पाऊस न पाहिलेला माणुस!

रुजणार्‍या एखाद्या बियाण्याला नाकारण्याचा अधिकार ओल्या मातीला कधीच नसतो, मग भले त्या बियाण्यातून उदय होणार्‍या रोपट्यामध्ये मातीला नासवण्याचे विष का पेरले असेल. ऋणानुंबंध असणार्‍या मानवी स्वभावातील गुंतागुंत जेव्हा नकळत शब्दांची श्रृंखला खंडीत करायला लागते, जिभेचे आणि हृदयातून कंप पावणार्‍या भावनांचे अघोषित युध्द सुरु होते, मेंदू बिगुल फुंकुन अदृश्य मनपटलावर युध्दाचे तांडव सुरु करण्यास अनुमोदन देतो, तेव्हा धारदार शब्दांची अस्त्रे गिळावी लागतात, अनंत जखमांनी स्वतःला पोखरुन घ्यावे लागते, न दिसणार्‍या अन कधीही न अनुभवलेल्या यातनांच्या अंगणामध्ये याचनेची झोळी लपवुन स्वाभिमानाच्या वाश्याला पकडून घट्ट उभे रहावे लागते. विजा कडाडल्या अन त्या जिथे अवतरल्या तिथे होणार्‍या नुकसानाचे अंदाज कधीही पाऊस न पाहिलेला माणूस कसा काय लावू शकेल! ज्या सुगंधाचे आयुष्य फुलाच्या कोमेजल्यानंतर वार्‍यामध्ये शोधावे लागते किंवा आठवणीच्या साठवणीमध्ये चाचपडावे लागते त्या सुगंधाला अमरत्व कसे बहाल करायचे, अन ते फुल त्या बागेतील नव्हे तर या धरतीवरील शेवटचे फुल असेल तर! तो सुगंध पुन्हा कसा सापडावा, तो गेलेला क्षण ज्यामध्ये त्या सुगंधाचे अस्तित्व कैद होते तो क्षण त्या काळाच्या पोटामध्ये जाऊन कसा पुन्हा मिळवायचा! हट्ट फुलाचा असेल वा सुगंधाचा वा त्या अनुभुतीतुन उत्पन्न झालेल्या सुखाचा, हा हट्टदेखील तेवढाच क्षणभंगुर मानायचा का? यातना हे वेदनेचे दृश्यस्वरुप म्हणता येईल पण यातना प्रकट होण्याआधी त्यामागची वेदना संपुन गेलेली असते, सद्य क्षणास कदाचित अनुभवली जाणारी वेदना असते अन यातना आधीच्या क्षणाची मोहोर असते!

आवाजाचा माग काढणं सोप्प असतं का? जोपर्यंत आवाज आणि त्याची कंपनं शाबित असतात तो पर्यंत दिशा कळाली तर ठिक नाहीतर पुढच्या येणार्‍या सादेची चाहुल लागेपर्यंत आधी ऐकलेल्या आवाजाचे वेड सर्वांगामध्ये भिनवावे लागते! पुढची साद येईल याची शश्वती ज्याची त्याने मिळवायची असते! इथे एकच लक्षात ठेवावे लागते ते म्हणजे आवाजाच्या मागे धावताना ना रस्ते पुरे पडतात, ना दर्‍या-खोर्‍या, ना डोंगर-शिखरे, ना नद्या-धबधबे, ना महिने-वर्षे, ना जन्म-मृत्यू! फक्त दिशा बाणावर ठेवुन प्रत्यंचा ओढुन स्वतःचे सर्वस्व शून्यात विरणार्‍या भोवर्‍यामध्ये वाहून द्यायचे असते!

पाऊस न पाहिलेला माणुस जेव्हा वादळाचा पदर शोधू जातो, काळ्या ढगांची चादर ओढुन उब मागू जातो, ढगाळलेल्या वातावरणामध्ये आकाशाखाली सारीपाट मांडू जातो तेव्हा काय कराल!! ज्याने ना मृदगंध श्वासातून अंतरंगामध्ये घेतला आहे, ना त्याने खळखळून वाहणार्‍या नद्यांच्या संगिताचे श्रवण केले आहे, ना रानोमाळातून पावसाकडे आतुरतेने धावणार्‍या पक्षांचा किलबिलाट पाहिला आहे, ना थेंबाथेंबातून मातीच्या कणाकणाला होणारा पावसाचा अभिषेक पाहिला आहे! रखरखीत वाळवंटाचा शुष्क सोबती असणारा हा पाऊस न पाहिलेला माणुस अतरंगी वाटतो.

हळुहळु आपल्याही आतमध्ये कुठेतरी एक वाळवंट तयार होत आहे आणि असणारा ओलावाही दुरापास्त होत आहे, काहीही असो, पाऊस न पाहिलेला माणुस आपली वसाहत वाढवत आहे हे मात्र खरं!!

-निलेश सकपाळ
१३ ओक्टोबर २०२३