चौकट

तत्वज्ञान

तत्वज्ञान समजणे, तत्वज्ञान जगणे आणि तत्वज्ञान शिकवणे वेगवेगळ्या अवस्था आहेत. ज्याला तत्वज्ञान समजले तो ते जगेलच असे नाही, अन सार्‍या जगाला तत्वज्ञान शिकवणार्‍याला तत्वज्ञान जगता येईलच असे नाही.. यात सर्वात महत्वाचे काय तर तत्वज्ञान जगणे, त्याच्यात मुरणे अन इतके जुने होणे की ते तत्वज्ञान रोज नव्याने जगायला उत्प्रेरीत करीत राहील.सर्वसाधारण धारणेप्रमाणे धोपट मार्ग सोडुन जेव्हा एखादा अवघड वळणाची वाट निवडतो तेव्हा बघ्यांना नेहमीच कौतुक कमी आणि मत्सर जास्त वाटत असतो. एकतर सहज जगणे सोडुन काहीतरी वेगळे अवलंबणे म्हणजेच समाजाच्या लेखी गुन्हा त्यात जर यात यश नाही मिळाले तर दुप्पट गुन्हा, टिकाकारांना ते बरोबर असल्याचा पाशवी आनंद.. खरी मजा ही तेव्हाच येते जेव्हा ही वाट आपल्या अंगवळणी पडते अन त्यावरील सार्‍या अवघड वळणांशी मैत्री होते..यावेळी पदरी पडणारा स्वानंद एखाद्या मधाच्या थेंबाप्रमाणे वाटुन जातो…मग्रुर मनसुब्यांना सामोरे जाण्याचे सामर्थ्य तत्वज्ञान देते, आवाहनाला स्वीकारुन नवा पायंडा पाडण्याचे अलौकीक धाडस तत्वज्ञान देते.. एखाद्या दवबिंदूचे अस्तित्वही नकळत जाणवुन त्यासाठी पानांचा देठ हा अलवार हाताळला जाण्याचे भान तत्वज्ञान देते… रस्ता हा फक्त माध्यम न राहता त्याच्याशी सख्य जोडण्याचे गुपित तत्वज्ञान सांगते.. प्रत्येक सहयोगी मानव हा त्याच्या व आपल्यातील समान इश्वरी अंशामुळे आपल्याशी बांधला आहे याचे संस्कार तत्वज्ञान देते.. युद्ध हा एकमेव पर्याय नसुन जोडण्यासाठी, सांधण्यासाठी शब्दांचा बांध हा महत्वाचा दुवा असल्याचे तत्वज्ञान सांगते.. युध्द झालेच तर खोल अंतरंगापासुन त्या प्रामाणिक उद्देशाप्रती कटिबध्द राहण्याचे वाण तत्वज्ञान देते… शत्रुचे शत्रुत्व गाळुन त्यातल्या शरणागत आलेल्या डोळ्यांमध्ये पश्चातापाचे अश्रु ओळखायला तत्वज्ञान शिकवते… क्षणी रंध्रारंध्रातुन अग्निलंकार लेवुन राक्षसाचे दहन करण्याचे मार्गदर्शन तत्वज्ञान करते.. न बोलता उठणारे तरंग, चेहर्‍यावरील भावरंग, देहबोलीतील हावभाव या सगळ्यांशी संलग्न व्हायला तत्वज्ञान सांगते.. शेतात मदमस्त डोलणार्‍या कणिसाप्रमाणे ह्या माणसांच्या जंगलामध्ये टवटवित रहायला तत्वज्ञान शिकवते.. बाहेरच्या विश्वाकडुन आतल्या विश्वाकडे वाटचाल करायला तत्वज्ञान सांगते.. सुंदर बिलोरी स्वप्नांच्या दुनियेतुन ओरखड असलेल्या खरबडीत जगण्याच्या पटावर उभे करायचे काम तत्वज्ञान करते… शांततेचा आवज शोधता शोधता जेव्हा आतील आवाजाशी ओळख होते तेव्हा बाहेरील गोंगाट नगण्य वाटू लागतो.. तेव्हाच कदाचित तत्वज्ञानाचे परिसथेंब झिरपण्यास सुरुवात झालेली असते!

तत्वज्ञानाचे दान प्रत्येकाच्या झोळीत पडेलच असे नाही.. विचारांच्या गर्तेत हरवुन स्वतःला वास्तवाच्या विस्तवावर परखुन बघणे प्रत्येकाला जमेलच असे नाही, दारात आलेली सहजसुखे नाकारुन मनाने सांगितलेल्या ओबडधोबड मार्गावर दिशाक्रमण करणे एवढे सोप्पे नसावे.. सगळ्या दुनियेचा विरोध डावलुन भविष्यातील एका स्वप्नावर दाखविलेला आत्मविश्वास हरहृदयी धडधडेल असे नाही.. भरपुर वाचावे लागेल..घटनांचा ध्यास घ्यावा लागेल, सत्यासाठी कासावीस व्हावे लागेल.. येईल ते अंगावर घेऊन प्रत्यंचा ताणुन पुढील बाण भात्यातुन काढुन परिस्थितीकडे रोख धरुन रहावा लागेल.. कदाचित तेव्हाच हे सुख गाठी पडेल… मोहरलेली एखादी वेल बघुन आपसुक झिरपणारे सुख असेल, एखाद्या तहानलेल्या पांथस्थाला मिळालेलं एखादं गोड्या पाण्याचं वरदान असेल, झुंजूमंजू उजेडाचा जेव्हा काळोखाशी समझोता होऊन एकेक किरणाला धरतीच्या हवाली करताना दिनकराची लुकलुक अवस्था असेल, भारदस्त आवाजातून मिळालेली आश्वस्तता जेव्हा सामोरी येणाऱ्या महाकाय संकटाला आवाहन देत असेल, कधीही कुणीही केव्हाही ज्या बाभळीचा आधार न घेता अचानक एखादे पाखरू जेव्हा त्याच बाभळीवर घरटे बांधत असेल, अनेक रंगांमधून आपल्याला आवडणारा रंग जेव्हा आयुष्यात पहिल्यांदा नजरेसमोर आकाशभर पसरला असेल, रोजची सवयीची असणारी वाट, तिथले वळण एखादया अत्तराप्रमाणे आपले अंतर्बाह्य रुपडे सुगंधी करत असेल…. देवदर्शनासाठी झगडणाऱ्या यात्रिकाला भग्न मंदिरामधील पायरीपाशीच विधात्याच्या पावलाचे नयनविभोर सुचिन्ह दर्शनास मिळत असेल, न पाहिलेले, न अनुभवलेले अवर्णनीय असे संचित आपल्या झोळीमध्ये असणे म्हणजेच सर्वांगसुंदर सुख नाही का!

तत्वज्ञानाशी अगदी ओझरता का होईना पण एक क्षणिक संग व्हावा, या जगण्याच्या वाळवंटाचे नंदनवन व्हावे, समज आणि गैरसमज या पलिकडे जाऊन निर्भेळ जगण्याचे मृगजळ नजरेतुन आयुष्य व्यापुन जावे, त्या बासरीच्या एका स्वरासाठी या जिवनाचे कान व्हावे, पंचप्राण एकवटुन त्या विधात्याच्या चरणाशी लीन व्हावे आणि ह्या देहरुपी फुलाचे सार्थक व्हावे!

निलेश सकपाळ
-२३ मे २०२२

जर आणि तर

नश्वरतेचा शिक्का घेऊन जन्माचे देणे मिरवत राहतो, दूर एका काळ्या काळाच्या पुलावरुन मृत्यू विकट हास्य करुन पाहत असतो, सूर्याला जगणे वहावे किंवा अंधाराला शरण जावे की फक्त तटस्थ भुमिका घेऊन उजेड आणि सावलीची सीमारेखा ठरवत जावे, कळत नाही! कळत नाही की आपल्याला न कळणे हेसुद्धा कुणी कळणार्‍याने आपल्याला हे सारे नकळत वाटावे असे पेरले नसेल कशावरुन, प्रश्नाचे उत्तर मिळाल्यानंतर आणि प्रश्नाने भांडावुन सोडलेले असताना लौकिक अर्थाने, भौतिकतेच्या नियमाप्रमाणे आपल्या जिवनामध्ये जाणवणारा अथवा मुल्यांकन करता येईल असा कोणताच फरक पडत नाही, नाही म्हंटले भावार्थामध्ये, मानसिक पटलावर उठलेल्या तरंगांचा तेव्हा ठाव कळतो किंवा आपल्यामध्येच आपण प्रश्नामध्ये असताना प्रश्नानंतरची अवस्था लपुन होती, ती सुद्धा आपल्या नकळत, फक्त त्या एका बदलाच्या नांदीसाठी किंवा भौतिक नोंदीसाठी व्यक्त होण्याची वाट बघत असते! म्हणजे जे झाले नाही अन जे सारे झाले आहे, जे घडणार आहे किंवा जे दिसणार आहे ते आपल्यामध्येच अस्तित्वाला आहे, असते! फक्त दस्तुरखुद्द आपण अनभिज्ञ असतो!

एखादे फुल उन्मळुन जमिनीला बिलगते तेव्हा हृदय पिळवटण्यापेक्षाही एखाद्या अनुत्तरीत भटकणार्‍या प्रश्नाला उत्तर मिळाले नसेल कशावरुन, वाईट वाटण्यापेक्षाही तो मुक्ततेकडे जाणारा सोहळा नसेल कशावरुन! विवस्त्र फिरणार्‍या शरीराने कदाचित आवरणाचा, प्रावरणाचा संग त्यागुन नजरेला भेदाअभेदापलिकडे दिसणार्‍या स्वच्छ, निर्मळ निर्झराकडे विस्थापित केले नसेल कशावरुन! माझ्या दिसण्यावरुन माझे असणे, माझी व्यापकता जर ठरते असेल तर ही संकुचितता नाही कशावरुन, जे दिसत नाही, जिथे कुणी पोहचू शकत नाही तिथे मनाच्या वारुची घोडदौड सुरू असताना एका यत्किंश्चित भौतिक टिंबामध्ये माझे अस्तित्व कसे काय असू शकेल!

न दिसणार्‍या जखमा किंवा अजुनही अव्यक्त असलेल्या जखमा अंगाखांद्यावरुन गुदगुल्या करू लागतात, आपल्यातील आपण म्हणजे कुणीच नसल्याची, किंवा आपल्यामध्ये आपण सोडुन बरेच काही असण्याची जाणिव होत असेल तर, निर्बंध असणे म्हणजे जखडणे असेल अन एखाद्याच्या पुर्ण वशामध्ये असणे म्हणजे मोकळे वाटत असेल तर, दुर्मिळ अन दुरापास्त असणार्‍या भावनांच्या वावटळाशी जर संग घडला तर, इतरांना ज्या गोष्टिचा विचारही थरकाप उडवत असेल नेमक्या त्याच गोष्टिमध्ये आपल्याला इंगित सापडले तर!

जर आणि तर एखाद्या न संपणार्‍या अख्यायिकेचे नायक वाटू लागतात, सभोवताली घडणार्‍या असंख्य घटनांच्या पोटामध्ये घुसुन त्या घटनांचे भांडवल करुन एका अनिश्चततेपासुन दुसर्‍या अनिश्चततेकडे अहोरात्र काळ खाऊन बीभत्सततेचा असंतृप्त ढेकर देत असतात! घड्याळाशी त्यांचा काहीही संबंध नसतो तरीही घड्याळाच्या काट्यांना फितवुन, पुढच्या प्रवासाचे अमिष देत राहतात, कदाचित हे जर आणि तर हे त्या घड्याळाचे काटेच नसतील ना, जग म्हातारं होत असताना हे मात्र फुगडी घालत राहतात, एकमेकांसोबत असतात, भेटतात असे वाटते पण न भेटता सराईतपणे एकमेकांना टाळत असतात, त्यांचे भेटणे म्हणजे काळाचे थांबणे असे वाटुन ते पळत असतात.. पण काळ मात्र त्यांच्यापुढचा खेळाडू आहे… कुणाच्याही थांबण्याने किंवा न थांबण्याने काळाला काहीही फरक नाही पडला, ना पडणार! पण हे त्या काट्यांना, त्या जर आणि तर या दुकडीला कसे उमजेल!

निलेश सकपाळ

२०मे२०२२

तडा गेलेली भिंत!

वादळात असते शांत,
पावसात किती निवांत,
कोण गाणे गुणगुणते?
ही तडा गेलेली भिंत!

एक वेल खांद्यावरती,
अन तुळस बहरु येते
बीज कसे ती रुजवते?
ही तडा गेलेली भिंत!

जरी भेगाळले प्राक्तन,
काळास सामोरी जाते,
सुखदुःख कुठे शोधते?
ही तडा गेलेली भिंत!

टवके उडाले जिण्याचे,
स्वत्व अबाधित राखते
कोणती शाळा शिकते?
ही तडा गेलेली भिंत!

तो पाया खंगला जरी,
संसार झाकत राहते
छताचे सांत्वन करते!
ही तडा गेलेली भिंत!

कुणाचे खिळ्यांचे देणे,
जखमा मिरवत राहते
गूढ सहयात्रिक वाटते!
ही तडा गेलेली भिंत!

-निलेश सकपाळ
१०-०५-२०२२

बाशिंदा

अलवार असो की,
ते असो निब्बर!
जगणे आपले,
नकोच उधारीवर!

आपली दुलई नी,
आपली पथारी
झोपेसाठी नको,
रात्रीचा अडसर!

निरोप घ्यायचा तर,
भेटणे कशाला?
नाव माझे खोडुन,
द्या मोबाईलवर!

इरसाल ते तुमचे,
महाल नी मनोरे!
तिरकी नजर नको,
माझ्या झोपडीवर!

लौकीकात असूदे,
आपणही सहोदर!
निर्व्याज ना मिळाले
कोणीच ते जन्मभर!

सुरेलच असावा तो,
सुर समेवरचा!
कोण अन्यथा थांबे,
फुकट इथे रात्रभर!

हात धरो वा सुटू दे,
प्रवास तो निरंतर!
तुझे माझे करुन का,
मिळे प्रश्नाचे उत्तर!

बाशिंदा मी मातीचा,
या मातीत संपणार
तुम्हास लखलाभ ते,
तुमचे स्वर्गालंकार!

-निलेश सकपाळ
०५ मे २०२२

ओजस्वी

आता पुन्हा नैराश्याची लाट नको,
मागे फिरणारी परतीची वाट नको
उधळूनच पहा, आज उसळून पहा,
हृदयावरील पत्थराला उचलून पहा
हलका हो, उडून पहा,
वार्‍याशी तू बोलून पहा
 
साद ऐक, गद्दारीची भाषा नको,
यौध्दा तू, ती मदतीची आशा नको
खवळूनच पहा, आज चेकाळून पहा,
म्यानातील पात्यास रक्त पाजून पहा,
स्वयंभू हो, नडून पहा,
शत्रूला तू फोडून पहा
 
मुठी आवळ, भ्याडांची बात नको,
किती मरावे? पुन्हा ती रात नको
तेजाळूनच पहा, आज झळाळून पहा,
सुर्यावरील काळाची धूळ झटकून पहा
तेजस्वी हो, जळून पहा,
ओजस्वी तू होऊन पहा
 
 
निलेश सकपाळ
११ ऑगस्ट २००८

शापित अस्वस्थता

सूड घ्यावा असा का कोणी,

गळफास द्यावा आभूषणांनी,

तख्त उजाडले इथे सार्‍यांचे,

नैवेद्य हा नासवला बाटग्यांनी!

तुतारी गरजे तेव्हा रणांगणी,

आज टाहो फोडला बुरुजांनी,

मिरवले उरी ज्यांचे शामियाने,

लाज वेशीवर नेली गिधाडांनी!

आमचे नाकारले आमच्यांनी

करावे काय भूगर्भी मंदिरांनी!

कुरुक्षेत्री धर्म उत्थानला तेव्हा,

अहिंसेस कवटाळले पिढ्यांनी!

पुरोगामी व्हा बेलाशक तुम्ही,

का ते सज्जन व्हावे खाटकांनी?

जेव्हा क्रांतीचा आगाज होईल,

पहिला बळी द्यावा पुरोगाम्यांनी!!

त्या प्रश्नांचे विष प्यायलो आम्ही,

ज्यांची उत्तरे सुस्पष्ट आसमानी!

बिगुल वाजेल ना वाजेल कधी,

समिधा अर्पावी राजाच्या वारसांनी!

भेकड जातील भेकड कारणांनी,

का चिंता वहावी स्वाभिमान्यांनी!

आता भाळावर मृत्यू मिरवू आम्ही,

हिम्मत दावावी कुण्या लांडग्यानी!!

अस्वस्थता शापित ती हिंदुस्थानी,

लाव्ह्याचेही अश्रू पाहिले वादळांनी,

हमखास ग्रहणही फिटणार तमाचे,

अखंडत्वाचे वाण ल्याले मनगटांनी!!

– निलेश सकपाळ

०३ मे २०२२

कवडसा

जुजबी म्हणण्याएवढा मामुली नसावा,

मित्र माझा सूर्याएवढा तेजस्वी असावा!

तो भिकारी कुणाचा माग काढत फिरतो?,

झोळीमध्ये एखादा पाचूचा खडा असावा!

तूर्तास ही विश्रांती जीवघेणी ठरेल वाटते

घळईतुन पायीचा दोर तो ओढत असावा!

ते निखालस लाजणे, आरस्पानी रूप आहे

त्याच्या गावचा कवडसाही शाही असावा!

एकदाच लिहुन टाक माझ्या जन्माचे ओझे,

की माझ्या सुटण्यावर अटींचा स्टार असावा!

शून्यात ती विश्वाची किंमत कळायला लागते

तो शोधता स्वतःचा शोध पूर्ण होत असावा!

निलेश सकपाळ

२० एप्रिल २०२२

कल्पना!

भकास आणि भरमसाट आहेत या भिकार, वांझोट्या कल्पना! वेळेशी तारतम्य नाही अन जगाच्या या स्पर्धेशी देणंघेणं नाही, चारचौघांतील चलनवळणाचा यत्किंचितही विचार नाही, पावलागणिक श्वासांसाठी तरसणार्‍या आणि जीव सोडणार्‍या समाजाशी दुरान्वयेही संबंध नाही. आपल्याच तालात अन कशाचीही भलावण नसलेली बिनधास्त, बिनदिक्कत योजनांमागून योजने आपल्यापासून तोडून टाकणारी, वेळेची अन् काळाची लक्तरं कुठेतरी अंतरिक्षात भिरकावून मदोन्मत्तपणे ठाण मांडणार्‍या या अनंताच्याही पलिकडे आपला वावर असण्याच्या हक्कावर शिक्कामोर्तब करणार्‍या अवलिया म्हणजेच या कल्पना!
ज्याच्याबरोबर यांचा संग खुलला त्याला क्षणार्धात परलोकीच्या पारिजातकाचा सुवास गंधाळून टाकणारी अनन्यता भेट मिळेल तर त्याचवेळेला जर अंधाराच्या कभिन्न पारंब्यांशी जर एखादा यात्री रेंगाळला तर त्याच्या क्षमतेपलिकडील अन् अवाक्यापडील विचाराने झिंजोडून स्वत्वाच्या परीक्षेला सामोरे जायला भाग पडेल.. ठरवून वा न ठरवता कल्पना मानगुटीवर बसत नाही… रिकाम्या भांड्याने जशी तहान भागत नाही.. मोकळ्या ताटाला बघून जशी भूक लोप पावत नाही तसेच शून्य अवस्थेतील किंवा काही करण्याची इच्छा नसलेल्या क्षुद्र जीवांना हा संसर्ग कधीच होणार नाही… जग बदलवण्याची.. स्वतःला आव्हान देऊन स्वतःशी लढून स्वतःला पराभूत करून स्वतःच विजयी होण्याची आस धरून उभे राहणार्‍यास कदाचित या कल्पनांच्या गर्भार वेदनांचा वारसा मिळत असावा… न पाहिलेल्या स्वप्नांवर विश्वास ठेवायला लावणारी सुद्धा एखादी कल्पनाच असते अन आपल्या सख्ख्या नात्यावर विश्वास बसण्यास तडफडवणारीही कदाचित एक अनुभवजन्य कल्पनाच असते… भविष्य घडण्याआधी एखाद्या नेत्याच्या स्वप्नील अन दुर्दम्य आत्मविश्वासपूर्ण नजरेत कल्पनाच असते… बिल्वरी स्वप्नांना पांघरुन अंधार तुडवणारी अन नैराश्य झुगारुन आजच्या पोटातून उद्याचा ध्यास घेणारीही एखादी वेडी कल्पनाच असते! तलम, रेशमी प्रणयांकित झोक्यांत नांदणारी मृण्मयी परिमळणारी युगुले भोवताल विसरुन मोहरतात तीसुध्दा एखाद्या कल्पनेनेच!
लाटांशी तारतम्य शोधताना लाटेच्या प्रेमात पडणारा किनारा त्या लाटेचे क्षणिक अस्तित्व मान्य करताना कोणत्या कल्पनेने त्या प्रीतीस पूर्णत्व बहाल करत असेल कुणास ठाऊक, त्या क्षणानंतर कदाचित या धरेच्या विनाशापर्यंत ज्या किनार्‍याला अमरत्व बहाल आहे त्याने त्या क्षणिक लाटेच्या प्रेमात पडावे अन नंतर झुरावे ही कल्पनाही मर्त्य मानवाच्या संकल्पनांना छेद देणारी आहे!
सोडवूनही न सुटणारी कास म्हणजे कल्पना, आपण झोपलेलो असतानासुद्धा बेलाशक जागणारी कल्पना, सुरकुत्यांमधून काळ गाळून अनुभव वेगळा करणारीही कल्पनाच, नाविन्याचा अंकुर मिरवणारी, धाडसाला जाज्वल्यता परिधान करणारी, तगमगतेला डोहाच्या तळाशी नेऊन समाधीत्व देणारी, भाबड्या निरागस भावाला विश्वासाचे अलवार कोंदण देणारीसुद्धा कदाचित एखादी सुरेल, तरल कल्पनाच असते!
निर्णायक घटकांत बाहुंमध्ये अमर्याद ताकदीचा उद्घोष होतो, रणावरील सरसेनापतीच्या हुंकाराने हजारो मुठींमध्ये वायुवेगाचा संचार होतो, एखाद्या सार्वत्रिक विचाराने तपातपांची खडतर कारावासाची सुवर्णफुले होतात, एका विचाराने पछाडुन एकमेवाद्वितीय पराक्रमांमधून न भूतो न भविष्यती राजाचा, स्वराज्याचा उदय होतो, धमन्यांमधून वाहणार्‍या रक्ताचा जेव्हा मनातील कल्पनांशी गाठ होते.. तेव्हा कदाचित जीवनातील ध्येयाचा, ध्यासाचा एकजीव असा अकल्पित साक्षात्कार नावारूपास येतो! इथेच सामान्यत्वाच्या सार्‍या व्याखांना तिलांजली देऊन असामान्य अन् ध्यासवेड जन्माला येतं हे नक्की!

निलेश सकपाळ
१८ जानेवारी २०२२

दैनंदिनी ०४-११-२०२१

भांडेन मी धुक्याशी,
येणार्‍या नव्या दिवसाशी,
पावलांचे करुन विमान,
भिडेन मी आभाळाशी!

चिंब पावसाच्या नादी लागून प्रवाही होता येत नाही अन वर्षानुवर्षे एकाच जागेवर थांबलेल्या एखाद्या दगडाला पाहुन ध्यानस्थ होता येत नाही, वार्‍याला श्वासांमध्ये घुमवुन मदमस्त मनमौजी प्रवासी होता येत नाही, तर पाण्याच्या तरंगांशी स्वतःला जोडून पाण्याप्रमाणे पारदर्शी वा निर्मळ होता येत नाही, आजूबाजूला असलेल्या अनंताच्या कोड्यामध्ये अडकलेल्या प्रत्येक क्षुद्र जीवजंतूस भेडसावणार्‍या क्षुल्लक अन कुपमंडुक प्रश्नांमध्ये स्वतःला गुंफवुन निर्मोहीपणाची पताका फडकवता येत नाही.. बर्‍याचदा भौतिकाच्या रहाटगाड्यात आपल्याला आपला अंदाज येत नाही किंवा आपल्याला आपलीच ओळख होत नाही, आपण आपल्याच स्वपासुन अनभिज्ञ आहोत, आपण आपल्याच अमर्याद स्वरुपापासुन अज्ञातात समोर दिसणार्‍या क्षणभंगुर गोष्टींवर आपल्या आयुष्याचे वरदान ओवाळुन टाकतो आहोत, आपल्या अंतिम ध्येयाशी होणारी ही आपली फसवणुक नाही का? उलगडणे किंवा उमजणे किंवा अनुभुती येणे किंवा प्रचिती येणे या गोष्टी काय असतात याचा आपल्याला प्रश्नच पडत नाही एवढे आपण व्यस्त आहोत!
आभाळातून काहीतरी शोधत जाणारा एखादा ढग कदाचित आपल्यासाठी काही गुढ संकेत घेऊन जात नसेल ना! झाडाझाडांच्या गर्दीतुन आभाळ शोधत फिरणारे एखादे सुकलेले पान आपल्यासाठी या निसर्गाचा एखादा गुमनाम संदेश घेऊन येत नसेल ना! एखाद्या अनोळखी ठिकाणी रस्ता चुकल्यानंतरही चुकलेला रस्ता जेव्हा आवडू लागतो अन चुकल्याबद्दलचे वाईट वाटण्यापेक्षा जेव्हा चुकलो म्हणुन एखादी समाधानाची लकेर घामेजलेल्या चेहर्‍यावर स्मितहास्य आंदण ठेऊन जाते तेव्हा त्या योगायोगाला काय म्हणाल? विचारांचे ओझे वाटण्यापेक्षा विचारांच्या शृंखलेमध्ये आपल्याला आपल्या अस्तित्वाची एखादी बाजू सापडुन जाते, विचारांचे मंथन किंवा विचारांतुन विचारांकडे घुसळुन जाण्यासाठी लागणार्‍या अंतर्बोधाची चुणुक भोवताली दरवळू लागते तेव्हा कुठे तरी आपली प्रगती होत आहे किंवा होण्याच्या मार्गावर आहे असे समजायला हरकत नसावी.
पाखरांच्या थव्यांशी संलग्न व्हायचे असेल वा खोल दरीमधुन येणार्‍या प्रतिध्वनीमधील कंपनांशी एकरुप व्हायचे असेल वा एखाद्या चित्रामधील रंगसंगतीमध्ये एखाद्या रंगामध्ये भुत अन भविष्याचे कांगोरे सापडुन अस्तित्वाचे विस्मरण व्हायचे असेल तर नक्की कोणती अवस्था, कोणता मार्ग अवलंबावा लागेल हे व्यक्तिसापेक्ष आहे, कदाचित ज्याचे त्याला किंवा त्या विधात्याच्या मार्गदर्शनाशिवाय निव्वळ अशक्यप्राय आहे. काय शोधायचे हे जेव्हा माहित नसते तेव्हा मिळणार्‍या प्रत्येक गोष्टीला कशाशी जुळवुन बघणार किंवा जे मिळाले तेच हवे होते किंवा तेच हासील होते हे जर वेळेनंतर अन मृत्यूपुर्वी उलगडले तर काय अवस्था असेल! जेव्हा मिळाले तेव्हा उलगडले नाही अन जेव्हा उलगडले तेव्हा काळाची कैची इतकी आवळलेली असते की पुनः त्या गोष्टीची अनुभुती, अनुभव घेणे जन्मांतरीचे स्वप्न होते, त्या अनुभवासाठी कदाचित दुसर्‍या जन्माचे मागणे येणार असेल अन मृत्यूलोकातील चक्रात पुन्हा अडकणार असू तर त्याचा उपयोग शून्य!
दिवस अन रात्र यामधील श्रेष्ठता ठरविण्यामध्ये ते काय स्वारस्य असावे, एक श्वास दुसर्‍या श्वासाशी तुलना करुन कसा पाहता येईल? जगण्यासाठी घेतलेला पहिला श्वास अन मृत्यूपुर्वी घेतलेला शेवटचा श्वास याव्यतिरिक्त सर्व श्वास हे फक्त जगण्यासाठीच असतात, त्यांची तुलना नाही होऊ शकत! मोठ्या स्वप्नांचे ओझे मोठे असते तसेच त्यामागुन प्राप्त होणारे समाधानही नक्कीच तेवढेच अनमोल असते, त्यासाठी श्वासांशी झगडावे लागले किंवा श्वासही जर पटावर लावावे लागले तरी बेहत्तर!!