दैनंदिनी – ०८ जुलै २०२१

दैनंदिनी – ०८ जुलै २०२१

नैतिकता, नितीमत्ता बोलायला जेवढे अवघड कदाचित जगण्यासाठी त्याहुनही जास्त अवघड शब्द आहेत. इतरांनी आपल्याला तोलणे किंवा आपण इतरांचे मोजमाप करणे हे सदैव घडत असते..पण जेव्हा आपण स्वतः खुद्द आपल्यालाच तोलायला जातो किंवा तोलतो तेव्हाच आपल्या न्याय्यपणाची परीक्षा खर्‍या अर्थाने होत असते.. आपण स्वतः तेव्हा आरोपी असतो, आपण पोलिस, आपण वकिल आणि आपणच न्यायमुर्ती असतो.. बघायला गेले तर खुप सरळ हिशोब आहे पण बर्‍याचदा बर्‍याचजणांची अवस्था चोरुन दुध पिणार्‍या मांजरासारखी असते!
मोजमाप करताना वजनकाट्यामध्ये एका बाजूला जेव्हा विशिष्ट वजन ठेवुन त्याच्याबरोबर दुसर्‍या बाजूला इतर गोष्ट तोलणे कदाचित सोपे असते.. कारण कुठे थांबायचे कधी थांबायचे अन किती मोजायचे हे पुर्वनियोजित असते.. पण जेव्हा पहिल्याबाजूला ठेवायला येणार्‍या मापाचे परीमाणच माहित नसेल तेव्हा मग दुसर्‍या बाजूला ठेवण्यात येणार्‍या गोष्टीचे मोजमाप करायचे तरी कसे? ह्याला आपण नैतिकता जपणार्‍यांचा तात्विक गोंधळ म्हणू शकतो किंवा त्यावेळी उद्भवणार्‍या दोलायमान परिस्थितीचा झगडा! कारण तत्वांना किमतीचे लेबल लावणे हा त्या तत्वांचा तर अपमान होईलच पण त्याहीपेक्षा त्या तत्वांना अनुसरुन जगणार्‍या जिवासाठी तो सर्वस्वी त्याच्या अस्तित्वाला किंवा ओळखीला दिलेले आव्हान ठरेल!

आपले प्रतिबिंब जसेच्या जसे परावर्तित करणारा आरसा जेव्हा आपल्या हातातील घड्याळाची वेळ चुकीची सांगतो तेव्हा आपल्याला समजुन घेणार्‍या एखाद्या दुसर्‍या व्यक्तीच्या मनात आपल्याला हवी असलेली आपली प्रतिमा असेल याची खात्री किंवा अपेक्षा ठेवणे म्हणजे निव्वळ धुळफेक ठरेल…

जाणीव आणि अनुभव दोन पुर्णतः वेगळ्या गोष्टी, जाणीव सोप्या शब्दांत म्हणायचे तर न अनुभवता होणारी अनुभुती! हरवलेल्या एखाद्या क्षणाबरोबर त्या क्षणाला मिळालेली अनुभुती हरवते का की एखादी अनुभुती विस्मरणात गेल्यानंतर तो क्षण हरवला असं म्हणतात?? कशापासुन अलिप्त व्हायचं अन कशासाठी अट्टहास करायचा याचा अंदाज घेण्यासाठी अनुभुती आवश्यक नव्हे हवीच! व्यवहारीक जगामध्ये भौतिक सुखांच्या विळख्यात एकदा अडकले की एका भौतिक सुखापासुन दुसर्‍या भौतिक सुखाकडे एवढाच प्रवास सुरु होतो, भौतिक सुखांपेक्षाही दुसरे कुठले सुख आपल्याला आंतरीक मनःशांती देऊ शकेल याचा विचार येता येता आयुष्यातील उर्जेची फक्त थोडी थोडकी सावली आपल्याकडे शिल्लक राहिलेली असते…

प्रवाहाला दैवी कौल मानुन स्वतःची फुटकळ समजुत काढुन त्याबरोबर वाहत जाणे केव्हाच बरोबर ठरणार नाही.. तर प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन उगमाशी एकरुप होणे कधीही आणि केव्हाही संयुक्तिक ठरेल… अन हे कळण्यासाठी लागणारी अनुभुती ज्याची त्याने शोधावी अन ठरवावी!

-निलेश सकपाळ
०८-०७-२०२१

सोहळा

सोहळा

कुणास गमते आज, कुणा गमले आधी
एकांतात सुख आहे, एकांतात ती समाधी!

मुकपणाचे दाह इथे, सोनफुले होऊन गेले
सुगंधात ऐब आहे, सुगंधात ती खुमारी!

निसर्ग घाली थैमान, आपुलाच वाटे कोणी
उद्रेकात क्रांती आहे, उद्रेकात ती भरारी!

ओसरीत चंद्र पोरका, घरात कैद आभाळ
समाजात मान आहे, समाजात ती निलामी!

इतिहास मग जेत्यांचा, डावलुन साहेब जातो
भविष्यात घात आहे, भविष्यात ती गुलामी!

अजुन जिवंत मिठीत, तुझ्या भेटीचे पुरावे
विरहात नशा आहे, विरहात ती शिसारी!

शब्दही अजब शहाणे, मौनात उमटती तराणे
गोंधळात गाव आहे, गोंधळात ती बिचारी!

चुकुन हसलीस काल, मैफिलीत काजव्यांच्या
क्षणार्धात ठप्प आहे, क्षणार्धात ती प्रवाही!

हृदयाचा चुकला ठेका, बेताल ही जिंदगानी
पायामध्ये चाळ आहे, पायामध्ये ती तबाही!

तोलून श्वास हयातभर, हतबल राजा शेवटी
संभ्रमात मृत्यू आहे, संभ्रमात ती उपाधी!

भेटण्यास आले मला, न भेटणारे लोक जेव्हा
सोहळा तो तृप्त आहे, सोहळ्यात मी उपाशी!

२३जून२०२१

दिव्यत्व

दिव्यत्व

दाराभोवती सडा तुझ्या चांदण्यांचा,
नकोच मला आभाळ आता,
नकोच पापणीचे मिटणे आता,
श्वासही तुझा भास माळुन येतो,
सोहळाच हा नित्य तुला पांघरण्याचा!

सूर्य होऊन जाईल जणू काजव्याचा,
नकोच उजेड उसना आता,
नकोच सावली तीही आता,
गावही स्वप्नांचा तेजाळुन येतो,
अंतरी वीजकल्लोळ तुझ्या अस्तित्वाचा!

तरंगाशी नाते तुझे तू या लाटालाटांचा,
नकोच कोरडे सागर आता,
नकोच भरती आहोटी आता,
किनारा चालीरीती मोडुन येतो,
प्रवाहात प्रवासी मी तुझ्या दिव्यत्वाचा!!

१२ जून २०२१

लळा

लळा

फुलांनीच काटा काढावा,
लळा एवढा नाजुक होता!

सावज भुलले शिकाऱ्याला,
उजेड एवढा अंधुक होता!

दगडही तरंगावे समुद्रावरी,
भाव एवढा साजुक होता!

खांद्यावर हात देत हसला,
बाप एवढा भावूक होता!

सीमारेषा घराला छेदणारी,
पत्ता एवढा अगतिक होता!

तिला पाहणे निर्लज्जापरी,
मोह एवढा मसरूक होता!

होकार होता की नकार तो,
मृत्यू एवढा नजदिक होता!

निलेश सकपाळ
४ जून २०२१

आई – दैनंदिनी – १४ ऑक्टोबर २००९‏

आईची आठवण आल्यानंतर कोणी हळवे होणार नाही असे क्वचितच घडेल.. कोणत्याही पत्थरदिल माणासाच्या काळजाला खिंडार पाडू शकेल अशी ती माय-ममता असते…. तिच्या स्पर्शाच्या उबेला काळाचे बंधन नसते.. आजही पापण्यांचे दरवाजे मिटले की तो स्पर्श, ती प्रेमाची उब, तो अनंतकाळासाठी बांधुन ठेवणारा दैवी सुगंध अलगद अंगावर शहारे उठवुन जातो… मनाला बेकल करतो, काळाचे फासे उलटे फिरतात, आठवणींच्या गावामध्ये, बालपणीच्या रानामध्ये असंख्य मिश्कील हरकतींच्या किलबिलाटामध्ये आपण ठाण मांडण्यास जातो…

खस्ता खातानाही हसता येते नी कुणाला न दाखवता मनातून मूक रडता येते हे पहिल्यांदा आईकडूनच तर शिकलो, सगळ्यांची भूक शमल्यानंतर, सगळ्यांचे संतृप्तीचे ढेकर ऐकल्यानंतर मोकळ्या पातेल्याला पाहूनही पोट भरता येते हे आईशिवाय कोण सांगू शकेल… शाळेतल्या पहिल्या दिवशी आपल्या आधी तयार होणारी आई, शाळा सुटण्याआधी आपल्याआधी शाळेबाहेर ताटकळत उभी राहणारी आई, परीक्षेत आपण पहिले आल्यानंतर सगळ्यांच्या हसण्यामध्ये गुपचुप देवासमोर जाऊन समाधानाचे अश्रु गाळणारी आई, राशनच्या रॉकेलच्या रांगेमध्ये रॉकेल संपू नये म्हणून तासनतास उभी राहणारी आई, आपल्याला शिकता यावे म्हणून प्रत्येक वैयक्तिक सुखाला कात्री लावणारी आई, आज तारुण्यात फक्त काहीवेळ मनासारखे नाही झाले म्हणून चीडचीड करणारे आपण अन तेव्हा तिच्या ऐन तारुण्यात गुमान शंकराच्या पिंडीवर बेलाच्या पानांप्रमाणे स्वतःच्या आनंदाला वाहणारी आई, शाळेमध्ये फी भरण्यासाठी सकळी आपण उठण्याआधी वडिलांशी बोलून ऐन सणाच्या दिवशी आपली हौस बाजूला सारून आवडता दागिना काढून देणारी आई, आपल्याला ठेचकाळले की जोरात रागावणारी आई त्याचवेळेला तेवढ्याच मायेने मिळेल ते करून रक्त थांबवण्याचा प्रयत्न करणारी आई, आम्ही झोपल्यानंतरही काम करणारी अन आम्ही उठण्याआधीपासुन काम करणारी आणि कदाचित झोपेतही संसाराच्या जबाबदा-यांची बेरीज वजाबाकी करणारी आई, आपल्या शब्दांच्या फेकीवरून आपली संगत ओळखणारी व दामटून बरोबर काय अन चूक काय हे ठसवणारी आई, एक नाही दोन नाही कित्येक वर्षे आपल्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारी आई, चार पैसे वाचावे म्हणून पायी चालत प्रवास करणारी आई….. त्यागाचे मूर्तीमंत उदाहरण कोणी असेल तर ती आईच असते, सगळ्या परिस्थितींशी भांडून प्रसंगी समोर येईल त्या अवघड वळणाला स्वीकारून आपल्याला आपल्या योग्य ठिकाणी पोहचविण्यासाठी धडपडणारी आई, वादळात, वीजांच्या गडगडाटात, मुसळधार पावसात, गरीबीमध्ये, हालाखीमध्ये उद्याचा आशेच्या किरण आपल्या डोळ्यांत शोधून त्यावर वर्षानुवर्षे मागे ढकलणारी आई.. आपल्या स्वप्नांवर आपल्यापेक्षा जास्त विश्वास ठेवणारी व तिथपर्यंत पोहचण्यासाठी सततचा पाठपुरावा करणारी दैवी शक्ती म्हणजे आई!

आईच्या उपकाराचे गणित मांडणारेही नतद्रष्ट असतात, पण हे उपकार अनंत काळाचे आहेत अन ते न फिटण्यासाठीच असतात अन असावेत त्या उपकारांमध्येच त्या कल्पवृक्षाच्या सावलीचा परमानंद आहे… जो परब्रह्म ह्या जीव सृष्टीला चालवतो त्याच परब्रह्माने आपल्याला त्या मातेच्या उदरी स्थान दिलेय… आपल्या पूर्वसंचिताचे ते फलित आहे! जिथे अलंकारितता उपमामुक्त होते, जिथे भाषा शब्दमुक्त होते, जिथे भावना देहमुक्त होते,  जिथे प्रेम स्पर्शमुक्त होते, जिथे अश्रु भावमुक्त होतात तिथे आईचा महिमा सुरू होतो! आई झालेले पहिले देवदर्शन असते,  आइ नकळत झालेले पहिले मैत्र असते, आई हृदयात कोरलेले पत्र असते, आई वात्सल्याचे प्रतिबिंब असते, आई काळाच्या वहीमध्ये जपलेले अव्यक्त पिंपळपान असते, आई प्रत्येकाला न मागता मिळालेले वरदान असते!

काळाच्या ओंजळीतून आपलेही आयुष्य त्या रेतीप्रमाणे निसटून जात आहे.. अनेकांचे गेले अन आता आपलेही जाईल… अनामिकतेचा शाप घेऊन अनामिकतेमध्ये हरवून गेलेले कितीतरी जण आपल्या पाहण्यात आहेत अन येत राहतील… आयुष्यभर झटले अन शेवटी एका तस्वीरीच्या चौकटीमध्ये आठवणींच्या रंगामध्ये कायमचे चिकटून बसलेले चेहरे नवीन नाहीत… निष्क्रियता जर अशीच चालू राहीली तर तुमचे आमचेही असेच होणार यात काही शंकाच नाही…. जो मृत्यूनंतरही त्याच्या योगदानातून जिवंत राहतो तो आणि फक्त तोच या जीवन-मृत्यूच्या साखळीला भेदू शकला…. जीवनाच्या प्रत्येक वळणावर संधीला चुकवणारा व आयुष्याच्या प्रत्येक वळणावर संधी शोधून तिला यशस्वी करणारा या दोन विभागात नकळत जग विभागले जाते.. नवीन जबाबदारींचा मार्ग कुणालाच चुकला नाही ना तो रस्त्यावरील भिकार्‍याला अन ना महातील राजाला, पण यातही जो कर्तव्याप्रती एकनिष्ठ राहून तेजाळून निघतो तोच यशस्वी गणला जातो! फुटकळ समस्यांवर आयुष्य घालवायला थोडी ना हा जन्म आहे… या दगडातून उत्कृष्ठ शिल्प घडवायचे तर मग छन्नी अन हातोड्याची भीती बाळगून कशी चालेल.. यातून तावून सुलाखून निघू तेव्हाच तर खरे शिल्प तयार होईल! या आणि अशा अनेक विचारांच्या सोबतीत कालच्या दिवसाची सांगता झाली!

दैनंदिनी – १९, २०, २१ आणि २२ सप्टेंबर २००९

मित्रहो, काहीही झाले तरी जगणे नाकरता येत नाही! सुंदर सुंदर फुलांमधुन जाणारी वाट कधी अचानक रखरखीत वाळवंटात येते, सोनेरी भविष्याचे तुषार मृगजळाप्रमाणे अशक्यतेच्या ढगामध्ये विरघळून जातात, नेहमीचे आश्वासक वाटणारे हिंदोळे, उमाळे खोल हृदयाच्या गूढगर्भामध्ये नामशेष होऊन जातात, आपले आपले वाटणारे प्रतिबिंब आपल्याकडे पाठ करून उभे राहते, प्रकाशाचा अन सावलीचा ताळमेळ बसत नाही, उडणार्‍या पाखरांना आकाश नाकारून जाते, एखादी आयुष्याची ओळ पान सोडून पानाबाहेर भरकटून जाते, जीवनाच्या दाराचे कुलुप काही केल्या उघडत नाही, डोके आपटूनही पलिकडून कोणी आवाज देत नाही, चावी कुलुपामध्ये फिरवताना अचानक अर्ध्यात तुटून जावी.. लोळ भावनांचे मनावर आदळून काचेप्रमाणे क्षणात तुटून जावे,  अंगावरुन निथळताना आपण निराकार होऊन पहात रहावे.. आपल्या ठिकर्‍या उडताना आपण प्रेक्षक व्हावे व नंतर तेवढ्याच निराकारपणे सगळ्या ठिकर्‍या जमवून पुन्हा स्वतःला एका आकृतीमध्ये बांधावे… देहभावनेच्या चौकटीत अजून आपले अस्तित्व उरले आहे याची जाणीव होऊन पुन्हा नव्या वणव्यासाठी इंधन म्हणून जगत रहावे… ठिणग्यांचा दोष नाही, ज्वाळांचा काही दोष नाही, आता जगण्याचे चटके जाणवत नाहीत, अंगापिंडावर एखाद्या लहान मुलाला मनसोक्त खेळवावे त्याप्रमाणे या अघोरी वादळांना, वणव्यांना खेळवत आहोत असे वाटायला लागले आहे…. कदाचित समुद्र मंथन झाल्याशिवाय अमृताचा घडा मिळणार नाही.. आमचेही असेच काही सुरु असावे.. या मंथनाला सामोरे जाण्यापलिकडे दुसरा कोणताही पर्याय आमच्या भात्यात नाही… यात जाताना एकसंध राहणे व यातून परतताना स्वतःला एकसंध राखणे एवढेच काय ते आमच्याकडे आहे अन त्या विश्वविधात्याच्या कृपाशीर्वादाच्या विश्वासावर आम्ही यातूनही तरून जाऊ असा विश्वास वाटतो, नव्हे नव्हे तो आहेच!

शून्यांची बेरीज शून्य! शून्यांचा गुणाकर शून्य! शून्यांची वजाबाकी शून्य! मात्र शुन्यांचा भागाकार अनिश्चित! या शून्याचेही असेच काहीसे झाले गेल्या चार दिवसात! मित्रहो, अनिश्चितता, अनियमितता ही शब्दात खुप आटोपशीर असते नाही, पण जेव्हा शब्द सोडून ती वास्तवात असते तेव्हा बिलकुल आटोपशीर नसते.. हे अनुभवणे म्हणजे स्पंदनांचे ठोके एखाद्या घणाच्या आघाताप्रमाणे छाताडामध्ये आदळणे, पापण्यांचे फडफडणे म्हणजे या जगात आहोत की नाही या झुल्यावर झुलणे, श्वासांतून उकळता लाव्हारस अंतरंगात फिरणे, उच्छवासातून वातावरणाला गढुळ करणारे विषारी वायू निसटणे, डोळ्यांतील पाण्याला कुजकट, किळसवाणा दुर्गंध येणे!! … पावलांचे एका जागी रुतून पुतळ्याप्रमाणे ठप्प होणे, संवेदनांच्या पलिकडे जाऊन आपण न व्यक्त होणारी एक संवेदना होऊन जाणे, कुत्सित नजरांमधून छद्मी, जीव्हारी  भाल्यांचे हल्ले होणे काय असू शकते हे अनुभवणे म्हणजे आमचे गेले चार दिवस होते…

देव आहे हे अनुभवायचे असेल तर काय करायचे? देव असेल तर मग जगात ही अंदाधुंदी का आणि कशाला? जेवढी अंदाधुंदी आहे कदाचित त्यात टिकून राहणे, त्यात वाहुन न जाणे, स्वतःला त्यातूनही वेगळे राखणे म्हणजेच देव आहे सिद्ध होत नाही का? जर देव नसता तर समाजावर काळाच्या आकांडतांडावाचे निर्विवाद वर्चस्व पाहीजे होते पण तसे नक्कीच नाही.. आपल्याला यातूनही वेगळे राहता येते किंवा याची ओळख घेता येते म्हणजेच आपल्या आतमध्ये त्या चांगल्या शक्तीचे अधिष्ठान निश्चितच आहे हे नक्की!! या अधिष्ठानाप्रती जर विश्वास वाढवला तर नक्कीच या काळ्या साम्राज्यापासुन स्वतःला वेगळे राखता येईल.. जेवढे आपण सात्विक वा शुद्ध होण्याचा प्रयत्न करतो तेवढ्याच जोरात या काळ्या शक्तीचा आघात आपल्यावर होत असतो… तेव्हा आपली इच्छाशक्ती पूर्णपणे एकवटली गेली पाहीजे, पूर्ण विश्वास त्या विधात्याप्रती एकवटला पाहीजे.. तेव्हाच जर आपण त्या विधात्याच्या असण्यावर संशय घेतला तर आपल्यासारखे दुर्दैवी आपणच! कदाचित ही भाषा बर्‍याच जणांना बाष्कळ व तोंडाची वाफ वाटेल.. पण मित्रहो, याला प्रत्यक्ष अनुभवाची किनार आहे हे ठामपणे आम्ही आता नक्कीच सांगू शकतो… आधी अनुभवले अन मग लिहीले वा त्या विधात्यानेच हे लिहून घेतले असावे! कुणास ठाऊक या शब्दांमार्फत त्याला तुमच्यापर्यंत पोहचायचे असेल!!

काय सांगावे अन काय न सांगावे… एका बाजूला ढासळेलेले भौतिकाचे बुरुज आहेत तर दुसर्‍या बाजूला अभौतिकाच्या अनुभूतीतून मिळालेले प्रचंड बळ आहे! समाजाकडून असे काही अनुभव गाठीला येतात की ते पुन्हा कधीच आठवावेसे वाटत नाहीत.. या गेल्या चार दिवसातले अनुभवही असेच होते… पुन्हा त्या वळणावर जाणे नाही… ज्यांनी कुणी तेव्हा दरीत ढकलले त्यांच्याबद्दल मनात घृणाही नाही.. फक्त एकच सदिच्छा आहे की पुन्हा कधी हे ढकलणे आणखी कुणाबाबतीत त्यांच्याकडुन न होवो! नुकत्याच आकाश पाहिलेल्या रोपट्याला मुळासकट उखडताना त्या न फुललेल्या मुक रोपट्याला काय वाटत असेल हे प्रत्यक्ष अनुभवले! … पंख फैलावून उडण्यासाठी एखाद्या दरीच्या टोकावरून आकाशात झेप घ्यावी व कळावे की हे पंख नकली आहेत, फसवे आहेत व काही कळायच्या आत जमिनीवर कोसळणे काय असते याचा अंदाज घेता आला या चार दिवसात! … त्याच वेळेला दुर्लभ असणारे, अदृश्य असणारे आंतरीक बळ या ब्रह्मांडातून आपल्या आतमध्ये उतरवता येते, पोहचवता येते.. ध्यानस्थपणे स्वतःला एखाद्या पिसाप्रमाणे हवेत सोडुन देऊन हलके होता येते हे सुद्धा वाट्याला आले हे नक्की! अनुभवांचा हा संमिश्र सोहळा पदरी पाडून पूर्ण निरपेक्ष विश्वासाने आता आम्ही उभे आहोत…… पुढे येणार्‍या अनामिक वळणासाठी!!

दैनंदिनी – १७ आणि १८ सप्टेंबर २००९

सध्याच्या दोन दिवसांचे वर्णन काय करायचे असा प्रश्न पडला आहे.. कधी वाटते की भळभळणारे मन कोणत्याही बांधाशिवाय, अडथळ्याशिवाय शब्दा शब्दातुन मुक्त होउन या व्यक्त स्वरुपाच्या स्वाधीन करुन बाजूला व्हावे तर कधी वाटते की एखादे भावनिक मलम, एखादे रामबाण औषध शोधत त्या जख्मी अश्वत्थाम्याप्रमाणे वणवण फिरावे.. शेवटी बाह्य जगाला दिसतात त्या जखमा.. झालेला घाव.. पण तो घाव होताना, झेलताना पचवताना झालेल्या अनंत यातना अदृश्य स्वरुपात पिंगा घालत असतात.. त्या यातना कदाचित त्या जखमा वागवण्यापेक्षा कितीतरी पटीने भयानक, विदारक असतात… छातीची ढाल करुन लढणार्‍या सैनिकाला देशसाठी मरण्याचे किंचितही दुःख नसते.. असतो तो सार्थ अभिमान… त्याच्या पश्च्यात देखील हा अभिमान, त्याचे शौर्य गौरविले जाते… पण हेच त्याच्यावर शेवटचे घाव जर त्याच्याच छावणीतील एखाद्या जिवलग पण शत्रुला फितुर असलेल्या मित्राने केले असतील तर??? मग मात्र त्याच्या मृत्यूसमयीच्या यातनांचा अंदाज कोण बांधू शकेल.. कदाचित कुणीच नाही… बस्स! कधी कधी जगणेसुद्धा असेच सापडते एखाद्या सरड्याप्रमाणे.. वेळ बघून खेळ करणारे.. मदाराच्या तालावर नाचणार्‍या माकडाला कुठे पैशाची किंमत कळते.. कधी कधी आपल्यालाही नाही कळत या जगण्याची किंमत, वेळेची किंमत, येणार्‍या जाणार्‍या क्षणांचा हिशोब, वटवाघळाप्रमाणे उलट्या लटकणार्‍या माणसांच्या हेव्यादाव्यांचा उच्छाद… आपण माकड असतो फक्त माकड.. त्या काळरुपी मदार्‍याच्या दोरीने बांधलेले एक माकड…

कुणीही यावे टपली मारुन जावे इतके हिणकस जगणे स्वतःच्या ताटात वाढून घेणे कित्ती भयंकर असू शकते.. एखाद्या उकीरड्यामध्ये शिळ्या अन्नाची नासाडी होऊन पावसात अंगावर येणारा वास निर्माण व्हावा, घराच्या उंबरठ्यावर शेवाळे येऊन नुसत्या कोरड्या पायाने घरात जायला कसेतरी व्हावे, भुकेले भुकेले घरी जेवायला यावे व खाण्याचा डब्बा उघडतच आंबलेला वास डोक्यात जावा, पोळ्यांच्या डब्बा उघडताच ओकारी येणारी बुरशी नजरेत भरावी… भावभावनांच्या बाजारात जगातल्या सगळ्यात निर्मळ भावनांचा लिलाव होणे काय असते हे अनुभवणे म्हणजे जगताना मरण अनुभवण्यासारखेच असते… देव्हार्‍यातील प्रसन्न देवतेच्या प्रतिमेप्रमाणे पूजली जाणारी लाज जेव्हा द्रौपदीप्रमाणे पटावर लावली जाते तेव्हा काय होते, विवस्त्र होऊन नाचणार्‍या चांडाळांनी आपल्याला आपल्या नजरेसमोर ओरबाडणे किंवा आपले कपडे नखाने फाडताना विवश होऊन कोरड्या डोळ्यांनी जगातल्या सार्‍या शून्यांचा चोळामोळा करून एखाद्या ठम्म पुतळ्याप्रमाणे थांबणे अनुभवणे काय असते? सुखाच्या क्षणांची बेरीज वजाबाकी न करता जेव्हा फक्त वेदनांचा गुणाकार सहन करणे काय असते? तुंबलेल्या मोरीचे पाणी घरभर पसरून सगळ्या किळसवाण्या भावना गिळून जगणे काय असते? दया माया सहानुभूती या भावना क्षुल्लक वाटतात अशावेळेला.. जगण्यावर हसणे येऊ लागते.. या अशावेळेला सुद्धा तरुन जाणे म्हणजे वादळामध्ये मातीत मिसळून गेलेल्या गावामध्ये जमिनीत रुतून सार्‍या मृतदेहांच्या खचात, विध्वंसाच्या क्रूर हल्ल्यात फक्त एकट्याने उभे असणे.. हे कुणा माणसाच्या शक्यतेच्या पलिकडे आहे… माणसामधल्या भगवंतामुळेच केवळ हे शक्य होते वा शक्य आहे.. याची प्रचिती अनुभवणे… शरांच्या वा बाणांच्या पावसामध्ये स्वतः न खरचटता जगणे काय असते हे फक्त त्यातुन तरलेलाच सांगू शकेल.. सर्वसाक्षी परमेश्वराच्या विश्वासाचे अमृत प्यायले की भौतिक अडथळ्यांचे जहाल विष पचविणे काहीच नसते!

एखाद्या निरागस लहान मुलाच्या भूमिकेची काय गोडी असते ती अशावेळी कळते.. जगाच्या सर्व चौकटींना झुगारुन एखाद्या मनमौजी भ्रमराप्रमाणे बिनधास्त बागडण्याची भूमिका! कोण काय म्हणेल, कुणी बघेल अथवा नाही बघणार, कुणी चिडेल, हसेल, रडेल, मारेल वा नाक मुरडेल याचे सर्व अंदाज धाब्यावर बसवून जगण्याला एखाद्या चेंडूला लाथाडण्याप्रमाणे ते लहान मूल पुढे पुढे जात असते… ही भूमिका प्रत्येकानेच जगलेली असते, नव्हे नव्हे सगळ्यांमध्येच ती असते फक्त वयाचा साज असा काही चढवला जातो की या भूमिकेचा अंमळ विसर पडतो… त्या परब्रह्मावर, त्या भगवंतावर बिनधोक विश्वास ठेवणे कितीतरी सुखकारी असते हे पहायचे म्हणजे एखाद्या लहान मुलाला आठवायचे…. ही भूमिका कधीतरी यावी यासाठी त्या परमेश्वराकडे नेहमी सांकडे घालत रहावे असेच वाटते!

दैनंदिनी लिहीताना बर्‍याचदा शब्दांचा चाप सुटतो… कदाचित नकळत इथे कुणाच्या भावनांच्या तारा माझ्याकडून छेडल्या गेल्या असतील.. जुन्या गाडून टाकलेल्या भुतांनी मनाचा ताबा घेतला असेल तर मोठ्या मनाने मला क्षमा कराल हीच प्रामाणिक अपेक्षा… गाडून गेलेली दुःखे ही पुन्हा जिवंत झाली तर एक जरुर असते की ती दुःखे पूर्ण गाडलेली नव्हतीच ती मोकळी करुन बाहेर फेकण्यासाठीच पुन्हा मोकळी झाली असतील कदाचित.. गेल्या दोन दिवसांचे मोजमाप लिहीणे थोडे अवघड होते… संमिश्र भावनांचा गोंधळ झाला की तयार होणारे जीवनसंगीत सुद्धा एकदम वेगळे असते… सुखद क्षणांच्या कैदेमध्ये रहाणे कुणाला नाही आवडणार… पत्नीसह केलेल्या धम्माल मस्तीमध्ये आकंठ बु्डून राहणे कुणाला नाही आवडणार.. मनसोक्त मारलेल्या गप्पांमध्ये रंगून जायला कुणाला नाही आवडणार, वेगवेगळ्या आठवणींच्या देवाणघेवाणीमध्ये जगणे ओवाळून टाकणे कुणाला नाही आवडणार… अशा वेळेला आलेल्या बाकी गोष्टींना एखाद्या पुस्तकावरील धुलीकणांप्रमाणे फुंकर मारुन पुढे जावेसे वाटते… जगण्याला व त्या काळाला माफ करून पुढे आणखी सुखद क्षणांसाठी मार्गक्रमण करावेसे वाटते.. आयुष्यातील उद्देशासाठी बाकी सगळ्या गोष्टींचा जोहार करावासा वाटतो… कदाचित याच उद्देशपूर्तीसाठी सध्या येणारी वादळे परीक्षा घेत असतील वा नकळत तो परब्रह्म आम्हाला मोठ्या वादळांना परतविण्यासाठी तयार करते असेल ही जाणीव आली की जगणे सुसह्य वाटते.. एखाद्या आवडत्या गोधडीमध्ये थकल्यानंतर आरामात झोपल्यासारखे वाटते हे नक्की!!