“अनकही”

न जाने आज क्यूँ सब बिखरसा गयाँ,
सवरना ही था पर तेरा खयाल छूँ गयाँ|

हर मंजर पर तेरा निशाँ वाक्किफ था,
रुबरु होना ही था, पर तूँ मुडता चला गयाँ|

कौनसा साहील और कौनसा पता है तेरा,
आसमान ही था, हर तारा तूँ दिखता गयाँ|

शर्मसार दिखता है हर चेहरा इन गलियोंमे,
इत्तेफाक ही था, तूँ सभी को दर्पण बाँटता गयाँ|

बदगुमान हूँ, तूँ एहसास है या फिर है जिंदगी
बेखबर ही था, हर साँसमे तूँ घुलता गयाँ|

-निलेश सकपाळ
-०१ जुलै २०१३

दैनंदिनी – १८ एप्रिल २०१३ (संक्रमण)

कधी अंधारुन आल्यावर वा आभाळातील मळभ असताना बाहेर पडल्यानंतर अचानक पाऊस पडून जातो.. सारे मळभ दूर होते अन् समोर लख्ख प्रकाश दिसू लागतो… डोळे तेच पण नजर बदलून जाते… समोर असणारा अन् खुंटत जाणारा सगळा परिसर एकदम आवाक्याबाहेर जाऊन विस्तीर्ण होऊ लागतो… आपल्या अमर्याद कक्षांमध्ये येण्यास त्याचा एक अविभाज्य भाग होण्यास आव्हान देऊ लागतो… एका मानसिक परिवर्तनानंतर सुद्धा कित्येकदा अशाच भावना मनःपटलावर दाटून येतात.. मनातील मळभ नाहीसे होणे.. किंवा एखाद्या आगंतुक क्षणाला त्या बदलाची परिणती अनुभवणे सुद्धा अजबच ना!! मोकळे होणे किंवा बिनधास्त होणे कधीही महत्वाचे… बर्‍याचदा आपणच आपल्याला खुराड्यात बंद करून घेतो… अगदी एखाद्या चिंचोळ्या अरुंद नळकांडीप्रमाणे.. दोन्हीबाजूला मोकळेपणा पण मध्ये तो असंकुचितपणा किंवा एक घुसमट… जगताना या गोष्टींची सोबत असेल तर प्रगती नाही तर अधोगती होणार यात काही वादच नाही म्हणूनच या सगळ्यांना झुगारून, पंख फडफडवून एखाद्या उंच शिखरावर वार्‍याच्या उलट दिशेने सार्‍या जगाला न्याहाळणे निराळेच… येणार्‍या बदलाला सामोरे जाणे जेवढे महत्वाचे तेवढेच किंवा कदाचित त्याहीपेक्षा किंचित महत्वाचे म्हणजे तो बदल स्वीकारणे होय…

रोजच्या रहाटगाड्यात स्वतःला इतकं अडकवून घेतल्यानंतर बदल, संक्रमण असे शब्द नको वाटतात जगाला, स्वतःच अहं स्वतःच्याच भोवती मोठं वेटोळं निर्माण करून घेतो अन मग एखाद्या भुंग्याप्रमाणे आपण त्यात अडकून जातो ते कधीही न सुटण्याकरताच! अन यासाठीच बदल महत्वाचा… नेणीवेकडून जाणीवेकडे नेणारा तो राजमार्ग महत्वाचा.. कधी कळत अन कधी नकळत स्वतःला त्या काळाच्या स्वाधीन करायला आपल्यालाही तर जमायलाच हवे… ते तेव्हाच जमेल जेव्हा आपण हातचं काही राखून नाही ठेवणार.. मोकळे असू अगदी एखाद्या लख्ख काचेप्रमाणे आरपार! परिस्थिती आपल्याला घडवत असते… आपल्यातूनही एखादे लाजवाब शिल्प साकारू शकते याचा आपल्यापेक्षा जास्त विश्वास त्या परिस्थितीला त्या काळाला असतो हेच खरे… याच काळानेच तर आपल्याला पहिल्यांदा चालायला अन नंतर धावायला शिकवले… अगदी लहानपणी असलेला मातीचा गोळा कधी दगड झाला हेदेखील आपल्याला कळाले नाही… त्यातील अहं इतका कधी मोठा झाला की येणारे आश्वासक बदल झुगारणे त्याला जमू लागले… अन म्हणूनच जर घडायचे असेल तर आता त्या काळाच्या सामोरे बिनदिक्कत जायलाच हवे… शिल्प घडणार तर टवके उडणारच.. वेदना होणारच.. फक्त एवढाच विश्वास हवा की हे टवके नको असलेल्या त्या अहंकाराचे आहेत… अविश्वासाचे आहेत!

एखाद्या नवीन मार्गावर पुढारणे किंवा समोर कोणताही मागोवा नसताना पुढे चालणे म्हणजेच धाडस किंवा स्वतःतील आत्मशक्तीवरील अतोनात विश्वास! वाट नसताना वाट काढणे अन् वाट तयार करणे हे सगळ्यांना जमतेच असे नाही….महाकाय समुद्रातून पलिकडे जाण्यासाठी सेतू बांधणे सगळ्यांनाच जमत नाही त्यासाठी श्रीरामाचा ध्यास हवा, मारुतीची गगनभेदी इच्छाशक्ती हवी, वानरसेनेचा तो निरागस पण अतोनात भक्तीभाव हवा… त्या खारुताईची धडपड अन भक्ती हवी.. शबरीचा भोळाभाव अन आपलेपणा हवा! खलाश्याला गलबत भर समुद्रात आल्यानंतर धीर गाळून चालत नाही.. तेव्हा परतीचा मार्ग नसतो… येणार्‍या वार्‍याशी झुंजायचे, समुद्राला कवटाळायचे अन त्यावरच स्वार व्हायचे असते… हे ज्याला जमेल त्यानेच नवीन मार्ग शोधण्याच्या फंदात पडावे अन्यथा आपला धोपटमार्ग बरा!!!

“तुतारी”

वळणांची वाट गरगरणारी,
फिरुनी येते पुन्हा माघारी
नजर वेंधळी घुटमळणारी,
सुरुवातीचे ते कौतुक भारी!

आत डोकवा, येते शिसारी,
घाटाघाटांची गम्मत न्यारी!
कधी झटका, मध्येच उभारी,
चांदण्यानीच थाटली पथारी!

हुंदक्यांची ती भाषा बिलोरी,
काळजांच्या आरपार कट्यारी!
सोबतीचे जाम, आठवांची यारी,
जणू,जिभेवर चिंच विरघळणारी!

मदमस्त कलंदर तो पुकारी,
कोण नाचती नी, कोण मदारी?
कुठले आप हे? कुठले शेजारी,
भाव द्या चेहर्‍याला, व्हा रंगारी!

झटावे नशिबाने रोजच बाजारी,
म्हणे नशिब तुझे देशील उधारी?
बुरुजावरुनी वाजू द्या तुतारी,
येता आम्ही, कफल्लक भिकारी!

-निलेश सकपाळ, २० फ़ेब्रुवारी, २०१३

संग-असंग

संग-असंग

काळोखाचे घेऊन हात,
उजेडाचे पांग फेडावे
आभाळाला देऊन कान,
परलोकाचे ध्यान करावे…

उडता येते कोणाला,
पाताळातही रुतताना..
आभासाचे घेऊन सोंग,
उत्थानाचे नाट्य घडावे..

विचारांची स्पर्धा कसली,
भावनांचे बंड असताना…
अदृश्याचे जोडून बिंदू,
निर्गुणाचे रूप दिसावे…

गुंततात मने केव्हातरी,
एखादे कोडे उकलताना..
हातच्याचे राखून भान,
विश्वासाचे नाते जडावे…

असंग सार्‍या बाजुला,
निसंगाचे भेद सुटताना
आसक्तीचे गळून पान,
संवादाचे रोप फुटावे…

निलेश सकपाळ, १७ जानेवारी २०१३

संग-असंग

जूस्त-जू

जूस्त-जू

शब्दोंका कारण दे नहीं मन मेरे…
सच तो यह है… के तू बहना भूँल गया…

भगवानसे कहता दर्शन दुर्लभ तेरे….
सच तो यह है… के तू झुकना भूँल गया…

मुझसे मेरी रंजिशोंकी कसम ना दे…
सच तो यह है… के तू मनाना भूँल गया…

हासील ढुँढता रहेगा जन्नतमें सारे…
सच तो यह है… के तू लुटाना भूँल गया…

झूँठी तसल्ली, झूँठे है तराने तेरे..
सच तो यह है.. के तू सच जताना भूँल गया…

हवेलींयोकें दालानों का सन्नाटा तू मांगे…..
सच तो यह है.. के तू चिल्लाना भूँल गया….

लिखेगा नाम हर कागज के पन्ने पन्ने पे…
सच तो यह है.. के तू ‘मैं’ को मिटाना भूँल गया….

——निलेश सकपाळ, १६ जानेवारी, २०१३

प्रवाहविभोर!!! : २४ जुलै २०११

बंधनांना झुगारुन, बंधनांशी झगडुन की बंधनांना स्वीकारुन! निर्णय तुमचा अन माझा असतो… तिथुन निवडलेला मार्गही तर मग आपापलाच असतो… नियतीच्या पटावरील पुढची चाल माहीत नसली, तरी कुतुहलापोटी फासे खेळण्याचे धाडस बरेच जण करतात, अगदी बिनधास्त!! भावनांच्या आधीन होऊन मग भावनांशीच प्रतारणा का करावी, आभाळाच्या सावलीखाली राहून आभाळालाच जखम का करावी, एखादी लांबसडक पाऊलवाट कधीच संपणार नाही याची शाश्वती कोण देतो? जर कुणीच देत नाही तर आपण आजनंतर उद्या अन उद्यानंतर परवा घरंगळत त्या भविष्याच्या मागे का धावतो? क्षितीजाशी मैत्री केली तर त्याचे नसणे स्वीकारावेच लागते, अन ते स्वीकारले नाही तर मग जखमा होतात अन त्याही न दिसणार्‍या, न भरणार्‍या, अगदी क्षितीजाप्रमाणेच निरंतर चिरकाल अस्तित्वाचा हक्क सांगणार्‍या!

धरती हादरली, वादळ घोंघावले, समुद्र उधाणला कीच आपल्याला यांच्या अस्तित्वाची जाणीव होते… नव्हे नव्हे त्यांच्या आपल्या जवळ असण्याचीसुद्धा अनामिक संशयी भीती वाटते… जसे आपल्या मनात काहूर माजले तर आपल्या वागण्यावरून आपला ताबा सुटून जातो…मनातल्या या खळबळीचा थांगपत्ता लागत नाही तोपर्यंत किंवा कदाचीत जोपर्यंत उठणार्‍या प्रत्येक प्रश्नाला समाधानकारक उत्तर मिळत नाही तोपर्यंत…. मग या धरतीने, वादळाने अन या समुद्राने कसे काय उत्तर शोधावे.. त्यांच्यातील खळबळीचा कुणी व कसा समाचार घ्यावा? त्यांच्या उच्छादामागील घाव अन त्या घावामागील भाव कोणत्या सजीव मनाला उमजावे? की सजीव मनाची व्याख्या यांच्या दुःखापलिकडेच संपत असावी अन्यथा कोणी वडाच्या झाडाला आधार घेत पसरणारा वेल तोडला नसता अन बाजारभावामध्ये विकला जाणारा कृत्रिम वेल शोभेसाठी घेतला नसता! माझे काय अन कुणाचे काय निसर्गाच्या ओसरीवर पाय पसरून बसायला थोडी का परवानगी लागते, पानाच्या गालावरील नकळत सुटलेला तो पहाटेचा दवबिंदू अलगद आठवणीच्या शिंपल्यामध्ये वेचायला मात्र नशीब लागते हेच खरे!!

पाऊसप्रवासी : दैनंदिनी २७ जुलै २०१०

कधीतरी पावसात भिजवून मन रमवणारे पाऊसवेडे चातक बरेच आहेत… अगदी रोजच्या घडीला कितीतरी वेळा हे असे पाऊसप्रवासी नजरेसमोर मुसळधार पावसामध्ये विरघळताना दिसत असतात… कुणी आपल्या संसाराच्या गाठोड्याला खांद्यावरून त्याची होडी करुन पाण्यामध्ये सोडून देतो तर कुणी उद्या काय होणार या सामान्य प्रश्नाला कवटाळून पावसामध्ये आपले चिंतांचे कापसी ओझे भिजवून रस्त्यावरून सरपटताना दिसतो… कुणी पक्षी अगदी झाडाच्या कोवळ्या फांदीवर बसून आपले अधिराज्य गाजवताना दिसतो तर त्याचवेळेला या निसर्गाच्या नव्या नवलाईला दूर सारून डांबरी रस्त्यावर एखाद्या नव्या खड्ड्याच्या तक्रारीमध्ये त्रासलेला एखादा बुद्धिमान प्राणी दिसतो… कुठे एका बाजूला पांडुरंगावर सगळा भार सोपवून त्याच्या नामघोषामध्ये या पावसाचा टाळ करुन, या पावसाचा मृदंग करुन, या पावसाचा अभंग करुन त्या विठुमाऊलीकडे निघालेली यात्रिकांची आषाढवारी दिसते..

गेल्या पाच सहा वर्षामध्ये भारतातला पाऊस अनुभवला नव्हता.. जो काही होता तो फक्त बातम्यांमधून अन इथल्या फोटोंमधून.. यावेळी मात्र अगदी दूर गेलेल्या जुन्या मित्राप्रमाणे कडकडून गळ्यात पडला… त्याच जुन्या त्वेषामध्ये अन त्याच त्याच्या नेहमीच्या तालामध्ये… जणू काही सांगत होता की बघ या एकाच निसर्गामध्ये तू अन मी दोघे जगत आहोत, पण मी अजून तसाच मुक्त, मोकळा कोसळतो… अन तू दिवसेंदिवस एखाद्या जुन्या तलावाप्रमाणे आटत आटत चाललायस…. सार्‍या विश्वाला सताड बाहुंनी गवसणी कशी घालायची हे मात्र शिकावं ते या पावसाकडूनच… तो ना घड्याळाच्या काट्याला बांधलेला असतो ना तो कोण्या एखाद्या विशिष्ट व्यक्तीभोवती घुटमळत असतो… वर्षभराचे मळभ साचलेल्या आपल्या नजरा, आपले कोते झालेले दृष्टिकोन पुसून टाकण्यासाठी, धुवून टाकण्यासाठीच हा देवदूत आपल्याकडे झेपावत असेल… त्याचा ओला संदेश घेऊन माती सुगंधित होते.. त्याच्याकडून जीवन घेऊन कितीतरी नवी रोपटी आकाशाचे स्वप्न जोपासू लागतात… अन त्याचवेळेला आपल्यातला माणूस मात्र या पावसाचे आभार मानण्याचे विसरून जाताना दिसतो हीच ओली खंत मनामध्ये अंकुरत रहते…

अजूनही दैनंदिनी लिहावी की असंच जेव्हा वाटेल तेव्हा लिहावे हे काही केल्या नक्की होत नाहीये… लवकरच काहीतरी निर्णय व्हावा हीच अपेक्षा… विचारांशी प्रामाणिक राहणे जमावे.. उठणार्‍या प्रत्येक भावस्पंदनाला त्याच्या हक्काचे आभाळ देता यावे म्हणुन आणखी कसोशीने यत्न करावे… खळबळ वा उफाळणारा अग्नीचा समर्पक सार्थ बहुमान कराता यावा…. भ्रष्ट व कुनीतीपुर्वक काळवंडणार्‍या ढगांना क्षितीजापलिकडे दूर ढकलता यावे….. अन यानंतर उभ्या राहणार्‍या सुसंवादासाठी शब्दांना साकडे घालणे मात्र असेच सुरु राहील!!!

गुरुपौर्णिमा :२५ जुलै २०१०

जवळ जवळ आठ नऊ महिन्यांच्या एका मोठ्या खंडानंतर लिहिण्यास घेतले आहे.. खंड होता तो फक्त या शब्दांकित स्वरुपाला.. खरे काळाचे शब्द तर प्रत्येक पावलावर आपोआप उमटत होते अन याहीपुढे अवतरत राहतील.. असंख्य घटनांचे वादळ अविरतपणे काळाच्या क्षितीजावरुन आयुष्याच्या या रणावर अघोरी शरांचा मुक्तछंद, बेभान वर्षाव करीत होते… कधी कधी अगदी इंद्रधनुष्यावरही संशय यावा की कदाचित याच धनुष्याचाच तर हा छद्मी डाव नसेल ना? इथपर्यंत सैरभैर होणारी अवस्था वास्तवात होती.. प्रत्येक क्षणासरशी पायाखालची जमीन आतमध्ये धसत जावी.. आपण जिथे आहोत तिथेच आपले जिवंत थडगे होईल की काय असे वाटावे.. आयुष्यांच्या सुंदर, चमचमीत कल्पनांच्या मागे एक भेसूर आभास दब्या पावलाने आपले अस्तित्व जपत असतो व सत्यामध्ये येण्यासाठी आसुसत असतो हे पटण्यासाठीच काही योग लिहिलेले असतात.. जेव्हा हिशोब लागण्यापेक्षा हिशोब करणे नको वाटते.. जेव्हा एखाद्या चक्रव्यूहातून सुटून सुखरुप घरी जाण्यापेक्षा चक्रव्यूहाचा हिस्सा होऊन जाण्यात सार्थक वाटते…. असणे नसणे याहीपेक्षा हरवणे जास्त समर्पक असते… आपल्या कटाक्षामध्येच आपल्याला छेदून जाणारे एखादे अस्त्र लपलेले असावे असे प्रतिबिंबातून उमटत असते तेव्हा सावलीचाही तिरस्कार वाटू लागतो..

कल्पनेच्या परे असणार्‍या अशा भीषण परिस्थितीतून सहीसलामत सुटणे कधीच सहज नसते…. आज गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर हे लिहिण्याचे प्रयोजन इतकेच की गेल्या कित्येक महिन्यांच्या सगळ्या अग्निदिव्यातून, रौद्र महासागरातून जर ही जीवननौका आज पैलतीरावर सुखरुप आली आहे ती फक्त अन फक्त एका दीपस्तंभामुळे म्हणजेच एका सद्गुरुकृपेमुळेच! या अशक्य काळामध्येही जर शाश्वत काय असेल तर ते आहे सद्गुरुतत्व! त्याला समजणे, त्याची मीमांसा करणे हे या तुच्छ देहाचे कामच नाही… त्याचे अढळत्व वादातीत आहे, त्याचा वास सूक्ष्मतम सूक्ष्म आहे अन त्याचा विस्तार अनंत आहे…. तो प्राप्तही आहे अन तो अगम्यही आहे…. तो सिध्द आहे, तो साधकही आहे… तो सहजही आहे तर तोच अनाकलनीयही आहे…. तो सार्‍या या पंचीकरण पसार्‍याचा केंद्रबिंदूही आहे अन तोच या सार्‍यापासून अलिप्तही आहे… तो मी आहे, मी तो आहे… हीच सद्गुरुकृपा जी त्या रामाला वसिष्ठांकडून मिळाली, कृष्णाला सांदिपनींकडून मिळाली … अशी ही सद्गुरुकृपा मिळणे हेच ह्या जगण्याचे फलित आहे.. या अशा जगण्यासाठी मग ह्या संसाराचे शिवधनुष्य पेलणे मान्य आहे!

प्रगती : दैनंदिनी – १६, १७, १८, १९ आणि २० ऑक्टोबर २००९

नेहमी प्रश्न पडतो की भारताची प्रगती ही सामान्य माणसांपर्यंत का पोहचत नाही? या प्रश्नाचे कंगोरे खूपच विस्तृत आहेत.. अन आपल्यापैकी बर्‍याचजणांना त्याची कल्पनाही असेलच… माझ्यामते सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा की भारताची प्रगती होतेय असे म्हणण्यापेक्षा Indiaची प्रगती होत आहे असे जास्त उचित अन योग्य ठरेल.. हे सगळ्यांना मान्य आहे.. अन कदाचित यातच आपल्या प्रश्नाचे उत्तरही लपले आहे… Indiaची प्रगती सर्वसामान्यांपर्यंत पोहचायची असेल तर त्यासाठी सर्वसामान्यांना समजेल हे माध्यम हवे.. म्हणजेच काय तर ह्या प्रगतीला सर्वसामान्याला समजेल त्या भाषेतून त्याच्यापर्यंत पोहचवले पाहीजे… भारतामध्ये ग्लोबलायझेशन स्वीकारले गेले पण ते स्वीकारले गेले ते englishमधूनच.. कोणत्याही भारतीय भाषेतून नाही! भारतातील प्रांतवाद बाजूला ठेवून जर विचार करूयात.. जर तेव्हा प्रत्येक गोष्ट ही भारतीय भाषेचा अट्टहास करून स्वीकारली गेली असती तर काय झाले असते? आज डोक्यावरून जाणारे तंत्रज्ञान शेतकर्‍यांना वा खेडुतांना त्यांच्या भाषेतून कळु शकले असते.. कितीतरी प्रमाणात नोकर्‍यांचे दालन उघडले गेले असते.. इंग्रजी म्हणजेच सर्वकाही असा ‘गैरसमज’ न पसरता भारतातील भाषांना प्राधान्य मिळाले असते… भले पहिल्यांदा काही प्रोजेक्टस नसते मिळाले पण या अटीवरुन जर प्रोजेक्टस स्वीकारले असते तर नक्कीच कितीतरी हितकारी झाले असते… आज अवघड वाटणारे माहिती तंत्रज्ञान जर मराठीतून वा हिंदीतून सर्वदूर पसरले असते तर… आज कितीतरी जणांना त्याचा सहज सुलभ फायदा घेता आला असता! आधीच्या पिढ्यांना संगणकाची भीती नसती वाटली.. कमी शिकलेल्या लोकांच्या मनात न्यूनगंड निर्माण नसता झाला.. आज प्रांतीय भाषेच्या शिक्षणाबाबत आलेली उदासीनता कदाचित यामुळेच आहे.. आज मुलांना प्रांतीय भाषा शिकवा असा अट्टहास करणे योग्य आहे पण जर नोकर्‍या त्यांना इंग्लिशमधून मिळणार असतील तर त्यांचे मन त्यात कसे लागेल? आधी कॉर्पोरेट जगताची भाषा फक्त इंग्लिश न राखता ती भारतीय भाषा केली पाहीजे… इंग्लिश पर्याय म्हणून असेल…  भाषांतर करून देखील कितीतरी नोकर्‍या उपलब्ध झाल्या असत्या…. खेड्यातील लोकांनादेखील त्यांच्या भेषेत नोकर्‍या मिळू शकल्या असत्या.. शहराची प्रगती खेड्यापर्यंत खर्‍या अर्थाने पोहचू शकली असती! कोणतेही राष्ट्र प्रगत होते तेव्हा प्रगती ही सर्वसमावेशक असते.. दुर्दैवाने भारतातील प्रगती सर्वसमावेशक न होता समाजातील काही घटकांपर्यंत मर्यादित राहण्यासाठी हे देखील एक मुख्य कारण असू शकते.. नव्हे आहेच! आज भारत लोकशाहीकडून भांडवलशाहीकडे झुकतो आहे.. त्यामुळे हा भाषेचा मुद्दा मांडायचा असेल तर सरकारी प्रयत्न गरजेचे आहेत… कालांतराने या भांडवलदारांनी सरकारी हस्तक्षेप व कायद्याचा बडगादेखील उधळून लावला तर नवल वाटायला नको! या विचित्र धोरणामुळेच भारतातील भाषा जागतिक पातळीवर पिछाडीवर राहील्या व एका अर्थाने भारतीय भाषांची प्रगती खुंटली असेही म्हणता येईल! आज चीन, रशिया, जपान, आखाती देश, युरोपातील छोटी राष्ट्रे भारतापेक्षा प्रगत आहेत कारण तेथील समाजातील प्रत्येक घटक त्यांच्या प्रगतीचा हिस्सेदार आहे.. कोणत्याही तंत्रज्ञानाचे पहिले भाषांतर करून तेथील सामान्य माणसाला कसे समजेल हा कयास तिथे पहिल्यांदा असतो… भारतालाही जर कधी महासत्ता बनायचे असेल तर मात्र सर्वसमावेशक प्रगतीसाठी सर्वसामान्यांना समाविष्ट करुन घेण्यासाठी प्रयत्न करावेच लागतील…. अन भाषेचा हा मुद्दा तेव्हा कळीचा ठरेल यात काही वादच नाही!

शब्दांमध्ये निखारे असतात.. शब्दांमध्ये बंद अण्वस्त्रेही असतात.. फक्त वंदे मातरम हे दोन शब्द कोटी कोटी भारतीयांच्या छातीला ढवळून काढून स्वातंत्र्य लढ्यासाठी प्रेरित करू शकतात, हर हर महादेवची गर्जना जर सैनिकांना बेधडक शत्रुवर चालून जाण्यासाठी प्रेरक ठरू शकते… देवाच्या प्रार्थनेचे स्मरणही एकांतात जर अंगावर रोमांच उभारून लढण्यासाठी तयार करू शकते…. सावरकरांचे लेख वाचून कितीतरी तरुण घरदार सोडून जन्मभूमीसाठी प्राण देण्यास तयार होऊ शकतात.. म्हणजेच शब्द काही साधी गोष्ट नाही… शब्दच असतात जे नजरेला भेदून काळजाला छेदू शकतात.. ते शब्दच असतात जे ध्वनीलहरीच्या कंपनामधून अंग-अंग हादरवू शकतात.. शब्दांचे वादळ जर मनाच्या सीमारेषा ओलांडून आत शिरल्यानंतर काय होऊ शकते याची प्रचिती सगळ्यांना आहेच… पण शेवटी त्या शब्दातील भाव समजून घेणेही सगळ्यांना जमत नाही.. रामायण अन महाभारत ऐकून शिवाजी तयार झाले अन तेच रामायण अन महाभारत आज काही तरूणांच्या थट्टेचा विषय बनले आहे… ज्याला भगवदभक्तीच माहीत नाही त्याला शिवशक्ती मिलन कसे समजेल? प्रकृती-पुरुष म्हणजे काय हे कसे कळेल? मूळमाया-परब्रह्म हे नाते कसे उलगडेल? भगवंताशी होणारी अनन्यता, त्यातून पुढे येणारी समाधी कशी समजेल? विवेक, वैराग्य, योग, सिद्धता कसे समजेल? आपल्या पिढीला या गोष्टिंचा पुरवठा कदाचित लहानपणापासून झाला नसेल, याचेही कारण कदाचित इंग्रजाळलेल्या शिक्षणाचे झालेले अंधानुकरणच आहे… त्यामुळे या शब्दांचे खरे अर्थ उलगडण्यासाठी तो ध्यास हवा.. ती आस हवी अन ती भगवंताच्या अढळतेप्रती नितांत श्रद्धा हवी म्हणजे हवीच!

गेल्या चार पाच दिवसांचे वर्णन करण्यास मी असमर्थ आहे, अन कदाचित याचमुळे दैनंदिनी लिहीता आली नसावी.. जेव्हा मनावर मळभ साठते, जेव्हा स्वतःच स्वतःचे शत्रू असतो, विचारांमध्ये भरकटून जेव्हा अज्ञातात हरवणे होते तेव्हा काहीच करता येत नाही.. अशा अवस्थेतून बाहेर येण्यासाठी स्वतःच स्वतःच्या बेड्या तोडाव्या लागतात, स्वतःच निष्ठूर व्हावे लागते.. स्वतःच स्वतःच्या प्रतिमेचा बुरखा फाडावा लागतो…. एका बाजूला दिवाळीचे मंगलमय वातावरण होते.. तर एका बाजूला मौनामधून उठणारे वादळ होते… एका बाजूला नात्यांचा पसारा होता तर एका बाजूला एकांतातील प्रतिध्वनींचा सुळसुळाट…. आम्हा नवरा-बायकोच्या नात्यामधील भरभराट एका बाजूला उज्वल भविष्याकडे झेपावत होती तर एका बाजूला वास्तवाशी जुळवताना रिचवलेले विषाचे प्याले आठवत होते… एखाद्या गोष्टीतून सुटायचे असेल तर फक्त शारीरिक संदर्भ तुटून साध्य काहीच नसते… मानसिक संदर्भ पुसण्यासाठीच खरी इच्छाशक्ती हवी असते.. काही अक्षरे आपल्या जीवनाच्या फळ्यावर न पुसता येणार्‍या शाईने लिहीलेली असतात.. ती पुसण्याचा निष्फळ प्रयत्न करण्यापेक्षा त्यांची जागा तिथेच सोडून नवी अक्षरे काढणे जास्त हितावह ठरते…. कुणास ठाऊक येणारी नवी अक्षरे कदाचित त्या जुन्या अक्षरांचा प्रभाव पुसून टाकतील? पण जुन्या अक्षरात अडकून आपण येणार्‍या नव्या अक्षरांवर तर अन्याय करत नाही ना हा विचार करणे जास्त योग्य, नाही का?