सोहळा

सोहळा

कुणास गमते आज, कुणा गमले आधी
एकांतात सुख आहे, एकांतात ती समाधी!

मुकपणाचे दाह इथे, सोनफुले होऊन गेले
सुगंधात ऐब आहे, सुगंधात ती खुमारी!

निसर्ग घाली थैमान, आपुलाच वाटे कोणी
उद्रेकात क्रांती आहे, उद्रेकात ती भरारी!

ओसरीत चंद्र पोरका, घरात कैद आभाळ
समाजात मान आहे, समाजात ती निलामी!

इतिहास मग जेत्यांचा, डावलुन साहेब जातो
भविष्यात घात आहे, भविष्यात ती गुलामी!

अजुन जिवंत मिठीत, तुझ्या भेटीचे पुरावे
विरहात नशा आहे, विरहात ती शिसारी!

शब्दही अजब शहाणे, मौनात उमटती तराणे
गोंधळात गाव आहे, गोंधळात ती बिचारी!

चुकुन हसलीस काल, मैफिलीत काजव्यांच्या
क्षणार्धात ठप्प आहे, क्षणार्धात ती प्रवाही!

हृदयाचा चुकला ठेका, बेताल ही जिंदगानी
पायामध्ये चाळ आहे, पायामध्ये ती तबाही!

तोलून श्वास हयातभर, हतबल राजा शेवटी
संभ्रमात मृत्यू आहे, संभ्रमात ती उपाधी!

भेटण्यास आले मला, न भेटणारे लोक जेव्हा
सोहळा तो तृप्त आहे, सोहळ्यात मी उपाशी!

२३जून२०२१

दैनंदिनी – २५, २६, २७ आणि २८ सप्टेंबर २००९

भांडणाची सुरुवात नाही तर भांडणाचा शेवट महत्वाचा असतो! कदाचित असंख्य जोडप्यांना याची मज्जा लगोलग कळून येईल… एखाद्या सरोवरामध्ये एकाचवेळी असंख्य कमलपुष्पांनी उमलल्यानंतरचा अत्यानंद काय असतो हे आपला प्रियकर भांडल्यानंतर शांत होताना हळूच हसताना कळून जाते… पहाटेच्या समयी नवजीवनाची सुरुवात कराणारी प्रभा डोंगरावरुन घरंगळत जेव्हा फटीफटीतून लोकांच्या आयुष्यात प्रवेश करते त्यावेळचे प्रसन्न वातावरण ओंजळीत आल्याची भावना त्यावेळेला मिळते! भांडताना उफ़ाळलेला मनसागर जेव्हा किनार्‍याच्या पायाशी येऊन शांतपणे एखाद्या कुत्र्याच्या पिल्लाप्रमाणे खेळू लागतो… कोसळणार्‍या पावसाची भीती जाऊन जेव्हा त्यामध्ये भिजण्याचा मोह होतो तेव्हा तोच पाऊस आपला सखा सोबती वाटतो.. अगदी तसेच या भांडणांचे नाही का.. आणि म्हणूनच भांडणाचा शेवट महत्वाचा ठरतो.. नदीमध्ये दगड मारून पाणी गढुळ करण्यापेक्षाही शांतपणे किनार्‍याला बसून पाण्याचे तरंग अंगावर अनुभवणे जास्त मनोहारी असते! अशीच काहीशी भांडणे आपली आपल्याशीही होतात.. मग उत्तर कुठे शोधावे कळत नाही…. मन नुसते सैरभैर असते.. अगदी एखादा दिवा जसा भकभक करत जळत असतो त्याप्रमाणे… त्याच्या वातीवर जर थोडीशी काजळी राहीली तरी तो जोरात तेजाळतो त्या काजळीस जाळून पुन्हा मंदपणे जळू लागतो.. बस्स! आपलेही असेच, जेव्हा आपल्या नित्य व्यवहारांमध्ये जगत असताना वा अध्यात्मात वावरत असताना जेव्हा प्रश्नांची काजळी येते.. किंवा आपल्याच विचारातून प्रश्न निर्माण होतात तेव्हा सैरभैर अवस्था होते व त्या दिव्याप्रमाणे तेजाळून उठतो… पण त्याचवेळेला त्या जळण्यावर विश्वास हवा.. तेवढेच काही क्षण तेजाळून घेण्याची तयारी हवी! तेव्हाच जर नांगी टाकली तर आपण त्या काजळीसवे जगू व कालांतराने विझणे हाती येईल… बाकी काही नाही!

वाट सोडून चालावेसे वाटणे नवीन नाही… प्रत्येकालाच नवीन वाट तयार करावीशी वाटते… काही जणांना तो आशिर्वादही असतो.. की ते जिथे उभे राहतात तिथे वाट सुरू होते… मग अशावेळी नव्या वाटेची वळणेही नवीच असणार.. कुणीही, कधीही न अनुभवलेली.. त्याचा कोणताही पूर्वानुभव ऐकीवात नसेल ना कुठे कुणाच्या संदर्भात… तेव्हा या नवीन वळणांत स्वतःला घट्ट बांधून ठेवण्याची जबाबदारी देखील आपणच स्वीकारली पाहीजे… नवीन वाटा जशा लोकांना रुचत नाहीत तसेच नवीन वाटांना नवीन पावले रुचत नाहीतच.. तिथे परीक्षा घेतलीच जाते… कदाचित तिथे जबाबदारी असते ती मागून आपल्या पावलांवर पाऊल ठेवत येणार्‍या असंख्य वाटसरूंच्या भवितव्याची! आणि त्यामुळेच वाट आधी आपल्या नवखेपणाला पारखून घेणारच.. उगीचच भ्रमात वावरणार्‍या स्वप्नपाखरांनी नव्या वाटेचा ध्यास घेऊ नये… जिथे वास्तवाच्या चाबकाने पूर्वाश्रमीचे रटाळवादाचे कातडे सोलले जाते तेव्हाच तिथे भविष्याची नवीन सोनेरी कांती बहाल होते!

विश्वनिर्मितीपासून ते आजतागायत अंधाराचे मनोगत त्या रात्रीस उलगडले नाही… रात्र आपली त्या गुप्तधनाला पोटात घेऊन जगाच्या फेर्‍या करीत आहे… कदाचीत मर्यादित वेळेने तिला बांधले आहे.. ती अंधाराची उकल करण्याचा कदाचित रोज प्रयत्नही करीत असेल पण एकदा का तांबडं फुटलं की रात्रीस निघणे क्रमप्राप्त होते… अन ते गुप्तधन उजेडात नाहीसे होते… आपलेही असेच नाही का त्या रात्रीप्रमाणे… आपणही तर गुप्त धनाचा हंडा घेऊन जगतो आहोत… कधी कधी त्याला शोधण्याचा मर्यादित प्रयत्नही करतो पण आपला पाठपुरावा कुठेतरी कमी राहतो… कधी अट्टहासाने बसावे म्हंटले तर ध्यान लागेपर्यंत रोजंदारीची कामे मागे लागतात व पुन्हा त्या रात्रीची जाणीव संपून या भौतिकाच्या उजेडात आपण लख्ख होतो… या गुप्त धनाची खासीयतच अशी की ते उजेडात पहायला गेले तर कधीच हाती लागणार नाही, जवळ असूनही ते खूप लांब असते… ‘गुप्त धन’ म्हणजे काय हा प्रश्न येणं सहज शक्य आहे.. पण या प्रश्नाचे उत्तर तोच सांगू शकेल जो त्याचा अधिकारी आहे.. अन त्याच्याकडे त्यासाठीच अन केवळ त्यासाठीच धाव घेतली पाहीजे… जसे तहान लागल्यानंतरच पाण्याचा शोध घेतला जातो.. तसेच या गुप्त धनाचे आहे.. जेव्हा ते हवे आहे याची तहान जागृत होईल त्याचवेळी ते पाणी पिल्यानंतरची येणारी आकंठ संतृप्त अवस्था नखशिखांत अनुभवता येईल…

गेले चार दिवस खरेतर दैनंदिनी नाही लिहीली… लिहावेसेही वाटले पण मग वेळ जुळून आली नाही किंवा काहीतरी कारणास्तव पुढे जाते राहीले… नुसते श्वास घेणे म्हणजे जगणे का? की नुसते एका दिवसामागून दुसर्‍या दिवसाकडे जाणे म्हणजे जगणे का? कळत नाही… गेल्या चार दिवसात हे प्रश्न बर्‍याचदा टपली मारुन गेले.. सण येतात नी जातात.. पण एका सणाला केलेला संकल्प दुसर्‍या सणाला किती पूर्ण झालाय याचा दुर्दैवाने कधीही अंदाज घेतला जात नाही.. श्रीरामाच्या रुपाने भगवंताने देहात असताना रावणाचा खातमा केला पण त्यानंतर आपल्यातील राम कितीवेळा जागृत झाला हा प्रश्न वादातीत आहे! गेले चार दिवस संथ होते… निवांत होते… ओल्या मातीच्या भांड्यावरून कुंभाराने सफाईने ओला हात फिरवावा व त्याला शेवटचा हावा तो आकार मिळावा त्याप्रमाणे होते… ओल्या तांदळाच्या भाकरीवर तव्यावर टाकून पाण्याचा हात फिरवून ज्याप्रमाणे आपण भाकरीच्या भेगा मिटवतो त्याचप्रमाणे हे चार दिवस होते…. प्रभु आशिर्वादाचा ओला हात या भेगाळलेल्या आयुष्यावर अशाच रीतीने फिरला व सारेकाही सुरळीत असल्याची खात्री झाली… तरूणाईचा काळ हा उमेदीचा असतो यात काही शंकाच नाही.. पण त्याचवेळी मनाला योग्य त्या संस्कारांचा अभिषेक झाला नाही तर भविष्याचा मनोरा कच्चा बनतो वा त्याचा पाया ठिसूळ होतो… परंपरा म्हणजे खुळचट थोतांड नव्हे… ज्यांना परंपराच नाही त्यांनी म्हणजेच पाश्चिमात्यांनी अंदाधुंदीने वागले तर नवीन ते काय! पण तेच जर भारतीय तरुणाई परंपरा नाकरुन, तिला लाथ मारुन या पाश्चिमात्यांचे अनुकरण केले तर त्यांच्यासारखे दुर्दैवी आणखी कोणीच नाही! सध्या हे दृश्य अगदी रोजचे झाले असले तरी एक मात्र वाटत राहते… येणारी पिढी कधीतरी आपल्या परंपरेचा ध्यास घेईल.. त्यांना प्रश्न पडतील की इथे ज्ञानेश्वर माऊली कसे काय निर्माण झाले? इथे संत रामदास स्वामी, छत्रपती शिवाजी, लोकमान्य, सावरकर कसे काय उदयास आले?.. तेव्हाच आणि तेव्हाच खरे “सीमोल्लंघन” होईल आणि विजयादशमी साजरी होईल!

दैनंदिनी – ११, १२ आणि १३ सप्टेंबर २००९

भावनांचे घोंघावणारे वादळ नेहमीच मन सांभाळू नाही शकत, कधी आपल्यापेक्षाही आपल्या भावनांचा रंग सभोवतालावर पसरून जातो… आनंदात असताना किंवा मस्त मोकळ्या मनाने फिरायला जाताना उल्हासाचे नवे लोळ सूर्यकिरणांमधुन आकाशावर पसरत असल्याचा भास होतो… सोबतीला असलेल्या प्रत्येक गोष्टीतून नाविन्याचा आभास होतो… नेहमीचा वाटणारा रस्ता थोडा आपल्याबरोबर हरवून जातो.. अंतराशी आपला संबंध तुटून जातो… आनंदाचे पूल तयार होऊन या विश्वातून आपण वेगळे होऊन जातो.. तीच ती ऑफिसला जाणारी वाट आता सुखाची नविन कवाडे उघडू लागते.. नेहमी नजरेतून सुटणार्‍या फुलबागा आता वेगवेगळे रंग समोर उधळू लागतात… क्षणांचे झुले होतात अन आनंदाचे हिंदोळे! एका मागून एक ठिकाणी फिरताना नवा हर्ष आपल्याला तिथे सापडून जातो…. वर्षानुवर्षे लाखो, करोडो लोकांनी पाहिलेल्या त्याच त्याच गोष्टींमध्ये आपल्या सुखाचा वाटा अबाधित असतो.. तो आपलाच असतो अन आपलाच राहतो फक्त तो ओळखता आला पाहीजे… किती फिरलो याहीपेक्षा जितके फिरलो तितके भरभरून घेतले की जे उरलेय त्याचे दुःख मनाला शिवत नाही… फिरण्याचा मूळ उद्देश काय असतो हे आपल्या मनाला माहीत असेल तर मग खंत कसलीही वाटत नाही… बरेचदा फिरणे म्हणजे बर्‍याच ठिकाणी हजेरी लावून येणे याला म्हणतात… किती फिरलात यावरुन प्रतिष्ठा ठरविली जाते… पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपल्याला मिळालेला आंतरिक आनंद कधीच कुणी मोजू शकणार नाही…. बाह्य गोष्टींमध्ये रमताना अंतरातील मनाला प्रफुल्लित करणे महत्वाचे… पुढे येणार्‍या बर्‍यावाईट प्रसंगामधून आपल्याला तारून न्यायला आपल्या बाह्य सुखांपेक्षा आपली आंतरीक उर्जा जबाबदार असते हे विसरता कामा नये…

अनिश्चितता सगळ्यांच्याच वाट्याला येते.. प्रत्येकाला ती वेगवेगळी भासते… प्रत्येकाच्या असणार्‍या समस्या निराळ्या असतात.. याचे उत्तरही तसेच आहे कारण प्रत्येकाच्या जगण्याकडुन असलेल्या अपेक्षा वेगवेगळ्या असतात…. प्रत्येकाची स्वप्ने वेगळी आहेत.. प्रत्येकाचे मार्ग वेगळे आहेत… अन कदाचित यामुळेच प्रत्येकाचे दुःख सुद्धा वेगळे असते… पण यातही साम्यता काय असेल तर ती आहे प्रत्येकाची त्या स्वप्नाप्रती असलेली एकनिष्ठा व त्या ध्यासाप्रती असलेले वेड… हो हो वेड हवेच.. जर स्वप्नांना सत्याचा अविष्कार द्यायचा असेल तर मात्र ते वेड हवेच… नसानसात भिनलेले वेड.. शून्यातून विश्वनिर्मिती करणारे वेड… परकीय गुलामगिरीला झुगारून हिंदवी स्वराज्य निर्माण करणारे वेड… स्वातंत्र्याची प्रतिज्ञा करून शत्रुला पेटवणारे वेड… विषम धाग्यांना जोडुन समतेचे वस्त्र विणणारे वेड… एकदा का हे वेड असेल तर मात्र दुःखांची धार बोथट होऊन जाते.. नव्हे त्या दुःखांना ही त्या वेडाची एक धुंदी असते… या दुःखांना गळ्यातून उतरवल्याशिवाय त्या स्वप्नपुर्तीची पहाट क्षितीजावर उगवणार नाही हे चांगले ठाऊन असते त्या वेडाला.. आज आपण कसल्या लेच्या पेच्या दुःखांना कुरवाळून बसलोय… जेव्हा देशाप्रती निष्ठा राखणार्‍यांना हत्तीच्या पायाखाली दिले जायचे, जेव्हा धर्माप्रती एकनिष्ठ राहीलेल्या शंभूराजांना जिभ कापून, डोळ्यात गरम सळ्या घालून मारण्यात यायचे, ऐन तारुण्यात क्रांतिवीरांना फासावर लटकवले जायचे तेव्हाचे दुःख नक्कीच आपल्या आजच्या दुःखापेक्षा श्रेष्ठ असेल ना? की अजूनही आपल्याला म्हणायचे आहे की तो काळ वेगळा होता म्हणुन?? तेव्हा मान कापताना होणार्‍या वेदना आज मान कापताना होणार नाहीत का? सगळे सारखेच आहे बदलले आहे ते स्वप्न व त्या स्वप्नाची व्याख्या! आता स्वप्नांची विभागणी झाली आहे, प्रत्येकाचे वेगवेगळे स्वप्न झाले आहे .. कधीतरी पुन्हा सर्व तरुणांचे स्वप्न ‘उज्वल भारत’ व्हावे.. पुन्हा ते एकजुटीचे गीत दुमदुमावे असे मनोमन वाटते! आपल्या हयातीत पुन्हा तो भारत तारुण्याने व नवनिर्मितीच्या त्वेषाने एकत्र उसळलेला बघता यावे असे मात्र सारखे वाटते!

गेल्या तीन दिवसांचा आलेख वेगळाच होता… गर्दीमध्ये दाटीवाटीने उभ्या असलेल्या यात्रिकांप्रमाणे तीनही दिवस अगदी दाटीवाटीने एकत्र आले… अन प्रभुचरणी मस्तक ठेऊन धन्य झाले व पूर्ण समाधानाने येणार्‍या आठवड्याला वाट करून देऊन गेले… लंडनमध्ये फिरताना नेहमी वाटते की हे असे आपल्या देशात का नाही? इथे असणारी प्रत्येक गोष्ट तशीच किंवा त्याही पेक्षा जास्त प्रमाणात आपल्या इथे आहे मग आपण असे का नाही? याचे उत्तर एवढेच सापडते की या लोकांचे सर्वसमावेशक उद्दिष्ट ‘एक’ आहे ते म्हणजे उज्वल भविष्याचे… येणार्‍या पिढ्यांसाठी आदर्श सोडण्याचे… नियमांमधून समाजोन्नती साधण्याचे… अन कदाचित इथेच आपण मागे पडतो.. आपल्याकडे या अशा ‘एक’ उद्देशाची वानवा दिसून येते व त्याहीपेक्षा दिसून येते ती कुरघोडी वृत्ती… कुरघोडी चांगल्या गोष्टींतही होऊ शकते पण कदाचित दूरदृष्टीने पाहणार्‍या नेत्याची खरी गरज आजच्या घडीला भारताला आहे.. जातीव्यवस्था ही भारतीय समाजाला लागलेला शाप आहे हे सगळ्यांना मान्य आहे पण कोणी जातीव्यवस्था निर्मूलन करण्याचे उद्दीष्ट ठेऊन समोर येत नाहीत तर समोरून मतांच्या नावावर जातींना वेगळे करून स्वतःची भाकरी भाजणारे कंपुबाज नेते जन्माला येत आहेत… जगाच्या या स्पर्धेत आपल्याला धावायचे आहे तर या जातीव्यवस्थेच्या कुबड्या फेकून धावावे लागले… कुबड्या घेऊन धावणे म्हणजे फक्त धावतोय हे भासवणे होईल स्वतःचे स्वतःला… जगाने कधीच या गतकाळाच्या कुबड्यांना सर्वसंमतीने झुगारले आहे… आपण मात्र ओल्या गोनपाटाप्रमाणे त्याला धरून बसलो आहोत.. तरुण पिढीने तरी या गोष्टी ध्यानात घेऊन या गंज लागलेल्या प्रगतीच्या चाकांमध्ये सुधारणेचे वंगण घालावे हीच प्रभुचरणी प्रार्थना!!

दैनंदिनी – २ सप्टेंबर २००९‏

वेध लागणे किंवा मन बेकल होणे म्हणजे नक्की काय होते? एखाद्या गोष्टीची आतुरता उत्तरोत्तर इतकी वाढत जाते की मन मग ब्रेक नसलेल्या सायकलसारखे भन्नाट वेगाने धावायला लागते, बिनापंखाचे उडायला लागते… मनात आतमध्येच अनंत हालचालींना उधाण येते… वर्तमानाशी संबंध क्षीण होऊ लागतो व भविष्यात आपण वावरू लागतो… झोपेमध्येही स्वप्नांची फुले पांघरुणात विखुरली जातात.. नेहमी कशीतरी वाटणारी जागा आता अचानक थोड्याश्याच सहवासासाठी मस्त वाटू लागते…. पण ह्या सगळ्यात होते काय तर वेळ काही केल्या पुढे सरकत नाही.. घड्याळाला काय झाले म्हणुन बाकीची घड्याळे तपासुन होतात.. दहा जणांना दहा वेळा वेळ विचारून होते पण वेळ काही सरकत नाही… सगळ्यात पंचायत तेव्हा होते जेव्हा ही अशी वाट कितीवेळ बघायची ते माहीत नसते तेव्हा… वाट बघण्यातील हुरुप सुरुवातीला खुपच उमदा असतो पण नंतर आपल्या मनाचे खेळ सुरु झाले की एक एक शंका कुशंका डोळ्यांसमोर पिंगा घालू लागतात… प्रत्येक क्षण, प्रत्येक जण, प्रत्येक नवी हालचाल, प्रत्येक सकाळ, संध्याकाळ आपल्याला डीवचत आहे असे भासू लागते… आपण आपल्याच जाळ्यामध्ये गुंतू लागतो.. गुरफटू लागतो… हातपाय आदळू लागतो.. उठणार्‍या असंख्य प्रश्नांच्या काहुराला तोंड देण्यास असमर्थ ठरू लागतो…
 
यावेळेला आठवावे ते काय? छिन्नविछिन्न अवस्थेत कर्तव्यतत्पर भावनेने मरणाच्या दारात प्रभू रामंचंद्रांची वाट बघणारा जटायू आठवावा की युगानुयुगे शिळासम अवस्थेत प्रभू रामचंद्रांच्या प्रतिक्षेत शापित आयुष्य कंठणारी गौतम ऋषींची पत्नी अहील्या आठवावी की लहानपणापासुन अगदी वृद्धावस्थेपर्यंत न थकता श्रीरामांच्या सेवेसाठी जगणारी शबरी आठवावी की श्रीकृष्णासाठी देहभान विसरून थांबलेली राधा आठवावी की भामरागडावर अनन्यावस्थेत विठ्ठलाच्या भेटीसाठी तप करणारे संत तुकाराम आठवावे? या सर्व अवस्थेत समान दुवा एकच तो म्हणजे त्या परब्रम्हावरील अतुट व अखंड भक्ती वा विश्वास… ह्या विश्वासाची जाणिव जर हृदयात जीवंत असेल तर कोणतीही प्रतिक्षा ही काळाच्या बंधनातुन मुक्त होते….
 
मग पुढे प्रश्न येतो की सध्याच्या कलियुगात या गोष्टी कालबाह्य का ठरतात… खरेच? माणसाच्या आयुर्मानामध्ये फरक झाला पण त्याच्या मनामध्ये नाही.. मन अजुनही तेवढेच चंचल आहे जेवढे ते आधी होते आता कमी झाली आहे ती मनाची दृढावस्था.. मन फार कमी वेळा एखाद्या गोष्टीत स्थिर होते.. मनाला इतके भरमसाट पर्याय उपलब्ध आहेत की मनाचे कोणत्याच पर्यायाने समाधान होत नाही… अन या पर्यायांच्या मागे धावण्याने जेवढी दमछाक होते तेवढी आणखी कशानेही नाही… ते पर्याय शोधण्यामध्ये खर्‍या मिळणार्‍या सुखाचा आस्वाद घेणेही इतके अकृत्रिम होते किंवा फक्त हे मिळणारच होते अन ते मिळाले वा मी ते मिळवले यामध्येच सार्‍या आनंदाचे बाष्पीभवन होऊन जाते!
 
कधी कधी लोकांच्या मानसिकतेवर हसूही येते अन चीडही येऊन जाते.. हतबलपणे एखाद्या घटनेचे मुक प्रेक्षक बनणे म्हणजे मुक्का मार लागल्यासारखेच आहे.. जखम दिसत नसली तरी घाव खोलवर जातो… वरवरच्या जखमा कालापरत्वे भरुनही येतात पण मुक्का मार कधी भरून येईल याची शाश्वतीही देता येत नाही…इतिहासाचे भान हवे भविष्य उज्वल करायला.. भविष्यात तेजोमयी ज्ञानप्रकाश आणण्यासाठी, अज्ञानाचा तिमिर भेदण्यासाठी, येणार्‍या पिढ्यांचे स्फुरणगीत होण्यासाठी, एकसंधता, सुसुत्रता शब्दातून कृतीत उतरवण्यासाठी.. आणि आम्ही पाहतो काय तर इतिहास हा फक्त लोकांचं उट्ट काढण्यासाठी वापरला जातोय, महान नेत्यांची चरीत्र अन त्यांचे शब्द समाज दुभंगण्यासाठी वापरले जाताहेत… ज्याला इतिहास स्वीकारता आला नाही त्याला वर्तमानाचे मळभ दुर सारून भविष्याची मुहुर्तमेढ रोवता आली नाही अन येणारही नाही.. इतिहास म्हणजे काही चलचित्रपट नव्हे जेव्हा पाहीजे तेव्हा ज्याला पाहीजे त्याने रीवाईंड, फॉरवर्ड अन एडीट करावा! इतिहासाचा पुल झाला पाहीजे वर्तमान आणि उज्वल भविष्यकाळामध्ये.. जाज्वल्य अभिमान हवा इतिहासाचा पण नाहक अहंकार नको… अहंकराने साध्य फक्त अधोगती आहे अन स्वाभिमानाने साध्य हिंदवी स्वराज्य आहे हे छत्रपतींनी पुराव्यासहीत सिद्ध केले आहे!

कुणी इतिहासाचा गैर-वापर करत असेल तर मात्र तळपायाची आग मस्तकात जाते.. याला फक्त षंढपणा अन फक्त षंढपणाच म्हंटले पाहीजे.. मग ते कोणी राजकीय नेते असू देत किंवा मग तुमच्या आमच्या सारखे सर्व-सामान्य नागरीक असू देत.. इतिहासाचा समाजविघटनासाठी होत असलेला छद्मी अन कुटील वापर म्हणजे आपल्या सामाजिक, राजकीय, शासकीय मानसिकतेची किव येते… स्वतःची स्वतःवर चीड येते.. झोपलेल्या समाजाला जागृत करण्यासाठी समर्थांनी पायाखाली घातलेला भारत देश कुठे अन आता तुकड्या तुकड्यामध्ये विभागलेला देश कुठे… कितीही त्रागा करून परीस्थिती बदलणार नाही हे खरे परंतु या उज्वल देशाच्या हरवणार्‍या परंपरेची कास धरुन ती धग जीवंत ठेवण्याचा व ती धग सर्वांपर्यंत पोहचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण जरूर करू शकतो अन कोणी करत नसल्यास या दिवसेंदिवस आटणार्‍या महासागराचा थेंब आपल्या हृदयात जरूर जपवून ठेवावा.. योग्य वेळी शंखनाद होईल व या थेंबातुनही स्फुर्तीचे महासागर निर्माण होतील हे सत्य!!

कालचा दिवस परवाच्या दिवसाला झिडकारण्यात गेला… सांत्वनापेक्षाही आतमधील निखार्‍याला उत्फुल्लतेची हवा देण्यात गेला… अधिकाराचे दोन शब्द उत्साहाची लाट आणू शकतात… कोमेजून गेलेल्या झाडाला नविन पालवी आणू शकतात व एका झाडामुळे सार्‍या जंगलाला शोभा आणू शकतात याची अनुभूती घेण्याचा कालचा दिवस होता… डळमळून जाण्यापेक्षा आत्मशक्ती एकवटून सज्ज होणेच योग्य… या दोन्ही अवस्थांमधला फरक अनुभवण्याचा कालचा दिवस होता!

बरेच काही शिकण्यासारखे आहे……

बरेच काही आहे शिकण्यासारखे...


आतंकवाद म्हणजे हिंदुस्थानच्या मस्तकी झालेली भळभळती जखम. अन यवनांच्या प्रत्येक हल्ल्याने ती वाढतच आहे. क्षणाक्षणाला त्यातून रक्त बाहेर पडत आहे. अन त्याबरोबर त्या यवनांचा, अधर्मींचा अतिरेक अंगाखांद्यावरुन सा-या अंगावर पसरू लागला आहे. एवढ्या वर्षात आपण ती जखम तर नाही बरी करु शकलो, ना त्यातून वाहणारं रक्त,ना त्या रक्ताचा आधार घेऊन पसरणारा अतिरेक. हो हो हा अतिरेक हिंदुस्थानच्या रक्तावरच तग धरून आहे. हर ठिकाणी आता जखमा पसरत आहेत, हिंदुस्थानला छिन्नविच्छिन्न करीत आहेत. हे थांबवणं प्रत्येक सुजाण नागरिकाचं, हिंदूंचं आद्य कर्तव्य आहे. आपल्याला आपल्याच रक्तात घुसून नामोहरम करण्याचा हा छद्मी डाव आता उलथून टाकण्याची वेळ आली आहे. आपापसातील भेद आता नाही मिटवले तर त्यावरुन भांडण्यासाठीही आपले अस्तित्व उरणार नाही याची पुरेपूर दखल हे अतिरेकी घेत आहेत.

आज विविध वर्णांचा विचार केल्यास असे लक्षात येईल की सगळेच मग तो ब्राह्मण असो किंवा क्षुद्र असो, सगळे जण प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजेच ते इंजिनीअरिंग असेल किंवा राजकीय, शास्त्रीय किंवा साहित्यिक असेल तिथे एकत्र एकाच निकषावर काम करीत आहेत. आता कोणता वर्ण हा जन्मानुसार प्राप्त कर्म आचरण करीत आहे? हे देखील प्रत्येकाने स्वतःला विचारून पहावे अन मगच भांडायला समोर याव. आपण आपल्या खोचक अन संकुचित वृत्तीमध्ये अडकून आपलं आणि आपल्या येणा-या पिढ्यांचं नुकसान करीत आहोत. ह्या संकुचित वृत्तीच्या विषाचं बीज आपण पेरत आहोत हेही लक्षात घ्यावं. ह्याचे विषारी परिणाम आज आपल्यालाच भोगावे लागत आहेत. मग जर ही वृत्ती आपण नाही संपवू शकलो तर इतर लोकांनी म्हणजे अतिरेकींनी त्याचा फायदा घेतला तर नवल ते काय.

आजच्या पिढीने, शाळेपासूनच सर्वधर्मसमभावाचे पाठ गिरवले पण प्रत्येक धर्माच्या मुलभूत तत्वांपासून अनभिज्ञ राहिली. हिंदू धर्माने जगाला मानवतावादी दृष्टिकोन दिला हेही या लोकांना शिकवावे लागते, नव्याने सांगावे लागते अशा या पिढीला आपण दोष द्यायचा की त्यांना घडविणा-या पालकांना अन शिक्षकांना की या काळाप्रमाणे पाश्चिमात्य संस्कृतीचे लांगूनचालन करणा-या प्रसारमाध्यमांना.

आज युरोप अन अमेरिकेमध्ये त्यांना त्यांच्याच शिक्षणपध्दतीचे तोटे जाणवू लागले आहेत. पालकत्व म्हणजे काय याचे धडे त्यांना शिकावेसे वाटू लागले आहेत. लहान वयात मुलांना स्वातंत्र्य दिल्यामुळे होणा-या झळांचे विवेचन करण्यात इथे हे लोक गुंतलेले असताताना आपल्या इथे अजूनही या लोकांचे अनुकरण करण्याचा विचित्र अट्टहास वाढीला लागल्याचे पाहून मन हेलावून जाते. या लोकांच्या चुकांपासून तरी आपण आता धडे घ्यावेत. गुरुकुल पद्धती काय होती अन कशासाठी होती याचा विचार शाळांनी करायला सुरुवात करावी. मुलांना स्पर्धात्मक जगात उतरुन मुले एकांगी होतात. त्यांना इतर गोष्टींचे काहीच महत्व उरत नाही हे तरी समजून घेतले पाहिजे. आज पाहिले तर दिसेल की, आपली नवीन पिढी आधीच्या पिढ्यांच्या मानाने खूप प्रगल्भ आणि जिज्ञासु अन अभ्यासु आहे.. पण त्यांना वेळीच योग्य ते धडे दिले पाहिजेत.

इथे एक प्रसंग सांगावासा वाटतो, एका सहयोग्याला मी वेदिक गणितातल्या काही कल्पना अन त्यातील गणिती बारकावे वापरुन गणित सोडवून दाखवले. त्याच्या चेह-यावरील आश्चर्य पाहण्यासारखे होते. तो म्हणाला आमच्या इथे असं कुणी काही शिकवत नाही. तुम्ही लोकं खरेच श्रीमंत आहात. मला तुझा हेवा वाटतो. त्याने मला भारतातून येताना आठवणीने वेदिक मॅथेमॅटिक्सवरचे पुस्तक आणायला सांगितले, एवढेच नव्हे तर त्याने इथे ३०० पौंड (२५००० रुपये) भरुन या विषयावरील ट्युशन्स लावल्या. अन इतरत्रही पसरविले. अन त्याचवेळी इथे रहात असलेला एक भारतीय मात्र ’ही पध्दत कालबाह्य आहे’ असे म्हणून हिणवून गेला. थोड्या दिवसांनी जेव्हा हेच लोक ही गोष्ट ओरडून जगाला सांगतील तेव्हाच आपण भारतीय ह्याचे अनुकरण करु. अगदी हूं चूं न करता. कारण आपण ‘भारतीय’ आहोत!!

ब्रिटीशांनी जेव्हा भारत सोडला तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने केली ती म्हणजे येणा-या पिढ्यांमधे स्वतःच्या विचारांचे दास्यत्व कायम ठेवले. यामुळेच आपली शिक्षणपध्दती ही पूर्णपणे त्यांचे अनुकरण करणारी झाली. आज आपले बलस्थान असलेला स्वातंत्रलढ्याचा इतिहास, शिवाजी महाराजांचे चरित्र हेही आपण ह्या गो-यांच्याच नजरेतून शिकतोय. कदाचित ह्यामुळेच काही चुकीचे संदर्भ आपल्या भावी पिढ्यांना वेळोवेळी दिले जात आहेत. आजही इथे युरोपामध्ये भारतीयांना हे गोरेच हुशार अन सर्वज्ञ म्हणून त्यांना शरण जाणे पाहिले की आपल्या स्वाभिमानवर देखील हसु येऊ लागते.

या लोकांच्या चांगल्या सवयी उचलण्याचे कुठेही दिसत नाही पण त्यांच्यासारखे दिसणे, वागणे ह्याचा सर्रास अवलंब करताना येथील भारतीय दिसतील अन मग ते भारतात जाऊन इतरांना बाटवताना दिसतात. याउलट जर स्वाभिमानाने या लोकांना जर आपल्या पद्धती सशास्त्र समजावून सांगितल्या तर हेच लोक त्याचे अनुकरण करतात हेही पाहीले आहे.. आज भारतातील आयुर्वेद व योगा इथे प्रचंड वेगाने पसरत आहे पण उलट आजही आयुर्वेद म्हणजे काय? हे भारतातल्या सुजाण नागरिकांना सांगावे लागते. आपण आपल्या संस्कृतीपासून दुरावत असल्याचे पाहिले की दुःख झाल्याखेरीज राहत नाही.

इथे आवर्जुन नमूद करावे अशी घटना आहे. एका ब्रिटीश मित्राच्या (वय वर्षे ६०+) घरी गेलो असताना तिथे त्यांनी आपल्या संस्कृतीची स्तुती केली, की तुमच्या इथे ज्याप्रमाणे मुलं आई वडिलांच्या निर्णायाचे स्वागत करतात किंवा विचार करण्याची तयारी दर्शवितात, आई वडिलांना गुरुसमान किंवा दैवत मानतात, सगळे घरामध्ये एकत्र नांदतात हे सगळेच किती विस्मयकारक आहे. आम्हाला आमच्या मुलांना हे सांगणे कधीच जमले नाही. आमची मुले वयाच्या १३-१४व्या वर्षी वेगळ्या घरात राहायला लागली. आम्हालाच दुनियादारी शिकवू लागली. हे ऐकून माझं मन भरुन येत होतं पण त्याचवेळी हिंदुस्थानचं आजचं बेरकं रुप नजरेसमोर आल्याने अतिशय खेदाने असे म्हणावेसे वाटले, की आता आम्हीही तुमच्याच पावलावर पाऊल ठेवून आज वाटचाल करीत आहोत. आपले काळानुरुप बदलणे योग्य आहे पण किती, कसे अन कोणत्या दिशेमध्ये याचा आपल्या येथील विद्वानांनी विचार करुन जनतेला मार्गदर्शन करावे असेही वाटून गेले. पण आता जनताही काही सांगण्यापलिकडे गेली आहे का?? असेही वाटून गेले.

इथे अजून सांगावसं वाटते ते म्हणजे आपल्याइथे या पाश्चिमात्यांसारखे वागणे म्हणजे प्रमाण धरले जाते. त्याचवेळी दुस-या महायुद्धात पूर्ण उद्ध्वस्त झालेले जपान सारखे राष्ट्र मात्र अजूनही स्वतःची संस्कृती अन धोरण ख-या अर्थाने टिकवून आहे. कुठेही आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये त्यांचा अवाजवी गवगवा दिसून येत नाही पण निर्मितीक्षेत्रातला उच्च दर्जा, सर्वांगीण प्रगती ह्यात आजही हे राष्ट्र अग्रेसर ठरते. जगातील प्रगत राष्ट्रांची गणती त्यांच्यावाचून पूर्णही होत नाही. आज या राष्ट्राकडूनही आपण बरेच काही शिकण्यासारखे आहे.

आखाती देशांमध्ये आजही धर्माला प्रथम क्रमांकाचा दर्जा दिला जातो. तिथल्या प्रथा अन संस्कृती तिथे नव्याने राहायला आलेल्यास बंधनकारकच असतात. त्याला त्या समजून घेऊनच वागावे लागते. जरी काही ठिकाणी या लोकांची मानसिकता पटणार नाही पण आज दुबई, कतार, कुवेत अशी ठिकाणं पाहिली की लक्षात येतं की धर्माची मुलभूत धाटणी तशीच ठेवूनही प्रगती साधता येते. आज दुबई मधील वाळवंट नावालाही उरले नाही, एवढी झाडी अन हिरवळ तिथे पहायला मिळते. तिथल्या लोकांना शिक्षणासाठी आता प्रोत्साहन देण्यात तेथील सरकारला यश येत आहे. पण तिथेही पाश्चिमात्यांचे अनुकरण यामध्ये आजच्या अन उद्याच्या पिढीमध्ये वाद होतात. पण तरीही आपण त्या लोकांच्या काही गोष्टी घेऊ शकतो. प्रशासन अन मुलभूत गरजांच्या पुरवठ्याबाबत तर नक्कीच शिकण्यासारखे आहे.

आज भारताने सर्व धर्म एकाच दर्जावर स्वीकारुन पाडलेला आदर्श नक्कीच इतर राष्ट्रांच्या कौतुकाचा विषय राहिला आहे. पण तेथे राजकारणापायी विशिष्ठ धर्मांची केलेली चापलुसीही इतर राष्ट्रांच्या नजरेतून कशी सुटु शकेल. आज जगामध्ये फिरल्यानंतर एवढेच जाणवते की हिंदुस्थान आपल्याच लोकांचे घाव सहन करीत रक्तबंबाळ होत आहे. आज इथे लोकांना अतिरेकी या शब्दाविरुध्द आवाज उठवणे म्हणजे एका विशिष्ठ समूहाविरुध्द आवाज उठविणे वाटते. अमेरिकेचे उदाहरण पाहिले तर लक्षात येईल की त्यांनी देशातील दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात लढण्याची तयारी केली, संपूर्ण जगाचे मन वळविले. प्रसंगी आपल्याच नाही तर अगदी दुस-या राष्ट्राच्या भूमीवर जाऊन युद्ध लढले व आंतरीक सुरक्षा कशी चोख आहे याची खात्री तेथील नागरिकांना पटवून दिली.

याच अमेरिकेने दुस-या महायुध्दात पर्ल हार्बर बेटावर केलेला हल्ल्याच्या प्रतिशोधात जपानवर अणुहल्ला करुन त्यांना नामशेष केले होते. याउलट भारताने आपल्या ताब्यातील प्रांत या अतिरेक्यांना अन त्यांच्या पोकळ धमक्यांना घाबरुन गमावले आहेत. पाकिस्तान, बांग्लादेश, अन आता काही नाही केले तर काश्मीरही.

कोणत्याही धर्माचा प्रसार अन त्याचा अतिरेक हे आपण समजून घेतलेच पाहिजे. आज हा धर्मप्रसार चालतो तो आदिवासी ठिकाणी किंवा मागासलेल्या ठिकाणी, जिथे सरकारी यंत्रणा पोहचू शकत नाही. आज पूर्वांचल पाहिले तर कळेल की, तिथे अनेक खेडेगावात ९०% पर्यंत धर्मांतर झाले आहे. अज्ञान, अंधश्रद्धा, गरिबी अन अंतर्गत कलह ह्यांचा गैरफायदा घेऊन हे धर्मांतरण होत आहे. इथे धर्माला नावं ठेवणं हा उद्देश नाही आहे तर त्याच्या या विचित्र रुपाला विरोध करण्याचा प्रयत्न आहे. हिंदूस्थानने आजवर सहिष्णुतेने सर्व धर्मांना स्वीकारलेच आहे. पण त्यातील वाईट भागाला का स्वीकारायचे? ही दहशतवादाची कीड जर ह्या सुजलाम सुफलाम देशात फैलावत असेल, एकात्मतेच्या पीकाचीच नासाडी करत असेल तर ती कीड काढणे आपले कर्तव्य होत नाही का? या अजगराला वेळीच आवरले नाही तर मात्र आपले काय होईल याचा विचार प्रत्येकाने करावा.

– निलेश सकपाळ
१३ – ०८ – २००८

तरुण भारत, आसमंत पुरवणी, सोलापूर येथून प्रकाशित

दैनंदिनी – २८, २९, ३० व ३१ ऑगस्ट २००९

cute girlहेवेदावे ठेवून वागणारे किंवा मनात कुटील भावनांचे बंधारे घेऊन वावरणार्‍या लोकांशी तासनतास संभाषण केल्यानंतरही आपलेपणाचा ओलावा निर्माण होत नाही हे खरेच! माणसांचा मनमोकळेपणा नेहमीच समोरच्याला संभाषणाआधी अर्धे जिंकून घेतो..  ही मनमोकळेपणाची भाषा काही औरच असते, कोणत्याही नात्याला आरशासारखं स्वच्छ व लखलखीत बनवण्याचे काम ही मोकळी वृत्ती करते…. गेल्या ३-४ दिवसात असे एक ना अनेक अनुभव आमच्या गाठीला आले… विविध प्रकारच्या विचारपद्धती एका ठिकाणी येऊन एकत्र होऊ शकतात, सगळ्या व्यवहारिक उपाध्या गळून निखळ माणसे माणसांसारखी वागू शकतात, जगण्याला गहन कोडे मानणार्‍या जगात जगणे चुटकीसारखे वाटून जाते, सेकंदाचे हिशोब करणार्‍या बाजारात मग नकळत तासामागुन तास मुक्त हस्ताने उधळून द्यावेसे वाटून जातात… एखाद्या लहानमुलाच्या कृष्णलीलांमध्ये हरखून जायला कुणाला आवडणार नाही… आम्ही देखील असेच एका चिमुकलीच्या शाळेमध्ये दिवसभर एखाद्या विद्यार्थ्याप्रमाणे वावरत होतो अन आनंदामागून आनंद जमा करून घेत होतो.. चाणाक्षपणा मोठ्यांमध्ये तर असतोच पण लहान मुलांमध्ये तो असेल तर मात्र त्याला एक वेगळीच मनोहारी किनार लाभते… सगळ्यांना सगळे विसरायला लावून आपल्या मागे धावायला लावण्याचे, आपल्या विश्वात रमवुन ठेवण्याचे वेगळेच कसब या लहानग्यांमध्ये असते, कितीतरी पैसे खर्चून काही तासांच्या करमणुकीमधून देखील तो निवांतपणा मिळणार नाही तेवढा शांतपणा व संतृप्तपणा एखाद्या बालगोपाळाच्या संगतीत मिळतो….

विश्वास, भक्ती कोणत्या प्रमाणात एखाद्याच्या अंगी असावी हे आपण नक्कीच सांगू शकत नाही कारण त्याला प्रमाणच नाही.. संत गोराकुंभारासारखी तल्लीनता म्हणावी, संत मीराबाई, जनाबाईसारखी एकरुपता म्हणावी वा संत चोखामेळासारखी अनन्यता म्हणावी.. याला प्रमाण नाही.. प्रत्येक जण या भक्तीमार्गावर चालू शकतो व स्वतः भगवंत होऊ शकतो असाच या भक्तीमार्गाचा महीमा आहे… तिथे सगळेच देवासारखे होऊन जातात… फक्त तो निजध्यास हवा… नेहमी ऐकीवात येते की तरुणपणी या भक्तीमार्गावर जाणे ठीक नाही, नुकतेच लग्न झालेल्यांनी संसाराची नवी स्वप्ने बघावी उगीचच या भक्तीमार्गाला लागू नये वैगेरे वैगेरे… अन हे बोलणारे मात्र या भक्तीमार्गापासून वंचित असतात.. म्हणजे ज्या गोष्टीची चव ज्याने घेतलीच नाही तो ती गोष्ट एखाद्याला सोडायला कशी काय सांगू शकतो, अज्ञान यालाच तर म्हणतात ना? एखाद्याला जर याच भक्तीमार्गावर समाधान मिळत असेल, मानसिक शांतता लाभत असेल तर मग त्याने ते का करू नये? फक्त हे ज्यांना कळते ज्यांनी या मार्गावर पाऊल ठेवले आहे.. त्यांनाच आपण बालपण अन तरूणाईचा काही काळ या मार्गावर न घालवल्यामुळे खंत वाटू शकते! या काही दिवसात अशीच भक्तीमार्गाशी संलग्न असलेली तरुणाई पाहिली अन धन्य वाटले..

पूर्वापार चालत आलेला समाधानाचा हा अभिनव भक्तीमार्ग सोडून आजच्या तरुणांनी स्वीकारलेली आधुनिक पद्धती (दारू, पब, क्लब्स वैगेरे) पाहिली की मात्र कीव करावीशी वाटते… नक्कीच या भक्तीमार्गावर काही बाबा-बुवांनी खोट्यानाट्या पद्धतींनी लोकांना फसविले वा थैमान घातले.. पण याचा अर्थ ही पद्धत चूक होती म्हणून नाही, तर चुकीच्या लोकांना स्वीकारणारे लोक चुकीच्या समजांच्या आहारी गेले म्हणून ते सगळे घडले… आज तरुणाईकडे सारासार विचार करायची ताकद आहे.. देवाशी समरस होणे म्हणजे काही कामधंदा सोडून, मित्रमैत्रिणी सोडून संन्यासी होणे नव्हे तर विहीत कामांच्या भाऊगर्दीमध्ये मनाला स्थिरस्थावर करण्यासाठी आवश्यक असलेला किनारा असणे होय… कर्मकांड वा जादूटोणा वा अंधश्रद्धा यातून समाजाला बाहेर काढण्याची जबाबदारी तरुणपिढीवर आहे पण यातून बाहेर काढणे म्हणजे देवावरील अखंड विश्वासाला छेद देणे नव्हे तर तो विश्वास कायम ठेवून या निरर्थक गोष्टींना समाजातून कालबाह्य करणे जास्त यथोचित अन योग्य होय!

वास्तवाची जाण ठेऊन स्वप्नांची सांगड घालणे खुप महत्वाचे… मोठी स्वप्ने असावी पण त्यासाठी कराव्या लागणार्‍या त्यागाची वा कष्टाची सुद्धा पुरेपुर ओळख असावी… धाटणीपलिकडची स्वप्ने बाळगणार्‍यांना धाटणीबाहेरच्या वा चाकोरीबाहेरच्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी तयार रहावेच लागते…उंच इमारत बांधण्यासाठी आधी पायासाठी जमिनीत खोलवर जावे लागते हे लक्षात ठेवले पाहीजे… पाया मजबूत असेल तर मजले चढवायला वेळ लागत नाही… कधी कधी कळत नाही की आपल्याकडे येणार्‍या पैशाची आवक वाढली की आपल्या गरजा आपसुकच का वाढतात, खर्च एकदम वरती का जातात? .. पण गरजा वाढवणारे मात्र आपण असतो हे मात्र आपण विसरतो व नविन गरजांसाठी आणखी कष्ट उपसायला तयार होतो… आयुष्य म्हणजे एखाद्या गोष्टीच्या वा एखाद्या कामाच्या मागे धावणे कसे काय असू शकते? तरुणाईतला जोश संपून गेल्यावर जाग येऊन काय फायदा? याचा विचार सगळ्यांनीच करण्याची गरज आहे… अन म्हणूनच स्वप्नांची अन वास्तवाची सांगड घालणे गरजेचे होऊन बसते…

गेले ३-४ दिवस एकदम मस्त गेले.. पत्नीच्या सहवासाने वा त्या संगतीने जगण्याची रंगत वेगळ्याच उंचीवर जाते… या संगतीमुळेच बर्‍याच दुखद घटनांचा साक्ष ठरलेला गेला आठवडा मागे रेटता आला…. अगदी समाधानाने या आठवड्याची सुरुवात करता आली.. आमच्या या समाधानाला जबाबदार ठरलेल्या सर्वजणांचे मनापासून आभार व आम्हाला अशा घटनांचा योग घालून दिल्याबद्दल त्या परमेश्वराचे आभार!