जर आणि तर
मे 20, 2022 यावर आपले मत नोंदवा
नश्वरतेचा शिक्का घेऊन जन्माचे देणे मिरवत राहतो, दूर एका काळ्या काळाच्या पुलावरुन मृत्यू विकट हास्य करुन पाहत असतो, सूर्याला जगणे वहावे किंवा अंधाराला शरण जावे की फक्त तटस्थ भुमिका घेऊन उजेड आणि सावलीची सीमारेखा ठरवत जावे, कळत नाही! कळत नाही की आपल्याला न कळणे हेसुद्धा कुणी कळणार्याने आपल्याला हे सारे नकळत वाटावे असे पेरले नसेल कशावरुन, प्रश्नाचे उत्तर मिळाल्यानंतर आणि प्रश्नाने भांडावुन सोडलेले असताना लौकिक अर्थाने, भौतिकतेच्या नियमाप्रमाणे आपल्या जिवनामध्ये जाणवणारा अथवा मुल्यांकन करता येईल असा कोणताच फरक पडत नाही, नाही म्हंटले भावार्थामध्ये, मानसिक पटलावर उठलेल्या तरंगांचा तेव्हा ठाव कळतो किंवा आपल्यामध्येच आपण प्रश्नामध्ये असताना प्रश्नानंतरची अवस्था लपुन होती, ती सुद्धा आपल्या नकळत, फक्त त्या एका बदलाच्या नांदीसाठी किंवा भौतिक नोंदीसाठी व्यक्त होण्याची वाट बघत असते! म्हणजे जे झाले नाही अन जे सारे झाले आहे, जे घडणार आहे किंवा जे दिसणार आहे ते आपल्यामध्येच अस्तित्वाला आहे, असते! फक्त दस्तुरखुद्द आपण अनभिज्ञ असतो!
एखादे फुल उन्मळुन जमिनीला बिलगते तेव्हा हृदय पिळवटण्यापेक्षाही एखाद्या अनुत्तरीत भटकणार्या प्रश्नाला उत्तर मिळाले नसेल कशावरुन, वाईट वाटण्यापेक्षाही तो मुक्ततेकडे जाणारा सोहळा नसेल कशावरुन! विवस्त्र फिरणार्या शरीराने कदाचित आवरणाचा, प्रावरणाचा संग त्यागुन नजरेला भेदाअभेदापलिकडे दिसणार्या स्वच्छ, निर्मळ निर्झराकडे विस्थापित केले नसेल कशावरुन! माझ्या दिसण्यावरुन माझे असणे, माझी व्यापकता जर ठरते असेल तर ही संकुचितता नाही कशावरुन, जे दिसत नाही, जिथे कुणी पोहचू शकत नाही तिथे मनाच्या वारुची घोडदौड सुरू असताना एका यत्किंश्चित भौतिक टिंबामध्ये माझे अस्तित्व कसे काय असू शकेल!
न दिसणार्या जखमा किंवा अजुनही अव्यक्त असलेल्या जखमा अंगाखांद्यावरुन गुदगुल्या करू लागतात, आपल्यातील आपण म्हणजे कुणीच नसल्याची, किंवा आपल्यामध्ये आपण सोडुन बरेच काही असण्याची जाणिव होत असेल तर, निर्बंध असणे म्हणजे जखडणे असेल अन एखाद्याच्या पुर्ण वशामध्ये असणे म्हणजे मोकळे वाटत असेल तर, दुर्मिळ अन दुरापास्त असणार्या भावनांच्या वावटळाशी जर संग घडला तर, इतरांना ज्या गोष्टिचा विचारही थरकाप उडवत असेल नेमक्या त्याच गोष्टिमध्ये आपल्याला इंगित सापडले तर!
जर आणि तर एखाद्या न संपणार्या अख्यायिकेचे नायक वाटू लागतात, सभोवताली घडणार्या असंख्य घटनांच्या पोटामध्ये घुसुन त्या घटनांचे भांडवल करुन एका अनिश्चततेपासुन दुसर्या अनिश्चततेकडे अहोरात्र काळ खाऊन बीभत्सततेचा असंतृप्त ढेकर देत असतात! घड्याळाशी त्यांचा काहीही संबंध नसतो तरीही घड्याळाच्या काट्यांना फितवुन, पुढच्या प्रवासाचे अमिष देत राहतात, कदाचित हे जर आणि तर हे त्या घड्याळाचे काटेच नसतील ना, जग म्हातारं होत असताना हे मात्र फुगडी घालत राहतात, एकमेकांसोबत असतात, भेटतात असे वाटते पण न भेटता सराईतपणे एकमेकांना टाळत असतात, त्यांचे भेटणे म्हणजे काळाचे थांबणे असे वाटुन ते पळत असतात.. पण काळ मात्र त्यांच्यापुढचा खेळाडू आहे… कुणाच्याही थांबण्याने किंवा न थांबण्याने काळाला काहीही फरक नाही पडला, ना पडणार! पण हे त्या काट्यांना, त्या जर आणि तर या दुकडीला कसे उमजेल!
निलेश सकपाळ
२०मे२०२२
प्रतिक्रिया