दैनंदिनी – ०८ जुलै २०२१

दैनंदिनी – ०८ जुलै २०२१

नैतिकता, नितीमत्ता बोलायला जेवढे अवघड कदाचित जगण्यासाठी त्याहुनही जास्त अवघड शब्द आहेत. इतरांनी आपल्याला तोलणे किंवा आपण इतरांचे मोजमाप करणे हे सदैव घडत असते..पण जेव्हा आपण स्वतः खुद्द आपल्यालाच तोलायला जातो किंवा तोलतो तेव्हाच आपल्या न्याय्यपणाची परीक्षा खर्‍या अर्थाने होत असते.. आपण स्वतः तेव्हा आरोपी असतो, आपण पोलिस, आपण वकिल आणि आपणच न्यायमुर्ती असतो.. बघायला गेले तर खुप सरळ हिशोब आहे पण बर्‍याचदा बर्‍याचजणांची अवस्था चोरुन दुध पिणार्‍या मांजरासारखी असते!
मोजमाप करताना वजनकाट्यामध्ये एका बाजूला जेव्हा विशिष्ट वजन ठेवुन त्याच्याबरोबर दुसर्‍या बाजूला इतर गोष्ट तोलणे कदाचित सोपे असते.. कारण कुठे थांबायचे कधी थांबायचे अन किती मोजायचे हे पुर्वनियोजित असते.. पण जेव्हा पहिल्याबाजूला ठेवायला येणार्‍या मापाचे परीमाणच माहित नसेल तेव्हा मग दुसर्‍या बाजूला ठेवण्यात येणार्‍या गोष्टीचे मोजमाप करायचे तरी कसे? ह्याला आपण नैतिकता जपणार्‍यांचा तात्विक गोंधळ म्हणू शकतो किंवा त्यावेळी उद्भवणार्‍या दोलायमान परिस्थितीचा झगडा! कारण तत्वांना किमतीचे लेबल लावणे हा त्या तत्वांचा तर अपमान होईलच पण त्याहीपेक्षा त्या तत्वांना अनुसरुन जगणार्‍या जिवासाठी तो सर्वस्वी त्याच्या अस्तित्वाला किंवा ओळखीला दिलेले आव्हान ठरेल!

आपले प्रतिबिंब जसेच्या जसे परावर्तित करणारा आरसा जेव्हा आपल्या हातातील घड्याळाची वेळ चुकीची सांगतो तेव्हा आपल्याला समजुन घेणार्‍या एखाद्या दुसर्‍या व्यक्तीच्या मनात आपल्याला हवी असलेली आपली प्रतिमा असेल याची खात्री किंवा अपेक्षा ठेवणे म्हणजे निव्वळ धुळफेक ठरेल…

जाणीव आणि अनुभव दोन पुर्णतः वेगळ्या गोष्टी, जाणीव सोप्या शब्दांत म्हणायचे तर न अनुभवता होणारी अनुभुती! हरवलेल्या एखाद्या क्षणाबरोबर त्या क्षणाला मिळालेली अनुभुती हरवते का की एखादी अनुभुती विस्मरणात गेल्यानंतर तो क्षण हरवला असं म्हणतात?? कशापासुन अलिप्त व्हायचं अन कशासाठी अट्टहास करायचा याचा अंदाज घेण्यासाठी अनुभुती आवश्यक नव्हे हवीच! व्यवहारीक जगामध्ये भौतिक सुखांच्या विळख्यात एकदा अडकले की एका भौतिक सुखापासुन दुसर्‍या भौतिक सुखाकडे एवढाच प्रवास सुरु होतो, भौतिक सुखांपेक्षाही दुसरे कुठले सुख आपल्याला आंतरीक मनःशांती देऊ शकेल याचा विचार येता येता आयुष्यातील उर्जेची फक्त थोडी थोडकी सावली आपल्याकडे शिल्लक राहिलेली असते…

प्रवाहाला दैवी कौल मानुन स्वतःची फुटकळ समजुत काढुन त्याबरोबर वाहत जाणे केव्हाच बरोबर ठरणार नाही.. तर प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन उगमाशी एकरुप होणे कधीही आणि केव्हाही संयुक्तिक ठरेल… अन हे कळण्यासाठी लागणारी अनुभुती ज्याची त्याने शोधावी अन ठरवावी!

-निलेश सकपाळ
०८-०७-२०२१

दैनंदिनी ०१ जुलै २०२१

एखादा झोका अनाहुतपणे लक्षात राहतो, ज्या झोक्याबरोबर काळजाचा थरकाप उडाला होता, अस्तित्वाच्या ठिकर्‍या उधळल्या जाऊन सार्‍या भुतकाळाची उजळणी झाली होती, भविष्याबद्दल साशंकता निर्माण झाली होती… कधीतरी निसरड्या वाटेवरुन भक्कम वाटणारा आधाराचा दगड मामुली पापुद्र्याप्रमाणे हातात आला असेल अन ब्रम्हांड आठवले असेल… रस्ता ओलांडताना नखभर अंतरावरुन भरधाव एखादे वाहन आपल्या नकळत आपली वाट कापुन गेल्यानंतर समोर येणारा नजरपट.. एखादी उचकी लागल्यानंतर अडकलेला श्वास जर सुटता सुटत नसेल, हातांची होणारी फडफड कोणापर्यंत पोहचविण्यास असलेली असमर्थता त्या श्वासाचे मोल सांगुन जाते.. तो एक श्वास वजा करुन पुढचे श्वासांचे मोल फक्त आणि फक्त शून्यच!

धापा टाकत जगणारे अन धावुन झाल्यावर धापा टाकत कापलेल्या अंतराचा आस्वाद घेणारे यामध्ये न सांगता येणारा फरक आहे.. स्वप्नांची राखरांगोळी करुन उबेला निवांत झोपणे अन झोपेची कुर्बानी देऊन स्वप्नांची गुढी उभारणारे यामध्ये असलेली विसंगतता जेव्हा अनुभवता येईल, खळबळ होऊन जेव्हा अंतरातील ढवळाढवळ मुर्त स्वरुपात पावलांना ढकलायला सुरुवात करेल तेव्हा आणि तेव्हाच त्या अनुभवलेल्या विसंगततेची खरी रुजवात होईल. किनार्‍यावरुन समुद्र अनुभवता येत नाही तर बिनधास्त खलाशाप्रमाणे जेव्हा आपली नौका त्या लाटांवर स्वार होते, ध्रुवाच्या आधाराने दिशाप्रवास सुरू होतो, ओळख झुगारुन जेव्हा नवं क्षितीज कपाळावरील आणि हातावरील नशिबाला आव्हान देऊ लागते कदाचित तेव्हा आणि तेव्हाच कदाचित समुद्रासारखा मैत्र उलगडू लागेल, बेभरोशाचे वाटणारे वादळ पंखांसारखे वाटू लागेल अन सारे मर्त्य, कुपमंडुक मानव लाटांप्रमाणे क्षणभंगुर वाटू लागतील… आपल्या अस्तित्वाची कदर जेव्हा खुद्द निसर्गालाच घ्यावी लागेल, आपल्यासाठी विशेष घटनांना जन्म द्यावा लागेल.. तेव्हा होणारा आनंद किंवा उन्माद काही औरच असेल!!

आनंदासाठी प्रयत्न करणे.. अन विहीत कर्म करताना आपल्या गळयात माळेप्रमाणे येऊन आनंद बागडणे हा स्वानुभव, स्वानंद कोणत्याही मिठाईपेक्षा सुमधुर, स्वर्गीय असेल यात काहीच शंका नाही… छोटे कुंपण, छोटे विचार अन छोटे स्वप्नं यामध्ये गुरफटुन आयुष्याची कितीतरी वाताहत झाली हे जर उमेद संपल्यावर कळले तर त्याचा काय उपयोग! नात्यांचे जंजाळ, अपेक्षांचे मायाजाळ जर आपलेच पंख छाटत असतील, आपल्याला पावलोपावली ठेचकाळत असतील तर काय करावे? प्रत्येक नाते सुगंधी असेल असे नाही.. अन प्रत्येक सुगंधी गोष्ट आपली होईलच असे नाही.. जे आहे त्याला नव्या आयामांची कल्हई देता आली तर ठीक नाही तर आपल्या स्वप्नांची, प्रयत्नांची झेप एवढी व्यापक हवी सगळे अनियमित ढोबळ जगणे प्रवाही होईल, प्रत्येकाला जगण्याचा उद्देश देईल.. आपण नाही तर आपल्या जगण्याचा पट दिपस्तंभ होईल!

आपल्या प्रामाणिक खस्ता वारीत चाललेल्या वारकर्‍यांप्रमाणे टाळ-चिपळीतील आर्त साद होऊन पांडुरंगाच्या त्या विधात्याचा चरणांशी आपल्याला मार्गस्थ करतील एवढे मात्र नक्की!!

-निलेश सकपाळ

दैनंदिनी – ०६ आणि ०७ ऑक्टोबर २००९

एखाद्या प्रश्नाच्या उत्तरासाठी जर आयुष्य खर्ची करावे लागणार असेल तर? अन तरीही त्या उत्तराची शाश्वती मिळणार नसेल तर? कुणास ठाऊक एखाद्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे ‘आणखी एक प्रश्न’ असायचा? प्रश्नांमध्ये भरकटणे मला कधीच जमले नाही.. प्रश्नांची सोबत असते, ती नाकारता येत नाही वा तिचे असणे गरजेचेच असते.. या शोधार्थ आयुष्य जगणेही उचित असते… पण कोणता प्रश्न स्वीकारायचा अन कोणता प्रश्न किती महत्वाचा ठरवायचा याचे सर्व अधिकार मात्र हे आपल्यावर असतात.. कुणाला कशाला बर्‍याच जणांना वैयक्तिक प्रश्नांचे शाप असतात.. वैयक्तिक आयुष्यातून बाहेर डोके काढायला मिळत नाही..  माझे आयुष्य, माझा संसार अन माझे कर्तृत्व इथे अन इथेच आयुष्याच्या शेवटच्या क्षणांवर येऊन थांबणे होते…. यात गैर काहीच नाही… पण नेहमीच वाटते की हे तर सगळ्यांच्याच नशिबी आहे.. जरी कितीही नाकारले किंवा कितीही धुडकावले तरी माझे प्रश्न माझेच राहणार, माझा संसार, माझे कर्तृत्व याचा बोझा मलाच वहावा लागणार.. त्यापासून काही सुटका नाही… मग वाटते की हे अशा धोपटमार्गावर जगायचे म्हणजे खरेच योग्य आहे का? की आपल्या वर्तुळाच्या परिघाबाहेरील एखादे उद्दिष्ट जगण्याचा उद्देश करुन घ्यावे अन जगणे सफल करावे… माहीत नाही, नेहमीच हा पर्याय जास्त योग्य वाटतो अन नेहमीच नव्याने स्वीकारला जातो वा डोक्यात भिनला जातो… अगदी लहानपणापासून या मतामध्ये कुठेही फरक नाही पडला… ना शिक्षणाची पूर्तता करताना फरक पडला ना जगातील वेगवेगळ्या ठिकाणी गेल्या काही वर्षामध्ये काम करताना फरक पडला… ना जगातील वेगवेगळ्या भाषिक लोकांशी बोलताना वा त्यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध जपताना जोपासताना फरक पडला…  उलट यामुळे एक वेगळाच विश्वास मनात भरीस होता.. कितीतरी लोकांमध्ये हा विश्वास मी पाहीला व त्यांना तो जगताना पाहीला… आपल्या देशामध्ये या जगण्याला जिथे दुर्मिळतेचे लेबल आहे तिथे कितीतरी देशांमध्ये याला वेगळं असं काही स्थान नाही कारण तो त्यांच्या जगण्याचाच भाग आहे… अगदी नायजेरीया, लिबया, आयर्लंड, दक्षिण आफ्रिका, रशिया, कझाकिस्तान, चीन, इंडोनेशिया, मलेशिया, अमेरिका, इंग्लंड (इथे मुद्दाम आखाती देशांचा उल्लेख केला नाही) अशा कितीतरी देशातील नागरिकांशी बोलणे झाले पण बहुसंख्य वेळाला या सुजाण लोकांकडे एक उद्देश असतो म्हणजे असतोच! आपल्या भारतीयांबद्दल कुठेही टीका करण्याचा हेतू नाही पण बर्‍याचदा आपल्या तरूणांना हा प्रश्न विचारल्यानंतर त्यांच्याकडे उत्तर नसते… का ते माहीत नाही… खासकरुन मुलींमध्ये तर ही ‘मूकता’ जास्त बोलकी असते.. एवढ्या शिक्षणानंतरसुद्धा जगण्याचा काहीच क्रम न ठरवता येणे याला काय म्हणायचे.. आपल्या शैक्षणिक पद्धतीचे अपयश की आपल्या संगोपनात असलेली एक मोठी तूट??.. कळत नाही….

जगण्याचा एक उद्देश असेल तर मात्र नकळत एका वैश्विक तत्वाशी तुम्ही जोडला जाता.. एका वैश्विक भाषेमध्ये तुम्ही सार्‍या जगाशी बोलू शकता…  नुसतेच मी शिकलो, पहील्या नंबराने पास झालो, परदेशात शिकायला आलो, आता यानंतर इथे नोकरी करेन, लग्न करेन, पैसा मिळवेन, दुसर्‍या देशात जाईल, तिथे नोकरी करेन.. मग भारतात घर घेईन, मोठा बंगला बांधेन, आई-बापाला मजेत ठेवेन, त्यांचे पांग फेडेन, मुलांना मोठे करेल… ही असली जर उत्तरं डोक्यात असतील तर नवल नाही… पण दुर्दैव! यात कुठेही ‘उद्देश’ नसतो.. आयुष्याच्या पन्नाशीमध्येही जरी हा प्रश्न विचारला तरी उत्तरं ठरलेली असतात… घरी बसेन, पेंशन खाईन, नातवंडांना खेळवेन, हे करेन अन ते करेन… तेव्हासुद्धा काही वेगळे करेन हे उत्तर अशक्य! म्हणजे जेव्हा करण्याचे, तारुण्याचे दिवस होते तेव्हा केले नाही तर मग म्हातारपणात काय अपेक्षा ठेवावी! या जगातील एक घटक व्हायचे असेल तर मित्रांनो आयुष्याला आकार द्या…. विचार करून मार्ग निवडा… प्रत्येक मार्गावर उन्नती आहे.. डोळे झाकुन ग्लोबलायझेशनच्या लाटेवर झोकून देण्यापेक्षा नवी लाट आणण्याचा प्रयत्न करा… वेगळा उद्देश म्हणजे नक्की काय? हा प्रश्न सहाजिक आहे… तो काहीही असू शकतो… कुणाला देशासाठी काहीतरी करावेसे वाटेल, कुणाला मानवजातीसाठी काही करावेसे वाटेल, कुणाला एखाद्या खेड्यासाठी काही करावेसे वाटेल, कुणाला निसर्गासाठी काही करावेसे वाटेल, कुणाला राजकारणासाठी काही करावेसे वाटेल, कुणाला वातावरणातील बदलांसाठी काही करावेसे वाटेल, कुणाला समाजातील दुर्लक्षितांसाठी काही करावेसे वाटेल, कुणाला प्राण्यांसाठी काही करावेसे वाटेल…. यातले किंवा यापलिकडे बरेचसे पर्याय आहेत… अन नवीन पर्याय स्थापित करणारे जर आपल्यातील कुणी असतील तर त्यासारखे सुदैव नाही! नेहमीच्या आयुष्याला नाकारता येत नाही पण फक्त तेवढेच स्वीकारुन जगण्याच्या वैश्विक वरदानाला नाकरणे चुकीचे नाही का? मला जमत नाही, जमणार नाही, माझ्या शक्यतेपलिकडे आहे, उगीच यामध्ये का पडा? या असल्या गोष्टिंचे विटाळ आता काळाच्या अंधार्‍या खाईत कायमचे झुगारुन द्या… जगण्याला अर्थ द्या.. जगता जगता स्वतः अर्थ होऊन जा.. येणार्‍या पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल असा जीवनपट मांडून जा…

कितीदा तरी स्वतःला अशा परीस्थितीमध्ये पहात असतो जेव्हा जगण्यापेक्षाही फक्त श्वास घेणं चालू असतं…. जिवंत असूनही मृत भावनांचे ओघळ देहावरुन निथळताना मन भानावर नसतं…. जसं निष्पर्ण झाड एक खोड होऊन उभं असतं, जसं कुंकु पुसलेलं विधवेचं कपाळ कुंकवाचा सुगंध शोधत असतं, जत्रेनंतर उत्सवाच्या खुणा जसं एखादं मैदान जपत असतं  तसंच काहीसं कधी कधी तुमचं आमचं झालेलं असतं…. जेव्हा परिस्थितीवर सारं सोडलेलं असतं, वार्‍यावरचं जगणं स्वीकारलेलं असतं….. गेलेल्या क्षणापाशी कुठेतरी मन अडखळलेलं असतं…. भूतकाळाच्या दोरखंडात वर्तमानाला बांधून भविष्यासाठी उत्तर नसतं तेव्हा हतबलतेच्या जगात आपले आगमन झालेलं असतं… अंधार सगळीकडेच असतो.. अगदी निमिषाच्या अंतरावर तर तो असतो.. फक्त पापण्या मिटल्या की अंधारच अंधार…. गेल्या दोन दिवसात या अशा घटनांचा बेबंद वावर माझ्या आसपास होता.. पण त्याचवेळेला प्रत्येक क्षणी आयुष्यभर जपलेला जगण्याचा उद्देश आठवून देण्याचे काम माझ्या पत्नीने व त्या भगवंताच्या नित्य स्मरणाने केले… पूर येतात, दुष्काळ येतात, भूकंप येतात जगण्यापासून भरकटवणारे कितीतरी महाभयंकर अघोरी विचारही मनपटलावर येतात… या सगळ्यातून उभे करते ती त्या वैश्विक मूलतत्वाशी असलेली आपली एकरुपता… सृष्टीतील सृजन शक्तीबरोबर जर आपले संधान असेल तर मग कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्यापेक्षा जास्त आपली काळजी घेतली जाते.. हे अनुभवणे वा ही प्रचिती घेणे यासारखे दुसरे सुख या भूतलावर नाही! फक्त त्यासाठी लागते ती त्या वैश्विक सृजनशक्तीशी गट्टी, बाकी काही नाही!

दैनंदिनी – ०१ ऑक्टोबर २००९‏

मलमली तलम वस्त्राप्रमाणे कोणतेही नाते जपले जावे.. मग ते पती-पत्नीचे असेल वा आई-मुलाचे, भावा-बहीणींचे वा दोन मित्रांचे.. त्याच्या स्पर्शाने वा फक्त स्मरणाने अंगावर आठवणींचे रोमांच उभे रहावेत… ते तलमी वस्त्र घट्ट पकडीतही तेवढेच आल्हाददायक असते जेवढे ते निसटत्या स्पर्शाने आपल्याला उत्फुल्लित करते… भावनांच्या चौकटीत नात्याची घुसमट होऊ नये तर भावनांच्या मुक्त उधळणीला नात्याने उभार द्यावा… अटींवर आधारलेले जगणे तर बाह्यजगात मुकाटपणे जगावेच लागते पण नातेसंबंधात बिनशर्त बागडणे हवे…  विशिष्ट अपेक्षांच्या बांधणीत राहुन वाट लंगडी करण्यापेक्षा अंगी असणार्‍या सुप्त गुणांना शोधुन त्यांचे संवर्धन करणे नात्याने करावे… नाती सहज जोडली जातात पण नाती जोपासणे महत्वाचे… मनात लपलेले बालपण जिथे उघड उघड जगता येते, मनात उफाळलेला रौद्ररस जिथे सुसाट सोडता येतो ते नाते.. जिथे बंधनांपेक्षा बंधनमुक्त असणे स्वीकारले जाते जिथे स्वप्नांना हक्काचे आभाळ मिळते… जिथे मनाच्या चित्र विचित्र कल्पनांना वाव असतो जिथे संशयापेक्षा विश्वास जास्त मज्बुत असतो ते नाते… पहिल्या पावसानंतर उठणारा मातीचा दरवळ जिथे अनंत काळासाठी बद्ध असतो… जिथे आज हा कालपेक्षा सुंदर अन उद्या आजपेक्षा सुंदर असतो ते नाते… जिथे ढसळताना सावरले जाते.. चुकताना डाफरले जाते.. रडताना अश्रुंना हलके वाटते…. पराभवानंतर जिथे लढल्याचा आनंद असतो… पुढच्या विजयासाठी शुभेच्छांचा डोंगर असतो ते नाते.. अशी नाती जगावेगळी नसतात तर ही जगणारी माणसे जगावेगळी असतात!
 
उद्देशाप्रती प्रामाणिक असणार्‍यांना येणार्‍या अनंत अडचणी त्या उद्देशाप्रती आणखी घट्ट बांधुन ठेवतात… पण ज्याकडे उद्देशच नाही अशे लोक या येणार्‍या अडचणीतच भांभावुन जातात.. स्वतःचे सारे मार्ग वा जीवन या अडचणीतुन बाहेर येणे एवढेच मानतात… जगण्याला उद्देश असावा का? बुचकाळ्यात टाकणारा प्रश्न… पण जर थोरामोठ्यांची चरीत्र बघितली तर हेच कळुन येईल की उद्देश माणसाला महान ठरवतो.. तिथे किती आयुष्य जगले याला महत्व नसते… अवघ्या २३ व्या वर्षी फाशीवर जाणार्‍या भगतसिंगांचा उद्देश ‘भारताचे स्वातंत्र्य’ होता व त्या उद्देशाप्रती ते शेवटच्या क्षणापर्यंत प्रामाणिक राहीले… शिवाजी महाराजे.. आयुष्याची अवघी ५३ वर्षे जगले पण आज ४ शतकानंतरसुद्धा व येणार्‍या कित्येक शतकांमध्ये सुद्धा त्यांचे उद्देशाप्रती असणारे प्रेम व त्यांची किर्ती जागृत राहील… मित्रहो, आपल्या आयुष्याला उद्देश आहे का? तो असलाच पाहीजे हे  माझे ठाम मत आहे… फक्त काळाच्या लाटेवर सामान्यपणे स्वतःला झोकुन देऊन हसील काहीच नाही… उद्देश असला पाहीजे अन तो अंगी बाणता आला पाहीजेच.. बर्‍याच जणांचे मत पडते की सामान्य आहोत अन सामान्य माणसाप्रमाणेच आयुष्य जगायचंय उगीचच नस्त्या खटपटींमध्ये नाही पडायचंय… आपण खरेच सामान्य आहोत? आज जर आपण आपल्या व्यवसायीक जीवनामध्ये एवढी प्रगती करु शकलो तरी?? मग एखाद्या खेडुताने काय म्हणावे? की सामान्य म्हणवुन घेऊन वास्तुस्थितीला दुर सारण्याचा प्रयत्न करीत असतो आपण… आपलेच विचारमंथन झाले पाहीजे… बाहेर उत्तरे शोधण्यापेक्षा स्वतःला प्रश्न विचारण्याची हिम्मत अंगात आली पाहीजे… बिकट परीस्थितीला मनासारखे वळवुन त्यातुन आपल्याला हवा असलेला भाग प्राप्त करण्याची धमक अंगी आली पाहीजे व त्यासाठी प्रयत्नशील असलेच पाहीजे!
 
वाळवंटामधील प्रत्येक रेतीच्या कणाला अस्तित्व नसतेच पण बर्‍याच कणांपासुन तयार होणार्‍या रेतीच्या क्षणभंगुर डोंगरांनाही अस्तित्व नसतेच! जर आपल्याकडे उद्देश नसेल आणि आपण इतर उद्देश नसलेल्यांबरोबर जगलो तर आपलेही या वाळवंटातील डोंगराप्रमाणेच होणार यात बिल्कुल शंकाच नाही. समर्थांनी याकरताच म्हंटले आहे ‘सदा संगती सज्जनाची घडो|’ म्हणुनच जर बाकी काहीही करता आले नाही तरी आपली सोबत वा संगत ही तरी आदर्श असावी… मांडवाचे सगळेच बांबु डळमळीत असेल तर तो मांडव ढासळणारच.. तेच जर त्यातील एकच बांबु थोडा डळमळीत असेल तर मात्र तो मांडव इतर मजबुत वाश्यांच्या आधारे उत्तमस्थितीत राहतो… आयुष्याचेही असेच आहे.. जर आपणही भरकटलेल्यांबरोबर राहू तर फक्त भरकटणेच हाती येईल… दुर्दैवाने बाकी काहीच नाही! इथे आपल्यापेक्षाही आपल्या येणार्‍या पिढ्यांचा विचार जास्त व्हावा असे मला वाटते.. पालकांनाच जर वैचारीक बैठक नसेल तर मुलांचे संगोपन आदर्श कसे होईल? कदाचित त्या लहानग्याच्या भविष्याचा मांडव डळमळीत करण्याचे दुर्दैव माथी घेऊन आयुष्य कंठावे लागेल! जिजाऊंनी शिवाजी घडवला… पण याहीआधी जिजाऊ घडलेल्या होत्या हे विसरून कसे चालेल! भविष्यात जर सर्वांगीनदृष्ट्या विकसित नेतृत्व दिसायचे असेल तर पुढे येणार्‍या पिढ्यांना अध्यात्मिक, शारीरीक, मानसिक, तांत्रिक, शैक्षणिक असे सारे पर्याय उप्लब्ध करुन दिलेच पाहीजेत!
 
कालचा दिवस गोंधळात टाकणारा होता… चपळपणा जसा एखाद्या मांजराकडे पिढीजात असतो त्याचप्रमाणेच बहुतेक कालचा दिवस रंग बदलण्यात तरबेज होता… कामाच्या धावपळित दिवस रात्रीमध्ये विश्रांतीला जाईल असे वाटत असतानाच एखाद्या जख्मांच्या वारुळाला धक्का लागून मुंग्याप्रमाणे बर्‍याच वेदना अंगापांगावर जीवंत झाल्या… सुदैवाने त्या क्षणिकच होत्या… त्यातुन जीवाला सोडवुन अलगद रात्रीच्या हवाली केले व दुसर्‍या दिवसासाठी मनाला घट्ट केले!

दैनंदिनी – ९ सप्टेंबर २००९

गुलदस्त्यातल्या फुलांनी कितीही आव आणला तरी फांदीवर फुलणार्‍या टवटवीत फुलाच्या स्वातंत्र्याएवढे सौंदर्य क्वचितच त्यांना दाखवता येईल… सजावटीसाठी वापरण्यात येणार्‍या त्या फुलांचे त्या गुलदस्त्यात असणे सुद्धा अस्थायी असते.. थोडासा जरी कोमेजलेपणा दिसला तरी ती पाकळी वा तो भाग कैचीने कापला जातो… कारण तिथे मूळ उद्देश सजावट असतो फुलांचे संगोपन नाही.. प्रदर्शनामध्ये सौंदर्य मांडावे लागते.. जसे आहे तश्या मूळ स्वरुपाला सहसा सौंदर्य म्हणुन कोणी समोर आणत नाही!… फांदीवर राहून सड्यामध्ये इतर फुलांबरोबर मातीत मिसळून जाण्यातला परमानंद कुठे अन कोमेजून, चुरगळून एखाद्या कचराकुंडीमध्ये वा असेच पायदळी पडण्याचे दुर्भाग्य कुठे!… सध्या आपली अवस्था यावेगळी आहे का?? आपण गुलदस्त्यात आहोत असेच वाटत राहते.. प्रदर्शनाप्रमाणे, बाह्यजगात आपण आपल्याला सगळ्यांसमोर मांडत असतो.. मूळ स्वरुपात काय आहोत किंवा होतो याचा तर विसर पडत चालला आहे…. काही जणांना याची खंत वाटते, काही जणांना हीच जगण्याची रीत वाटते तर काही जणांना असल्या निरर्थक गोष्टींसाठी थांबण्यास वेळ नाही… स्वतःपासून आपण लांब धावत आहोत… आभासासाठी वास्तवाची होळी करीत आहोत… साहस, धैर्य अशा व्याख्यांचा गाशा गुंडाळून वेगवेगळ्या पळवाटा शोधत आहोत… प्रदर्शनासाठी जगत आहोत अन प्रदर्शनांनतर फेकून दिलेल्या, चोथा झालेल्या फुलांच्या पाकळ्यांप्रमाणे संपून जात आहोत…

एखादी लहानपणी हरवून गेलेली गोष्ट जर अगदी वीस-पंचवीस वर्षांनी हाती लागली तर कसे वाटेल? एखादा बालमित्र/मैत्रीण बर्‍याच वर्षानंतर सहज बाजारात फेरफटका मारताना सामोरे आले तर किती आनंद होतो? म्हणजेच काय या गोष्टींशिवाय आपण आयुष्य जगत होतो, या गोष्टींची निकड नव्हती, कुठेही कधीही या गोष्टी हव्या म्हणुन देवाकडे साकडेही नव्हते, या गोष्टींना भेटून पुन्हा काही दिवसांनी नॉर्मल आयुष्य जगताही येते… पण जर यातील एखादी गोष्ट अचानक आपल्यासमोर येताना त्याचवेळेला ती खंगून गेलेली असेल तर.. आपल्यासमोर शेवटचे श्वास घेत असेल तर… आपल्याला न ओळखता अनोळखी चेहर्‍याने आपल्याला न्याहाळत असेल तर.. कोणाचीतरी गरज असतानासुद्धा आपली गरज धुडकावून लावत असेल तर…  मग आपले काय होईल? आपली खरी परीक्षा इथेच तर असते.. या वेळेला आपण काय करतो यावरच माणसाची उपयुक्तता ठरते.. प्रदर्शनीय आयुष्याला छेद देऊन जेव्हा मातीतले आयुष्य जगावे लागते तेव्हाच कसोटी असते… याही सगळ्यात ती हरवलेली गोष्ट दुसरी तिसरी कोण नसुन आपण स्वतःच असू तर????? आपणच आपल्याला गवसलो तर.. बेकल अवस्थेत.. मुखवट्यांच्या ओझ्याखालुनचे विव्हळने जर आपल्या कानी आले तर… होईल का आपली तयारी आपल्या मुखवट्यांना झुगारून आपल्या मूळ स्वरुपाशी एकरुप होण्याची? वैयक्तिक प्रश्न आहे… प्रत्येकाने याचा शोध नक्की घ्यावा.. आपल्याच घरामध्ये आपणच आश्रिताचे आयुष्य कंठत असू, स्वप्नांच्या पंखाना संसाराचे साखळदंड बांधून जमिनीवर सरपटत असू… बर्‍याच भूमिकांमध्ये जगता जगता मुळ रुपात यायला विसरून गेलेलो असू… खूप अवघड अन अग्निदिव्यसे आहे.. पण निश्चयाशी एकरुप होऊन जर उडायचे ठरवले तर श्वासांचे पंख होतात… काळाची धुळ झटकून स्वत्वाशी प्रामाणिक राहणे महत्वाचे!

चालायला सुरुवात करताना जर पुन्हा परत यायचे नाही हे ठाउक असेल तर… सावलीसाठी बसलेले झाडच उन्मळुन पडले तर… भासांमध्ये जगत असताना जर भासच आकाशात विरघळुन गेले तर… झप झप पावले उचलणारे पाय अचानक थांबले तर… विचारांची चक्रे अकस्मात आपल्यालाच तुडवू लागली तर.. भंपक मोहासाठी खर्चिलेल्या अस्तित्वाने जर सर्वनाशासाठी आपल्याकडेच बोट दाखवले तर… काहीही नाही सांगता येत… पुढच्या वळणाचा कितीही अंदाज असला तरी दैवाचा अंदाज आपल्याला कधीच येणार नाही… जिथे समर्पण भावनेने शरण जायचे तिथे जर अहंकारापायी अडून बसलो तर आपल्यासारखे कफल्लक आपणच!

कालचा दिवस असा काही खास नव्हता… दुधावरील साय बोटाने बाजूला करुन जसे आपण दूध घेतो अगदी त्याप्रमाणे काल दिवसाला बाजुला सारुन मी रात्रीकडे झेपावलो… रात्रीला झालेल्या गप्पांमध्ये नेहमीप्रमाणे मन रमुन गेले… आपल्या देशाच्या तरुणाईमध्ये आलेला विचित्र भित्रेपणा किंवा असुरक्षितता यावर सासर्‍यांनी लिहिलेल्या लेखावर चांगल्या गप्पा झाल्या… गप्पांमध्ये कधी वेळ निघून गेला हे देखील आम्हा दोघांना कळाले नाही…!

काही नाती कशी जोडली जातात हे कळत नाही.. कधी अचानक कुणाबद्दल कुणाला इतकी आस्था कशी वाटून जाते? कुणासाठी कुणाचे मन इतके बेकल होऊन कसे जाते?.. अंतराच्या, काळाच्या सार्‍या सीमा ओलांडून कोण कुणाशी कसे जोडले जाते हे अनाकलनीय आहे.. कधीही न भेटलेल्या व्यक्तीसुद्धा फक्त काही शब्दांच्या आधारे इतक्या जवळ येउन निखळ मैत्रीच्या वा संकल्पनेपलिकडील नात्यात गुंफुन जातात हे पाहून मन खर्‍या अर्थाने थक्क होते… काल अशाच एका अनुभवाला सामोरे जाता आले… अशा वेळी आपण मुर्तीमंत साक्षीदार होऊन या सगळ्या गोष्टी अनुभवणे सुद्धा नशिबवान असल्याचे संकेत देऊन जातात हे नक्की!