दिव्यत्व

दिव्यत्व

दाराभोवती सडा तुझ्या चांदण्यांचा,
नकोच मला आभाळ आता,
नकोच पापणीचे मिटणे आता,
श्वासही तुझा भास माळुन येतो,
सोहळाच हा नित्य तुला पांघरण्याचा!

सूर्य होऊन जाईल जणू काजव्याचा,
नकोच उजेड उसना आता,
नकोच सावली तीही आता,
गावही स्वप्नांचा तेजाळुन येतो,
अंतरी वीजकल्लोळ तुझ्या अस्तित्वाचा!

तरंगाशी नाते तुझे तू या लाटालाटांचा,
नकोच कोरडे सागर आता,
नकोच भरती आहोटी आता,
किनारा चालीरीती मोडुन येतो,
प्रवाहात प्रवासी मी तुझ्या दिव्यत्वाचा!!

१२ जून २०२१

दैनंदिनी ०१ जुलै २०२१

एखादा झोका अनाहुतपणे लक्षात राहतो, ज्या झोक्याबरोबर काळजाचा थरकाप उडाला होता, अस्तित्वाच्या ठिकर्‍या उधळल्या जाऊन सार्‍या भुतकाळाची उजळणी झाली होती, भविष्याबद्दल साशंकता निर्माण झाली होती… कधीतरी निसरड्या वाटेवरुन भक्कम वाटणारा आधाराचा दगड मामुली पापुद्र्याप्रमाणे हातात आला असेल अन ब्रम्हांड आठवले असेल… रस्ता ओलांडताना नखभर अंतरावरुन भरधाव एखादे वाहन आपल्या नकळत आपली वाट कापुन गेल्यानंतर समोर येणारा नजरपट.. एखादी उचकी लागल्यानंतर अडकलेला श्वास जर सुटता सुटत नसेल, हातांची होणारी फडफड कोणापर्यंत पोहचविण्यास असलेली असमर्थता त्या श्वासाचे मोल सांगुन जाते.. तो एक श्वास वजा करुन पुढचे श्वासांचे मोल फक्त आणि फक्त शून्यच!

धापा टाकत जगणारे अन धावुन झाल्यावर धापा टाकत कापलेल्या अंतराचा आस्वाद घेणारे यामध्ये न सांगता येणारा फरक आहे.. स्वप्नांची राखरांगोळी करुन उबेला निवांत झोपणे अन झोपेची कुर्बानी देऊन स्वप्नांची गुढी उभारणारे यामध्ये असलेली विसंगतता जेव्हा अनुभवता येईल, खळबळ होऊन जेव्हा अंतरातील ढवळाढवळ मुर्त स्वरुपात पावलांना ढकलायला सुरुवात करेल तेव्हा आणि तेव्हाच त्या अनुभवलेल्या विसंगततेची खरी रुजवात होईल. किनार्‍यावरुन समुद्र अनुभवता येत नाही तर बिनधास्त खलाशाप्रमाणे जेव्हा आपली नौका त्या लाटांवर स्वार होते, ध्रुवाच्या आधाराने दिशाप्रवास सुरू होतो, ओळख झुगारुन जेव्हा नवं क्षितीज कपाळावरील आणि हातावरील नशिबाला आव्हान देऊ लागते कदाचित तेव्हा आणि तेव्हाच कदाचित समुद्रासारखा मैत्र उलगडू लागेल, बेभरोशाचे वाटणारे वादळ पंखांसारखे वाटू लागेल अन सारे मर्त्य, कुपमंडुक मानव लाटांप्रमाणे क्षणभंगुर वाटू लागतील… आपल्या अस्तित्वाची कदर जेव्हा खुद्द निसर्गालाच घ्यावी लागेल, आपल्यासाठी विशेष घटनांना जन्म द्यावा लागेल.. तेव्हा होणारा आनंद किंवा उन्माद काही औरच असेल!!

आनंदासाठी प्रयत्न करणे.. अन विहीत कर्म करताना आपल्या गळयात माळेप्रमाणे येऊन आनंद बागडणे हा स्वानुभव, स्वानंद कोणत्याही मिठाईपेक्षा सुमधुर, स्वर्गीय असेल यात काहीच शंका नाही… छोटे कुंपण, छोटे विचार अन छोटे स्वप्नं यामध्ये गुरफटुन आयुष्याची कितीतरी वाताहत झाली हे जर उमेद संपल्यावर कळले तर त्याचा काय उपयोग! नात्यांचे जंजाळ, अपेक्षांचे मायाजाळ जर आपलेच पंख छाटत असतील, आपल्याला पावलोपावली ठेचकाळत असतील तर काय करावे? प्रत्येक नाते सुगंधी असेल असे नाही.. अन प्रत्येक सुगंधी गोष्ट आपली होईलच असे नाही.. जे आहे त्याला नव्या आयामांची कल्हई देता आली तर ठीक नाही तर आपल्या स्वप्नांची, प्रयत्नांची झेप एवढी व्यापक हवी सगळे अनियमित ढोबळ जगणे प्रवाही होईल, प्रत्येकाला जगण्याचा उद्देश देईल.. आपण नाही तर आपल्या जगण्याचा पट दिपस्तंभ होईल!

आपल्या प्रामाणिक खस्ता वारीत चाललेल्या वारकर्‍यांप्रमाणे टाळ-चिपळीतील आर्त साद होऊन पांडुरंगाच्या त्या विधात्याचा चरणांशी आपल्याला मार्गस्थ करतील एवढे मात्र नक्की!!

-निलेश सकपाळ

दैनंदिनी – ०६ आणि ०७ ऑक्टोबर २००९

एखाद्या प्रश्नाच्या उत्तरासाठी जर आयुष्य खर्ची करावे लागणार असेल तर? अन तरीही त्या उत्तराची शाश्वती मिळणार नसेल तर? कुणास ठाऊक एखाद्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे ‘आणखी एक प्रश्न’ असायचा? प्रश्नांमध्ये भरकटणे मला कधीच जमले नाही.. प्रश्नांची सोबत असते, ती नाकारता येत नाही वा तिचे असणे गरजेचेच असते.. या शोधार्थ आयुष्य जगणेही उचित असते… पण कोणता प्रश्न स्वीकारायचा अन कोणता प्रश्न किती महत्वाचा ठरवायचा याचे सर्व अधिकार मात्र हे आपल्यावर असतात.. कुणाला कशाला बर्‍याच जणांना वैयक्तिक प्रश्नांचे शाप असतात.. वैयक्तिक आयुष्यातून बाहेर डोके काढायला मिळत नाही..  माझे आयुष्य, माझा संसार अन माझे कर्तृत्व इथे अन इथेच आयुष्याच्या शेवटच्या क्षणांवर येऊन थांबणे होते…. यात गैर काहीच नाही… पण नेहमीच वाटते की हे तर सगळ्यांच्याच नशिबी आहे.. जरी कितीही नाकारले किंवा कितीही धुडकावले तरी माझे प्रश्न माझेच राहणार, माझा संसार, माझे कर्तृत्व याचा बोझा मलाच वहावा लागणार.. त्यापासून काही सुटका नाही… मग वाटते की हे अशा धोपटमार्गावर जगायचे म्हणजे खरेच योग्य आहे का? की आपल्या वर्तुळाच्या परिघाबाहेरील एखादे उद्दिष्ट जगण्याचा उद्देश करुन घ्यावे अन जगणे सफल करावे… माहीत नाही, नेहमीच हा पर्याय जास्त योग्य वाटतो अन नेहमीच नव्याने स्वीकारला जातो वा डोक्यात भिनला जातो… अगदी लहानपणापासून या मतामध्ये कुठेही फरक नाही पडला… ना शिक्षणाची पूर्तता करताना फरक पडला ना जगातील वेगवेगळ्या ठिकाणी गेल्या काही वर्षामध्ये काम करताना फरक पडला… ना जगातील वेगवेगळ्या भाषिक लोकांशी बोलताना वा त्यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध जपताना जोपासताना फरक पडला…  उलट यामुळे एक वेगळाच विश्वास मनात भरीस होता.. कितीतरी लोकांमध्ये हा विश्वास मी पाहीला व त्यांना तो जगताना पाहीला… आपल्या देशामध्ये या जगण्याला जिथे दुर्मिळतेचे लेबल आहे तिथे कितीतरी देशांमध्ये याला वेगळं असं काही स्थान नाही कारण तो त्यांच्या जगण्याचाच भाग आहे… अगदी नायजेरीया, लिबया, आयर्लंड, दक्षिण आफ्रिका, रशिया, कझाकिस्तान, चीन, इंडोनेशिया, मलेशिया, अमेरिका, इंग्लंड (इथे मुद्दाम आखाती देशांचा उल्लेख केला नाही) अशा कितीतरी देशातील नागरिकांशी बोलणे झाले पण बहुसंख्य वेळाला या सुजाण लोकांकडे एक उद्देश असतो म्हणजे असतोच! आपल्या भारतीयांबद्दल कुठेही टीका करण्याचा हेतू नाही पण बर्‍याचदा आपल्या तरूणांना हा प्रश्न विचारल्यानंतर त्यांच्याकडे उत्तर नसते… का ते माहीत नाही… खासकरुन मुलींमध्ये तर ही ‘मूकता’ जास्त बोलकी असते.. एवढ्या शिक्षणानंतरसुद्धा जगण्याचा काहीच क्रम न ठरवता येणे याला काय म्हणायचे.. आपल्या शैक्षणिक पद्धतीचे अपयश की आपल्या संगोपनात असलेली एक मोठी तूट??.. कळत नाही….

जगण्याचा एक उद्देश असेल तर मात्र नकळत एका वैश्विक तत्वाशी तुम्ही जोडला जाता.. एका वैश्विक भाषेमध्ये तुम्ही सार्‍या जगाशी बोलू शकता…  नुसतेच मी शिकलो, पहील्या नंबराने पास झालो, परदेशात शिकायला आलो, आता यानंतर इथे नोकरी करेन, लग्न करेन, पैसा मिळवेन, दुसर्‍या देशात जाईल, तिथे नोकरी करेन.. मग भारतात घर घेईन, मोठा बंगला बांधेन, आई-बापाला मजेत ठेवेन, त्यांचे पांग फेडेन, मुलांना मोठे करेल… ही असली जर उत्तरं डोक्यात असतील तर नवल नाही… पण दुर्दैव! यात कुठेही ‘उद्देश’ नसतो.. आयुष्याच्या पन्नाशीमध्येही जरी हा प्रश्न विचारला तरी उत्तरं ठरलेली असतात… घरी बसेन, पेंशन खाईन, नातवंडांना खेळवेन, हे करेन अन ते करेन… तेव्हासुद्धा काही वेगळे करेन हे उत्तर अशक्य! म्हणजे जेव्हा करण्याचे, तारुण्याचे दिवस होते तेव्हा केले नाही तर मग म्हातारपणात काय अपेक्षा ठेवावी! या जगातील एक घटक व्हायचे असेल तर मित्रांनो आयुष्याला आकार द्या…. विचार करून मार्ग निवडा… प्रत्येक मार्गावर उन्नती आहे.. डोळे झाकुन ग्लोबलायझेशनच्या लाटेवर झोकून देण्यापेक्षा नवी लाट आणण्याचा प्रयत्न करा… वेगळा उद्देश म्हणजे नक्की काय? हा प्रश्न सहाजिक आहे… तो काहीही असू शकतो… कुणाला देशासाठी काहीतरी करावेसे वाटेल, कुणाला मानवजातीसाठी काही करावेसे वाटेल, कुणाला एखाद्या खेड्यासाठी काही करावेसे वाटेल, कुणाला निसर्गासाठी काही करावेसे वाटेल, कुणाला राजकारणासाठी काही करावेसे वाटेल, कुणाला वातावरणातील बदलांसाठी काही करावेसे वाटेल, कुणाला समाजातील दुर्लक्षितांसाठी काही करावेसे वाटेल, कुणाला प्राण्यांसाठी काही करावेसे वाटेल…. यातले किंवा यापलिकडे बरेचसे पर्याय आहेत… अन नवीन पर्याय स्थापित करणारे जर आपल्यातील कुणी असतील तर त्यासारखे सुदैव नाही! नेहमीच्या आयुष्याला नाकारता येत नाही पण फक्त तेवढेच स्वीकारुन जगण्याच्या वैश्विक वरदानाला नाकरणे चुकीचे नाही का? मला जमत नाही, जमणार नाही, माझ्या शक्यतेपलिकडे आहे, उगीच यामध्ये का पडा? या असल्या गोष्टिंचे विटाळ आता काळाच्या अंधार्‍या खाईत कायमचे झुगारुन द्या… जगण्याला अर्थ द्या.. जगता जगता स्वतः अर्थ होऊन जा.. येणार्‍या पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल असा जीवनपट मांडून जा…

कितीदा तरी स्वतःला अशा परीस्थितीमध्ये पहात असतो जेव्हा जगण्यापेक्षाही फक्त श्वास घेणं चालू असतं…. जिवंत असूनही मृत भावनांचे ओघळ देहावरुन निथळताना मन भानावर नसतं…. जसं निष्पर्ण झाड एक खोड होऊन उभं असतं, जसं कुंकु पुसलेलं विधवेचं कपाळ कुंकवाचा सुगंध शोधत असतं, जत्रेनंतर उत्सवाच्या खुणा जसं एखादं मैदान जपत असतं  तसंच काहीसं कधी कधी तुमचं आमचं झालेलं असतं…. जेव्हा परिस्थितीवर सारं सोडलेलं असतं, वार्‍यावरचं जगणं स्वीकारलेलं असतं….. गेलेल्या क्षणापाशी कुठेतरी मन अडखळलेलं असतं…. भूतकाळाच्या दोरखंडात वर्तमानाला बांधून भविष्यासाठी उत्तर नसतं तेव्हा हतबलतेच्या जगात आपले आगमन झालेलं असतं… अंधार सगळीकडेच असतो.. अगदी निमिषाच्या अंतरावर तर तो असतो.. फक्त पापण्या मिटल्या की अंधारच अंधार…. गेल्या दोन दिवसात या अशा घटनांचा बेबंद वावर माझ्या आसपास होता.. पण त्याचवेळेला प्रत्येक क्षणी आयुष्यभर जपलेला जगण्याचा उद्देश आठवून देण्याचे काम माझ्या पत्नीने व त्या भगवंताच्या नित्य स्मरणाने केले… पूर येतात, दुष्काळ येतात, भूकंप येतात जगण्यापासून भरकटवणारे कितीतरी महाभयंकर अघोरी विचारही मनपटलावर येतात… या सगळ्यातून उभे करते ती त्या वैश्विक मूलतत्वाशी असलेली आपली एकरुपता… सृष्टीतील सृजन शक्तीबरोबर जर आपले संधान असेल तर मग कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्यापेक्षा जास्त आपली काळजी घेतली जाते.. हे अनुभवणे वा ही प्रचिती घेणे यासारखे दुसरे सुख या भूतलावर नाही! फक्त त्यासाठी लागते ती त्या वैश्विक सृजनशक्तीशी गट्टी, बाकी काही नाही!

दैनंदिनी – ०१ ऑक्टोबर २००९‏

मलमली तलम वस्त्राप्रमाणे कोणतेही नाते जपले जावे.. मग ते पती-पत्नीचे असेल वा आई-मुलाचे, भावा-बहीणींचे वा दोन मित्रांचे.. त्याच्या स्पर्शाने वा फक्त स्मरणाने अंगावर आठवणींचे रोमांच उभे रहावेत… ते तलमी वस्त्र घट्ट पकडीतही तेवढेच आल्हाददायक असते जेवढे ते निसटत्या स्पर्शाने आपल्याला उत्फुल्लित करते… भावनांच्या चौकटीत नात्याची घुसमट होऊ नये तर भावनांच्या मुक्त उधळणीला नात्याने उभार द्यावा… अटींवर आधारलेले जगणे तर बाह्यजगात मुकाटपणे जगावेच लागते पण नातेसंबंधात बिनशर्त बागडणे हवे…  विशिष्ट अपेक्षांच्या बांधणीत राहुन वाट लंगडी करण्यापेक्षा अंगी असणार्‍या सुप्त गुणांना शोधुन त्यांचे संवर्धन करणे नात्याने करावे… नाती सहज जोडली जातात पण नाती जोपासणे महत्वाचे… मनात लपलेले बालपण जिथे उघड उघड जगता येते, मनात उफाळलेला रौद्ररस जिथे सुसाट सोडता येतो ते नाते.. जिथे बंधनांपेक्षा बंधनमुक्त असणे स्वीकारले जाते जिथे स्वप्नांना हक्काचे आभाळ मिळते… जिथे मनाच्या चित्र विचित्र कल्पनांना वाव असतो जिथे संशयापेक्षा विश्वास जास्त मज्बुत असतो ते नाते… पहिल्या पावसानंतर उठणारा मातीचा दरवळ जिथे अनंत काळासाठी बद्ध असतो… जिथे आज हा कालपेक्षा सुंदर अन उद्या आजपेक्षा सुंदर असतो ते नाते… जिथे ढसळताना सावरले जाते.. चुकताना डाफरले जाते.. रडताना अश्रुंना हलके वाटते…. पराभवानंतर जिथे लढल्याचा आनंद असतो… पुढच्या विजयासाठी शुभेच्छांचा डोंगर असतो ते नाते.. अशी नाती जगावेगळी नसतात तर ही जगणारी माणसे जगावेगळी असतात!
 
उद्देशाप्रती प्रामाणिक असणार्‍यांना येणार्‍या अनंत अडचणी त्या उद्देशाप्रती आणखी घट्ट बांधुन ठेवतात… पण ज्याकडे उद्देशच नाही अशे लोक या येणार्‍या अडचणीतच भांभावुन जातात.. स्वतःचे सारे मार्ग वा जीवन या अडचणीतुन बाहेर येणे एवढेच मानतात… जगण्याला उद्देश असावा का? बुचकाळ्यात टाकणारा प्रश्न… पण जर थोरामोठ्यांची चरीत्र बघितली तर हेच कळुन येईल की उद्देश माणसाला महान ठरवतो.. तिथे किती आयुष्य जगले याला महत्व नसते… अवघ्या २३ व्या वर्षी फाशीवर जाणार्‍या भगतसिंगांचा उद्देश ‘भारताचे स्वातंत्र्य’ होता व त्या उद्देशाप्रती ते शेवटच्या क्षणापर्यंत प्रामाणिक राहीले… शिवाजी महाराजे.. आयुष्याची अवघी ५३ वर्षे जगले पण आज ४ शतकानंतरसुद्धा व येणार्‍या कित्येक शतकांमध्ये सुद्धा त्यांचे उद्देशाप्रती असणारे प्रेम व त्यांची किर्ती जागृत राहील… मित्रहो, आपल्या आयुष्याला उद्देश आहे का? तो असलाच पाहीजे हे  माझे ठाम मत आहे… फक्त काळाच्या लाटेवर सामान्यपणे स्वतःला झोकुन देऊन हसील काहीच नाही… उद्देश असला पाहीजे अन तो अंगी बाणता आला पाहीजेच.. बर्‍याच जणांचे मत पडते की सामान्य आहोत अन सामान्य माणसाप्रमाणेच आयुष्य जगायचंय उगीचच नस्त्या खटपटींमध्ये नाही पडायचंय… आपण खरेच सामान्य आहोत? आज जर आपण आपल्या व्यवसायीक जीवनामध्ये एवढी प्रगती करु शकलो तरी?? मग एखाद्या खेडुताने काय म्हणावे? की सामान्य म्हणवुन घेऊन वास्तुस्थितीला दुर सारण्याचा प्रयत्न करीत असतो आपण… आपलेच विचारमंथन झाले पाहीजे… बाहेर उत्तरे शोधण्यापेक्षा स्वतःला प्रश्न विचारण्याची हिम्मत अंगात आली पाहीजे… बिकट परीस्थितीला मनासारखे वळवुन त्यातुन आपल्याला हवा असलेला भाग प्राप्त करण्याची धमक अंगी आली पाहीजे व त्यासाठी प्रयत्नशील असलेच पाहीजे!
 
वाळवंटामधील प्रत्येक रेतीच्या कणाला अस्तित्व नसतेच पण बर्‍याच कणांपासुन तयार होणार्‍या रेतीच्या क्षणभंगुर डोंगरांनाही अस्तित्व नसतेच! जर आपल्याकडे उद्देश नसेल आणि आपण इतर उद्देश नसलेल्यांबरोबर जगलो तर आपलेही या वाळवंटातील डोंगराप्रमाणेच होणार यात बिल्कुल शंकाच नाही. समर्थांनी याकरताच म्हंटले आहे ‘सदा संगती सज्जनाची घडो|’ म्हणुनच जर बाकी काहीही करता आले नाही तरी आपली सोबत वा संगत ही तरी आदर्श असावी… मांडवाचे सगळेच बांबु डळमळीत असेल तर तो मांडव ढासळणारच.. तेच जर त्यातील एकच बांबु थोडा डळमळीत असेल तर मात्र तो मांडव इतर मजबुत वाश्यांच्या आधारे उत्तमस्थितीत राहतो… आयुष्याचेही असेच आहे.. जर आपणही भरकटलेल्यांबरोबर राहू तर फक्त भरकटणेच हाती येईल… दुर्दैवाने बाकी काहीच नाही! इथे आपल्यापेक्षाही आपल्या येणार्‍या पिढ्यांचा विचार जास्त व्हावा असे मला वाटते.. पालकांनाच जर वैचारीक बैठक नसेल तर मुलांचे संगोपन आदर्श कसे होईल? कदाचित त्या लहानग्याच्या भविष्याचा मांडव डळमळीत करण्याचे दुर्दैव माथी घेऊन आयुष्य कंठावे लागेल! जिजाऊंनी शिवाजी घडवला… पण याहीआधी जिजाऊ घडलेल्या होत्या हे विसरून कसे चालेल! भविष्यात जर सर्वांगीनदृष्ट्या विकसित नेतृत्व दिसायचे असेल तर पुढे येणार्‍या पिढ्यांना अध्यात्मिक, शारीरीक, मानसिक, तांत्रिक, शैक्षणिक असे सारे पर्याय उप्लब्ध करुन दिलेच पाहीजेत!
 
कालचा दिवस गोंधळात टाकणारा होता… चपळपणा जसा एखाद्या मांजराकडे पिढीजात असतो त्याचप्रमाणेच बहुतेक कालचा दिवस रंग बदलण्यात तरबेज होता… कामाच्या धावपळित दिवस रात्रीमध्ये विश्रांतीला जाईल असे वाटत असतानाच एखाद्या जख्मांच्या वारुळाला धक्का लागून मुंग्याप्रमाणे बर्‍याच वेदना अंगापांगावर जीवंत झाल्या… सुदैवाने त्या क्षणिकच होत्या… त्यातुन जीवाला सोडवुन अलगद रात्रीच्या हवाली केले व दुसर्‍या दिवसासाठी मनाला घट्ट केले!

दैनंदिनी – २९ सप्टेंबर २००९‏

अट्टहास करूनही जगणे मनासारखे होत नाही… जिथे पाऊल ठेवायचे तिथे जमीन सापडत नाही… स्वप्नांचे पंख छाटल्यासारखे वाटतात… भूलभुलैय्यामध्ये आत्मभान गमावून विचारांच्या साखळीमध्ये जेरबंद झाल्यासारखे वाटते… सापशीडीच्या खेळासारखे अगदी शेवटच्या घरातील सापाने गिळून पुन्हा सुरुवातीला फेकल्यासारखे वाटते… धोब्याच्या धोपटण्याने धोपटल्याप्रमाणे व त्या कपड्यातील बिचार्‍या पाण्याच्या थेंबांप्रमाणे उधळल्यासारखे वाटते… तोंड रंगवून झाल्यावर तेवढ्याच आवडीने तोंडात घेतलेल्या पानाला पिचकारीत थुंकून दिल्यासारखे वाटते… फळ्यावर खडुने लिहीताना सरसर पडणार्‍या धूलिकणांप्रमाणे आयुष्याच्या फळ्यावर उमटण्याआधीच फळ्याबाहेर फेकल्यासारखे वाटते… एखादा आवाज ऐकून सगळे काही विसरून जीवाच्या भीतीने उडणार्‍या असंख्य पाखरांच्या थव्याप्रमाणे जगणे वाटून जाते.. नैराश्य, हतबलता, उदासीनता अगदी रोजचे सवंगडी होऊन गेल्यासारखे फेर घालून नवे खेळ मांडत असतात… जगण्याचे उद्देश, धेय, ध्यास, प्रयत्न, कणखरता, शौर्य या सगळ्या  गोष्टी कालबाह्य होऊन जगण्याच्या शब्दकोषामधुन बेमालुमपणे निघून गेलेल्या असतात… किती भंपक आयुष्य आहे हे! ना जगण्याला अर्थ ना मरण्याला अर्थ, जगण्याचे ओझे जन्मापासून मरणापर्यंत वाहून नेणारी अशी असंख्य गाढवे आपल्या आजुबाजुला सहज सापडतील.. कधी कधी आरशात आपल्या प्रतिबिंबातही सापडेल!

अशावेळी लोकांना हवी असते ती सहानुभुती, दया! … कुणाच्या तरी सावलीमध्ये राहण्याची गरज निर्माण होते आणि खरेतर इथेच याच क्षणाला एका बांडगुळाचा जन्म होतो… अशी बांडगुळे ना कधी स्वतः वृक्ष होऊ शकतात आणि ना कधी वृक्षावाचुन स्वतःचे अस्तित्व दाखवू शकतात.. प्रेरणा जरूर घ्यावी, आदर्शवाद जरूर स्वीकारावा, पण समोरच्याचा प्रगतीचा फॉर्म्युला जसाच्या तसा स्वतःच्या जगण्याला लावताना जरा देवाने दिलेल्या अकलेचा वापर जरूर करावा… समविचारी असणे वेगळे व एखाद्याच्या मागे शेपुट धरून फरफटत धावणे वेगळे!

आजकाल स्वतःला अमुक तमुक नेत्याच्या नावाशी जोडण्याचा तरुणांचा प्रयत्न दिसतो… मित्रांनो, समर्थकांच्या झुंडीमधील मेंढरू होण्यापेक्षा समर्थ व्यक्तिमत्व व्हा… तत्वांचे आदान-प्रदान करणे गरजेचे असते पण एखाद्या ठराविक तत्वांच्या साच्यामध्ये अडकून एक साचेबद्ध कार्यकर्ता तयार होणे हे हास्यास्पद आहे… साच्याच्या आतमध्येही पोकळी राहिली की होणारी कलाकृती ही विक्षिप्त होते… तिला उचलुन फेकून द्यावे लागते… याहीपेक्षा स्वीकारा ते मार्गदर्शन.. प्रत्येकाने प्रत्येकाच्या आभाळाची जाणीव करुन घ्या… आदर्श विचारांचे कोठार मुक्त हस्ताने उपलब्ध करुन घ्या, त्याचा ध्यास घ्या… एकाच उद्देशाला वेगवेगळ्या मार्गाने प्राप्त करता येते हे मान्य करणे गरजेचे आहे… पठडीबंद घोड्याप्रमाणे वागल्यानंतर माणूसही  पुढे आयुष्यभर घोड्यासारखाच वागतो… त्याला निर्णायक अमृतापेक्षाही हरभराच गोड वाटतो… काळानुसार होणारे बदल स्वीकारण्याची वृत्ती अंगीकारलीच पाहीजे… सारासार विचारांची ओळख घेता आली पाहीजे… या घडीला समर्थ नेत्यांची गरज आहे… समर्थ व्यक्तिमत्वातूनच सकस नेत्याची निर्मिती होते… प्रत्येक समर्थ नेता हा उत्तम समर्थक असतो पण एक निष्ठावान समर्थक दुर्दैवाने आदर्श नेता होऊ शकत नाही… पुढाकार घ्या.. काळाला अंगावर घ्या… कळपामध्ये राहून कळपामागे फिरण्यापेक्षा आता कळपाचे अधिभारी व्हा!

देशाचे झालेले अधःपतन आपल्या पिढीला पहावेही लागत आहे व झेलावेही लागत आहे.. याला बदलायचे असेल तर आपल्याला प्रथमतः कात टाकली पाहीजे.. आपल्यातून प्रत्येकाने पुढे येऊन काम केले पाहिजे…. कोणते काम करायचे हे सर्वाधिकार आपल्याकडे आहेत.. असंख्य खेड्यांमधील असंख्य प्रश्न आ वासून उभे आहेत.. खेड्यांना खेड्यांप्रमाणे विकसित केले पाहीजे… वर्षानुवर्षे चालत आलेली आदर्श पंचायत व्यवस्था पुन्हा जोमाने उभारली पाहीजे.. गावाचे शहर करण्यापेक्षा गावला एक ‘स्वयंपूर्ण खेडे’ होणे जास्त गरजेचे आहे… संगणक, इंटरनेट, मोबाईल, या खुप लांबच्या गोष्टी आहेत अजूनही कितीतरी खेड्यांमध्ये पाण्याचे व खाण्याचे राक्षस बळावत आहे… आपण घेतलेल्या ज्ञानाचा वापर देशासाठी नाही झाला तर त्याचे फलित काय? परदेशातील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या विषयांवर काम करणारे आपण काहीना काही बदल नक्कीच घडवू शकतो.. इथे मोबदला पैसा नसेल पण समाधान असेल.. एका गावाला जर त्यांचा स्वाभिमान परत मिळाला तर त्या गावात तयार होणार्‍या पुढच्या कितीतरी पिढ्यांचे भवितव्य सुडौल बनवण्याचे समाधान नक्कीच मिळेल… अगदी प्रत्यक्ष जाऊन नाही जमले तरी अप्रत्यक्ष काम करण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात निर्माण व्हावी हीच त्या भारतमातेचरणी प्रार्थना!

हे मी का लिहीले, हे मला माहीत नाही.. मनातून उठणार्‍या वादळाला शब्दांचे गाव दिले आहे… प्रत्येकाच्या आतमध्ये एक समर्थ नेता व कार्यकर्ता असतो याची खात्री मला आहे अन त्यालाच आवज देण्याचा हा प्रयत्न आहे… मोबदल्यासाठी काम करण्यापेक्षाही समाधानासाठी काम करणार्‍या पिढ्या तयार व्हाव्यात… बदलांना नुसते मान डोलवुन होकार देणार्‍यांपेक्षाही तो बदल अंगी उतरवून समाजातील दुर्लक्षितांपर्यंत पोहचविणार्‍या समर्थ पिढ्या तयार व्हाव्यात असे वाटते म्हणूनच हा खटाटोप!

एखाद्या पोस्ट ऑफिसमध्ये ज्या निराकारपणे व अगदी कशासही घेणे-देणे नसल्याप्रमाणे  तो पोस्टमन एकामागून एका पाकीटावर ठसे उमटवत गठ्ठ्यामध्ये भर पाडत असतो… त्याचप्रमाणे कालचा दिवस होता.. अशाच निराकारपणे मी जगण्याचा ठसा दिवसावर उमटवला अन आयुष्याच्या गठ्ठ्यामध्ये ‘आणखी एक’ म्हणून मागे ढकलला… काही विशेष घडलेच नाही… माझ्याकडून तसा प्रयत्नही झाला नाही… शेवटी वार्‍याबरोबर उडणार्‍या कागदाला कुठे जायचं हे ठरवण्याचा अधिकार नसतोच अगदी तसेच काल कसे जगायचे हे त्या जीवनाला सांगण्याचा अधिकार मला नव्हता! रात्रीशी सलगी करताना पत्नीशी मारलेल्या गप्पांनी कितीतरी प्रमाणात गेल्या दिवसाला त्याचे वैभव परत मिळाले व समाधानाने मला उद्याकडे जाण्याचे आमंत्रण मिळाले!

दैनंदिनी – ११, १२ आणि १३ सप्टेंबर २००९

भावनांचे घोंघावणारे वादळ नेहमीच मन सांभाळू नाही शकत, कधी आपल्यापेक्षाही आपल्या भावनांचा रंग सभोवतालावर पसरून जातो… आनंदात असताना किंवा मस्त मोकळ्या मनाने फिरायला जाताना उल्हासाचे नवे लोळ सूर्यकिरणांमधुन आकाशावर पसरत असल्याचा भास होतो… सोबतीला असलेल्या प्रत्येक गोष्टीतून नाविन्याचा आभास होतो… नेहमीचा वाटणारा रस्ता थोडा आपल्याबरोबर हरवून जातो.. अंतराशी आपला संबंध तुटून जातो… आनंदाचे पूल तयार होऊन या विश्वातून आपण वेगळे होऊन जातो.. तीच ती ऑफिसला जाणारी वाट आता सुखाची नविन कवाडे उघडू लागते.. नेहमी नजरेतून सुटणार्‍या फुलबागा आता वेगवेगळे रंग समोर उधळू लागतात… क्षणांचे झुले होतात अन आनंदाचे हिंदोळे! एका मागून एक ठिकाणी फिरताना नवा हर्ष आपल्याला तिथे सापडून जातो…. वर्षानुवर्षे लाखो, करोडो लोकांनी पाहिलेल्या त्याच त्याच गोष्टींमध्ये आपल्या सुखाचा वाटा अबाधित असतो.. तो आपलाच असतो अन आपलाच राहतो फक्त तो ओळखता आला पाहीजे… किती फिरलो याहीपेक्षा जितके फिरलो तितके भरभरून घेतले की जे उरलेय त्याचे दुःख मनाला शिवत नाही… फिरण्याचा मूळ उद्देश काय असतो हे आपल्या मनाला माहीत असेल तर मग खंत कसलीही वाटत नाही… बरेचदा फिरणे म्हणजे बर्‍याच ठिकाणी हजेरी लावून येणे याला म्हणतात… किती फिरलात यावरुन प्रतिष्ठा ठरविली जाते… पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपल्याला मिळालेला आंतरिक आनंद कधीच कुणी मोजू शकणार नाही…. बाह्य गोष्टींमध्ये रमताना अंतरातील मनाला प्रफुल्लित करणे महत्वाचे… पुढे येणार्‍या बर्‍यावाईट प्रसंगामधून आपल्याला तारून न्यायला आपल्या बाह्य सुखांपेक्षा आपली आंतरीक उर्जा जबाबदार असते हे विसरता कामा नये…

अनिश्चितता सगळ्यांच्याच वाट्याला येते.. प्रत्येकाला ती वेगवेगळी भासते… प्रत्येकाच्या असणार्‍या समस्या निराळ्या असतात.. याचे उत्तरही तसेच आहे कारण प्रत्येकाच्या जगण्याकडुन असलेल्या अपेक्षा वेगवेगळ्या असतात…. प्रत्येकाची स्वप्ने वेगळी आहेत.. प्रत्येकाचे मार्ग वेगळे आहेत… अन कदाचित यामुळेच प्रत्येकाचे दुःख सुद्धा वेगळे असते… पण यातही साम्यता काय असेल तर ती आहे प्रत्येकाची त्या स्वप्नाप्रती असलेली एकनिष्ठा व त्या ध्यासाप्रती असलेले वेड… हो हो वेड हवेच.. जर स्वप्नांना सत्याचा अविष्कार द्यायचा असेल तर मात्र ते वेड हवेच… नसानसात भिनलेले वेड.. शून्यातून विश्वनिर्मिती करणारे वेड… परकीय गुलामगिरीला झुगारून हिंदवी स्वराज्य निर्माण करणारे वेड… स्वातंत्र्याची प्रतिज्ञा करून शत्रुला पेटवणारे वेड… विषम धाग्यांना जोडुन समतेचे वस्त्र विणणारे वेड… एकदा का हे वेड असेल तर मात्र दुःखांची धार बोथट होऊन जाते.. नव्हे त्या दुःखांना ही त्या वेडाची एक धुंदी असते… या दुःखांना गळ्यातून उतरवल्याशिवाय त्या स्वप्नपुर्तीची पहाट क्षितीजावर उगवणार नाही हे चांगले ठाऊन असते त्या वेडाला.. आज आपण कसल्या लेच्या पेच्या दुःखांना कुरवाळून बसलोय… जेव्हा देशाप्रती निष्ठा राखणार्‍यांना हत्तीच्या पायाखाली दिले जायचे, जेव्हा धर्माप्रती एकनिष्ठ राहीलेल्या शंभूराजांना जिभ कापून, डोळ्यात गरम सळ्या घालून मारण्यात यायचे, ऐन तारुण्यात क्रांतिवीरांना फासावर लटकवले जायचे तेव्हाचे दुःख नक्कीच आपल्या आजच्या दुःखापेक्षा श्रेष्ठ असेल ना? की अजूनही आपल्याला म्हणायचे आहे की तो काळ वेगळा होता म्हणुन?? तेव्हा मान कापताना होणार्‍या वेदना आज मान कापताना होणार नाहीत का? सगळे सारखेच आहे बदलले आहे ते स्वप्न व त्या स्वप्नाची व्याख्या! आता स्वप्नांची विभागणी झाली आहे, प्रत्येकाचे वेगवेगळे स्वप्न झाले आहे .. कधीतरी पुन्हा सर्व तरुणांचे स्वप्न ‘उज्वल भारत’ व्हावे.. पुन्हा ते एकजुटीचे गीत दुमदुमावे असे मनोमन वाटते! आपल्या हयातीत पुन्हा तो भारत तारुण्याने व नवनिर्मितीच्या त्वेषाने एकत्र उसळलेला बघता यावे असे मात्र सारखे वाटते!

गेल्या तीन दिवसांचा आलेख वेगळाच होता… गर्दीमध्ये दाटीवाटीने उभ्या असलेल्या यात्रिकांप्रमाणे तीनही दिवस अगदी दाटीवाटीने एकत्र आले… अन प्रभुचरणी मस्तक ठेऊन धन्य झाले व पूर्ण समाधानाने येणार्‍या आठवड्याला वाट करून देऊन गेले… लंडनमध्ये फिरताना नेहमी वाटते की हे असे आपल्या देशात का नाही? इथे असणारी प्रत्येक गोष्ट तशीच किंवा त्याही पेक्षा जास्त प्रमाणात आपल्या इथे आहे मग आपण असे का नाही? याचे उत्तर एवढेच सापडते की या लोकांचे सर्वसमावेशक उद्दिष्ट ‘एक’ आहे ते म्हणजे उज्वल भविष्याचे… येणार्‍या पिढ्यांसाठी आदर्श सोडण्याचे… नियमांमधून समाजोन्नती साधण्याचे… अन कदाचित इथेच आपण मागे पडतो.. आपल्याकडे या अशा ‘एक’ उद्देशाची वानवा दिसून येते व त्याहीपेक्षा दिसून येते ती कुरघोडी वृत्ती… कुरघोडी चांगल्या गोष्टींतही होऊ शकते पण कदाचित दूरदृष्टीने पाहणार्‍या नेत्याची खरी गरज आजच्या घडीला भारताला आहे.. जातीव्यवस्था ही भारतीय समाजाला लागलेला शाप आहे हे सगळ्यांना मान्य आहे पण कोणी जातीव्यवस्था निर्मूलन करण्याचे उद्दीष्ट ठेऊन समोर येत नाहीत तर समोरून मतांच्या नावावर जातींना वेगळे करून स्वतःची भाकरी भाजणारे कंपुबाज नेते जन्माला येत आहेत… जगाच्या या स्पर्धेत आपल्याला धावायचे आहे तर या जातीव्यवस्थेच्या कुबड्या फेकून धावावे लागले… कुबड्या घेऊन धावणे म्हणजे फक्त धावतोय हे भासवणे होईल स्वतःचे स्वतःला… जगाने कधीच या गतकाळाच्या कुबड्यांना सर्वसंमतीने झुगारले आहे… आपण मात्र ओल्या गोनपाटाप्रमाणे त्याला धरून बसलो आहोत.. तरुण पिढीने तरी या गोष्टी ध्यानात घेऊन या गंज लागलेल्या प्रगतीच्या चाकांमध्ये सुधारणेचे वंगण घालावे हीच प्रभुचरणी प्रार्थना!!