दैनंदिनी – ०८ जुलै २०२१


दैनंदिनी – ०८ जुलै २०२१

नैतिकता, नितीमत्ता बोलायला जेवढे अवघड कदाचित जगण्यासाठी त्याहुनही जास्त अवघड शब्द आहेत. इतरांनी आपल्याला तोलणे किंवा आपण इतरांचे मोजमाप करणे हे सदैव घडत असते..पण जेव्हा आपण स्वतः खुद्द आपल्यालाच तोलायला जातो किंवा तोलतो तेव्हाच आपल्या न्याय्यपणाची परीक्षा खर्‍या अर्थाने होत असते.. आपण स्वतः तेव्हा आरोपी असतो, आपण पोलिस, आपण वकिल आणि आपणच न्यायमुर्ती असतो.. बघायला गेले तर खुप सरळ हिशोब आहे पण बर्‍याचदा बर्‍याचजणांची अवस्था चोरुन दुध पिणार्‍या मांजरासारखी असते!
मोजमाप करताना वजनकाट्यामध्ये एका बाजूला जेव्हा विशिष्ट वजन ठेवुन त्याच्याबरोबर दुसर्‍या बाजूला इतर गोष्ट तोलणे कदाचित सोपे असते.. कारण कुठे थांबायचे कधी थांबायचे अन किती मोजायचे हे पुर्वनियोजित असते.. पण जेव्हा पहिल्याबाजूला ठेवायला येणार्‍या मापाचे परीमाणच माहित नसेल तेव्हा मग दुसर्‍या बाजूला ठेवण्यात येणार्‍या गोष्टीचे मोजमाप करायचे तरी कसे? ह्याला आपण नैतिकता जपणार्‍यांचा तात्विक गोंधळ म्हणू शकतो किंवा त्यावेळी उद्भवणार्‍या दोलायमान परिस्थितीचा झगडा! कारण तत्वांना किमतीचे लेबल लावणे हा त्या तत्वांचा तर अपमान होईलच पण त्याहीपेक्षा त्या तत्वांना अनुसरुन जगणार्‍या जिवासाठी तो सर्वस्वी त्याच्या अस्तित्वाला किंवा ओळखीला दिलेले आव्हान ठरेल!

आपले प्रतिबिंब जसेच्या जसे परावर्तित करणारा आरसा जेव्हा आपल्या हातातील घड्याळाची वेळ चुकीची सांगतो तेव्हा आपल्याला समजुन घेणार्‍या एखाद्या दुसर्‍या व्यक्तीच्या मनात आपल्याला हवी असलेली आपली प्रतिमा असेल याची खात्री किंवा अपेक्षा ठेवणे म्हणजे निव्वळ धुळफेक ठरेल…

जाणीव आणि अनुभव दोन पुर्णतः वेगळ्या गोष्टी, जाणीव सोप्या शब्दांत म्हणायचे तर न अनुभवता होणारी अनुभुती! हरवलेल्या एखाद्या क्षणाबरोबर त्या क्षणाला मिळालेली अनुभुती हरवते का की एखादी अनुभुती विस्मरणात गेल्यानंतर तो क्षण हरवला असं म्हणतात?? कशापासुन अलिप्त व्हायचं अन कशासाठी अट्टहास करायचा याचा अंदाज घेण्यासाठी अनुभुती आवश्यक नव्हे हवीच! व्यवहारीक जगामध्ये भौतिक सुखांच्या विळख्यात एकदा अडकले की एका भौतिक सुखापासुन दुसर्‍या भौतिक सुखाकडे एवढाच प्रवास सुरु होतो, भौतिक सुखांपेक्षाही दुसरे कुठले सुख आपल्याला आंतरीक मनःशांती देऊ शकेल याचा विचार येता येता आयुष्यातील उर्जेची फक्त थोडी थोडकी सावली आपल्याकडे शिल्लक राहिलेली असते…

प्रवाहाला दैवी कौल मानुन स्वतःची फुटकळ समजुत काढुन त्याबरोबर वाहत जाणे केव्हाच बरोबर ठरणार नाही.. तर प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन उगमाशी एकरुप होणे कधीही आणि केव्हाही संयुक्तिक ठरेल… अन हे कळण्यासाठी लागणारी अनुभुती ज्याची त्याने शोधावी अन ठरवावी!

-निलेश सकपाळ
०८-०७-२०२१

यावर आपले मत नोंदवा