विहंग

विहंग

वात दिव्याची जळता जळता,
सांगत होती जळायचे आहे,
ज्योत विझण्याआधी,
तेल संपण्याआधी,
आसमंतभर उजळायचे आहे!

प्रवास छोटा अर्ध्यावर असता,
अंतरंग सारे उधळायचे आहे,
धुके निवळण्याआधी,
आभास सरण्याआधी,
सावलीस मस्त रंगवायचे आहे!

मौनात गोंगाट शोधत असता,
बेनामी स्वर्गीय सुर व्हायचे आहे
अंत उलगडण्याआधी,
धैर्य निखळण्याआधी,
मृत्यूस कोडे घालून यायचे आहे!

माझा तुमचा हिशोब जुळवता,
संचिताचा पाढा वाचायचा आहे
अश्रु ओघळण्याआधी,
बंध आवळण्याआधी,
रेतीसम मुठीतुन निसटायचे आहे!

भाळावर जखम ओली मिरवता,
युगायुगांचे ऋण आठवायचे आहे,
विश्व गोठण्याआधी,
सूर्य वितळण्याआधी,
राखेतुन विहंगासम उडायचे आहे

-निलेश सकपाळ
०४-११-२०२१

“तुतारी”

वळणांची वाट गरगरणारी,
फिरुनी येते पुन्हा माघारी
नजर वेंधळी घुटमळणारी,
… सुरुवातीचे ते कौतुक भारी!

आत डोकवा, येते शिसारी,
घाटाघाटांची गम्मत न्यारी!
कधी झटका, मध्येच उभारी,
चांदण्यानीच थाटली पथारी!

हुंदक्यांची ती भाषा बिलोरी,
काळजांच्या आरपार कट्यारी!
सोबतीचे जाम, आठवांची यारी,
जणू,जिभेवर चिंच विरघळणारी!

मदमस्त कलंदर तो पुकारी,
कोण नाचती नी, कोण मदारी?
कुठले आप हे? कुठले शेजारी,
भाव द्या चेहर्‍याला, व्हा रंगारी!

झटावे नशिबाने रोजच बाजारी,
म्हणे नशिब तुझे देशील उधारी?
बुरुजावरुनी वाजू द्या तुतारी,
येता आम्ही, कफल्लक भिकारी!

-निलेश सकपाळ, २० फ़ेब्रुवारी, २०१३

दैनंदिनी – ०८ जुलै २०२१

दैनंदिनी – ०८ जुलै २०२१

नैतिकता, नितीमत्ता बोलायला जेवढे अवघड कदाचित जगण्यासाठी त्याहुनही जास्त अवघड शब्द आहेत. इतरांनी आपल्याला तोलणे किंवा आपण इतरांचे मोजमाप करणे हे सदैव घडत असते..पण जेव्हा आपण स्वतः खुद्द आपल्यालाच तोलायला जातो किंवा तोलतो तेव्हाच आपल्या न्याय्यपणाची परीक्षा खर्‍या अर्थाने होत असते.. आपण स्वतः तेव्हा आरोपी असतो, आपण पोलिस, आपण वकिल आणि आपणच न्यायमुर्ती असतो.. बघायला गेले तर खुप सरळ हिशोब आहे पण बर्‍याचदा बर्‍याचजणांची अवस्था चोरुन दुध पिणार्‍या मांजरासारखी असते!
मोजमाप करताना वजनकाट्यामध्ये एका बाजूला जेव्हा विशिष्ट वजन ठेवुन त्याच्याबरोबर दुसर्‍या बाजूला इतर गोष्ट तोलणे कदाचित सोपे असते.. कारण कुठे थांबायचे कधी थांबायचे अन किती मोजायचे हे पुर्वनियोजित असते.. पण जेव्हा पहिल्याबाजूला ठेवायला येणार्‍या मापाचे परीमाणच माहित नसेल तेव्हा मग दुसर्‍या बाजूला ठेवण्यात येणार्‍या गोष्टीचे मोजमाप करायचे तरी कसे? ह्याला आपण नैतिकता जपणार्‍यांचा तात्विक गोंधळ म्हणू शकतो किंवा त्यावेळी उद्भवणार्‍या दोलायमान परिस्थितीचा झगडा! कारण तत्वांना किमतीचे लेबल लावणे हा त्या तत्वांचा तर अपमान होईलच पण त्याहीपेक्षा त्या तत्वांना अनुसरुन जगणार्‍या जिवासाठी तो सर्वस्वी त्याच्या अस्तित्वाला किंवा ओळखीला दिलेले आव्हान ठरेल!

आपले प्रतिबिंब जसेच्या जसे परावर्तित करणारा आरसा जेव्हा आपल्या हातातील घड्याळाची वेळ चुकीची सांगतो तेव्हा आपल्याला समजुन घेणार्‍या एखाद्या दुसर्‍या व्यक्तीच्या मनात आपल्याला हवी असलेली आपली प्रतिमा असेल याची खात्री किंवा अपेक्षा ठेवणे म्हणजे निव्वळ धुळफेक ठरेल…

जाणीव आणि अनुभव दोन पुर्णतः वेगळ्या गोष्टी, जाणीव सोप्या शब्दांत म्हणायचे तर न अनुभवता होणारी अनुभुती! हरवलेल्या एखाद्या क्षणाबरोबर त्या क्षणाला मिळालेली अनुभुती हरवते का की एखादी अनुभुती विस्मरणात गेल्यानंतर तो क्षण हरवला असं म्हणतात?? कशापासुन अलिप्त व्हायचं अन कशासाठी अट्टहास करायचा याचा अंदाज घेण्यासाठी अनुभुती आवश्यक नव्हे हवीच! व्यवहारीक जगामध्ये भौतिक सुखांच्या विळख्यात एकदा अडकले की एका भौतिक सुखापासुन दुसर्‍या भौतिक सुखाकडे एवढाच प्रवास सुरु होतो, भौतिक सुखांपेक्षाही दुसरे कुठले सुख आपल्याला आंतरीक मनःशांती देऊ शकेल याचा विचार येता येता आयुष्यातील उर्जेची फक्त थोडी थोडकी सावली आपल्याकडे शिल्लक राहिलेली असते…

प्रवाहाला दैवी कौल मानुन स्वतःची फुटकळ समजुत काढुन त्याबरोबर वाहत जाणे केव्हाच बरोबर ठरणार नाही.. तर प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन उगमाशी एकरुप होणे कधीही आणि केव्हाही संयुक्तिक ठरेल… अन हे कळण्यासाठी लागणारी अनुभुती ज्याची त्याने शोधावी अन ठरवावी!

-निलेश सकपाळ
०८-०७-२०२१

सोहळा

सोहळा

कुणास गमते आज, कुणा गमले आधी
एकांतात सुख आहे, एकांतात ती समाधी!

मुकपणाचे दाह इथे, सोनफुले होऊन गेले
सुगंधात ऐब आहे, सुगंधात ती खुमारी!

निसर्ग घाली थैमान, आपुलाच वाटे कोणी
उद्रेकात क्रांती आहे, उद्रेकात ती भरारी!

ओसरीत चंद्र पोरका, घरात कैद आभाळ
समाजात मान आहे, समाजात ती निलामी!

इतिहास मग जेत्यांचा, डावलुन साहेब जातो
भविष्यात घात आहे, भविष्यात ती गुलामी!

अजुन जिवंत मिठीत, तुझ्या भेटीचे पुरावे
विरहात नशा आहे, विरहात ती शिसारी!

शब्दही अजब शहाणे, मौनात उमटती तराणे
गोंधळात गाव आहे, गोंधळात ती बिचारी!

चुकुन हसलीस काल, मैफिलीत काजव्यांच्या
क्षणार्धात ठप्प आहे, क्षणार्धात ती प्रवाही!

हृदयाचा चुकला ठेका, बेताल ही जिंदगानी
पायामध्ये चाळ आहे, पायामध्ये ती तबाही!

तोलून श्वास हयातभर, हतबल राजा शेवटी
संभ्रमात मृत्यू आहे, संभ्रमात ती उपाधी!

भेटण्यास आले मला, न भेटणारे लोक जेव्हा
सोहळा तो तृप्त आहे, सोहळ्यात मी उपाशी!

२३जून२०२१

अद्वैत

अद्वैत

अद्भुत अनाहुत संचित,
अनाकलनीय कालपट!

अनामिक अतर्क्य संरचित,
अभिनिवेश अकल्पित!

आवर्तन आवेग अनियंत्रित,
अघोषित आंतरीक उद्वेग!

अचुक अवाढव्य अभिरुप,
अविचल अलंकृत प्रतिबिंब!

अक्षर अविभोर अंबरीश,
अचंबित अवाक सकलजन!

अविक्षित आत्मिक महोत्सव,
अथांग अमृतकुंभ अचाट!

अविरत अनमोल मार्गस्थ,
अप्रुप अलिप्त अद्वैतावस्था!

१७ जून २०२१

दिव्यत्व

दिव्यत्व

दाराभोवती सडा तुझ्या चांदण्यांचा,
नकोच मला आभाळ आता,
नकोच पापणीचे मिटणे आता,
श्वासही तुझा भास माळुन येतो,
सोहळाच हा नित्य तुला पांघरण्याचा!

सूर्य होऊन जाईल जणू काजव्याचा,
नकोच उजेड उसना आता,
नकोच सावली तीही आता,
गावही स्वप्नांचा तेजाळुन येतो,
अंतरी वीजकल्लोळ तुझ्या अस्तित्वाचा!

तरंगाशी नाते तुझे तू या लाटालाटांचा,
नकोच कोरडे सागर आता,
नकोच भरती आहोटी आता,
किनारा चालीरीती मोडुन येतो,
प्रवाहात प्रवासी मी तुझ्या दिव्यत्वाचा!!

१२ जून २०२१

लळा

लळा

फुलांनीच काटा काढावा,
लळा एवढा नाजुक होता!

सावज भुलले शिकाऱ्याला,
उजेड एवढा अंधुक होता!

दगडही तरंगावे समुद्रावरी,
भाव एवढा साजुक होता!

खांद्यावर हात देत हसला,
बाप एवढा भावूक होता!

सीमारेषा घराला छेदणारी,
पत्ता एवढा अगतिक होता!

तिला पाहणे निर्लज्जापरी,
मोह एवढा मसरूक होता!

होकार होता की नकार तो,
मृत्यू एवढा नजदिक होता!

निलेश सकपाळ
४ जून २०२१

दैनंदिनी ०१ जुलै २०२१

एखादा झोका अनाहुतपणे लक्षात राहतो, ज्या झोक्याबरोबर काळजाचा थरकाप उडाला होता, अस्तित्वाच्या ठिकर्‍या उधळल्या जाऊन सार्‍या भुतकाळाची उजळणी झाली होती, भविष्याबद्दल साशंकता निर्माण झाली होती… कधीतरी निसरड्या वाटेवरुन भक्कम वाटणारा आधाराचा दगड मामुली पापुद्र्याप्रमाणे हातात आला असेल अन ब्रम्हांड आठवले असेल… रस्ता ओलांडताना नखभर अंतरावरुन भरधाव एखादे वाहन आपल्या नकळत आपली वाट कापुन गेल्यानंतर समोर येणारा नजरपट.. एखादी उचकी लागल्यानंतर अडकलेला श्वास जर सुटता सुटत नसेल, हातांची होणारी फडफड कोणापर्यंत पोहचविण्यास असलेली असमर्थता त्या श्वासाचे मोल सांगुन जाते.. तो एक श्वास वजा करुन पुढचे श्वासांचे मोल फक्त आणि फक्त शून्यच!

धापा टाकत जगणारे अन धावुन झाल्यावर धापा टाकत कापलेल्या अंतराचा आस्वाद घेणारे यामध्ये न सांगता येणारा फरक आहे.. स्वप्नांची राखरांगोळी करुन उबेला निवांत झोपणे अन झोपेची कुर्बानी देऊन स्वप्नांची गुढी उभारणारे यामध्ये असलेली विसंगतता जेव्हा अनुभवता येईल, खळबळ होऊन जेव्हा अंतरातील ढवळाढवळ मुर्त स्वरुपात पावलांना ढकलायला सुरुवात करेल तेव्हा आणि तेव्हाच त्या अनुभवलेल्या विसंगततेची खरी रुजवात होईल. किनार्‍यावरुन समुद्र अनुभवता येत नाही तर बिनधास्त खलाशाप्रमाणे जेव्हा आपली नौका त्या लाटांवर स्वार होते, ध्रुवाच्या आधाराने दिशाप्रवास सुरू होतो, ओळख झुगारुन जेव्हा नवं क्षितीज कपाळावरील आणि हातावरील नशिबाला आव्हान देऊ लागते कदाचित तेव्हा आणि तेव्हाच कदाचित समुद्रासारखा मैत्र उलगडू लागेल, बेभरोशाचे वाटणारे वादळ पंखांसारखे वाटू लागेल अन सारे मर्त्य, कुपमंडुक मानव लाटांप्रमाणे क्षणभंगुर वाटू लागतील… आपल्या अस्तित्वाची कदर जेव्हा खुद्द निसर्गालाच घ्यावी लागेल, आपल्यासाठी विशेष घटनांना जन्म द्यावा लागेल.. तेव्हा होणारा आनंद किंवा उन्माद काही औरच असेल!!

आनंदासाठी प्रयत्न करणे.. अन विहीत कर्म करताना आपल्या गळयात माळेप्रमाणे येऊन आनंद बागडणे हा स्वानुभव, स्वानंद कोणत्याही मिठाईपेक्षा सुमधुर, स्वर्गीय असेल यात काहीच शंका नाही… छोटे कुंपण, छोटे विचार अन छोटे स्वप्नं यामध्ये गुरफटुन आयुष्याची कितीतरी वाताहत झाली हे जर उमेद संपल्यावर कळले तर त्याचा काय उपयोग! नात्यांचे जंजाळ, अपेक्षांचे मायाजाळ जर आपलेच पंख छाटत असतील, आपल्याला पावलोपावली ठेचकाळत असतील तर काय करावे? प्रत्येक नाते सुगंधी असेल असे नाही.. अन प्रत्येक सुगंधी गोष्ट आपली होईलच असे नाही.. जे आहे त्याला नव्या आयामांची कल्हई देता आली तर ठीक नाही तर आपल्या स्वप्नांची, प्रयत्नांची झेप एवढी व्यापक हवी सगळे अनियमित ढोबळ जगणे प्रवाही होईल, प्रत्येकाला जगण्याचा उद्देश देईल.. आपण नाही तर आपल्या जगण्याचा पट दिपस्तंभ होईल!

आपल्या प्रामाणिक खस्ता वारीत चाललेल्या वारकर्‍यांप्रमाणे टाळ-चिपळीतील आर्त साद होऊन पांडुरंगाच्या त्या विधात्याचा चरणांशी आपल्याला मार्गस्थ करतील एवढे मात्र नक्की!!

-निलेश सकपाळ

आक्रोश चांदण्यांचा…

शांत होता भद्र किनारा,
त्यासोबत जळता तारा,
एक शेकोटी मरणानंतरची,
अन् लाट अनामिक आहोटीची…..

स्थित्यंतरे नवी क्षितिजावर,
बांधले घरटे पावसावर,
टोळकी भ्रामक त्या सत्याची,
त्यावर ही कल्हई गुपितांची……

आसक्तीची आलिशान मंदिरे,
उत्तुंग आभासी ती गोपुरे,
मग्न साधना युगांतरीची,
भूते ओशाळली वेशीवरची…..

आक्रोश वेगळा चांदण्यांचा,
मनावरुन ओघळणार्‍या भावनांचा,
गाठ अंतरी निद्रिस्त वादळांची,
अव्यक्त वाट ही अदृश्य पावलांची….
अव्यक्त वाट ही अदृश्य पावलांची….

–निलेश सकपाळ
२९ मार्च २०१५

अपेक्षांच्या किनार्‍यावरुन…

अपेक्षांच्या किनार्‍यावरुन…

उमेद जागवायची असेल तर आंतरिक उन्मादाशी नाते तोडून नाही चालत… भग्न मंदिराच्या भग्न अवशेषांमध्ये साठलेला दैवी अंश तेवढाच तेजस्वी अन चिरंतन असतो हेच जर नाही समजले तर भूतकाळाच्या जखमांमधून अन जल्लोषांमधून काळाच्या कपार्‍यांमधून पाझरणारी प्रेरणा काय गवसेल? रात्रीला सुरुवात मानायचे की रात्रीला शाश्वत सत्य मानून मिळालेल्या तोकड्या उजेडाला वरदान मानून कपाळावर फासायचे हेही कळले पाहिजे… एखादा रातकिडा जर रात्रीची चादर चोचीत ओढत नेऊन डोक्यात किर्रर्रर्रर्र करायला लागला तर काय करायचे याचेही उत्तर जाणिवेच्या तळाशी साठलेले पाहिजे… सारा उजेड जर अंधार गिळंकृत करुन चंद्राच्या एका ठिपक्यामध्ये साठला असेल वा कुणीतरी आकाशाचे झाकण बंद करुन फक्त उजेडाकडे जाण्यासाठी असलेले झाकण थोडेसे ऊघडे ठेवुन त्याला चंद्र नाव दिले नसेल कशावरुन?

नात्यांच्या जंजाळात चक्रव्यूहाप्रमाणे बाहेर न पडण्यासाठी अडकत जायचे का? नात्यांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली दुःखाच्या दलदलीमध्ये धसत जायचे का? प्रत्येक श्वासाबरोबर अपेक्षांची असंख्य रोपटी आपल्या अवतीभवती उपटसुंभासारखी किंवा नको असलेल्या अन आपल्याला माहीतही नसलेल्या असंख्य क्षुल्लक किड्यांप्रमाणे जन्माला येत असतात… कधी एखाद्या स्वप्नातून, कधी एखाद्या क्षणिक आनंदातून तर कधी एखाद्या छोट्याश्या कर्तव्यपूर्तीतून ही पिल्लावळ जन्माला येते अन एखाद्या बांडगुळाप्रमाणे आपल्याच रक्ताच्या थेंबाथेंबावर आपलेच गळे आवळण्यासाठी दिलखुलास एखाद्या वेलीप्रमाणे आपल्या अंगाखांद्यावर अदृश्य पकड घेऊ लागते… कधीही माहीत नसलेल्या वाटेचा माग हवाहवासा वाटतो तर एखाद्या क्रूर घटनेमधून पाशवी आनंदाचा एखादा पेला रिचवताना आपल्यातल्या दडून बसलेल्या राक्षसाशी आपली ओळख होऊ लागते…. असमंजसपणा वा समंजसपणा, संकुचितपणा वा व्यापकता, वैश्विकता वा कूपमंडुकता यातील फरक समजून घेणे निव्वळ फालतू अन निरर्थक वाटू लागते… द्विधा मनःस्थिती असलेली, वर्तमानाची भान नसलेली असंख्य जिवंत भूतं आपल्याला हातभराच्या अंतरावर घुटमळताना दिसतील… ती भूतं अन त्यांच्या हिशोबातील गोंधळापेक्षा जगाच्या तिरस्कृत वर्गामध्ये मोडणारे पण बेमतलब विचारांच्या झुल्यामध्ये अडकून न राहता त्याच विचारांनीच त्या झुल्याचा दोर कापलेले व निराशेत रुजलेले, वाढलेले आपले स्वरुप आपल्याला कांकणभर का होईना सरस वाटायला लागते… अपेक्षांची कुंपणं माणसाला हृदय पिळवटून त्यातील मदमस्त मोकळा श्वास या स्वतःतील अघोरी राक्षसांवर ओवाळून टाकायला भाग पाडतात… अपेक्षांच्या झाडांची सावली कधी जीवनातील उजेड पिऊन टाकायला सुरुवात करते हेही कळत नाही… ती वाढत जाते एका सावलीतून दुसर्‍या सावलीपर्यंत अन् दुसर्‍या सावली पासून तिसर्‍या, चवथ्या अन् तद्पश्चात आपल्या भ्रामक अस्तित्वाला आश्वासकपणे आणखी अपेक्षांमध्ये पिचलेल्यांना आकर्षित करण्यास सज्ज होते…. प्रवास नेहमीच सुरुवातीपासून शेवटाकडे असतो असं म्हणतात पण या अपेक्षांच्या जंगलातील प्रवास जिथून सुरु होतो तिथेच तो जिलेबीप्रमाणे स्वतःच्याच पोटात एखाद्या भोवर्‍याप्रमाणे शून्यात संपून जातो… जिथे संपतो त्याला शेवट म्हणता येणार नाही कारण कदाचित तिथेच कुठेतरी, आपल्याच अंतरी त्या अनुभूतीचं नवीन पर्व सुरु होत असावं!!

अपेक्षांना सौदा मान्य नसतो… त्या म्हंटलं तर निर्दयी अन म्हंटलं तर एखाद्या प्रेयसीप्रमाणे मोरपिशी असतात… नाती निर्व्याज असावीत असं कितीही वाटलं तरीही जशा दोन समांतर रेषा एकमेकींना अनंतात छेदतात त्याचप्रमाणे दोन माणसे कितीही स्वतंत्र असली तरीही एकमेकांना कुठेतरी, कधीतरी, कोणत्यातरी अपेक्षांमध्ये एकमेकांना छेदतात हे मात्र नक्की!! एकांताचा दरवळ कितीही आपलासा वाटला तरी कधीतरी तिथेच जीव घुसमटायला लागेल हेही सांगता येणार नाही! माणसाला स्वतःचे सारे रंग जेव्हा समोर सुस्पष्टपणे उमटलेले दिसायला लागतात व डोळ्यांमध्ये विषारी बाणांप्रमाणे खुपू लागतात तेव्हा म्हंटले तर स्वतःच्याच संगतीचा कंटाळा येतोच की! स्वतःच्याच स्वतःकडून अपेक्षा असणे चूक की बरोबर हे ठरवणे व्यक्तिसापेक्ष अन त्यावरील वादही निरर्थकच!

अपेक्षांचे असणे मान्य पण असूनही न जाणवणे अधिक महत्वाचे! अपेक्षांनी मनामध्ये उभारीसाठी रुंजी घातली पाहिजे… नकळत एकामागून एक ओघळणार्‍या अश्रुथेंबांची एकमेकांकडून अशी काय अपेक्षा असते… असते ते निर्धोकपणे उमटणार्‍या तरंगांच्या लहरींशी एकरुप होणे… अंतरातील संवेदनांना नव्या जाणिवेसाठी उद्धृत करणे.. नवे आयाम, नवी क्षितीजे, नव्या भावना अन नवे विश्व आपल्यामधूनच आकारताना बघताना अपेक्षांची फुलपाखरं अलगद या आनंदातील मधाने संतृप्त होऊन बागडताना बघणे म्हणजेच जगण्याचे सार्थक होय! नात्यांतील अंतरांचे साखळदंड असण्यापेक्षा आपापसात कसलाही संबंध नसतानाही एका लयीत विहार करणार्‍या त्या पाखरांप्रमाणे नात्यांमधील धागा असावा… कुणालाही न दिसणारा पण घट्ट एकमेकांना ओढीने बांधून ठेवणारा!!

– निलेश सकपाळ
२७ नोव्हेंबर २०१४