“आत्मविश्वास”

तालेवार जगणे ज्यांचे,
लखलाभ ही चंदेरी दुनिया त्यांना!
माती फासून माथ्यावरी,
आमचे ताटवे भेदती आभाळांना!

लागता अहंतेचा लळा,
नसे मात्रा छिद्र पडल्या जहाजांना!
विखार शरमला विषाचा,
शब्दरुप मिळता कपटी विचारांना!

दुःख असावे मलमली,
महाली विनासायास झुरणार्‍यांना!
कृतघ्न म्हणावे जगाला,
दृष्टी छेदूनी आरसे विकणार्‍यांना!

अलौकिक होता विजय,
तो आनंद काडीमोल गुलामांना!
कोण शहीद सीमेवरती,
काय फरक पडतो निर्वासितांना!

दुर्मिळ आणि दुरापास्त,
औषध नाही आमच्या स्वभावांना!
गळ्यात पडू वा लाथाडू,
जुमानत नाही कुणा सावकारांना!

व्यर्थ भय मोह-बंधनांचे,
वेळ येता फिरवू या ग्रहतार्‍यांना!
सशक्त आमचे वज्रबाहू,
पाजू पाणी वाटेतील पत्थरांना!

गवसेल यशाचे गमक,
फुटेल आवाज जेव्हा वेदनांना!
लढुन उरलो सार्‍यांशी,
आता आव्हान येणार्‍या पिढ्यांना!

-निलेश सकपाळ
१४-१२-२०२३

“पुनर्जन्म”

गरजत होते पण कळत नव्हते,

खूप दाटले तरी बरसत नव्हते,

नवेच ढग असावे आजकालचे,

दारातूनी पुढे ते सरकत नव्हते!

झिरपत होते पण मुरत नव्हते,

दुःख मलमली ते संपत नव्हते,

आणाभाका नुसत्या कसल्या,

तेल संपूनी दिवे विझत नव्हते!

अवगत होते पण वळत नव्हते,

अन् गुंत्यावाचून करमत नव्हते,

विषाद माळले जरी धाग्यातूनी,

तुटुदे म्हणूनीही ते तुटत नव्हते!

वरचढ होते पण जिंकत नव्हते,

शत्रू माझे एवढेही सरळ नव्हते,

घमासान झाले जरी आता इथे,

शत्रूविना कुणी जिवलग नव्हते!

अवखळ होते पण सहज नव्हते,

माझे मीपण मज गवसत नव्हते,

ग्रीष्मात ओलावा आणला कुणी,

कोरड्या परसास उमगत नव्हते!

अवघड होते पण अटळ नव्हते,

मृत्यूस काळ, वेळ, प्रहर नव्हते,

गळाभेट घेईन त्या सवंगड्याची,

या क्षणी त्याचेही दडपण नव्हते!

खडतर होते पण सपक नव्हते,

जगण्यास यशाचे अत्तर नव्हते,

मोगऱ्यास वेड लागता चाफ्याचे,

पुनर्जन्मावाचूनी गत्यंतर नव्हते!!

-निलेश सकपाळ

२८ नोव्हेंबर २०२३