ठेवून आपल्या सुंदरतेचा माज कशाला हवा? जर सारेच संपणार आहे..जर सारेच विनाशाकडे वाटचाल करीत आहे.. तर मग प्रवाशाने संबध्दपणे विनाशातील सत्व शोधण्यासाठी अग्रेसर होणं हितावह नाही का?

निर्झर

निर्झर होता आले नाही,
सल पावसाचे झरताना,
धुमार गंधाचे माळताना,
मेघदुत होता आले नाही

पर्वत होता आले नाही,
सावल्यांशी अडखळताना,
उन्हे कोवळी झेलताना,
प्रकाश होता आले नाही

समुद्र होता आले नाही,
भोवर्‍यांतुन झगडताना,
वादळांचे भाव शोधताना,
दिपस्तंभ होता आले नाही

उन्मुक्त होता आले नाही,
अद्वैत जंजाळ जखडताना,
संवाद नवे उलगडताना,
शाश्वत होता आले नाही

-निलेश

भुमिका मुळांची…..

झाड वाढताना थोडी ना त्याचे त्याच्या मुळांच्या विस्तारावर लक्ष असते वा नियंत्रण असते… मुळे ही असतातच झाडाच्या स्थिरतेसाठी आणि वाढीसाठी! ..गरजांच्या ध्यासापाठी ती आपल्या कक्षा रुंदावत असतात… कधी एखाद्या अशक्यप्राय मुरबाड जमिनीतुनही कोवळ्या देठापासुन ते फळ, फुल आणि पानांपर्यंत सत्वं पोचवायची अन आपली तगमग अशीच जमिनीमध्ये पुरुन ठेवायची… झाडाची ती आकाशाची सोनेरी स्वप्नं आपण मात्र पाताळात घुसमटुन पुर्णत्वास न्यायची.. ना कसला आकार ना कसले कौतुक… फक्त युगानयुगे, शतकानुशतके अंधारात समाधीस्थ योग्याप्रमाणे व्रतस्थ रहायचं… अवघड आहे माणसाला वा खासकरुन मनाला एका साचेबध्द पठडीत बांधुन आयुष्याच्या अत: पासुन इतिपर्यंत असे असणे… पण बर्‍याचदा मनही मुळांची भुमिका निभावतेच की.. कधी, केव्हा अन कशी हे मात्र व्यक्तिसापेक्ष आहे!